गारेगार

Submitted by दत्तात्रय साळुंके on 19 October, 2018 - 04:58

गारेगार

वैशाख वणवा पेटला होता . शाळेला सुट्टी लागली होती. दुपारचे ऊन रणरणत होते. शेतातले नांगर सुटले होते. बैल झाडाखाली विसावा घेताघेता पुढयातला चारा खात होते. त्यांच्या गळ्यातल्या घुंगरमाळाचे किणकिणने ऊन सुसह्य करत होते. पक्षी देखील झाडावर विसावले होते. मध्येच एखादी टिटवी टिवटिव करत शांतता भंग करत होती. बाभळीच्या झाडावर उन्हाळी किडे किर्र, किर्र आवाज करत होते. जस जसा दिवस माथ्यावर चढे तसतशी उन्हाळी किड्यांची लाहीलाही होत असावी म्हणून ते देखील जोराने किर्र, किर्र करत. उन्हाच्या झळया समोर येईल त्याला लवलवत्या जिभेने खाऊ की गिळू करत होत्या. हवा तापून वर गेली की मध्येच वावटळ उठत असे. त्यामध्ये भोवतालच्या शेतातला पालापाचोळा गरगरत वर जात असे. नांगरून पडलेल्या जमिनी तापत होत्या तर न नांगरलेल्या जमिनी उन्हाने तडकल्या होत्या. एकंदरीतच वातावरणातला भकासपणा उन्हाळ्याची तीव्रता वाढवत होता. तापलेल्या उन्हाच्या तडाख्यात सापडलेली गुरेढोरे, माणसे पावासारखी भाजून निघत होती.

साखरेच्या कणासाठी मुंग्यांनी धावावे तसेच सारे जीव सावली किंवा पाणी शोधायचे.

औत सुटल्याबरोबर गड्यांना हायसे वाटले. काही गडी थोड्या वेळासाठी अंग मोकळे व्हावे म्हणून थंडगार लिंबाच्या सावलीत आडवे झाले. तर काही गडी विहिरीतल्या पाण्यात पोहून अंग मोकळे करत होते. कुठे विहिरीवर चालणाऱ्या मोटा देखील सुटल्या होत्या. या दिवसात कुठेतरी जनावरांसाठी पेरलेला ओला चारा भिजवला जायचा किंवा शेतातली भाजी भिजवली जायची . विहिरीला पाणी कमी असायचे त्यामुळे थोड्याच शेताला पाणी पाजणे शक्य व्हायचे. तापलेली हवा ओल्या शेतात आली की थंड व्हायची. बैलांसाठी पेरलेले विलायती गवत, मका किंवा गाजराचे वाफे वाऱ्यावर मस्त डोलायचे . वाफ्यांवर नजर गेली की डोळ्याला एक अद्भुत थंडावा मिळायचा. मन गारेगार व्हायचं .

कारभारीन टोपल्यात भाजीभाकरी घेऊन आलेली असायची. पोहून झाल्यावर कष्टकऱ्यांच्या पोटात चांगलीच आग पडलेली असायची. झाडाखाली भाजीभाकरीची पंगत पडायची. जेवल्यावर पाणी पिऊन गडी सावलीत लवंडायचे. दहा-पंधरा मिनिटात घोरण्याचा आवाज यायला लागायचा. तीन वाजेपर्यंत शेतात सगळे शांत असायचे. गायरानात गुराखी देखील आपल्या गुरासह लिंबाच्या किंवा आंब्याच्या थंडगार सावलीत विसवायचे. भुईवर काडीने कवड्यांचा पट काढला जायचा आणि डाव रंगायचा . दुपारी रानात आणि गावात सगळीकडे शुकशुकाट होता.

सगळी पिकं निघालेली असायची त्यामुळे दूरवर क्षितिजापर्यंत रान नुसतं मोकळ मोकळ दिसायच. सगळं कसं रखरखीत वाळवंट वाटायच . अशावेळी काकडी , कलिंगड द्राक्षे खायची आठवण झाली तरी जीवाला गार वाटायचं. त्यात कुठं बर्फाचं गारेगार मिळाल तर सोन्याहून पिवळं . शेतातून जाणाऱ्या रस्त्याने गारेगारवाला दिसला की गडी पळत जायचं आणि गारेगार घेऊन चोखत बसायचं.

मुले , म्हातारे आणि बहुतेक बायका शेतीची कामं नसल्याने गावातच असत. सगळे आपापल्या परीने सावलीत राहण्याचा प्रयत्न करत होते. देवळात पत्त्यांचा डाव रंगात आला होता. वडाच्या पारावर गजाली चालू होत्या.

कुठे बायकांनी गोधडी शिवायला घेतली होती तर कुठे कुरडया, पापड्या, शेवया बनवल्या जात होत्या. सारे थंड सावलीतच . कोण लोणच्यासाठी कैऱ्या फोडून सुकवत होते .

