अविस्मरणीय दौंड्या / देवदांडा डोंगर

Submitted by सुमित बागडी on 7 November, 2018 - 06:21

November 07, 2018
घरातून ट्रेकिंग ला सतत विरोध होत असल्याने जास्त ट्रेक होत नाहीत. त्यात मी एकुलता एक, मला काही होऊ नये हि घरच्यांची काळजी. ती काळजी रास्तच आहे म्हणा. पण मी कसला ऐकतोय दोन तीन महिन्यातून एखादा ट्रेक तरी मी करणारच. सह्याद्री ची ओढच म्हणा कि ज्यामुळे मला सारखं त्याच्याकडे जावंसं वाटतं. त्याच्या कुशीत एक झोप काढल्याशिवाय कुठल्या सह्याद्री वेड्याला रिलॅक्स वाटणारच नाही.
गोरखगड चा ट्रेक झाल्यानंतर परत ओढ लागली ती येणाऱ्या ट्रेकिंग सीजन ची. आकाश तर नेहमी रेड़ीच असतो त्याचा फोन आला आला कि समजायचं कि ट्रेक प्लॅन रेडी आहे बॅग तयार ठेवा. शुक्रवार चा दिवस होता, शनिवार रविवार काय करायचे याच्याच विचारात होतो. ऑफिसच्या मित्रांसोबत सिनेमा वैगेरे चा प्लॅन होता पण मनापासून जावेसे वाटतच नव्हते. तसा त्यादिवशी दुपारी लंच टेबल वर आकाश चा कॉल आला. आकाश ने सांगितले कि कॅम्पिंग चा प्लॅन आहे शनिवार रविवार मस्त कॅम्पिंग करू. लागलीच ऑफिस च्या मित्रांना सॉरी बोलून टाकले.
आता घरातून परवानगी मिळवण्यासाठी आई चे दोन शब्द ऐकायचे बाकी होते. एक तास आई चे भाषण ऐकल्यावर तिनेच ट्रेक साठी लागणारी शिदोरी बांधून दिली. वडील तेवढ्या घरी आले आणि त्यांचे अर्धा तास परत भाषण. दोघांचे भाषण ऐकल्याशिवाय कुटला ट्रेक चांगला जात नाही म्हणा. सर्व तयारी करून मी शुक्रवारीच आकाश कडे वस्ती ला गेलो. सकाळी ४ ला उठून मिळेल ती ट्रेन पकडून कल्याण गाठायचे होते.
ठरल्याप्रमाणे सकाळी ४ वाजता उठून अंघोळ वैगेरे आटपून आम्ही दोघे निघालो. कांजूर वरून ट्रेन पकडून सकाळी ६:१५ ला कल्याण गाठले.
जुन्नर तालुक्यातील देवदांडा किव्हा दौंड्या डोंगर कदाचित फार परिचित नसावा. डोंगर फार उंच नाही किव्हा कठीण नाही परंतु आसपासच्या घाटवाटा आणि परिसर फारच सुंदर आहे. आम्ही सगळेच त्या ठिकाणी पहिल्यांदाच जाणार होतो. मुरबाडवरून जुन्नर साठी किव्हा कल्याणहून पुणे एसटी व्हाया माळशेज घाट आणि घाट संपताच थोड्यावेळात मढ पारगाव फाटा लागतो तिथून तळमाची या पायथ्याच्या गावात जावे लागते. टीम लीडर साधना होती तसेच आमच्यासोबत अविनाश आणि ऍंथोनी सर सुद्धा होते. साधना आणि ऍंथोनी सरांनी कॅम्पिंग चे तंबू वैगेरे आणि इतर सामान आणले होते.
कल्याण डेपो वर आमच्या आधी ६०-६५ वर्षाचा तरुण माणूस ऍंथोनी सर आणि अविनाश आमची वाट बघत होते. ६:३० पुणे एसटी लागली होती तरी आमची ग्रुप लीडर साधना आली नव्हती. गाडी निघायच्या २ मिनिट आधी साधना धडकली. गोरखगड च्या वेळी आकाश ने साधनालाच फोन करून पर्यायी ट्रेक बद्दल विचारले होते हे मला तेव्हा कळले. एसटी कल्याणहून निघाली तेव्हा ६:४५ वाजले होते. कल्याण ते मढ पारगाव फाटा व्हाया माळशेज घाट असा आमचा प्रवास. सोबतीला माळशेज घाटाचे अलौकिक सौंदर्य.

