ह म बने तु म बने - सोनी मराठी वाहिनी

Submitted by soha on 11 October, 2018 - 03:44

नविनच सुरू झालेल्या सोनी मराठी वाहिनीवर ही मालिका रात्री १० वाजता असते. मी ह्याचे काही एपिसोडस तुनळीवर बघितले. चांगली मालिका आहे. मुलांना मोठ करताना पालकांना जाणणवणार्‍या समस्या/ प्रश्न आणि त्याबाबतचे उपाय ह्यांचे हसत खेळत, रंजक पद्धतीने सादरीकरण आहे.
एका एकत्र कुटुंबात रहाणारे दोन भाऊ, त्यांच्या बायका, आई-वडिल आणि मुलं अशी पात्र आहेत. पण इतर मालिकात दिसतं तसं मेलोड्रामा, राजकारण, भडक सादरीकरण असं काहीही नाही. अतिशय निखळ आणि आपल्या रोजच्या जगण्याशी तुलना करता येईल अशी मालिका आहे ही.
कलाकार ही चांगले कसलेले आहेत. दिग्दर्श्क कोण आहे ते मला कळले नाही.
कोणी बघतं काही मालिका? नसाल बघत तर जरूर बघा. सलग कथानक नसल्याने मधूनच बघायला सुरवात केली तरी चालेल. तुनळीवर आत्तापर्यंत ४० एपिसोड उपलब्ध झाले आहेत.

Group content visibility: 
Use group defaults

छान आहे मालिका.......
इतर मालिकात दिसतं तसं मेलोड्रामा, राजकारण, भडक सादरीकरण असं काहीही नाही. अतिशय निखळ आणि आपल्या रोजच्या जगण्याशी तुलना करता येईल अशी मालिका आहे ही. >>+१११११११११११

इतर मालिकात दिसतं तसं मेलोड्रामा, राजकारण, भडक सादरीकरण असं काहीही नाही +१
उलट थोडीशी भाबडी आणि आदर्श आहे. पण छान वाटते. महात्त्वाचे म्हणजे (छोटी ३ मुलं सोडली) कोणीही नाटकी बोलत नाही, पाठ करून म्हणल्यासारखे संवाद नाहीत. सगळ्यांची कामे छान.
मी ही आणि तुला पाहते रे बघते. दिग्दर्शन, कथा, संवाद आणि ऍक्टिग मधला फरक लगेच जाणवतो.

सोनी लिव app वर बघू शकता. Tata स्काय आणि सोनी च्या वादात 1 ऑक्टोबर पासून बंद झाली आहे दिसणे.

खुसखुशीत आहे मालिका. कुठूनही बघू शकता कारण सगळे भाग वेगळ्या कथानकावर बेतलेले आहेत.

अरे जबरदस्त खुसखुशीत कौटुंबिक मालिका.

मला आदिती ह्याआधी फार आवडली नव्हती पण यात भन्नाट काम. लहान मुलांपासून सर्वच सुंदर अभिनय करतात. मीनाक्षी गुणाजीच्या साड्या, ज्वेलरी छान असते, ती छान कॅरी करते.

कुठलीही बायकांची भांडणे, नवऱ्याची लफडी, मारामारी न दाखवतापण एखादी मालिका किती उत्तम असू शकते याचे उदाहरण ...

कुठलीही बायकांची भांडणे, नवऱ्याची लफडी, मारामारी न दाखवतापण एखादी मालिका किती उत्तम असू शकते याचे उदाहरण ...>> +१.
खूप छान मालिका. मला पण आदिती आधी फार आवडायची नाही. पण यात आवडतेय.

मीनाक्षी गुणाजीच्या साड्या, ज्वेलरी छान असते>> मीनाक्षी कोण अंजूताई?? तीचं नाव राणी आहे ना??

आजचा रावणाचा भाग छान होता. छोटा रावण एकदम गोड. बागेत जो रावण जाळला तोही खूप छान होता. समीर खांडेकर ह्यांचा शेजारी असतो का.

समीर खांडेकर ह्यांचा शेजारी असतो का. >>> नाही, स्नेही किंवा family फ्रेंड असावा जवळचा किंवा दोन भावांपैकी एकाचा मित्र.