गावाजवळच्या विहीरीवर मुले पोहण्यात व मस्ती करण्यात दंग होती. काही मुले थारोळयावर उभे राहून उंचावरून पाण्यात उडी घेत होती. उडी घेण्याचेही वेगवेगळे प्रकार होते. कोणी पाठीवर मुटका बांधून पडत तर कोणी मांडी घालून कुल्ल्यावर पडत. पाठीवर तिरके पडता नाही आले तर पाठ सोलून निघायची . पोरं रडकुंडं तोंड करत पुन्हा पाण्यात उडी मारायची. पाण्यात जी मुलं खूप वेळ पोहत होती ती कुडकुडायला लागल्यावर वर येऊन थारोळ्यात लाटीवर पालथी पडून ऊन पाठीवर घेत होती. उन्हाने पाठ शेकल्यावर पुन्हा उंचावरून पाण्यात सूर मारत होती. नवीन पोहायला शिकणाऱ्या मुलांची भीतीने गाळण उडाली होती . त्यांचा आरडा ओरडा चालू होता. कोण कोणाच्या गळ्याला घट्ट मिठी मारून बसायचा तर कोणी पायरी पकडून. कोण मेलो मेलो म्हणून रडत सुटायचा. तर कधी पोहणे शिकवणारा त्यांना पाठीवर भेळा बांधून ढकलून द्यायचा पाण्यात. पट्टीचे पोहणारे तळ आणण्याची शर्यत लावायचे . काही पकडापकडी खेळायचे. काही बेरकी मुले पाण्यात खोल जाऊन नवशिक्याचे पाय ओढायची.

मी सुद्धा तास-दीड तास यथेच्छ पोहलो डोळे लाल लाल होईपर्यंत. हा गारेगार उत्सव कधी संपू नये असं वाटायचं. खरपूस भूक लागल्यावर घराची आठवण यायची. फुफाट्यात पाय करपवत बुडाला आग लागल्या सारखा मी पळायचो . कुठे झाड दिसले तर पळत जाऊन त्या खाली थांबायचो आणि पाय निवल्यावर पुन्हा पळायला लागायचो. त्याकाळी खेड्यात मुलांना चप्पल घेण्याची चैन परवडत नसायची. शेतात काम करणाऱ्या नेमक्या लोकांनाच फाटक्या तुटक्या वाहणा मिळायच्या.

निबर झालेले पाय या वैशाख वणवव्या पुढे नांगी टाकायचे.
मी घरी आल्याबरोबर आईला आवाज दिला.

"आई मला भूक लागली".
आई शेवया वळायची तयारी करत होती.
तिने एका ताटलीत भाजी भाकर वाढली बाजूला एक लोणच्याची फोड ठेवली.
मी भाकर खाल्ली तवर आईने एक डबा घेतला आन भिताडाच्या थोडा पुढं ठेवला. तिनी भितीला जमिनीलगत शेवया वळायच्या फळीचं एक टोक टयाकावलं आन दुसरं टोक अधांतरी डब्यावर ठेवले.ते बघून मला हसू आलं. मी आईला म्हणलो

" हे तर तोफ सारखं वाटतंय "
भितीला टेकवलेल्या टोकावर गोधड्या ठेवून तिनं बसण्यासाठी जागा केली. नंतर त्या फळीला गोडं तेलाचा हात पुसला. कणकेची परात फळीच्या उजव्या आंगाला आणून ठेवली. कणकेलाही थोड तेल लावलं आणि मला एक टोपलं आणायला सांगितलं. टोपलं घेऊन फळी समोर बसलो.आई पदर खोचत गोधड्यावर बसली . मी पुन्हा हसत म्हणालो
"ये आई तू तर घोड्यावर बसून लढायला निघल्या सारखी दिसती "
आई "हो बाबा मला समद्यांच्या भुकचा किल्ला सर करायचाय . करून दिलेल्या शेवयाच चार पैक खर्चायला होतील आन घरी शेवया पण खायला मिळतील."

आई खूप शेवया बनवून द्यायची पण सगळे लोक तिच्याकडून स्वस्तात शेवया करुन घेत. ती सुद्धा "ठेविले अनंते तैसेची रहावे चित्ती असू द्यावे समाधान असेच म्हणायची."

आईने कणकेचा बारीक गोळा केला. तो हातावर घेऊन लांबोडा केला आणि फळीवर घेऊन दोन्ही हाताच्या पंजाने रगडू लागली. तिच्या हातातल्या बांगड्यांची किणकीण छान समा बांधत होती . फळीच्या दोन्ही बाजूने शेवईचा धागा खाली येऊ लागला तसा मी तो टोपल्यावर दोन्ही हाताने तो फिरवत होतो. टोपल्यावर छान जिलेबी सारखी नक्षी वळत होतो . असे करत करत टोपले पूर्ण भरत आले मग ते उन्हात नेऊन ठेवले व दुसरे टोपले घेऊन परत पालथ्या टोपल्यावर शेवयाची नक्षी काढणे चालू केले.

तेवढ्यात गावाच्या वेशी कडून एक जोरदार हाळी ऐकू आली " गारेगार " .

माझं हात शेवया वळायच थांबलं . म्या आईला म्हणलं..
" ये आय मला दे ना पाच पैसं गारेगार घ्यायला"
आईची काही हालचाल नाही बघून मी रडाया लागलो. हात पाय चोळू लागलो. माझं हे ठेवणीतलं अस्र होतं. पोराच्या हट्टापुढं ते मातृहृदय गारेगार सारखच विरघळलं.
तिनं कमरची जिवापाड जपलेली कापडी पिशवी काढली. एका कप्प्यात जपून ठेवलेलं पाच पैशाचं नाणं काढलं आन माझ्या हातावर ठेवलं . मी खुश झालो. उड्या मारत गारेगार वाल्याच्या दिशेने सुसाटलो. तोवर गारेगारवाला गावाच्या बाहेर दुसऱ्या टोकाला गेला होता. मी त्याच्याजवळ पोहोचेपर्यंत तो गावातून बाहेर पडला. मी रडत रडत घरी आलो. आईवर रुसलो. आईला म्हनलं तू लवकर दिलं असतं पैसं तर मला आज गारेगार मिळालं असतं. आईने मला समजावलं. उद्या घे म्हणाली. मला ते पटलं . दुसरा उपायच नव्हता. मी पुन्हा शेवया वळू लागलो . चातकासारखी उद्याची वाट पाहू लागलो. आपण ज्याची वाट पहातो के कधीच लवकर होत नाही हे मला पहिल्यांदा जाणवलं .

दुसऱ्या दिवशी नेहप्रमाणे माझं पोहणं झालं. दुपारची भाकर खाल्ली. शेवया वळाया लागलो . पण लक्ष सारं गारेगार आवाजाकडे. बऱ्याचदा शेवयाचा एकाच ठिकाणी ढिग घातला. आई रागावली. पुन्हा तो शेवयाचा ढिग हाताने सुटा केला. तेवढ्यात मला हवा तो आवाज आला गारेगार. माझ्या अंगावर थंडीचं रोमांच उभं राहिलं . काल मिळालेलं पाच पैसं म्या चड्डीच्या चोर खिशात जपून ठेवलं व्हतं . नजरेचं पातं लवायच्या आत मी गारेगार वाल्या जवळ पोचलो .

तोच तो बुटका, वर्णाने काळा गारेगारवाला गेले दोन-तीन वर्ष नियमाने उन्हाळ्यात गावात यायचा.

पोरांची नुसती झुंबड उडाली होती पोळ्याभोवती मधमाशा जमतात तशी, कल्लाही तसाच. कोणी त्याच्या डब्यातून कोपऱ्यावर पाझरणारे रंगीबेरंगी पाणी तळहातावर घेऊन चाटत होतं. तर कोणी झाकण उघडलं की तोंड पुढे करून थंड वारा तोंडावर घेण्यात समाधान मानत होतं. आणि ह्या सगळ्या गोंधळात तो एकटाच शांतपणे काम करत होता. त्याला म्या पैसं दिलं आन झाकाण उघडायची वाट बघू लागलो. झाकण उघडल्याबरोबर तोंड पुढं केलं . डब्यातून निघलेली थंडगार वाफ मला हिमालयात घेऊन गेली. भूगोलाच्या पुस्तकात वाचले होते हिमालयात खूप बर्फ असते किती मजा येईल नाही जर आपण हिमालयात राहायला गेलो तर .

रोज पोटभर गारेगार बर्फ खायचे मज्जाच मज्जा. फक्त खिशात एक काडी थोडी साखर आणि रंग ठेवायचे . आईला पैसं मागायची गरजच पडणार नाही. मग ती रडारडही नको.

गारेगारवाला मुलांना गारेगार देताना गर्दी आसल तर एकाचवेळी एका हातात वेगवेगळ्या रंगाच्या दोन तीन काड्या धरायचा आणि दुसऱ्या हाताने डब्यातून काड्या काढायचा . या काड्या आमच्या शालेय क्रीडा स्पर्धेच्या वेळी लावलेल्या रंगीबेरंगी झेंड्यासारख्या दिसत .

