आदिशक्तीचा जागर : चौथी माळ

Submitted by snehalavachat on 13 October, 2018 - 05:37

नवरात्र : आदिशक्तीचा जागर

चौथी माळ

या दिवसात देवीची आराधना ही पूजाअर्चा, अखंड नंदादीप, उपवास या मुळे उत्साहाचाच आणि उमेदीचा जणू काळ असतो. उपवास करणे हा उपासनेचाच एक भाग असतो. फक्त शरीराला हानिकारक न होता, यामुळे आपल्याला मानसिक बळ मिळावे हाच शुद्ध हेतू असतो.

आजची आपली माळ ही अश्याच आपल्या लाडक्या “आत्यासाठी”. लहानपणी वडील रागावल्यावर आई त्यांच्यासमोर फार बोलू शकत नसायची. पण ही आपली लाडकी आत्या आपल्या मदतीला कायमच धावून यायची. तिचे आपल्याला पाठीशी घालणे आणि आपले डोळे पुसणे हा आधार मनाला खूप सुखावून जायचा.

आजच्या आपल्या राखाडी रंगाप्रमाणे आपल्या आयुष्यात कायम गौरव व प्रतिष्ठा लाभावी यासाठी आपली आत्या जणू आपली हितचिंतकच. आपली भाचरे कायमच यशाच्या शिखरावर दिसावीत हीच तिची मनोमन इच्छा असते. यासाठी ती कायमच आपले कोडकौतुक करत असते व मनोमन सुखावते.

वस्त्र अलंकार करू आम्ही केला
दिव्य दर्शनाची ही काय सांगू लीला
आदिमायेने सौभाग्यसाज केला

असाच साजश्रूंगार आपण आपल्या आदिशक्तीला केल्यावर जे साजरे रूप आहे ते बघून आपण पण सुखावूनच जातो व जणू तिच्या दिव्यदर्शनाने आपल्या डोळ्याचे पारणे फिटता फिटत नाही.

Group content visibility: 
Public - accessible to all site users