IMG_20181013_085659271_0.jpg

साधारण एक दीड तासात माळशेज घाटाच्या आधी चहापाण्याची एसटी थांबली, तिथेच सगळ्यांनी गरम गरम वडापाव आणि चहा घेतला. माळशेज घाट संपून थोड्याच अंतरावर मढ पारगाव फाटा लागतो. पारगाव फाट्यावर उतरलो आणि तिथेच एका दुकानापाशी थांबलो तेवढ्यात एक गृहस्थ तिथे भेटले. आमच्या बॅगा पाहून विचारपूस करत साधनासोबत काहीतरी चर्चा सुरु झाली. साबळे मामा म्हणून सगळे त्या भागात त्यांना ओळखतात. साधनांची मामांसोबत जुनी ओळख निघाली , मग काय इकडच्या तिकडच्या गप्पा आणि अनोळखी वाटांबद्दल चर्चा. खूप आधी कधीतरी साधनाने मामांबरोबर एक ट्रेक केला होता त्याच्या आठवणी जाग्या झाल्या. तिथूनच आम्हाला देव दांडा किंवा दौंड्या डोंगर च्या पायथ्याशी असणाऱ्या तळमाची या वाडीत जायचे होते. फाट्यावरून जवळपास ५-६ किलोमीटर आत तळमाची गाव आहे. साबळे मामानी ट्रॅक्स वाल्यासोबत वाटाघाटी करून दिली आणि गाडीत बॅगा टाकून आम्ही तळमाची ला निघालो. रस्त्यातच साधनाला कळलं कि आमच्या आधी तिच्या ओळखीचे कोणीतरी आधीच डोंगरावर गेले आहेत. होईल भेट मधेच म्हणून आम्ही तसेच पुढे निघालो

44170517_1087635838077257_5115583049156788224_n.jpg.

गाडी तळमाची ला जिल्हा परिषदे च्या शाळेजवळ थांबली. जवळच असलेल्या दीपक साबळे च्या घरी बॅगा टाकल्या आणि पाणी वैगेरे पिऊन कोरा चहा घेतला. मला कोऱ्या चहा ची सवय नाही पण सगळेच पितायत म्हणून मी नाही म्हणू शकलो नाही. दीपक च्या आई बाबानी आपुलकीने जेवणाचा आग्रह धरला. पण आम्हाला पुढच्या वेळेचे भान ठेवून निघावेच लागले. दोघांनाही नम्रपणे नकार दिला तरीपण त्यांनी भाजी भाकरी आणि भात दीपक सोबत पाठवलाच. दीपक आमच्यासोबत येण्याचे नियोजन नव्हते पण जेवणाच्या निमित्ताने तो सुद्धा आमच्यात सामील झाला. सामील झाला ते बरेच झाले पुढे पुढे आम्हाला त्याची फार मदत झाली. दीपक साबळे हैदराबाद ला कामाला आहे. सुट्टी घेऊन अराम करण्यासाठी म्हणून तो काहीदिवस आला होता. दीपक साबळेंच्या घरासमोरूनच डोंगरावर जायची वाट आहे. समोर वरती पाहिल्यावर कोणीतरी आपली जनावरे चरण्यासाठी डोंगरावर गेलेले दिसत होते. दिपकच्या वडिलांनी आम्हाला वाटेला लावून दिले.
नुकताच पावसाळा संपला होता त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात सुंदर फुलांची रास होती. कुठे कुठे फोटो काढायचे हा प्रश्न होता. आमच्या कॅप्टन साधना ला सुद्धा त्या सुंदर बॅकड्रॉप वर फोटो काढण्याचा मोह आवरता आला नाही.