गारेगारवाल्याने मला कुठल्या रंगाचे गारेगार हवं विचारलं. त्याला पिवळ्या रंगाचं गारेगार मागितलं. पिवळ्या रंगाच्या गारेगारवर दुसरं रंग पण लागलं व्हतं . मला चित्रात रंग भराया यत नव्हतं तव्हा असंच रंगात रंग मिसळायचं.
गारेगारचा एक थेंबही खाली पडू द्यायचा नाही या निर्धारानं गारेगार पटापट चोखत होतो. कधी कधी काडीच बर्फ निसटून खाली पडलेलं असल्याने मी फडाफड बर्फ चावायचो . गालफाडं , जिभ आखडायची थंडीनं. माझं व्हट, जीभ पिवळं पिवळं झालं व्हतं. मला वाटायचं न ईतळणारं बर्फ आसतं तर किती मजा झाली असती. रोज गारेगार मिळण्यासाठी आई सांगल ती काम ऐकायचो . आई पण मला गारेगार देण्यासाठी काटकसर करून पैसं कनवटीला लावून ठेवायची .

गारेगारकाका आमच्या गावात दोन-तीन वर्ष येत व्हता. त्यामुळ वळखीचा व्हता . मांयंदाळा दयाळू माणूस . एखाद पोर खूप वेळ त्यांच्या आजूबाजूला नुसतं घुटमळतय पाहिल्यावर त्याच्याजवळ गारेगार घ्यायला पैसे नाहीत त्याला बरोबर कळायचे. मध्येच गर्दी विरळ झाल्यावर त्या मुलाला ते एखादी अर्धवट वितळलेली गारीगार फुकट द्यायचे . त्या मुलाच्या चेहऱ्यावरचे समाधान पाहून ते खुलून जायचे. कधी एखाद्या मुलाकडे दोनच पैसे असायचे त्यालाही थोडे वितळलेले गारेगार मिळायचे .

आमच्या शेजारचा नरशा लय मोठ्या मोठ्या गप्पा मारायचा. त्यो अधून मधून कुठल्यातरी शरातल्या नातेवाईकाकडे जायचा आणि आम्हाला शरातल्या गमती जमती सांगायचा. आम्हाला तो खूप चुणचूणीत वाटायचा. मला म्हणाला आपण शाळेत सामूहिक जीवनाच्या परीक्षेला सामुदायिक जेवण बनवतो परीक्षा झाल्यानंतर वर्गणी काढून. मास्तरांना आणि आपल्याला एक छान मेजवानी व्हती. तसेच आपण सगळ्यांनी मिळून वर्गणी काढून गारेगार वाल्याचा आख्खा डबा घेतला तर. मला ही कल्पना खूप आवडली आम्ही ठरवलं सगळ्यांनी थोडं थोडं पैसं साठवायचं आणि एक दिवस आख्खा गारेगारचा डबा घ्यायचा.

मी आईला म्हनलं मला कितीबी काम सांग पण गारीगारी साठी पैसं देत जा . आसच इतर मुलांनी आपल्या घरून कधी हट्ट करून तर कधी आईबापांना खुश करून पैसं जमवायला सुरुवात केली. बऱ्यापैकी पैसं जमा झालं. खूप गारीगार खायला मिळणार या कल्पनेनं मी पुन्हा एकदा हिमालयात गेलो .

पण एक दिवस नरशा रडत रडत म्हणाला आपण जमा केलेले पैसे कुणीतरी माझ्या घरून लांबवले . नरशावर आमचा विश्वासच बसना.

आम्ही विचार करू लागलो, असं काय झालं कुणी चोरल पैसं. समद्यांनी शोध घ्यायचा ठरवलं. पण कोणीच मिळालं नाही. एक दिस बापू म्हनला आरं गुरुवारच्या बाजारात ह्याला औषध घेताना पाहिलं माझ्या बा नं . लय पैसं मोजलं तत हयानी. नरशाला सगळ्यांनी हाग्या दम दिला तवा कुठं कबूल झाला. म्हणला माझ्या बा ला बरं नाही तुम्हाला माहिती हे . आई पण कामाव जात नाही. दिवसभर बा ला बघती. त्याच्या औषधासाठी पैकं नव्हतं काय करणार मी. समद्यांना लई वाईट वाटलं. गारेगारचा डबा खाण्याचा स्वप्न गारीगार सारखच वितळल. आमची स्वप्नसुद्धा अवकाळी पावसा सारखी. क्वचित फळफळतात नाहीतर बहुदा तोटाच.

पण एका गोष्टीचं बरं वाटलं, नरशाचा बा लवकर बरा होईल औषधपाण्यानी म्हणून नरशाच खोटं बोलणं जास्त खटकलं नाय . नरशा म्हणला बा बरा झाला की कामावर जाईल. मग येतील पैक .

