‘माथेरान’ व्हाया ‘बीटराईस क्लिफ’ आणि ‘माधवजी पॉईंट’

Submitted by योगेश आहिरराव on 10 October, 2018 - 03:34

‘माथेरान’ व्हाया ‘बीटराईस क्लिफ’ आणि ‘माधवजी पॉईंट’

गेल्या वर्षी सरत्या पावसात केलेल्या अलेक्झांडर रामबाग ट्रेक नंतर खाटवण मधून माथेरानला जाणाऱ्या वाटा खुणावत होत्या. मधल्या काळात माथेरानचे दोन ट्रेक चार वेगळ्या वाटेने झाले. खाटवण मधील बीटराईस क्लिफची वाट माधवजी पॉईंटला जोडायची असा मनसुबा होता. तसेही भोरप्या नाळेच्या ट्रेक नंतर तीन आठवडे होऊन गेले तरी कुठे जाणे झाले नव्हते. घरातली छोटी मोठी कामं, लग्न कार्य, नातेवाईक, मित्रमंडळी यातच सारे विकेंड जात होते. साहजिकच खाण्यापिण्याची चंगळ यात वजन दोन ते तीन किलोने वाढलं.
वैशाखात तडाखा पुन्हा अनुभवायचा होता. एकदिवसीय त्यात वेळेच्या मर्यादेनुसार नेहमीचे सूत्र प्रवास कमी ट्रेक जास्त अर्थातच पुन्हा माथेरान. बीटराईस क्लिफची वाट चढून माधवजी पॉईंटच्या वाटेने खाली खाटवण मध्ये परत असे ठरले. मी, जितेंद्र, सुनील आणि हेमंत आम्ही चौघे तर पुण्याहून राजेश जाधव या ट्रेकसाठी जॉईन झाले.
सकाळी भल्या पहाटे निघून बोरवाडी, पोखरवाडी मग पुढे बुरुजवाडीमार्गे खाटवण गाठेपर्यंत बराच वेळ खर्च होऊन उन वाढायची शक्यता यामुळे चर्चेअंती रात्री निघायचे ठरले. जितेंद्र आणि हेमंत यांना डोंबिवलीतून पिकअप करून भयंकर ट्रॅफिक जाम व नाहक मनस्ताप सहन करत चौक मार्गे बोरगाव गाठायला रात्रीचे पावणेदोन वाजले. तोवर सुनील आणि राजेश आमची वाट पाहत होते. राजेश तर पुण्याहून बाईक घेऊन आले होते. बोरगाव अलीकडे मोरबे जलाशयाकाठी बापदेव मंदिराजवळ उघड्यावर पथारी पसरली. जेमतेम दोन तासांची झोप काढून सकाळी सव्वाचार वाजता उठलो. खरे साहेबांनी कडक चहा तयार केला, सोबत टोस्ट हलका नाश्ता व बाकी सोपस्कार पूर्ण करून पोखरवाडीसाठी निघालो. दहा मिनिटात वाडीत पोहचतो तोच झुंजूमुंजू होऊ लागले. शाळेजवळ माझी गाडी आणि राजेशची बाईक ठेऊन समोरचा ओढा ओलांडून बुरुजवाडीच्या दिशेने निघालो. टेपाड चढून पुढच्या दहा मिनिटात सपाटी वरून चालत मागच्या वेळी ज्या घरात चौकशी साठी थांबलो होतो तिथेच थांबा घेतला. सुनीलला त्या घरातल्या माणसाचे नाव चांगलेच लक्षात होते. पावसाळ्यात बुरुजवाडीत वारेमाप पाणी असले तरी उन्हाळ्यात मात्र खालच्या विहिरीतून पाणी आणावे लागते. एक एक ग्लास पाणी पिऊन पुढे निघालो. पुढच्या वाडीला डावीकडे ठेवत थेट खाटवणच्या वाटेवर. हल्ली खाटवण पर्यंत पिकअप, टेम्पो जाऊ शकेल असा कच्चा रस्ता पण पावसाळ्यात मात्र मुश्कीलच. बुरुजवाडी ते खाटवण ही तशी मोकळं वनातून चाल वाटेवर जंगल नाही, अगदीच नाही म्हणायला थोडीफार करवंदाची जाळी जाता जाता थोडीफार तोंडात टाकत होतो. त्यात पूर्वेला गारबेट ते सोंडाई या डोंगर रांगेच्या पलीकडून सूर्य वर येण्याच्या आत खाटवण गाठायचे, थोडक्यात उन्हाचा त्रास व्हायच्या आधीच जास्तीत जास्त अंतर पार करता यावे असा सरळ हिशोब, हाच सकाळी लवकर सुरुवात केल्याचा मुख्य फायदा.