IMG_20181013_110654035.jpg

अर्ध्या तासाच्या चाली नंतर मगाशी दिसलेले मामा भेटले, शेळ्या मस्तपैकी चारण्यात मग्न होत्या. मामांची विचारपूस आणि रामराम करून आम्ही पुढे निघालो. थोड्या चाली नंतर छोटीशी खडकाळ नाळ आणि मग लगेच सपाटी. वाट फारच सुंदर थोडे फोटो सेशन केल्यानंतर पुढे निघालो. दीपक आमच्या नंतर घरातून निघून सुद्धा आम्हाला अर्ध्यातच भेटला होता. वर सपाटीवर पोचलो तेव्हा जेवणाची वेळ झाली होती. सगळ्यांच्या बॅग मध्ये पुरेसे पाणी होते तरी सुद्धा पुढे कमी पडायला नको म्हणून आम्ही दीपक ला आजूबाजूला कुठे पाणी आहे का असे विचारले असता त्याने जवळच एक छोटे टाके आहे असे त्याने सांगितले. तिथे पोचताच आमचा निरास झाला. ते टाके अगदीच छोटे होते आणि संपूर्ण चिखलाने माखले होते. लहान खळगीच होती ती. दीपक ने स्वतःच्या हाताने तो चिखल साफ केला, हेतू फक्त एवढाच कि जरी आम्हाला हे पाणी नाही मिळाले तरी दुसऱ्या एखाद्या वाटसरू ला ते मिळेल. तिथेच एका झाडाखाली आम्ही दुपारचे जेवण उरकले. मगाशी सांगितल्याप्रमाणे सपाटीवर आल्यावर आम्ही पाण्याच्या शोधात डावीकडे वळलो. खरी वाट आमची उजवीकडे जायची होती. जेवणे उरकल्यावर पुढच्या प्रवासाला लागलो.

IMG_20181013_144851055.jpg

जवळच असलेल्या जनावरांच्या शेड च्या बाजूने सरळ चाल सुरु झाली. पठारावर संपूर्ण पिवळेधम्मक माळरान सोबतीला रंगेबिरंगी फुलांचा सडा. मध्येच झाडीभरली वाट. दीपक ने व्यवस्तिथ वाट दाखवली. थोडे पुढे गेल्यावर एकेठिकाणी कोरीव पायऱ्या लागल्या पायऱ्यांचे थोडे निरीक्षण करून पुढे अजून माळरानात आलो. तिथेच आमच्या आधी आलेले साधनाच्या ओळखीचे गृहस्थ भेटले. मग सुरु झाल्या गप्पा, ट्रेक च्या आठवणी. नवीन वाटांबद्दल माहितीची देवाण घेवाण. मग सगळ्यांसोबत फोटो. आणि मग ते त्यांच्या वाटेल आणि आम्ही आमच्या वाटेला.

IMG_20181013_123841397.jpg

उजव्याबाजूला खाली तळमाची गाव आणि दीपक साबळेंचे घर स्पष्ट दिसत होते खालचा संपूर्ण परिसर देवदांडा डोंगराच्या अर्ध चंद्राकार आकारात वसलेला आहेत. ते दृश्य पाहून मला लोणार येथील सरोवराची आठवण झाली. दूरवर कुठेतरी गावात भजन चालू होते त्याचा आवाज हवेच्या झोताबरोबर इतक्या वर सुद्धा ऐकू येत होता. १५-२०मिनिटानंतर झाडीभरली वाट सुरु झाली. पाऊस नुकताच संपला होता म्हणून आता फार झाडी वाढली होती. पायाखालची वाट स्पष्ट होती पण उंच झाडी मुळे वाट कधी कुठे वळण घेईल काही सांगू शकत नव्हते म्हणून सगळी झाडे झुडपे तुडवताच आम्ही पुढे निघालो. शेवटी अशी एक वेळ आली कि वाट अचानक गायब. दीपक पण थोडावेळ थबकलाच पण त्याला माहित होते कि वाट आतूनच कुठून तरी आहे. अविनाशला वाट शोधण्यात जास्त कष्ट घ्यावे लागले नाही. थोडे उजवीकडे पाहिल्यावर वाट हळू हळू उघडत गेली. अचानक पुढे परत झाडीभरली वाट सुरु, काही ठिकाणी तर अगदीच अस्पष्ट होत गेली होती. कदाचित पाऊस संपल्यानंतर इकडे आम्ही पहिल्यांदा आलो असावेत. आमच्या आधी आलेला ग्रुप सुद्धा नक्कीच इकडून गेला नसणार.

44277347_1087631728077668_391791185938612224_n.jpg

आम्ही ज्या वाटेने पुढे जात होतो ती उजवीकडच्या कड्याजवळ जात होती. एकेठिकाणी झाडी असह्य झाल्याने दीपक ने उजवीकडून खाली उतरायला सांगितले. आम्ही अजूनच कड्याजवळ पोचलो तेव्हा तिथे शेवटी थोडे मोकळे रान मिळाले. थोडावेळ कडेने चालतो तोच पुन्हा डावीकडून वर जावे लागले. पुन्हा झाडीभरली वाट. आता मात्र आम्ही खरॊखरच नसलेल्या पण अस्पष्ट अशा वाटेजवळ होतो. वाट बनवतच पुन्हा डाव्या बाजूने अजून वर चढत गेलो आणि शेवटी सोनेरी गवताळ माळरानातून वाट बनवत उजवीकडून वर. थोडे वर जातो तोच अजून एक वाट डाव्या बाजूने येताना दिसली. कदाचित आम्ही चुकीच्या वाटेने बरोबर पोचलो होतो.