रोज गारेगार वाल्याची हाळी आली की जीवाची तगमग व्हायची पण आईला पैसं मागायचा धीर व्हायचा नाही . मुश्किलीने गारेगार खायची इच्छा मारावी लागायची . आमच्या बरोबरीच्या सगळ्याच पोरांना गारेगार पारखी झाली . हातातोंडाशी आलेला घास काढून घेणं काय असतं याचा अर्थ सगळ्या पोरांना समजला होता.

मला कुसुमाग्रजांच्या जन्मदिनी म्हंजी मराठी भाषा दिनी गुरुजींनी शिकविलेली कविता आठवली.
"ध्येय प्रेम आशा यांची
होतसे का कधी पूर्ती
वेड्या परी पूजतों या
आम्ही भंगणाऱ्या मूर्ती "

एक दिवस गारेगारवाला गावाच्या यशीतनं बाहेर गेला. चार पाच दिस झालं तरी त्यो काय येईना. तव्हा आम्ही पोरं वडाच्या झाडाखाली रोज दुपारी त्याची वाट पाहू लागलो. पण त्याचा काहीच पत्ता नव्हता एक दिवस दुपारच्या टायमाला वडाच्या झाडाखाली पोरांचा कलकलाट आयकून तात्या खवळला . जोराने खेकसत म्हणाला

" पोरांनो कशाला आरडताय "
पोरं म्हणली " गारीगारवाल्याची वाट बघतोय"
तात्या "गारेगारवाला आता येणार नाही. बाजूच्या गावात पोरांना कोणतरी फसवून नेताना लोकांनी पाहिलं आन त्याला धरून लय हानलं . "

मला वाटलं तात्या फेकतोय. गारेगारकाका मंजी लय साधा माणूस. तो कशाला पोरं पळवल? तो तर गावात दोन-तीन वर्ष येतोय कधी असं जाणवलं नाही. लोकांचा कायतरी गैरसमज झाला असावा किंवा त्यांनी ज्याला मारला तो गारेगारकाका नसावा. असं लय दिस खाली खाली गेलं. गारेगारकाका काय आला नाही. मी दोन-तीन दिवसांसाठी मावशीच्या गावाला जत्रला गेलो.

परत आल्यावर अचानक गावात वाण्याच्या दुकानासमोर लाऊडस्पीकर वाजू लागला. जाऊन पायलं तर समाजलं वाण्यानी गारेगारचे मशीन आणलं. तो आता गारेगार आणि आईसक्रीम विकू लागला. मला याचं काहीच अप्रूप वाटलं नाय कारण जो मायेचा ओलावा गारेगारकाकाच्या हातात होता तो इथं नव्हता तो नेहमी भसाड्या आवाजात पोरांवर गुरकायचा.

" ए पोऱ्या काय पाहिजे ? लवकर सांग "
आम्हाला छोट्या खिडकीतूनच सांगायला लागायचं.
त्याच्याकडं आपल्या पसंतीचा गारेगार कलर मिळायचा नाय. कमी पैशात गारेगार पण मिळायचे नाही. ना डब्याचं झाकाण उघडल्यावर तोंडावर थंडावा . पण हे सर्व गारेगारकाकाच्या बाबतीत नव्हतं. त्यामुळं त्याची खूप आठवण यायची . ही आठवण बंद डब्यातल्या गारेगारच्या थंडाव्या सारखी जपावी वाटायची .मी तर तो यायचा बंद झाल्यावर गारेगार खाणच बंद केलं.

येक दिस अचानक मला माझा मैतर बब्या भेटला. बब्याने मला गारेगारवाला का येत नाही त्याची गोष्ट सांगितली. त्याआधी मला आई वरून शपथ घ्यायला लावली की मी हे कुणाला सांगणार नाही.
बब्या म्हणाला
"अरं आमची वाण्याकडं लय उधारी झाली मग तो बा ला म्हणला,
" उधारी माफ करील पण माझी बहीण आंजीने गारेगारवाल्या वर आळ घ्यायला हवा की गारेगार देताना त्याने तिचा हात धरला."
बा घरी आला बा ने सगळं आम्हाला सांगितलं. आई आंजी आणि म्या बा ला ईरूध केला. पण आमचं काहीच चाललं नाही. बा म्हणला तुम्हाला मंजूर नसलं तर वाण्याची उधारी तुम्ही मिटवा. आईचं आण बा च लई भांडाण झालं. आई म्हणली
"मुडदा बशिवला त्या वाण्याचा . त्यो लई चांगला हाय व्हय . संमदया गावातल्या पोरीबाळींवर त्याची वाईट नजार हाय. गावाला लुटून खातोय. लोकांच्या गरिबीचा फायदा घेतोय.पोटात काटं भरू पण एका निष्पाप जीवाला फासावर चढवणार नाही."
बा काही ऐकायला तयार नव्हता मला वाटतं वाण्यानं त्याला दारूला पाच पन्नास रुपये दिलं आसल. बा त्या दिशी दारू पिऊनच आला होता. बा नी आईला आन आंजीला मारायला सुरुवात केली. म्या मधी पडलो पण बा नी माझ्या खवाटयाला धरलं आन मला लांब फेकलं. बा तावातावाने घरातनं निघून गेला. त्यो एका हप्त्यानं उगवला. तवर आय म्या आन आंजी शेतात कामावर जायला लागलो. तरीपण उधारी फेडण्यासाठी पैसं जमा झालं नाय. वाण्यानी लय तगादा लावला. माझी साळा थांबली. आईच्यान हे बघवना . बा म्होरं आईनं नांगी टाकली . नितीमत्ता गरिबीला शरण गेली . माझी आई ह्या सत्वपरीक्षेत हारली ..