एक फॉरवर्ड मेसेज
#क्षण एक हळवा...
तसा टीव्हीच्या मालिका पाहण्याचा माझा योग फारच कमी येतो(मात्र मालिका मला माहित आहेत बऱ्याचश्या!!)पण ताईकडे आल्यापासून काही मालिका नियमित पाहणं होतं.. त्यातलीच एक सोनी मराठी चॅनेलवरची "ह.म बने,तु.म बने"..कौटुंबिक मालिका..चौंकोनी,षटकोनी किंवा अगदी अष्टकोनी म्हणूयात अशी..नावापासूनच वेगळेपण जपणारी..
लेक आणि सुनांच्या नावाने सुरु होणारी घराची पाटी...हर्षदा मकरंद बने आणि तुलिका मल्हार बने..म्हणून ह. म बने,तू.म.बने!
घरातील रिडायर्ड आजी-आजोबा..खऱ्या अर्थाने रिडायर्ड लाईफ गुण्यागोविंदाने जगणारे,सुज्ञ..चतुर..हवेहवेसे!
मोठी सून हर्षदा नोकरी करणारी,धाकटी घर सांभाळणारी,मोठा मुलगा बँकेत तर धाकटा मुलगा स्वतःच्या व्यवसायात,पण अजूनही धडपडणारा..आणि यांची तीन मुले..दोन मुली आणि एक मुलगा!
ना कसला हेवादावा.. ना भांडणं..एकमेकांना अगदी समजून घेणारे (आणि यात कसलीही अतिशयोक्ती नाही,जेही मालिकेत दाखवतात,ते अगदी सहजतेने.!!)
......पण मुळामध्ये त्यांचे आपापसतले सामंजस्य हा माझा इथला मुद्दा नाहीये...तो एक विस्तृत लेखाचा भाग होईल.
मालिकेचा कालचा भाग हा इतर भागांपेक्षा खूप वेगळा होता..स्तब्ध करणारा..आणि डोळे ओलावणाराही!!
आणि खऱ्या जगातील कुठल्याही बापाला,ज्याला मुलगी आहे,त्याला हळवं करणारा..!!
.......ऑफिसच्या कामानिमित्त मोठी सून व एका लग्नानिमित्त धाकटी सून व सासू या तिन्ही स्त्रिया बाहेर असतात..घरामध्ये आजोबा आपल्या खोलीत व ऑफिसचं काम जरा लवकर आटोपलंय म्हणून घरी येऊन चादर घेऊन मस्तपैकी झोप काढणारा मोठा मुलगा मकरंद....हेच हजर असतात.
आणि तेव्हड्यात शाळेतून जरा लवकरच रेहा,मकरंदची मुलगी परत येते..भांबावलेली..घाबरलेली आणि रडवेली!!
कंबरेभोवती तिचाच यूनिफॉर्मचा कोट गुंडाळलेला...नजर आईला शोधतेय... शेवटी वैतागून शाळेची बॅग ती खाली टाकते आणि त्या आवाजाने मकरंद जागा होतो..अवेळी मुलीला शाळेतून आलेली पाहता तोही चक्रावतो.
आणि अरेरे..बाबा यावेळी नेमका घरात आहे,हे पाहून ती अधिक भांबावते.. अधिक रडवेली होते आणि पटकन बाथरूम मध्ये निघून जाते,त्याच्या विचारलेल्या प्रश्नांची काहीही उत्तरं न देता की... तू आत्ता शाळेतून कशी आलीस?काय झाले?
"काहीही नाही...माझं पोट दुखतंय..पाठ दुखतेय"बस्स..मागील पंधरा मिनिटापासून बाथरूमच्या आत असणाऱ्या तिचा आणि बाहेर असणाऱ्या बाबाचा हाच संवाद!!
...आणि अचानक त्याला काहीतरी जाणवतं. स्तब्ध होतो..आणि अगदी हळुवारपणे तो लेकीला विचारतो.."रेहा,बाळा..तुझं पोट दुखतंय...म्हणजे तुला...?"
आणि तेव्हड्याच हळुवारपणे ती म्हणते,"हो,बाबा..!"
.....आणि त्या क्षणाला तो अंतर्बाह्य थरथरतो..डोळे भरून येतात..आवाज कापरा होता..!
आपली लहानशी लेक "मोठी"झाल्याची जाणीव होते,त्या क्षणाला त्या बापाला! (इथे त्या कलाकाराचा अभिनय लाजवाब!!)
आणि हेही जाणवतं कि लेकीच्या आताच्या या अवघड प्रसंगात आपल्यालाच वेळ सावरायची आहे..आणि सुरु होते या बापाची धडपड..
बायकोच्या कपाटातून सॅनिटरी पॅड शोधून,सोबत लेकीला बदलायला दुसरे कपडे असं सारं घेऊन ते बाथरूमच्या बाहेर ठेवून व तिला सांगून तो खाली हॉल मध्ये जातो...तो तडक किचनमध्येच!
इंटरनेटवर शोधून या काळात मुलींना काय खायला द्यावे..काय precaution घ्यावी..काही प्रथमोपचार काय व कसे करावे..याची माहिती घेतो!
तिला पाय शेकायाला म्हणून पाणी गरम करतो..खायला गोडाचा शिरा..गरम दूध..फळं..!!
किचनमध्ये कुठे काय ठेवलंय..लायटर कुठे असतो,हे काहीही माहिती नसताना..धडपडत,भांबावत..हे सारं तो करतोच!
मधेच किचनमध्ये आजोबा येतात..त्यांना कॉफी हवी असते..एरव्ही त्यांच्या चिडचिडण्याला अगदी हसून प्रतिसाद देणारा हा..जरासा त्यांच्यावर वैतागतो...आजोबा अचंबित..हा असा काय वागतोय?
आणि तो त्याच्या बाबाला सांगतो.."बाबा,मी हे सारं रेहा साठी करतोय..ती..तिला..तिचं..!"त्याचे "नेमके"शब्द फुटत नाहीत...पण आजोबा "नेमका"अर्थ समजून जातात.आपल्याला कधी मुलगी झालीच नाही..म्हणून अश्या प्रसंगाला सामोरं कधी गेलोच नाही..याची जाणीव!
आपली नात..क्षणात मोठी झाली,याची जाणीव...प्रदीप वेलणकरांचा अभिनय ...अप्रतिम
बाबांनी दिलेली शेकण्याची पिशवी,खाण्याचे साहित्य..पाय बुडवून बसायला टब आणि गरम पाणी..हे सारं लेकीला देऊन..हा बाप तिच्याजवळ बसतो..आणि खऱ्या अर्थाने दोघात संवाद सुरु होतो.
"हे असं होतं बाळा,प्रत्येक मुलीला particular age मध्ये होतं.. थोडासा त्रास होतो..पण तो सहनही करायला हवा..आणि हे सारं निसर्गनिर्मित असतं.."
"हो,बाबा,हे सारं आम्हाला शाळेत शिकवलं पण असं अचानक..म्हणून मी जराशी घाबरले..!"
बाप हळुवारपणे तिच्या डोक्यातून हात फिरवतो..हातात हात घेतो..आणि तिची हि अवघड पहिली वेळ..स्त्रीत्वाची जाणीव तिला या कवितेतून सांगतो..कुणाची आहे माहिती नाही..पण अप्रतिम आहे.
या कळा नव्हे दुःखाच्या,
हितगुज तुझे हे स्वत्वाशी!
शापितांचे भोग नव्हे हे
पुण्याने भरली ओटी!
चार दिसांचा खेळ,
सृजनाशी ज्याचा मेळ!!
जरी चित्त सैरवैर, हि नवचैतन्याची वेळ!
घेई विसावा क्षणभर,निसर्गाशी जुळे नाळ,
सजे पालखी बीजाची, होई तू भाग्यवान!!
कुणी म्हणो हा विटाळ,म्हणो निषिद्ध हा काळ
सांग जगा तोऱ्यात,सृष्टीचे हे वरदान!!
कुणी काढता कोड्यात,कोडे त्यास थेट घाल,
कसा झाडाच्या फळाशी,
नाही बीजाचा विटाळ!!
खेळ झिम्मा पोरी आता,छेड सूर आनंदाचे,
तुझ्या कुशीत रुजले,गुपित हे विश्वाचे!!
कळी फुलू दे जराशी,मन होऊ दे हिंदोळा,
भान जन्माचे देतो,हा आनंद सोहळा!!