44099142_1087631871410987_3414281335672406016_n.jpg

डावीकडे दिसत असलेल्या उभ्या पॅच च्या माथ्यवर वनदेवतेचे मंदिर आहे. उजवीकडे अजून एक पॅच आहे पण तिथे दोर शिवाय वर चढता येत नाही. वर पोहोचताच आजूबाजूचा नजर मन मोहक होता पलीकडे दूरवर दिसणारा कोकण भाग उजवीकडे दूरवर दिसणारा हरिश्चंद्र गड, सारा काही अप्रतिम. असा उभा सह्याद्री बघितल्यावर इथेच कायमच राहावा असा नेहमी वाटतं. वन देवतेच्या मंदिराचा पॅच चढणे आणि उतरणे बाकी होते. आम्ही वरूनच रात्रीच्या मुक्कामासाठी चांगली जागा हेरली. त्यात दुग्धशर्करा योग्य म्हणजे जवळच मुबलक प्रमाणात पाण्याचे साठे दिसत होते. ठरलं तर आज तिथेच मुक्काम.
आता सुरु झाला तोच वन देवतेच्या मंदिराजवळ पोहोचवणारा कठीण उभा पॅच. हा पॅच खूपच नॅरो आहे तसेच काहीठिकाणी स्क्रि सुद्धा. माझ्यासाठी खूप कठीण होत तो पॅच पार करणे. दीपक ने हातात चपला घेतल्या आणि लीलया तो पार केला. त्याच्यासोबत अविनाश ने सुद्धा पॅच सहज पार केला. आकाश आणि साधनाने सुद्धा हळूहळू पार केला. मला मात्र खूप मेहनत घ्यावी लागली पण मी सुद्धा पार केलाच. पॅच संपल्यानंतर
नेहमीप्रमाणे आकाशला माझा पहिला प्रश्न " उतरायला दुसरा रस्ता आहे का" त्यावर साधना च उत्तर " अरे जसा आलास तसाच उतरुन पण जाशील, घाबरायचं काय त्यात." एकाअर्थी सल्ला वजा आदेशच म्हणा. आता काय पुढे बोलणार. ऍंथोनी सर आमच्या सोबत न येत तिथेच खाली अराम करत बसले. वन देवतेचं दर्शन घेऊन पुन्हा त्याच पॅच ने उतराई. अक्षरशः फाटली उतरताना. पण उतरल्यावर आपण हे करू शकलो याचे समाधान वाटले ते वेगळेच.
तितक्यात ऍंथोनी सरांनी आमच्या निदर्शनास आणून दिले कि आपल्या वस्तीच्या जागेवर सावली पडत चालली आहे. लगेच सगळ्यांनी घाई केली आणि पुन्हा आम्ही रात्रीच्या मुक्कामासाठी निवडलेल्या जागेवर उतरण्यास सुरुवात केली. मगाशी ज्या वाटेने आलो त्या वाटेने न जाता आम्हाला जी वाट मधेच मिळाली त्या वाटेने खाली उतरण्यास सुरुवात केली. थोडं खाली गेल्यावर मध्ये दीपक ने डावीकडे गेलेल्या एका गर्द झाडीतल्या वाटेकडे निर्देश केला. तीच वाट आम्हाला थेट आमच्या राहायच्या जागेवर घेऊन गेली. आम्ही तिथे पोचलो तेव्हा संध्याकाळचे ५ वाजले होते. लगेच आमचे तीन तंबू लागले ,

44265575_1087632548077586_8642650582504439808_n.jpg
वरील छयाचित्रात आग न पेटवता फोटोग्राफी साठी रंगीत बाटलीवर प्रकाश सोडून आगीचा इफेक्ट देण्यात आला आहे.