पंचायत बसली. पंचायतीसमोर गारेगारवाल्याला बोलावण्यात आलं माझा बाप, आई , आंजीला घेऊन तिथं गेला . म्या चावडीच्या भिंतीला कान देऊन ऐकत होतो . पंचांनी आंजीला ईचारलं ,
" काय ग पोरी हयानी तुझा हात धरला का ? "
आंजी काहीच बोलली नाही.
एक पंच म्हणला
" ए पोरी तुला त्वांड हाय का नाय बोलायला. जी काय असल ती सरळ सरळ सांग.
वाण्याची या पंचावर पण उधारी थकली होती.
आंजी घाबारली खाली बघत मोठ्या कष्टानं "व्हय धरला " म्हणली .
त्यावर गारेगारवाला म्हणाला
" आवं ही पोर माझ्या पोरीसारखी हाय. कसा अस करल. "
गारेगारवाल्याने खूप गयावया केलं. पंचांचं पाय धरलं. पण काही उपयोग झाला नाही. तव्हा तो मोठ्यानं रडू लागला. मानवर सुरी फिरवल्यावर कोंबडं कसं तडफडतं तसं तडफडत होता. आपल्यावर अन्याय होतोय हे सांगायला साठी त्याची धडपड चालू होती पण कोणच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हतं. लोकं कुजबूजू लागली " करताना लाज नाही वाटली."
आंजीचं खाली बघून बोलणं एका पंचाला खटकलं पण इतर पंच त्याच्याशी सहमत नव्हतं. तरी पाचामुखी परमेश्वर या न्यायानं निवाडा झाला . आंजीच म्हणनं सगळ्यांनी खरं मानलं.
वाणी म्हणला " असली घाण गावात यायला नगं .गाव नासल"
फैसला झाला गारेगारवाला पोलिसात दिला.

एवढं सांगून बब्याने एक आवंढा गिळला . मला पुन्हा आठवण करून दिली की हे तू कुणाला सांगू नकोस.

आमच्या गावातला वाणी लय बाराचा . पैशापुढं माणुसकी किस झाड की पत्ती होतं त्याच्यासाठी. म्हणायचा राजस्थानातून एवढ्या लांब आलो तो काय गुरं राखायला नाही. गावात बहुतेक माणसांवर त्याचा वचक होता. गावातल्या बड्या धेंडाना गोड बोलून आपलेसं करायचा. आडलेल्या नडलेल्या लोकांना बक्कळ व्याजाने पैसे द्यायचा. त्यासाठी कधी कोणाची जमीन तारण ठेवून घ्यायचा किंवा सोनं तारण ठेवायला लावायचा. पैसे नाही परत मिळाले तर जमीन किंवा सोनं वाण्याचं व्हायचं. दुकानदारी आणि व्याजाच्या पैशातून त्याने गावात शेत जमीन देखील खरेदी केली. शेतातलं काम गड्यांकडून करून घ्यायचा. गावात दळणाच्या पिठाची चक्की देखील त्याचीच. गावच्या अर्थकारणावर त्याची ईस्ट इंडिया कंपनी सारखी पोलादी पकड होती. त्यामुळे तो पैशाचा माज बी करायचा. तो गावात तमाशा आला की बायांनवर पैसं उधळायचा. गावातल्या तलाठी, ग्रामसेवक ,पोलिस पाटील , सरपंच इत्यादी लोकांशी तो आपली घसट वाढवायचा. या गोष्टी त्याला रेशनिंगचा काळाबाजार करायला उपयोगी पडायच्या. वयाची पन्नाशी ओलांडली तरी त्याने लग्न केले नव्हते. पुतण्याचे लग्न करून दिले होते. त्यामुळे खाण्यापिण्याची सोय झाली होती.
त्याच्या दुकानात त्याच्या आजूबाजूला लाकडी मांडण्या होत्या. त्या मांडण्यांमध्यी त्यो पाटावर बसायचा आन गि-हाईकाला. खिडकीतून वस्तू द्यायचा. त्यामुळे गिरायकाला एखाद्या वस्तूच वजन देखील नीट कळायचं नाही किंवा तेलासारख्या द्रवरूप पदार्थाचं माप दिसायचं नाही. आत गेल तर अंगावर खेकसायचा. लोक नाईलाज म्हणून त्याच्या दुकानात जायचे . गावात कोणाचही दुसरं दुकान त्याने चालू दिलं नाही. काही ना काही करून ते बंद पाडायचा. नवीन दुकानातून लोक खरेदी करू लागल्यावर त्याचे भाव थोडे कमी करायचा. लोकांना उधार द्यायचा त्यामुळे नवीन दुकान गावात टिकाव धरायचे नाही.

