आमचा सुरमयी विनू

Submitted by ASHOK BHEKE on 10 November, 2018 - 23:44

आमचा विनू म्हणजे *विनायक जोशी*. डोंबिवली सारख्या सांस्कृतिक नगरीला लाभलेले म्हणण्याऐवजी *बँक ऑफ इंडिया* सारख्या राष्ट्रीयकृत बँकेला लाभलेला आनंदाचा झरा. सतत आनंदाने पाझरत असतो. बागा फुलवीत असतो. अनेकांच्या मनातल्या बागा फुलविण्यासाठी त्यांनी उच्चारलेले, वाह .... क्या बात है....! अप्रतिम. काय त्याचं बोलणं, मधात घोळलेले आणि तुपात तळलेलं.एखाद्याने सहज फिदा व्हावं, अगदी तसं गोड बोलणं.काय विलक्षण जादु आहे या माणसात....! निखळ आनंद निर्माण करू पाहणारे श्री विनायक जोशी जसे बोलतात त्याचे कारण त्यांचं जेवणात गोडवा असतो. सहचारिणी पौर्णिमेच्या हाताचा स्पर्श म्हणून की काय त्या मधाळ बोलण्यावर पुरुषवर्गापेक्षा महिलावर्ग अधिक प्रमाणात आकर्षित होतो, हे रहस्य कुणाला न सांगितलेले बरे...! त्यांना तर माहितीच आहे मी काही कुणाला रहस्य सांगत नाही. तरीही ते अधून मधून माझ्यावर आक्षेप घेऊन नाही नाही तू कधी असे बोलत नाही....! हि त्यांची चेष्टा म्हणजे त्यांचे गोड बोलणे बघून मी देखील माझ्या घरी बायकोला सांगितले, आपल्याला देखील गुळ टाकून जेवण करीत जा....! जमणार नाही.....! थेट प्रश्नातला दम काढून घेतला आणि म्हणाली डॉक्टरांनी गोड खाण्यास मनाई केली आहे. तुम्ही मिरचीची भजीच खात जा..! वाटल्यास खर्डा बनून देते. असे दरडावून सांगणाऱ्या बायकोला काय म्हणायचं.
मला लहानपणी शाळेत जबरदस्तीने भाषण करायला उभे केले. भाषण कसं करायचं ठाऊक नव्हतं, गुरुजींनी ढकलत ढकलत मुलांच्या पुढे उभे केले. काय बोलावं..समजत नव्हतं. बंधू भगिनी बोलून झाले आणि पाय थरथरायला लागले. ओठांत देखील वादळ आल्यासारखी स्थिती निर्माण झाली अन यातच माझा माझ्या पोटावर हात गेला तसं मला कारण मिळाले. गुरुजी..... पोटात गडबड. कशीबशी सुटका झाली. सुटका होताना मात्र आग्र्याहून शिवराय निसटले कसे.... हे मनात आले. पण विनू म्हणजे कोणताही विषय असो, घुमवून फिरवून आणतो. भाषणकला सर्वाना जमते असे नाही. विनूकडे मौलिक विचार सांगण्याचे लकब,मानवी स्वभावाचे सूक्ष्म अवलोकन करून मनमोकळेपणाने कौतुक करण्याची सहृदयता, नर्म विनोदाचा शिडकावा या सर्वांचे प्रतिबिंब त्यांच्या समृध्द वकृत्वशैलीत दिसून येते. कधीकाळी आम्ही प्रयत्न केला आणि शौचालय गाठले होते. पुन्हा धाडस होत नाही. विनोदाने गुदगुदल्या करीत समोरच्याच्या चेहऱ्यावर हास्यछटा उमटविणारा नायक म्हणजे विनायक....! आपुलकीने *किशोर तिगडी* त्याला बुवा म्हणून साद घालतो. बुवा कीर्तनकारांना म्हणतात. नव्वद वर्षापूर्व प्रारंभ झालेल्या भावगीतांवर सखोल अभ्यास करीत व्याख्यान देत जुनं ते सोनं कसं होतं हे हरीभक्त पारायणकार आपल्या पांडुरंगाची महती सांगतात त्या प्रमाणे अनेक प्रतीभावंतानी निर्माण केलेल्या भावगीतांचा सखोल चिंतनाचा आस्वाद रसिक प्रेक्षकांना देऊ करणारा विनायक हा या विषयातील अभ्यासाचा नायकच.
विनायक जोशी नावाला वैशिष्ट्ये असेल तर त्यांच्या सुरमयी सांज संगीतामुळे.....! स्वरांचा आराधक आहे. सूर ताल लय यांचा आकृतीबंध असलेल्या त्यांच्या अनेक मैफिली ऐकल्या. त्यांच्या स्वरात आकार आहे तोच तेजस्वी असल्यामुळे कुंदनलाल सैगलचा प्रतीरव घेऊनच मंचावर बाबुलमोराची सुरेल ताण... म्हणजे श्रोत्यांना काहीकाळ तरी भूतकाळात डोकावून आणते. गाणे आमचा प्रांत नाही. पण घरात ऐकायला कंटाळवाणे असते, सुरांची बेचैनी यातना देते, तेच जर मैफिलीत बसल्यावर मात्र ती सुरेल ताण... व्वा व्वा करीत मनसोक्त आनंद भोगतो आणि तेथील वातावरणात रमतो. मनात तरंग उठल्याने आता काहीतरी झंकारत असल्याची अनुभूती ओठावर पुटपुटल्याविना राहवत नाही. गाणं ऐकणं तेवढं माहिती आहे. त्याचा आनंद शब्दापलीकडचा. सांगायचा प्रयत्न करून आपल्या अपंग बुद्धीचे अनाठायी प्रदर्शन केल्यासारखे होईल.
गाण्याप्रमाणे आमच्या विनुला खाद्यआहाराचा फार लळा आहे. *उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म*, हे उगाच म्हटले नाही. जठराग्नीच्या आवडी निवडीकडे लक्ष न देता ताटात आलेले तळलेलं, भाजलेलं,उकडलेलं काही असो....! गपगुमान पोटात ढकलायचे. वरून म्हणायचे, क्या बात है...! म्हणतात असे खाल्याने माणूस लठ्ठ होतो.पण विनुकडे पाहून त्या आहारतज्ञाला लाखोली वाहावी, असेच वाटते. काय खोटे सल्ले देतात. हे खाऊ नका ते खाऊ नका. तरुणपणीचा फोटो आणि आताचा फोटो जरी एकत्र ठेवला तरी ती अंगकाठी आहे तीच अजून तशीच ठेवली आहे. आमच्यासारखे अनेक बालमोहन झाले असतील पण एकही केस न गळलेला विनू....!
कधी कधी वेळ मिळाला आणि कंटाळा आला की, मला असे काहीतरी सुचते. प्रकृती सांगते ते करायचे असते ते लेखकाने. पण गवय्याला रियाज करावा लागतो. ते नादमाधुर्य चोखंदळून पाहावे लागते. पेशकारी जुनी असली ती खुलवून आणि फुलवून नवीन रचनाबध्द करण्याचा प्रयास रियाज घडवून आणतो. जीवनाचा सौंदर्याचा आस्वाद कसा घ्यायचा याची दृष्टी ईश्वराने बहाल केली आहे. जीवनात खळखळून वाहणारा आनंदाचा झरा सतत आपल्या आनंदवनात हसता खेळता बहरता राहो, हि सदिच्छा व्यक्त करून येथेच थांबतो. नाहीतर म्हणाल काय गुऱ्हाळ मांडले आहे.

*अशोक भेके*

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users