एव्हाना माझे व ताईचे डोळे भरून आले होते..भारावल्या सारखं झालं होतं..मुलीची पहिली पाळी, हि कुणाही आईसाठी एक विलक्षण हलवून व हरवून सोडणारी घटना असते..आपल्या लेकीत निर्माण झालेलं हे स्त्रीत्व पाहण्याची..तिला सावरण्याची..समजवण्याची..समजून घेण्याची वेळ असते.एक आई व एक डॉक्टर म्हणून मी हे चांगल्या प्रकारे समजू शकते...पण वरच्या या प्रसंगात आई कुठे नाहीच...आहे तो फक्त बाप!
आणि अजिबात स्वतः मुलीची"आई"न होता बाप राहूनच लेकीला समजून घेणारा हा बाप...अगदीच विलक्षण..हळवा!!
भाग्यवान असतात ते पुरुष..जे मुलींचे बाप असतात!!
या मालिकेतील या भागाबद्दल लेखक,दिग्दर्शक आणि कलाकार यांचे विशेष कौतुक!!
विशेषतः बापाची भूमिका बजावणाऱ्या कलाकाराचे..
चेहऱ्यावरील हावभाव आणि देहबोली यातून त्याने जो बाप साकारलाय, त्याला तोड नाही....त्या क्षणाला तो कलाकार नव्हताच...होता तो फक्त बाप!!
डॉ विद्या डी निकाळजे (पुणे)

