आठवण बालपणीची

Submitted by sarika choudhari on 15 October, 2018 - 07:13

आठवण बालपणीची ...
सुट्टी नको असणारा असा एकही मनुष्य प्राणी या जगाच्या पाठीवर नसेल. अगदी लहानापासून तर मोठ्या पर्यंत सर्वांना सुट्टी ही हवी हवीशी वाटते. आजच्या तरुणाईच्या भाषेत सांगायच झालं तर जीवनातील रुटीनला एक ब्रेक आवश्यक आहेच. रोज तीच ती कामं करून जीवनात आलेला निरसपणा घालवायचा असेल तर सुट्टी खुप महत्वाची ठरते. आता हेच पहाना बालगोपालांना शाळेची सुट्टी लागली की खुप मजा करतात. शाळेचं, अभ्यासाचं, टयुशनचं टेंशन नाही. तशी हल्ली ही मजा कमीच झाली आहे म्हणा कारण सुट्टी लागली रे लागली की आई बाबा मुलांना या शिबीरत टाक तो क्लास लाव असं करून त्यांना सुट्टीचा आनंदच घेऊ देत नाही. आमच्या बालपणी असं नव्हत. आम्ही सुट्टीचा आनंद मनमुराद लुटायचो. आमच्या आजोळी आजोबाचा वाडा होता.त्यांची स्व:ताची चार मुलं व तीन मुली व या सर्वाची मुलंमुली एकत्र उन्हाळ्यात जमायचो. शिवाय शेजारपाजरच्यांनचे पाच दहा जण तरी असतीलच. आणि तेव्हा काही फ्लॅट संस्कृती नव्हती सतत दरं बंद असायला. शिवाय कोण कोणाकडे जेवलं हे गौण होत. मुलं जेवली ना एवढं पुरेस होत पालकांसाठी. आमच्या कडे भरपुर जागा असल्यामुळे सर्वजण आमच्याच वाडयात खेळायला यायचे. माझ्या अाजीची पंरपंरागत असलेली खेळण्यातील पितळची भांडी होती. अगदी चुली पासुन तर ताट वाटी पर्यंत. आणि या भांड्यासोबत भातुकलीचा खेळ खेळायला खाऊ देखील मिळायचा. त्यामुळे खुप मजा यायची. अंगण मोठे असल्यामुळे विष-अमृत , लंगडी, खो-खो, पाठशीवणी , लगोरी असे किती तरी खेळ खेळायचो. मैदानी खेळाबरोबरच आम्ही दुपारी उन्हात जाता येत नाही म्हणून पत्त्यांचा डाव रंगायच, खडे, चिंचोके, कवडया यांच्या सहायाने किती तरी खेळ खेळायचो. दुकान लावायचो. कागदाचे पैसे असायचे . त्यामुळे कितीही आणि काहीही विकत घ्या. खुप श्रीमंत होतं आम्ही तेव्हा. बाहुला बाहुलीचे लग्न तर विचारुच नका. एकदम धमधडाक्यात व्हायच लग्न. पानाच्या गोल गोल झाकणांनी केलेल्या पोळया , मस्त पालेभाजी , आणि फुलांचे लाडु. पंगताच्या पंगता उठायच्या आणि हे सर्व जेवून पोटच नाही तर मनही भरायचं. हा सर्व खेळ खेळताना दिवसही अपुरा पडायचा, पण्‍ा आम्ही थकायचो नाही. या सर्वात भरीस भर म्हणजे आजी मस्त थंड ताकाची मेजवानी द्यायची . ते ताक अमृत तुल्य वाटायचं. कारण त्यात आजीच्या प्रेमाचे लोणी असायचे ना.
एकदा तर मजाच झाली आम्ही सगळे खेळत होतो. आमचा एक दादा आम्हाला गंमत म्हणून एका भिंतीच्या पडक्या भागात हात घालत होता व काही तरी चावालय असं नाटक करत होता. आणि त्याचे नाटक पाहुन आम्ही हसत होतो. असं करता करता त्याला खंरच काही तरी चावलं. तो खुपचं ओरडायला लागला घरची मोठी मंडळी धावत आली. त्याला पटकन डॉक्टर कडे नेण्यात आले. दादाला इंगळीने दंश केला होता. आम्ही खुप घाबरलो होतो. दादा लवकर बरा झाला पण इंगळीने केलेला दंश कायम लक्षात राहीला.
सर्व एकत्र जमल्यावर खुप मजा यायची. एका मोठ्या परातीत सर्वजण जेवायचो. जेवायला शिळी भाकरी का असेना पण सगळयाच्या सगतीत ती शिळी भाकर सुध्दा गोड लागयची. जेवणानंतर आम्ही सगळे एकत्र अंगणात जमायचो.
नारळाच्या दोरीनी विणलेली नवीन खाट असयाची. आजी त्या खाटेची पुजा करायची , भाकर तुकडा दाखवुन खाटीवर पाणी टाकायचे. पाणी यासाठी की नारळाची दोरी नरम पडायला. मग आम्ही त्यावर झोपायचो. खाटीवर झोपून रात्रीचे लुकलुकतं चांदण पहाण्याची मजा काही वेगळीच. निसर्गाच्या थंड हवेत , आभाळाच्या प्रेमाच्या छत्रछाये खाली चांदण्याच्या लुकलुकत्या प्रकाशात कधी झाेप लागयाची कळायचं नाही. ती झोप कॉक्रीटच्या छताखाली व AC च्या थंडथंड हवेत देखील लागत नाही.
बालपण गेले पण मागे आठवणी राहील्या . आता ते दिवस आठवले की वाटतं आपल्या मुलांचे बालपण हरवले आहे. या आधुनीक तंत्रज्ञानाच्या युगात मुलं टिव्ही, मोबाईल मध्येच अडकले आहेत. शारिरीक स्वास्था बरोबरचं मानसीक स्वास्थ देखील बिघडत चाललं आहे . मुलं एकलकोंडी बनली आहे. आणि त्यातुनच गुन्हे घडतात. पालकांना मुलांसाठी वेळ नाही, आजी-आजोबाच्या गावी नेट नाही, मित्र सगळे आपआपल्या घरी. मग सांगा आपल्या बालपणी सारखी मजा त्यांना कधी येणार. आपण सर्व एकत्र जमायचो, गप्पा मरायचो. मन मोकळ व्हायचं. पण आता सर्व मनातच साठुन राहत. आणि मग त्याचा उद्रेक होऊन एक तर आत्महत्या नाहीतर हत्या. हे सर्व थांबवायचं असेल तर आपल्या मुलांना त्याचं बालपण जगु द्या . जीवना च्या स्पर्धेत त्यांना मोठं झाल्यावर धावयचच आहे . आता तरी एक मोकळा श्वास त्यांना घेऊ द्या.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults