हे प्रकाशपर्वा

Submitted by दत्तात्रय साळुंके on 7 November, 2018 - 01:56

हे प्रकाशपर्वा

हे प्रकाशपर्वा तू झगमगतोस महाली
घे पुसून यंदा झोपडीची खुशाली
उल्लंघुनी या मदमस्त भिंती कुबेरी
उजळू दे दिवाळी श्रमिकांच्या दारी

लाव एक पणती तिथे कुबट झोपडीत
जिथे रक्ताची चिमणी जळे दिन रात
सुखाची वात लाव स्वप्नील डोळयात
रोजच होऊ दे तयांची दिवाळीपहाट

ते राकट काळे तडकलेले हात
सुरकुत्याची रांगोळी नखशिखांत
नको घालू घास गोडाचा तोंडात
दे एक रोटी त्यांच्या ताटात

तो बालकृष्णही नागडा कृश देही
पान्हा यशोदेचा आटत जाई
ना मागतसे टिकली फुलबाजी
दे वाटीभर दूध, होईल आतषबाजी

नको देऊ नवनवी वस्त्रप्रावरणे
झाकाया लाज दे जुनेर एखादे
रापल्या भिंती जराजर्जर झोपडीच्या
त्रिपुरारी तयावर ओसंडू दे

© दत्तात्रय साळुंके

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

सुखाची वात लाव स्वप्नील डोळयात
रोजच होऊ दे तयांची दिवाळीपहाट.....

अत्यंत छान कविता आहे. मनापासून आवडली.

उल्लंघुनी या मदमस्त भिंती कुबेरी
उजळू दे दिवाळी श्रमिकांच्या दारी>> खूपच सुंदर
रापल्या भिंती जराजर्जर झोपडीच्या
त्रिपुरारी तयावर ओसंडू दे>> हे पण आवडलं

सग्गळ्याच ओळी छान ! आवडली कविता

तो बालकृष्णही नागडा कृश देही
पान्हा यशोदेचा आटत जाई
ना मागतसे टिकली फुलबाजी
दे वाटीभर दूध, होईल आतषबाजी>>> करुण ओळी आहेत। मनाला भिडणारी कविता। खूप आवडली।