देवांचे दलाल

Submitted by ASHOK BHEKE on 10 November, 2018 - 23:48

मंदिरात जायचे म्हटले की, का कोण जाणे भीती वाटते. ते जागृत देवस्थान म्हटले की अजून मनात भीती निर्माण होते. भीती देवाची नसते, ती असते ती देवपण पांघरलेल्या भटजी पुजाऱ्याची. हे भाविकांचे भटजी नसतातच. ते असतात फक्त त्यांना दक्षिणा देणाऱ्या श्रीमंताचे....! दानपेटीवर त्यांची भलीमोठी थाळी म्हणजे मंदिरापेक्षा त्यांची जमापुंजी अधिक आढळून येते. मध्यंतरी आम्ही एका सुप्रसिध्द मंदिरात गेलो होतो.पंचवीस एक पुजारी त्या मूर्तीच्या भोवती.... दर्शनाला आलेल्या भक्तांच्या हृदयात त्या देवाची झेरॉक्स छापून घ्यायची ही माफक अपेक्षा. त्या कोंडाळे करून राहिलेल्या पुजाऱ्यांकडून होत असलेला अपेक्षाभंग हा कुणाला सांगायचा म्हणजे माझा अढळ विश्वास असून देखील नास्तिकतेचे फटकारे आपल्यावर ओढवून घ्यायचे.
देव जळी स्थळी काष्ठी पाषाणी आहे, हे मान्य असून देखील जेथे दुरावस्था आणि गर्दी असलेल्या मंदिरात चार चार तास रांगेत उभे राहून दर्शनाला जातो तर तेथे उर्मट माणसांचे दर्शन लाभते. दर्शन थाळीत पैसे न टाकणाऱ्या भक्ताला हाकलविणारे तेथील पुजारी किंवा सुरक्षा यंत्रणा जबरदस्त कार्यान्वित असते. भीती हि देवाची नसते तेथील माजोर उर्मट वागणाऱ्या पुजाऱ्याची धडकी भरविणारी असते. उघडे अगडबंब धिप्पाड शरीरयष्टी कमाविलेले हे लोक म्हणजे खरं तर आपले दुकान थाटून बसलेले आहेत. आपली माणसं खरं तर भोळी भाबडी श्रद्धावंत. त्यांच्या भोळेपणाच्या फायदा घेणारे संधिसाधू देखील समाजात वर मान करून फिरत आहेत.
गत महिन्यात एका मुलीचा साखरपुडा होता. देवळातल्या भटजीला सांगितले होते. वेळेवर उपस्थित राहण्याची विनंती काकुळतीने त्या वरमाईने केली होती. नवरा अकस्मात सोडून गेल्यामुळे ती बिच्चारी आपल्या मुलीच्या विवाहाचे सारे काही पाहत होती. साखरपूड्याला माणसं जमली. भटजीचा पत्ता नव्हता. भटजी आले नाही म्हणून फोनाफोनी सुरु झाली. तेव्हा कळले, भटजीला अधिक दक्षिणा देणाऱ्या श्रीमंतांच्या घरची पूजा करायला गेले होते. अखेर आमच्या एका मित्राने त्याला येत असलेल्या मंत्रविधीनुसार साखरपुडा उरकवून घेतला. देवळाबाहेर बसणारे भिक्षुक परवडले, ते तर थाळीत पडलेले सुखासमाधानाने स्वीकारतात. पण हे देवळातले भटजी आपली कार्यकक्षा ओलांडून कुठल्यातरी श्रीमंताची हुजरेगिरी करतात. तेव्हा मनाला वाईट वाटते. देवानंतर आम्ही यांना देवपण बहाल करतो. तेच आमच्या लोकांशी ब्रम्हराक्षस होऊन वागतात. मंदिरात फक्त फुल नारळ आणि प्रसाद चढविला जातो का...? अन्य काही गोष्टी बहाल केल्या जातात. त्यांची कुणाला खबरबात देखील नसते. मागच्या वाटेने त्यांना पाय फुटतात. कारण काही मंदिरात *CCTV* सारखी यंत्रणा कार्यान्वित नसते. असेल तर त्या कॅमेऱ्याचे तोंड त्या दिशेला नसतेच. या देवळांच्या दलालांचे धंदे कितीतरी आहेत.
अकस्मात नवरा गेल्यामुळे विधवा पत्नीला भरणीश्राध्द करणेच भाग आहे. हातावर पोट असलेला नवरा अचानक जाण्यामुळे घरात येणारी कमाई बंद झाली होती.कसं बसं घर चालविणारी ती मंदिरातल्या भटजीकडे आली होती. त्याने तिला ५०० रुपये दक्षिणा सांगितली. तीने त्याला सांगितले इतके पैसे कोठून आणू....! काहीतरी कमी घे बाबा... अगदी काकुळतीने म्हणाली. पण एक छदाम कमी नाही म्हणत तो अड्डेलतट्टू भटजी अडून बसला. शेवटी ती कबूल झाली. काय करणार बिच्चारी....! समाजात राहायचे आहे तिला. उडतउडत ही बातमी माझ्या कानापर्यंत येऊन पोहचली. तेव्हा मी त्या भटजीला समजावून सांगितले. गरीब आहे. थोडंफार सांभाळून घे. मला तो म्हटला देखील नक्की कमी घेणार....! मलाही बरे वाटले, काहीतरी चांगले काम केले की चेहऱ्यावर आनंद झळकतोच.
अखेर भरणीश्राध्द करायला गेलेल्या त्या भटजीने मात्र त्याची जात त्या दिवशी दाखविली. खुशाल त्या बाईकडून ५०० रुपये उकळून मंदिरात परतला. या भटजीला काय म्हणावे.... देवाचे दलाल. त्याला पूर्णच घ्यायचे होते तर मला त्यांनी सांगितले असते तर मी माझ्या खिश्यातले दिले असते. आता तुम्ही म्हणाल मंदिराचे नांव घेऊन लिहायला पाहिजे होते. *मागच्या वेळी एका मंदिराचे नांव लिहिले तर एकाने असा शाप दिला की, तुझे एक महिन्याच्या आत वाटोळे होईल...* तो निस्वार्थी भक्त होता. स्वच्छ मनाने त्याच्या मनातले बोलला होता. मी जवळ जवळ एक महिना चिंतेत होतो. पण मला देवापेक्षा या मधल्या दलालांची अधिक भीती वाटू लागते. देव तर दूरच असतो पण हे मधले दलाल थेट दर्शन घडून देत नाही. यांच्यामुळे जागृत देवस्थानाचा अर्थ बदलत चालला आहे. मुर्तीतल्या देवाने देखील यांच्या ढोंगी, लुटारूवृत्तीमुळे पळता पाय काढला आहे. आता या दलालापासून सावध राहायला हवे...! मी तर सावध आहेच, पण आपणदेखील राहावे. एक आहे चांगल्याला चांगलेच म्हटले पाहिजे. पण जे वाईट करतात त्यांचं समर्थन काही महाभाग करतात. तेव्हा मात्र डोक्यात तिडीक येऊन जाते.

*अशोक भेके*

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users