मधल्या ओढ्याच्या लोखंडी पुलाजवळ छोटा ब्रेक घेतला गेल्या पावसात आलो होतो तेव्हा इथले दृश्य ते वातावरण सारेच धुंदमय. आताही कोवळ्या उन्हात पक्ष्यांची किलबिल चालू होती, डावीकडे डोळे बारीक करून पाहिलं तर रामबाग पॉईंटच्या वाटेवर काही गावकरी जाताना दिसत होते. केळी, केक, खजूर असं झटपट तोंडात टाकत पुढे निघालो.
छोटा चढ पार करून वळसा घेत पठारावर आलो तेव्हा डावीकडे अलेक्झांडर पॉईंट त्याची खाटवण गावात उतरणारी सोंड व्यवस्थित नजरेत आली. बरोब्बर साडेसातच्या सुमारास खाटवणमध्ये दाखल झालो. सोबत आणलेली इडली आणि बॉईल अंडी असा दमदार नाश्ता. सर्व झाल्यावर नेहमीप्रमाणे वाटेसाठी विचारणा, गावकरी आम्हाला अलेक्झांडरने जाण्यासाठी सुचवू लागले.
आमची ती वाट मागे झाली आहे. त्यांना दिशेनुसार अलेक्झांडर पॉईंट आणि गारबेट पॉईंट यामधील दरीतून जो मोठा ओढा माथेरान कडून वाहत येतो, त्या दिशेच्या बीटराईस क्लिफच्या वाटेने वर जायचं आहे असं सांगितल्यावर तिथे असलेल्या एका मावशीने आम्हाला हवी ती माहिती देण्यास सुरुवात केली. मावशीला इथल्या भागाची चांगलीच माहिती. मागे म्हणालो तसे खाटवणला माथेरानने अगदीच कवेत घेतले आहे, एकीकडे रामबाग अलेक्झांडर तर दुसरीकडे गारबेट सोंडाई. याच मधोमध कुठेतरी बीटराईस क्लिफ लपलेले.
अमन लॉज ते बाजारपेठ या वाटेवरचे छोटे रम्य स्थळ. खाटवण मधून कमीत कमी वेळात माथेरान मध्ये जाणारी अलेक्झांडरची वाट मोठी सोयीची तसेच माधवजीची वाट आणि क्वचित प्रसंगी काही कामानिमित्त अथवा कार्यासाठी गारबेटला जाण्यासाठी नदी ओलांडून उजवीकडच्या खड्या दांडाने वर जाणारी गारबेटची वाट. त्या मानाने या बीटराईस क्लिफच्या वाटेने फारच क्वचित कुणी गेले तरच. आम्ही या वाटेबद्दल सांगितल्यावर मावशीने या बीटराईसच्या वाटेला गावकरी ‘काळोख्या खंडीची वाट’ म्हणतात असा खुलासा केला.
हाताशी असलेला वेळ आणि इतर गोष्टी लक्षात घेऊन कुणी सोबत मिळेल का असे मावशीला विचारले, लागलीच त्यांनी समोरच्या घराकडे पाहून हाक मारली. साधारण पन्नाशीच्या आसपासचे मामा बाहेर आले. त्यांना विचारल्यावर आमचीच फिरकी घेत मी नाही येत म्हणाले व सरळ पुढच्या वाडीत तडातडा चालत निघून गेले. आम्ही आपले अवाक झालो. नंतर मावशी सोबत बोलताना कळाले, की या मामांना या भागातील खडानखडा माहिती. त्या म्हणाल्या, ‘यालाच सोबत घेऊन जा, काय थोडेफार मागेल ते द्या. तो तुम्हाला व्यवस्थित वाट दाखवेल’.