दीपक आणि मी जवळच्या ओढयावरून पाणी भरून घेतले. दीपक च्या घरून आणलेले दोन टोप आम्हाला खूप उपयोगी पडले. ओढ्या शेजारीच एक खडकाळ जागा बघून आम्ही चूल मांडली. राहत्या जागेजवळ फारच सुके गवत असल्याने आम्हाला तिथे चूल मांडता आली नाही. ओढ्यातील पाणी वाहते होते त्यात थंडगार पाणी असल्याने मला पिण्यावाचून राहवले नाही. सोबतच्या बाटल्या आणि पोट तुडुंब भरून घेऊन आम्ही गरमागरम चहा बनवला. चहा झाला तेव्हा मिट्ट काळोख पडला होता. त्याआधी साधना आणि ऍंथोनी सरांनी रात्रीच्या जेवणाची तयारी केली होती. आकाश आणि अविनाश ने तंबू नीट लावून घेतले.

44141359_1087632874744220_2127370496541458432_n.jpg

रात्री स्वतः ऍंथोनी सरांनी सोयाबीन पुलाव आणि कोशिंबीर केली. दिवसभराचा शीण एव्हाना देवदांडा च्या थंडगार हवेमुळे पळून गेला होता. गरमागरम आणि चविष्ट पुलाव सगळ्यांनी मनसोक्त हादडला, भरीला कोशिंबीर होतीच. जेवणे उरकल्यावर आजूबाजूचा भाग व्यवस्तिथ साफ करून रात्रीची गप्पा गोष्टी आणि ऍंथोनी सरांची गाणी सुरु झाली. आकाश सोडून बाकी तिघांनाही मी पहिल्यांदाच भेटत होतो. पण एव्हाना छान गट्टी जमली होती. रात्रीचे ११:३० वाजले तसे सगळे पेंगू लागले हळूहळू आणि आपापल्या तंबूत झोपी गेले. सकाळी लवकरात लवकर उठून आम्हाला वनदेवतेच्या आजूबाजूचा परिसर फिरायचा होता.

44121580_1087632838077557_7188382687667683328_n.jpg

सकाळी ५:३० वाजले आणि मला जाग आली. बाकीचे अजून गाढ झोपेतच होते, मी आपला फ्रेश वैगेरे होऊन सूर्योदय होण्याची वाट पाहू लागलो. सूर्यनारायणाच्या येण्याची चाहूल लागताच सर्वाना मोठ्यानें आवाज देतच उठवले. लालबुंद सूर्यदेव सुद्धा नुकतेच झोपेतून जागे झाल्यासारखे भासत होते. हळूहळू सोनेरी छटा संपूर्ण आसमंतात सामावून गेल्या. मस्त फोटोग्राफी वैगेरे झाली.

IMG_20181014_064056548.jpg

दीपक आणि मी चहाच्या तयारी ला लागलो. चहा नास्ता उरकून, तंबू आणि इतर सामान गुंडाळून, आजूबाजूची जागा स्वच्छ करून पुढच्या मार्गाला निघायची तयारी. आज वन देवतेच्या खालच्या भागातून बाजूच्या कातळभिंतीला डावीकडे ठेवून सरळ देवदांडाच्या शेवटच्या टोकाला वर पर्यंत जाऊन पोहोचलो. जबदस्त नजारा, डावीकडे दूरवर पसरलेला कोकण चा भाग, समोर आदियोगी हरिश्चंद्र गड आणि आसपास चा परिसर. डावीकडे खाली माळशेज घाटाचे विहंगमय दृश्य, आणि उजवीकडे तळमाची आणि आसपास चा परिसर. सारे काही इतके विहंगमय होते कि कोणाचीच तिथून निघायची इच्छा होत नव्हती.

44023140_1086569848183856_2612997178775306240_n.jpg

मनसोक्त तासभर फोटोग्राफी केल्यावर आम्ही पुन्हा खाली उतरून कडेनेच परतीला लागलो. या सर्वामध्ये आम्हाला ११ कधी वाजले कळलेच नाही. थोडे पुढे चालत जातो तोच पाण्याचा खळखळ आवाज येत होता. काल रात्री आम्ही ज्या ठिकाणी राहिलो त्याच्या बाजूचा ओढा तिथेच खाली येत होता. तिथेच एका झाडाखाली सगळे विसावले आणि दुपारच्या जेवणाची ची तयारी सुरु केली. ती जागा इतकी परफेक्ट होती कि एकाच ठिकाणी दोन मोठी नैसर्गीक खळगी तयार झाली होती. दोन्ही पण खळगी इतकी मोठी होती कि सहज बुडून अंघोळ करता येऊ शकत होती. वरच खळग ऍंथोनी सरानी जेवणाच्या पाण्यासाठी राखून घेतलं. खाली आकाश आणि मी दोघांनी मनसोक्त आंघोळ आणि फोटोग्राफी केली.