त्यानंतर गारेगार वाल्याची आम्हाला काहीच बातमी नव्हती. एक दिवस पेपरात छापून आलं गारेगारवाल्याने पोलिसांच्या छळाला कंटाळून पोलीस स्टेशनमध्ये आत्महत्या केली. त्याने संडासमध्ये गळफास घेतला.

वाण्याच्या मुजोरीपुढं गावात सगळे वर वर नमून होते पण आतल्या आत चडफडत होते. संमदया जगात माणसाच्या दोनच जाती एक शोषणकर्ता आन दुसरा शोषित. शोषितांचं काम तेलाचा घाणा वढणं आणि शोषणकर्ता ते तेल आपल्या पोळीवर ओढणार . घाण्याच्या बैलाला मालक देईल तेच खायला लागतं. मालकाने काही नाही दिलं तरी घाणा उपाशीपोटी ओढावा लागतो.

गावात दबक्या आवाजात चर्चा उमटली. गारेगारवाला इज्जतदार होता. त्याला ही नालस्ती सहन झाली नाही म्हणून त्याने जीव दिला. कसा गेला असेल त्याचा जीव. बायको, लहान लहान पोरं डोळ्यासमोर दिसत असतील. तरी एखादा माणूस जीव द्यायला तयार होतो म्हणजे केवढी अगतिकता. त्याला वाटलं असेल जगात पैसा हीच खरी ताकद आहे. ज्याच्या जवळ तो नाही त्याला माणूस म्हणून जगायचा अधिकार नाही. कुत्र्याचं आण त्याचं जीनं सारखचं. एका दारातून हाकललं तर दुसऱ्या दारात तुकड्यासाठी लाळ घोटत उभं राहयचं.

का माणूस आप्पलपोटी बनतो. पोटाला पोटभर मिळाल्यावर पक्षी सुद्धा साठवणूक करत नाहीत . माणसाला कसं कळत नाही आपल्यासारख दुस-याच पण पोट आहे. धन जमवून त्याची दुसऱ्यावर हुकूमत गाजवायची लालसा का जागी होते ?
काय कमी होतं वाण्याला तरी खोटा आळ घेतला गरिबावर. गारेगार विकण्यावाचून का त्याचं दुकान बंद पडणार होतं. जग हे असंच आहे गरीबाचा कोणी वाली नाही. त्याने आपलं जमल तसं रोज मरत मरतच जगायचं . ज्या दिशी असलं उसनं जगण जड होतं त्या दिशी सगळ्या वेदना, आशा, आकांक्षा यांना पूर्णविराम देत मरण जवळ करायचं. अशा हुतात्म्यांचं मरण कुणाच्या ध्यानात राहील. रोज मढं त्याला कोण रडं . त्यांच्यासाठी कुठला चिरा कुठली पणती. किडया मुंग्यांच्या मरणाची कोण ठेवतो का गणती ? कुसुमाग्रजांच्या शब्दात सांगायचं तर काळाच्या अतिर सागरात विरुन जाणा-या पावसाच्या चार थेंबासारखं आयुष्य यांचं .

हे असच कायबाय बोलायचे गावातले लोक. हे संमद बब्याच्या घरी पण कळत होतं. बब्यानी सांगितलं आंजी दोन-चार दिस जेवली नाय त्याची आई पण जेवली नाय . त्याचा बा मातर रोज दारू ढोसून यायचा. आईला आंजीला मारायचा . भजी करून दे, मिरची तळून दे, भाकर दे म्हणायचा. बब्याच्या आईचा जीव मेटाकुटीला आला होता. नवरा दारुडा. न्हाणाला आलेली पोर यडी झाली. अंगावरच्या कापडाचं सुदीक तिला ध्यान नसायचं. ती जगत होती बब्यासाठी आन आंजीसाठी. आंजीच डोकं ताळ्यावर नव्हतं . वाटनी चालता चालता एकटीच बडबडायची गावात सगळ्यांना वाटलं आंजीला येड लागलं. येणाऱ्या जाणाऱ्या वर डोळे वटारायची किंवा फस्कन हसायची . गावातल्या बहुतेक लोकांना आंजीची दया यायला लागली. लोक म्हणायचे आंजीच्या डोक्यावर परिणाम झाला. तर काही लोक जाता-येता टोमणं मारायचं
" वाईट केलं की वाईटच होत".