दहा पंधरा मिनिटात मामा परत आले थोडक्यात त्यांचा कार्यक्रम उरकून त्यांच्या सोबत त्यांच्या साडूला घेऊन आले. साडूचे आणि आमचे संभाषण हा एक वेगळाच विषय होइल! साडूची गाडी टॉप गिअर मध्ये आऊट ऑफ कंट्रोल होती. साडू वारोसा हुंबर्णेत रहाणारा, मला सगळं माहीत आहे असं हसमुख चेहर्याने सांगत होता. साडू मागे लागला, ते पाहून मनात म्हटलं यांना आणखी कशाला! मामांनी त्याला स्पष्ट नकार दिला.
मामांशी मजुरी ठरवताना ते नाराज होणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली पण याचा अर्थ असा नाही की हट्टापायी पैशाच्या जोरावर त्यांनी जे मागितले ते दिले. अगदी सारासार विचार करून मी निर्णय घेतला कारण यातून चुकीचा पायंडा पडून या गरीब ग्रामस्थांना नको त्या सवयी लागायला. खरंतर वाटाड्या बद्दल माझी मतं अत्यंत रोखठोक आहेत. पाहिजे ते वाट्टेल ते देऊ पण न्याच अशी फालतुगिरी तर आम्ही कधीच करत नाही. मामा घरात जाऊन शर्ट बदलून खांद्यावर भगवं उपरण टाकून आले, त्यांच्या मागोमाग आम्ही पाच जण, असं वाटत होते की खाटवण मध्ये निवडणुकीचा प्रचार करायला आलो की काय! मामा पण फुल्ल टू राजकरण्यासारखे एकदम हातवारे करत याला त्याला आवाज देत तुडूतूडू पुढे जात होते. खाटवणची जिल्हा परिषदची शाळा. वाटेत डावीकडची माधवजी पॉईंटची वाट सोडून नदी पात्राच्या दिशेने निघालो. वाळू रेती दगड धोंडे यांनी भरलेली रुंद नदी पात्रातून चाल. IMG_20180513_085908.jpg
तसे नदीच्या डाव्या उजव्या बाजूने पायवाटा होत्या पण आम्ही थेट पात्रातून चालणे पसंद केले. मामा मोठे मिश्किल तसेच हजरजबाबी मध्येच एखादा पंच मारत मग काय हसून हसून पुरेवाट होई. अर्थात नुसतं खिदिखिदी फिदीफिदी न करता सोबत त्यांचा अनुभव आणि योग्य ती माहिती देत होते. अशी एखादी हटके सोबत असली तर चाल आणि वेळ दोन्ही कळून येत नाही. बरेच आत गेल्यावर एक आजोबा सोबत लहान मुलाला घेऊन येत होते. त्यांना इतक्या आत रानात पाहून चकित झालो.
मामांनी त्यांना आवाज दिला, बोलणं झाल्यावर समजले ते त्यांच्या ७-८ वर्षाच्या नातूला जंगलात फिरायला घेऊन निघाले होते. नवीन पिढीला या वाटा हे सर्व समजायला हवे, असं त्यांच्या बोलण्यातून जाणवत होते. खरंच पूर्वीच्या जुन्या लोकांनी हे सर्व नवीन पिढीला समजावून मार्गदर्शन करणे गरजेचे आहे त्यापेक्षाही नवीन मुलांनी स्वतः उत्साहानं शिकून ते व्यवस्थित लक्षात घ्यायला हवे तरच हा वारसा खऱ्या अर्थाने पुढे जाईल. आजोबांचा दृष्टीकोन आवडला. जसजसे पुढे जात होतो तशी रुंदी कमी होत गेली. दोन्ही बाजूला माथेरानचे उत्तुंग कडे. डावीकडे अलेक्झांडरची वाट बरीच मागे पडली होती, वरच्या बाजूला आमची उतराईची माधवजी पॉईंटची वाट खंडाळा पॉईंटच्या खालच्या बाजूने तिरक्या रेषेत सरकत होती. तर उजवीकडे गारबेटचा कडा तिथे खाटवण मधून जाणारी वाट दूर मागे नजरेपलीकडे. IMG_20180513_095555.jpg
साधारण तास दीड तास चालीनंतर हळूहळू नाळ अरुंद होत चढ जाणवू लागला. बीटराईस क्लिफची वाट ही पूर्ण नाळेतून तरीच गावकरी या वाटेला ‘काळोख्या खांडीची वाट’ म्हणतात. नाळ म्हटलं की आमच्या आघाडीच्या खरे साहेबांचा विक पॉईंट इथं सुद्धा लीड घेऊन भराभर पुढे निघून गेले. माथेरानच्या मिनी ट्रेनचा आवाज दरीत स्पष्ट ऐकू येत होता वर सरळ रेषेत पाहिल्यावर ट्रेन जाताना नजरेस आली.
नाळेतले एक एक टप्पे पार करत उंची गाठत होतो. नाळ फारशी अवघड मुळीच नाही. IMG_0238.JPG
नाळेच्या चढाईचे काही टप्पे.. जसं जसे आत जात होतो, तशी नाळ आणखी अरुंद आणि चढाई वाढत्या उन्हात जाणवू लागली. डावीकडे समोरासमोर दोन घळी इंग्रजी V अक्षराप्रमाणे एकमेकांना पुढे मागे छेदत होत्या. त्यापैकी उजवीकडच्या घळीच्या वरच्या बाजूला बरोब्बर मायरा पॉईंट लक्षात आला. एक अंदाज घेऊन मामांना विचारलं, मामा इथून मायरा पॉईंट वर जात येईल का ? IMG_0205.JPG
मामा : हो मंग, वाट हाये. ‘गळतीची वाट’ आणि ही ‘चांभार पाण्याची वाट’. थोडक्यात या दोन वाटा एक मायरा पॉईंटवर जाते तर दुसरी विरुध्द बाजूला बाजारपेठे अलीकडे जाते. पण इतर वाटांच्या तुलनेत या अती दुर्गम वाटा. पुढे नाळेच्या एका चिंचोळ्या टप्प्यात मोठा धोंडा वाट अडवून बसलेला, त्याच्या खालून वाकत सरकत सरपटत पलीकडच्या बाजूला वर चढलो.
जीवधनच्या पश्र्चिम दरवाज्याची आठवण झाली. बऱ्यापैकी निर्मणुष्य आणि दुर्गम अश्या वाटेवर एक गोष्ट मात्र पावलोपावली खटकली ती म्हणजे कचरा... अक्षरशः प्लॅस्टिकच्या बाटल्यांचा खच पडलेला. अगदी चप्पल, बूट, कपडे, प्लास्टिक पिशव्या काय काय नको ते सारे काही.
नाळेच्या डावीकडे वरच्या बाजूला माथेरानचा बाजार परिसर, याच भागात छोटी मोठी हॉटेल आणि खानावळी कितीही प्रयत्न केला तरी इथूनच दरीत लोटत पुढे पावसाळी ओढ्यासोबात दूषित प्रवास ठरलेला. बहुतेक हिल स्टेशन ची अशीच अवस्था झाली आहे. इतक्या सुंदर दरीत, या नाळेत, छोट्या छोट्या घळीत असे हाल पाहून फार वाईट वाटले. मामा तर म्हणाले हे सारं गावाच्या पुढे वाहत जाऊन पार धरणात जमा होत. इथल प्रशासन आणि बेशिस्त बेधुंद पर्यटकांबद्दल तर काय बोलावे नी काय नाही !