हा एपिसोड क्रमांक 118 , यू टयूब वर available आहे
https://youtu.be/1fs-kgdVxHA

मुलीला येणारी ऋतु प्राप्ति आणि घरी एकटा असणारा बाबा, आपल्या लाड़क्या लेकी साठी काय काय करतो ते अतिशय अलगद रित्या उलगडून दाखवल आहे

तुरु धन्यवाद, संपूर्ण कविता हवी होती ती मिळाली म्हणून. परवाच हा भाग पाहिला आणि भयंकर आवडला. सचिन देशपांडे त्या बाबाचं नाव - अप्रतिम अभिनय केलाय. रेहा पण खूप निरागस आणि सुंदर दिसते , सगळ्यांचा सहज अभिनय, अभिनय वाटतच नाही. फक्त वेळ 10 ची आहे मालिकेची म्हणून रोज बघता येत नाही पण तुनळी वर बघते अधून मधून. सई ला रेहा मेकअप किट देते तो आणि अप्पा आजोबाचा आणि सई चा एपिसोड पण खूप आवडला.

फार फार सुंदर मालिका आहे ही. आपले आजोबा मरू शकतात या कल्पनेने सई हळवी होते तो आणि रिहाला पहिल्यांदा मासिक पाळी येते तो हे दोन एपिसोड्स फार आवडले. सर्वच लोक खुप ताकदीचा अभिनय करतात या मालिकेत. तुपारेचा टीआरपी ह्या मालिकेपेक्षा जास्त असणे दुर्दैवी आहे.
तुरू, तुमची पोस्ट आवडली.

फार फार सुंदर मालिका आहे ही. >>> अगदी अगदी.

नात्यांची सुरेख गुंफण, मोठे मोठे प्रश्न पण सहजतेने सोडवणारी. हलकीफुलकी कौटुंबिक तरीही समाजभान असणारी मालिका.

वर तुरु यांनी दिलेली निकाळजे यांची पोस्ट आहे, तो एपिसोड तर फार तरल होता. हॅटस ऑफ पुर्ण टीम आणि चॅनेल.

मी ही आणि भेटी लागी जीवा दोन्ही मालिका आवर्जुन बघते.

तुपारेचा टीआरपी ह्या मालिकेपेक्षा जास्त असणे दुर्दैवी आहे.>> तेच तर, zee marathi चा पूर्वा पार चालत आलेला प्रेक्षक आहे, त्याच पुण्याई वर अजुनही फालतू मालिका तग धरून आहेत. एकाही मालिकेत राम नाही तरी प्रसिध्हीच्या शिखरावर आहेत.

आज एक दोन भाग बघितले खरच खुप छान आहे मालिका , वरची पोस्ट कालपासुन व्हायरल झालिये त्यामूले आज बहुतेक व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपला याच मालिकेची चर्चा.

Pages