कांदिसा -२

Submitted by किरणुद्दीन on 19 October, 2018 - 22:44

ह्युंडेर !

जगातल्या सर्वात उंचीवर असलेल्या वाळवंटाला लागून असलेले गाव. इथले प्रसिद्ध सॅण्डड्युण्स पहायला जगभरातून लोक येतात. दोन वशिण्ड असलेले उंट हा दुर्मिळ प्राणी आणि याक हे इथले वैशिष्ट्य.
जगभरातल्या फोटोग्राफर्सना खुणावणारे अप्रतिम निसर्गसौंदर्य लाभलेल्या या भूमीला गरीबीचा शाप आहे.
नुब्रा खोरे या नावाने ओळखले जाणा-या खो-यात नुब्रा पलिकडून वाहते तर इथे श्योक नदी वाहते.

दोन्ही बाजूंनी पर्वतशिखरांच्या रांगा आणि मधे हे अतुंद खोरे.
खलसरच्या पुढे घाट सुरू होतो. तो खारदुंगला इथे १८००० फूटांपर्यंत उंचीला पोहोचतो. जगातले सर्वात उंच रस्त्याने जोडले गेलेले ठिकाण म्हणून खार्दुंग ला प्रसिद्ध आहे. खार्दुंग ला पासून खाली उतार आहे. हा रस्ता लेहला जातो. लेह पासून एक रस्ता मनाली आणि दुसरा कारगिल मार्गे सोनमर्ग आणि पुढे जम्मू असा जातो.

चंदीगढ वरून हवाई दलाच्या विमानाने येताना या भागाची दुर्गमता पहिल्यांदा पाहीली तेव्हांच पोटात गोळा आलेला.
वरून फक्त हिमालयाची शिखरं दिसतात. त्यावर बर्फ साठून राहीलेला. त्याखाली ढग आणि वर निळे आकाश.
शिखरांचा तळ किमान नऊ ते दहा हजार फूट उंचीवर.
जर खाली पडलोच तर कुणी शोधायला येणार नाही अशी दुर्गम भौगोलिक रचना.
थॉईस ला जाणारे विमान लेहला वळसा घालून खार्दुंग ला जवळून येते तेव्हां विमानाला एक झटका बसतो.
याबद्दल अनेक मत मतांतरे आहेत. हवाई दलाचे अधिकारी त्याला एअर पॉकेट्स म्हणतात.
आर्मीचे जवान, जेसीओज खार्दुंगलाचा डोंगर विमानाला ओढतो असे म्हणतात.
मोठ्या विमानाला झटका सौम्य बसतो. पण छोट्या विमानात चांगला जाणवतो.

नुब्रा व्हॅलीच्या तोंडाशी दोन्ही पर्वतरांगांमधे एक छोटीशी जागा आहे. हवाई दलाचे तरबेज वैमानिकच या अरुंद खिंडीतून विमान आणू शकतात.
विमान थोडे जरी इकडे तिकडे झाले तर डोंगराला धडकून कपाळमोक्ष ठरलेला असतो. हवाई दलाचे मोठे विमान अगदी मधून जमिनीशी कोन करत खाली येऊ लागते. इथून ४५ किमी अंतरावर असलेल्या थॉईस विमानतळावर ते उतरते.

छोट्या विमानाला गिरक्या घेत उंची गाठावी लागते. हवेच्या दाबाने भरकटण्याची त्याला भीती असते.
वारं इथं भन्नाट वेगाने वाहतं.
हे थंड वारं अडवून हिमालय देशाचे संरक्षण करत असतो.
आणि शत्रूही इथून यायची कल्पना करत नाही.
मात्र १९८४ पासून पाकिस्तानने इथली काही गावं नष्ट केली. तेव्हां भारताने ऑपरेशन मेघदूत नावाची मोहीम राबवून पाकिस्तानने घेतलेला प्रदेश परत मिळवून तिथे विमानतळ उभारला.
हा सर्जिकल स्ट्राईक अत्यंत गुप्ततेने केल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याची वाच्यता झाली नाही.
त्या वेळी इथल्या गावांनी भारतीय सैन्याला साथ दिली होती.
सरकारने ही मदत लक्षात घेऊन आणि इथल्या गावांचे रणनैतिक महत्व लक्षात घेऊन त्यांना अनेक सुविधा लष्कराच्या माध्यमातून पुरवल्या.

काही जणांना ती खैरात वाटते. पण लष्करी अभ्यासकांना शत्रूचा काश्मीरमधे घुसण्याचा मार्ग रोखण्याची फीस वाटते.

इथे उतरल्यापासून एका गूढ प्रदेशात आपण आल्याची जाणीव संवेदनशील मनाला होत राहते.

नदीच्या किनारी पंप हाऊस पाशी मुलांसोबत गप्पा मारत असताना एकीकडे हे सगळं आठवत होतं.
अगदी पहिल्यांदा आत मधे पाच स्वेटर्स, जाड मोजे, थंडीचे बूट असा पेहराव करून फिरत असताना एकही कपडा अंगावर नसलेली मुलं बर्फातून गाडी गाडी खेळताना दिसली होती. आमच्या अंगावरचं कपड्यांचं ते प्रदर्शन पाहून ती पोरं हसत होती.