साधारण निम्याहून अधिक चढाई झाल्यावर एके ठिकाणी दोन वाटा फुटत होत्या. डावीकडची वाट मायरा पॉईंटच्या दिशेने निघालेली तर उजवीकडची जंगलात शिरत पुढे कड्याच्या बाजूने गारबेटकडे. मामा म्हणाले आता वाटेने जाऊ, नाळ बास झाली. मामांचे बोलणे ऐकून जरा बरं वाटलं. कधी नव्हे तर मला स्वतःला नाळ चढून कंटाळा येऊ लागला होता. भर उन्हात दगड धोंड्यावर कसरत करत चढाई करताना पायावर अतिरिक्त ताण जाणवत होता. त्यात माझे टाचेचे दुखणं पुन्हा सुरू झाले. बहुधा गेल्या काही दिवसांचा ब्रेक आणि थोडे वाढलेले वजन याच परिणाम असावा. मामा डावीकडच्या वाटेने पुढे निघाले. त्यांच्या पाठोपाठ खरे साहेब, सुनील, राजेश ही मंडळी पुढे गेली. मी आणि हेमंत आरामात निघालो. मायरा पॉईंटची आडवी वाट वळसा घेत पलीकडच्या बाजूला गेली. मामांनी अस्पष्ट अशा अरुंद वाटेने करावीच्या रानातून चढाई सुरु केली. त्यांच्या मागे तश्याच घसरड्या वाटेने वर चढत बाहेरच्या बाजूला आलो. आता डावीकडे दरी त्याखाली मायरा पॉईंटची वाट तर उजवीकडे घसारा असलेला दांड तो चढून पलीकडच्या घळीतून वर जायचं आहे असं मामा सांगत होते. पण तो घसारा असलेला दांड चढून पलीकडच्या घळीत जाणारा अरूंद ट्रेव्हर्स बर्यापैकी खचलेला जोडीला दृष्टीभय आणि प्रचंड घसारा. त्यात मामा जी वाट दाखवत होते ती चढाई नाळेपेक्षाही तीव्र वाटत होती. भर उन्हात अर्धवट दमलेल्या अवस्थेत हे सार करणं जीवावर आलं होतं. शेवटी पुन्हा माघारी येऊन नाळेतून जाण्याचा निर्णय घेतला, त्यानुसार पुन्हा सगळे त्या गचपण मधून उतरत नाळेत आलो. झाल्या प्रकारात अर्धा पाऊण तास निघून गेला. थोडक्यात मामांनी चांगलीच आड वाटेची झलक दाखवली. थोडी विश्रांती घेत खजूर चिक्की तोंडात टाकून पुन्हा नाळेतून चढाई सुरुवात केली.
पण काहीही असो, माथेरानची या वेगवेगळ्या वाटांनी चढाईत एक गोष्ट मात्र कायम सुखावते ती म्हणजे चढाई कितीही कष्टप्रद वाटली तरी माथ्यावर दिसणारं हिरवगार रान, वर गेल्यावर जी काही हिरवीगार शीतल छाया किंवा काहीही म्हणा ही बात काही औरच. अंदाजे तीन चारशे फूट नाळेतली चढाई शिल्लक असावी. बाकी चढ एकदम तीव्र होत दगड धोंडे सांभाळत चांगलीच कसरत करावी लागत होती.
एक मोठा पॅच समोर आला, उजव्या बाजूने होल्ड घेत एक एक जण सावकाश वर गेलो. नाळेच्या शेवटच्या टप्प्यात बरीच पडझड झालेली, काही ठिकाणी चक्क मिनी ट्रेनचे लोखंडी स्लीपर वाहून आलेले.
हे बहुधा २००५ सालच्या अतिृष्टीमुळे झाले असावे, त्या वेळी माथेरानवर तसेच या मिनी ट्रेन सेवेवर भरपूर परिणाम झाला होता. नाळ जिथून सुरू होत होती तिथे हूम पाईप टाकून संरक्षक कठडा बांधला होता, त्यामुळे नाळेतून बाहेर येत उजव्या बाजूने झाडीतून वर घुसत गेलो. वाट अशी नाहीच, वरती लोकांचे आवाज येत होते. लाल भुसभुशीत मातीत घसरत घसरत अधे मध्ये झाडांच्या फांद्या मूळ जे हातात मिळेल त्याला धरून एकदाचे रेल्वे ट्रॅक वर आलो.
बीटराईस क्लिफ उजवीकडे ठेऊन ट्रॅक वर विरुध्द दिशेला म्हणजेच बाजार पेठेकडे आम्ही निघालो. घामाघूम होऊन लाल मातीने माखलेला आमचा अवतार पाहून बरेच जण तोंड वाकड करत होते. पण आम्ही मात्र आपल्या धुंदीत त्यात सुनील बोलून पडला, ‘अरे आपली तर रेल्वे ट्रॅक वर काम करणारे मजूर बिगारी यांच्या पेक्षा ही भयानक हालत झाली आहे’. अमन लॉज ते बाजारपेठ या मार्गावर ठराविक वेळेत मिनी ट्रेनची शटल सद्या सुरू आहे. रविवार आणि त्यात सुट्टीचे दिवस असल्यामुळे बरीच गर्दी होती. वीस एक मिनिटात डावीकडे मायरा पॉईंटसाठी आत वळालो.