ऍंथोनी सरानी पुन्हा चविष्ट मॅगी तयारी केली. वाह ऍंथोनी सरांचा स्वयंपाक इतका चविष्ट होता कि भले भले शेफ्स पण नापास. मस्त मॅगी खाऊन पुन्हा आवरून पुढच्या वाटेल लागलो. आता मात्र दोन दिवस पुरतीच दमछाक झाली होती. आमचा प्लॅन होता कि देवदांडा डोंगराच्या दुसऱ्या बाजूला जाऊन तिथला भाग पालथा घालण्याचा पण पुढे जायची कोणाचीच ईच्छा राहिली नव्हती. जवळच असलेल्या डॅम ला भेट देऊ असे सगळ्यांचे मत झाले. तसेच पुन्हा परतीच्या वाटेल लागलो. निघता निघता आकाश ने कोडी घातली. ती सोडवत सोडवत मजा मस्करी करत खाली उतरायला सुरुवात झाली. मधेच सुंदर अशा वानरसेनेचे दर्शन झाले. खाली उतरायला अर्धा पाऊण तास लागला. पुन्हा दीपक साबळेंच्या घरी येऊन विसावलो तेव्हा सगळ्यांची डॅम वर जाण्याची इच्छा मेली होती. साधना ने दीपक ला आमचा हिशोब विचारला तेव्हा दीपकचा स्पष्ट नकार आला. दीपक ने आमच्यासोबत येऊन खूप मदत तर केलीच पण अनोळखी वाटा आणि आसपासच्या परिसराबद्दल फार छान माहिती दिली होती पण गाईड हे त्याचे काही काम नव्हते , तो फक्त फिरायला म्हणून आमच्यासोबत आला होता. ऍंथोनी सरांनी सुद्धा खूप समजावले पण तरीसुद्धा एकही पैसे घेण्यास त्याने नकारच दिला. शेवटी बळेबळेच सरांनी थोडे पैसे त्याच्या खिशात टाकले.साबळेंच्या घरी अर्धा पाऊण तास आराम आणि पुन्हा तळमाची ते पारगाव फाटा - कल्याण- मुंबई असा प्रवास सुरु.
घरी आल्यावर मात्र माझी काही खैर नव्हती कारण माझ्या डाव्या पायाच्या डाव्या अंगठ्याला मस्तच दुखापत झाली होती. एकतर आधीच असलेला विरोध त्यात पायाला दुखापत म्हणजे आगीत तेल. शेवटी घरी जाऊन आई च्या चार शिव्या खाल्ल्या तेव्हा जाऊन कुठे ट्रेक पूर्ण झाल्याचे समाधान वाटले. पण दुःख एवढेच होते कि पुढचे ३-४ महिने तरी ट्रेक बंद असणार होता. दुखापत झालेला अंगठा हे कारण पुरे होते आईसाठी माझ्यावर ट्रेकबंदी लादायला.

छायाचित्र - आकाश मगदूम आणि साधना चंदनशिवे

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

खूप दिवसांनी छान ट्रेक वर्णन वाचले . फोटो देखिल मस्त. तो देवतेच्या मंदिराचा सिलुएट वाला फोटो तर एपिक आहे. एखादे रॉकेट उतरले असावे स्पेस मधून असे वाट्ते. रात्रीचा तंबू वाला फोटो पण सुरेखच आला आहे. साधना ताईंचे खास कौतूक . त्यांना कळवा बरे का. तुमचा अंगठा बरा झाला का आता? काळजी घ्या. अजून ट्रेक करायचे आहेत.

तो देवतेच्या मंदिराचा सिलुएट वाला फोटो तर एपिक आहे >>>> क्रेडिट गोस टू आकाश मगदूम
तुमचा अंगठा बरा झाला का आता? >>> हो आता बारा आहे पण आई च्या मते अजून बरं नाही झालाय Happy Proud
नुसते वाचून आणि फोटो पाहून मनसोक्त शांत वाटले ... .>>>> धन्यवाद @पशुपत

आम्ही पहिल्यांदा कॅम्पिंग करण्याचा विचार करतोय.. तुम्ही आम्हाला तेथे जाण्याचा सल्ला द्याल का ? किंवा आणखीन कुठे जाण्यास सूचना ?

@Coolvishuu नवीन ठिकाणी जाताना नेहमीच गाईड ला सोबत घेऊन जा तेच सगळ्यात सोईस्कर. ती जागा तशी सुरक्षित आहे. बिनधास्त जा