आत्ता त्यातल्या एका चुणचुणीत मुलाला घेऊन त्यांच्या शाळेकडे निघालो.
शाळा म्हणजे एक देखणा विहार होता. इथली सर्व बांधकामे अत्यंत देखणी आहेत.
स्थानिक दगड, सिलिकामिश्रीत माती आणि लाकूड यांचा वापर करून चिनी पद्धतीचे बांधकाम केलेले असते.
ब्रूसलीच्या कुठल्याही सिनेमातले कुंगफू स्कूल असावे तशीच शाळा होती.

इथे सर्वत्र असतात तसे बुद्धाचे मंदीर (?) होते. हा धड पॅगोडा ही नाही आणि मंदीरही नाही असा प्रकार आहे.
मंदीराच्या बाहेर एक मोठा रंगीत नक्षीदार ड्रम असतो. तो आसाभोवती फिरतो.
तो हाताने फिरवायचा. एक आवर्तन पूर्न झाले की घंटीचा आवाज येतो. आपण जेव्हड्या जोराने फिरवू तितक्या वेळा घंटीचा आवाज येतो.
प्रत्येक आवर्तनासोबत ओममणीपद्मेण ने सुरू होणारा मंत्र एक हजार वेळा पूर्ण होतो अशी स्थानिकांची श्रद्धा आहे.

प्रत्येक बुद्ध मंदीराला बाहेरून दगड लावलेले असतात. त्या दगडांवर चुन्याने काहीतरी लिहीलेले असते. कधी कधी रंगानेही. काही दगडांवर इथल्या भाषेत काहीतरी लिहीलेले फडके बांधतात. त्याबद्दल विचारले तर कुणी काही सांगितले नाही.

शाळा एक बौद्ध भिक्खू चालवत होते.
स्वतःच्या कमाईतून त्यांनी शाळा उभारली होती. अनेक खटपटी करून या भागात सरकारकडून परीक्षा सुरू करवून घेतल्या होत्या.
माझ्या सुदैवाने भंतेजी शाळेतच होते.

त्यांना इंग्रजी आणि हिंदी उत्तम येत होते. ही खूप कामाची गोष्ट होती.
महाराष्त्रातून आलो असे म्हटल्यावर खूप प्रेमाने विचारपूस केली. त्यांनी अंगावर एक चीवर घेतले होते. त्याच्या आत काहीच नव्हते. डावा खांदा आणि हात उघडाच होता.

मी त्यांना विचारले "तुम्हाला काही होत नाही का ?"
कारण थंडीने रक्त गोठून शिरा फुटतात हे इथे येण्याच्या आधी ओरडून सांगितले जाते.

ते हसले फक्त.
म्हणाले मला मेडीकलचे ज्ञान नाही. पण आत्मशक्तीच्या जोरावर शरीर कणखर होत असते. शिवाय स्थानिक असल्याने वातावरणाशी आमचा डीएनए जुळवून घेत असावा. तुम्ही असे साहस करू नये.
भंतेंना मग ड्र्म विषयी विचारले.
ते म्हणाले "लद्दाखींच्या श्रद्धा आहेत या.
अगदी प्राचीन.
बौद्ध धम्माशी ओळख होण्याआधीपासून चालत आलेल्या गोष्टी आहेत.
त्या बदलल्या नाहीत आणि बदलणारही नाहीत.
ही आमची सांस्क्रुतिक ओळख आहे".

मी विचारले. " त्या पताका कसल्या असतात ? "

भन्ते पुन्हा हसले. त्यांना उत्तर द्यायचे नव्हते.
पुन्हा पुन्हा विचारल्यानंतर ते म्हणाले
"तुम्ही शहरी आणि आधुनिक माणसं आहात. जे लोक इथे राहतात त्यांना भेडसावणा-या समस्या , वाटणारे भय याचे समाधान चटकन होत नाही. इथे अद्याप अत्याधुनिक सुविधा पोहोचल्या नाहीत. अजूनही आम्ही आठव्या नवव्या शतकात वावरतो.
प्राचीन संस्कृतीशी जवळ आहोत.
काही गोष्टींचे स्पष्टीकरण नाही देता येत,
मी स्वतः नास्तिक आहे. पण मला स्थानिकांच्या भावनांचा आदर करावासा वाटतो"

शेवटचं वाक्य सूचक वाटलं.

या भेटीनंतर कित्येक दिवस नजर हटकून तो ड्रम, बाहेरचे दगड आणि त्यावरच्या गूढ पता़का यावर जायची.

चालताना हा सगळा पट डोळ्यासमोरून सरकत होता. ह्युंडेर बस स्टॉपपासून डांबरी सडकेने मिलटरी हॉस्पिटलकडे आलो.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

छान

छान लिहिताय, मजा येते आहे वाचायला.
" त्या पताका कसल्या असतात ? "
ह्या प्रश्नाचे नंतर काही उत्तर मिळाले का?

छान वर्णनशैली ...
मागील भागात तुम्ही लिहिलेत क्रमशः लिहायला लागते कारण मराठी एडिटिंग. याविषयी एक सोपा उपाय करू शकता तुमच्या स्मार्ट फोन मध्ये WPS ऑफिस डाऊनलोड करा प्ले स्टोअर मधून . डब्लू पी एस ऑफिसला थोडी स्पेस लागते . टंकन करण्यासाठी जी बोर्ड वापरा. तुम्ही डिक्टेशन पण देऊ शकता थोड्या करेक्शन करायला लागतात. काही वेळा ऑटो करेक्शन चा घोळ होतो. अथवा प्ले स्टोअर मधून एखादा मराठी कीबोर्ड डाऊनलोड करा.