IMG_20180513_134106.jpg
थोडं खाली उतरून पॉइंटवर आलो तेव्हा खाली दूर आम्ही जिथून सुरुवात केली ते खाटवण, पूर्ण नाळेची वाट तर समोर गारबेटची बाजू. तिथूनच पुढे वाट खाली उतरत होती हीच ती मायरा पॉईंटची वाट जी आम्ही चढाई करताना पहिली होती. थोडे खालच्या बाजूला एक बारमाही जिवंत पाण्याचा झरा. पाण्याला बऱ्यापैकी वाहती धार होती. पाणी साठवण्यासाठी हौदासारखे चौकोनी दगडी बांधकाम केलेले यालाच ‘हॅरीसन स्प्रिंग’ असे हि म्हणतात. शार्लोट तलावाचे पाणी फिल्टर करून गावाला पुरवले जाते. या शार्लोट तलावाव्यतिरिक्त सिम्पसन टॅंक, हॅरीसन स्प्रिंग, मैलेट स्प्रिंग, पेगमास्तर वेल ही छोटी पाण्याची ठिकाणं आहेत. पुन्हा रेल्वे ट्रॅकच्या बाजूने चालत अर्ध्या तासात स्टेशन जवळ आलो. मामांचा लहान मुलगा इथल्याच एका पॉवर लॉन्ड्रीत कामाला आहे. मामांनी बाजार पेठेच्या आतून, भाजी मंडई, मोहल्ला, गल्ली बोळात फिरवून लॉन्ड्रीत नेले. लॉन्ड्रीत पंख्याखाली जेव्हा मांडी घालून बसलो तेव्हा जरा बरं वाटलं. पोखरवाडी सोडल्यापासून जवळपास साडेसात तासाहून अधिक चाल झाली होती. पाण्याच्या बाटल्या अर्ध्याहून अधिक रिकाम्या, मामांच्या मुलाने गार पाणी पाजले. सोबत सर्वांना बाटल्या भरून दिल्या. तेवढेच पाण्याची बाटली विकत घेण्याचे पैसे वाचले, खरतर बहुतेक या दिवसात माथेरानला तसेच भीमाशंकर रायगड अश्या काही ठिकाणी सरत्या उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाई जाणवते. त्यामुळे असा विचार करता मामांच्या मुलाकडून मोलाची मदत झाली. दुपारचं जेवण माधवजी गार्डन जवळपास करायचे ठरले. गार्डन मध्ये थोडीफार गर्दी तशी अपेक्षीत होतीच, बाजूच्या स्टॉल मध्ये अर्थातच मालकाची परवानगी घेऊन सोबत घरातून आणलेल्या जेवणाची पंगत मांडली. काय माहित पण मला थोड अस्वस्थ वाटत होते, बहुधा रात्रीच्या जागरण दगदग यामुळे पित्त अपचन झाले असणार. त्यामुळे मी काही न खाता तसाच शांत बसून राहिलो, शेवटी राजेशने लिंबू सरबत तयार केले त्या सोबत खरे साहेबांनी काही गोळ्या दिल्या, तेव्हा जरा बरं वाटू लागले.
आरामशीर सव्वाचार वाजेच्या सुमारास माधवजी गार्डनच्या पाठीमागून उतरायला सुरुवात केली. झाडीतून बाहेर येताच वाट कड्याला बिलगून जाताना दिसली. थोडक्यात डावीकडे खोल दरी आणि उजवीकडे माथेरानची भिंत अगदी रामबाग पॉईंटच्या वाटेसारखीच आणि त्याच दिशेत जाणारी. सुरुवातीला त्या अरुंद वाटेवर बऱ्यापैकी घसारा एक एक जण सावकाश पुढे गेलो. खाली दरीत आमची सकाळची नाळेतली वाट तर पलीकडे गारबेटची बाजू. एक मात्र बरे होते सुर्य आता पश्चिमेकडे तर आम्ही माथेरानच्या साधारण पूर्व बाजूने उतरत होतो त्यामुळे उन्हाचा त्रास नव्हताच. उन्हाळ्यात ट्रेक करताना चढाईचा मार्ग त्याची स्थिती लागणारा वेळ आणि त्याची दिशा या सर्व गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. उदा. पश्चिमेकडील चढाई उन वाढायच्या आत पूर्ण करून वर पोहचणे तसेच उतराई विरुध्द दिशेने करून उन्हाचा थेट त्रास टाळता येतो तसेच वाटांची स्थिती त्यानुसार चढाई उतराई ठरवत, उघडी बोडकी आहे की नाळ आहे की आणखी जंगल वाट आहे या साऱ्या बाबी विचारात घेऊन वेळेनुसार नियोजन केले तर उन्हाळी भटकंती चांगल्या प्रकारे एन्जॉय करू शकतो. असो..
