ईश्वरी. . .

Submitted by sarika choudhari on 4 October, 2018 - 05:31

जवळ पास ३० वर्षानी मुंबईवरुन मी अमरावतीला आले होते.अमरावतीला आलेच तर देवीच दर्शन करून घ्याव म्हटलं. देवीच्या दर्शनासाठी निघाले आणि गर्दित एक ओळखीचा चेहरा दिसला . हो कार्तिकीच होती ती. ती मला ओळखतही नसावी पण मी तिला चांगलीच ओळखत होते कार्तिकी आता मोठी झाली होती पण तिच्या मनावर झालेला आघात ती विसरली असेल का ? की वयाबरोबर त्याचा विसर पडला असेल ?
आजही ती सकाळ आठवते अगदी जशीच्या तशी. . . . १५ ऑगस्टचा दिवस होता आम्ही सर्व शाळेत जायची तयारी करत होतो. १५ ऑगस्ट म्हणजे जणू सणच असायचा आमच्या साठी. आजी त्यादिवशी छान गोड पदार्थ बनवायची . आम्ही सर्व म्हणजे माझ्या दोन मोठ्या बहिणी, शेजारची सुनंदा काकूची ईश्वरी व कार्तिकी आदल्या रात्रीच मेंहदी काढायचो. शाळेत १५ ऑगस्ट निमित्त सांस्कृतीक कार्यक्रम राहायचा आणि ईश्वरी त्या कार्यक्रमात नेहमीच असायची. ईश्वरी दिसायला सुंदर त्याचबरोबर छान नृत्य करायची . शाळेच्या प्रत्येक कार्यक्रमात तिचे नृत्य असायचेच. आम्ही ही सामुहीक नृत्यात भाग घेतला होता. पण ईश्वरीच नृत्य पहायला आम्ही सर्व उत्सुक होतो. माझी आई छान तयारी करुन द्यायची. आजही ईश्वरी व कार्तिकी आमच्या कडेच होती. आई ईश्वरीला तयाार करत होती.खुप सुंदर दिसत होती ईश्वरी. तीच्या नंतर आमचा नंबर लागनार होता....आई एकीएकीला तयार करत होत. ईश्वरी म्हणाली मी घरी आईला दाखवुन येते कशी दिसते ते. आम्ही सर्व तयारीत मग्न. कार्तिकी आमच्याकडेच नृत्याची तालीम करत होती . थेाड्यावेळानी अचानक मोठा आवज झाला. आम्ही सर्व काय झाल हे पहायला बाहेर आलो. पहातो तर काय समोरील दृश्य पाहुन आम्ही सर्व घाबरलोच. कार्तिकी एकदम धावत सुटली आई, बाबा, ताई म्हणून ती ओरडायला लागली. सर्वानी तीला लगेच पकडल. ईश्वरीच्या घराला आग लागली होती. आम्हाला आत मध्ये नेण्यात आल. आजी आमच्या जवळ बसली होती. बाहेर धावाधाव सुरु होती. आग विझविण्याचे प्रयत्न सुरु होते. अग्निशमन दलाची गाडी, रुग्नवाहीकेचा आवाज बाहेर येत होता. आम्ही सर्वच घाबरलो होतो. बाहेर काय सुरू आहे यातल काही कळतच नव्हत. कार्तिकी खुप रडत होती. ईश्वरी व रमेश काका ( ईश्वरीचे बाबा ) गंभीर भाजले होते. पण सुनंदा काकू घरात कुठेच दिसेना. हे सर्व आईने येऊन आजीला सांगीतल. आजी देवाच नाव घेत होती. तेवढयात सुनंदा काकूचा आवाज आला त्यासमोरील दृश्य पाहून जागीच बसल्या हातातील अबोलीची फुल सगळीकडे विखुरली होती. ईश्वरीला व तिच्या बाबाला रुग्णलयात नेण्यात आलं. सुनंदा काकूला आमच्या घरी आणण्यात आलं. घरी बघ्याची गर्दी जमली होती. सुनंदा काकूची शुध्द हरपली होती. कार्तिकी आई जवळ बसुन रडत होती. घरासमोरुन १५ ऑगस्टची मिरवणुक जात होती.. आणि आम्ही घरात सर्व घाबरलेल्य स्थितीत बसलो होतो...