बब्याच घर कोलमडलं. त्याच्या आईला पूर्वीसारखं कामात आंजीची मदत होत नव्हती. उलट तिलाच आंजीवर नजर ठेवायला लागायची. बब्याची शाळा सुटली.

पोलीस दप्तरी गारेगारवाल्यांनं आत्महत्या केली एवढाच उल्लेख होता. आत्महत्येचे कारण स्पष्ट झालं नाही.
वाण्याचं मात्र सगळं व्यवहार पहिल्यासारखं सुरू होतं. जसं काय झालंच नाही.

गाव त्याच त्या मळलेल्या वाटनी चालनं पसंत करीत होते.
गावाच्या सगळ्या जाणिवा गोठून गेल्या होत्या गारेगार सारख्या .

माझं गारेगार खाणं तुटलं. मला एकच विचार सारखा सतवू लागला. कोणाचं पाप , कोणाला भोगायला लागलं. आसं नाय घडायला पाहिजे.

© दत्तात्रय साळुंके

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

ओह! Sad
अंतर्मुख करणार लिखाण!>+१

कथा मांडणी सुंदर पण वाचुन वाईट वाटलं. सत्य कथा नसु देत __/\__
बाकी शैली खुप मस्त, सगळं डोळ्यासमोर जसंच्या तसं उभं राहिलं, मी हे गावाकडंचं आयुष्य फारसं अनुभवलं नाहीये पण तरीही वातावरण 'जाणवलं'

आवडली.

फक्त ते कुसुमाग्रज मधमधे आणले नसते तर चाललं असतं.

तुमचं लिखाण खूप सुंदर असतं. आवडली ही कथा. सुरुवातीचं उन्हाळ्याच आणि शेताचं वर्णन तर अप्रतिम जमलं आहे. शेत कधी न अनुभवलेल्या मला सुद्धा सगळं डोळ्यासमोर चित्रसारखं दिसलं.

anjut, असा, पीनी, सारिका, शाली
प्रेरणादायी प्रतिसादासाठी खूप आभार.
शाली जी खरच दूध शेवया खाण्याची मजा काळाच्या ओघात लुप्त झाली.

धनवंती, संजय, मॅगी , टवणे सर, उमानु , anjali_kool
बहुमोल प्रतिसादासाठी खूप धन्यवाद. कथा चटका लावते हे खरे पण बऱ्याचदा एखाद्या छोट्या माणसाच्या मोठ्या गोष्टी इतरांसाठी फार छोट्या असतात. हेच सामाजिक वास्तव मला दाखवायचे होते.
@ रीया, मनिमाऊ.. तुमच्या प्रतिसादा एवढा सुंदर कॉम्प्लिमेंट असू शकत नाही. ग्रामीण जीवन अनुभवले नसताना तुमच्या डोळ्यासमोर त्याचे चित्र उभे करू शकलो . माझी लेखणी धन्य झाली .

गावाकडचं वातावरण अनुभवले आहे. ५ पैशाच्या गारेगारसाठी करावी लागणारी धडपड माहित आहे.
बाकी गारेगारवाल्याचे वाईट वाटले Sad

सुरेख लिखाण!

भिडली मनाला. आमच्याकडे पण एक 'गोला वाला' यायचा.इंदर भाऊ त्याचं नाव. त्याच्या आठवनी बालपणाच्या अमूल्य ठेवा आहेत.

@ रीया, मनिमाऊ.. तुमच्या प्रतिसादा एवढा सुंदर कॉम्प्लिमेंट असू शकत नाही. >>> सर, तुम्ही लिहिताच एवढं प्रभावी. मागे तुम्ही लिहिलेलं व्यक्तिचित्रण पण अतिशय आवडलं होतं, पण iPad वरून मराठीत प्रतिसाद टाइप करता येत नव्हता, त्यामुळे राहून गेलं.

सारिका, दिपूभाऊ, mi_anu मनापासून आभार
@ दिपूभाऊ बालपणीच्या कितीतरी हळव्या आठवणी आपल्या सर्वांच्या मनाच्या कोप-यात लपून असतात.
@ मनिमाऊ मी सतत प्रयत्नशील राहिल कसदार लिहायला .

जबरदस्त! चटका लावणारी गोष्ट. असल्या वाण्यासारखी माणसं आपणच हिंमत दाखवून उलथवून टाकायला हवीत कायदा हातात न घेता. कुणाला आयुष्यातून उठवणारे चुकीचे व खोटे आरोप करणे पाप आहे.

Pages