थोड अंतर पुढे जाताच एक सांडपाण्याची धार हे वरच्या बाजार पेठेतल्या हॉटेलवाल्यांचे ड्रेनेज पाण्याबरोबर चमचे, काटे चमचे, वाट्या आणि बरेच काही, आता यावर काय बोलावे ! या भागात वाटेला फारसा असा उतार नाही पण वर म्हणालो तशी आडवी अरुंद चाल मात्र बरीच. काही अंतर जात उजवीकडे कड्यात हे छोटे देवाचं स्थान. मागून काही गावकरी मंडळी येऊन पुढे निघून गेली त्यांचा हा रोजचा मार्ग, त्यांची बहुतांशी रोजी पर्यटकांवर अवलंबून असल्यामुळे सुट्टीच्या दिवसात काम करून थोडीफार काय ती कमाई. खंडाळा पॉईंटच्या खालच्या बाजूने वळसा घेत वाटेतला हा एक घसार्याचा टप्पा. बरेच अंतर कापलं तरी खाली दरीकडे पाहता फार उतराई झालेली वाटत नव्हती. थोडक्यात आधी म्हणालो तसे ही वाट सुरुवातीला बऱ्यापैकी अंतर आडवी जाते. घसारा टप्पा पार करून काही अंतरावर पाणी ठिपकत होते, झाडाचे पान लावून एका पत्र्याच्या डब्यात ते स्वच्छ पाणी पूर्ण भरलेले बाजूला पाण्याची बाटली कापून तिचा प्लॅस्टिकचा ग्लास तयार केलेला. मामा म्हणाले हा या वाटेवरचा बारमाही पाणवठा. तिथेच बाजूला चूल पेटवल्याच्या खुणा. तोंड धुवून पाणी पिऊन निघालो. आता वाट उतरत थोडा झाडोरा लागला, उजवीकडे वळसा घालून बाहेर आलो तेव्हा अलेक्झांडरची खाटवण मध्ये उतरलेली सोंड दिसू लागली. गारबेट गाव बऱ्यापैकी वरच्या पातळीत त्याच बाजूला दूरवर सोंडाई. निम्म्यापेक्षा अधिक उतराई झाली होती. एके ठिकाणी बांबूचा लहान टप्पा मग पुन्हा विरळ झाडी. वाटेत एका मोठ्या ओढ्यात थांबा घेतला. शेवटची नागमोडी वळणे उतरत खाटवण गावात आलो घड्याळात पाहिलं तर सहा वाजून गेले. खाटवण मध्ये नळाला पाणी, दिवसभर भर उन्हात फिरून घामाने हैराण झालो होतो. नळाला पाणी पाहताच अंघोळी उरकल्या. दिवसभराचा शीणवटा कुठच्या कुठे नाहीसा झाला.
मामांची गळाभेट घेत लवकरच पुन्हा येऊ असे सांगून परतीच्या वाटेला लागलो. कातरवेळी त्या बुरूजवाडी अलीकडची पठारावरील चाल, तो पसरलेला संधी प्रकाश, दूरवर चांगेवाडी, सोंडईवाडीत नुकताच एखादा दिवा मिणमिणतोय तर कुठल्यातरी झापातून हलकासा धूर निघतोय. सारं वातावरण अचंबित करणारं. आम्ही पाचही जण भारावलेले. कुणी कुणाशी शब्द न बोलता सार फक्त अनुभवत होतो. पोखरवाडीत यायला आठ वाजले. गाडी काढून बोरगाव फाट्या अलीकडे एका गाडीवर चहा नाश्ता करायला थांबलो, आम्लेट पाव आणि चहा. खरंतर यासाठी हेमंतला पैकीच्या पैकी मार्क द्यायला हवे. ट्रेकची यशस्वी सांगता करत राजेश सरांना निरोप देऊन पुन्हा माथेरान डोक्यात घोळत घरी परतलो.

अधिक फोटोसाठी हे पहा : https://ahireyogesh.blogspot.com/2018/06/matheran-beatrice-cliff-madhavj...

योगेश चंद्रकांत आहिरे

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users