सुनंदा काकू शुध्दीवर आल्या. त्या ईश्वरीला सारखा आवाज देत होत्या . ईश्वरी तुझ्यासाठी फुलं अाणली ये ना ग तुला छान गजरा करुन देते. आजीनी त्यांना समजवुन सांगीतल. पण त्या रडायचं काही थांबेच ना. थोड्या शांत झाल्यावर त्या सांगायला लागल्या आज ईश्वरी सकाळपासुन भजी करून दे म्हणून मागे लागली होती. मी तिला म्हटलं तू शाळेचा कार्यक्रम आटपून ये. तुला मस्त गरम भजी करून देते. पण ऐकेच ना. तिच्या बाबांची ती लाडाची . हे म्हणाले तू नाही करुन देत तर राहु दे मीच करुन देताे माझ्या ईशू ला भजी. म्हणून त्यांनीच स्टाेव्ह पेटवला व तेल गरम करायला ठेवल. मी पाटील काकु कडे ईश्वरीच्या गजऱ्यासाठी फुलं आणायला निघुन गेली. आणि येऊन पाहते तर काय सर्व होत्याचं नव्हत झालं होत.
आजुबाजुला सर्व बोलत होते. कदाचीत स्टाेव्हचा भडका उडाला होता. रात्र सर्वाची अशीच गेली. बाबा घरी येऊन परत गेले.आईला काय ते बोलेले. पण सुनंदा काकूला काहीच सांगितल नाही. या सर्वात आम्ही सर्व बच्चे मंडळी कधी झोपी गेलो ते कळलचं नाही. जाग आली तेव्हा रडण्याचा आवाज आला. ओसरीत जावुन पाहील तर ईश्वरी व रमेश काका खाली झोपले होते.सर्वजण रडत होते. नेमक काय झाल ते कळेना. सुनंदा काकू तर नुसतं पाहत बसल्या होत्या. कार्तिकीला पण काही कळत नव्हत. ती सारखी आईला विचाारत होती, ताईला , बाबाला काय झालं म्हणून. आजीनी तीला जवळ घेतलं . तिला सांगितलं बाळ तुझे बाबा आणि ताई देवाघरी गेले. पण त्यामागचा अर्थ काही कळेना. सुनंदा काकूना सारख सांगत होते ईश्वरी या जगात नाही.. पण त्या रडतच नव्हत्या. ईश्वरी व रमेश काकाना घेऊन जात असताना सुनंदा काकू अचानक उठल्या आणि इतका वेळ गप्प असणाऱ्या एकदम बोलायला लागल्या कुठे नेत आहात त्यांना, तिचे बाबा भजे करून देत आहेत तिला त्यांना कुठे नेवु नका आणि ईश्वरी तू थांब मी लवकरच फुल आणुन देते व छान गजरा बनवते बघ. त्या जायलाही निघाल्या. अाई व आजीनी त्यांना पकडले. त्यांची असंबंध्द बडबड चालुच होती. त्यांचे नातेवाईक आले , गावातील लोक आले त्याना समजवण्याच बराच प्रयत्न केला की ईश्वरी व तिचे बाबा आता या जगात नाही. पण त्या स्वत:शीच बडबड करतच राहील्या. सर्व सोपस्कार झाले पण त्या शेवट पर्यंत रडल्याच नाही. सर्व म्हणत होते त्यांना मोठा मानसिक धक्का बसला आहे. ईश्वरी व तिचे बाबा या जगात नाही हे मानायला त्या तयारच नव्हत्या. लहानगी कार्तिकी आता अकाली प्रौढ झाली होती. असं वाटायचं तीच्या आईचीच ती आई झाली होती. कार्तिकी व सुनंदा काकू गावी त्यांच्या भावाकडे राहायला गेल्या. त्यांनी ही जागाही विकुन टाकली. तिच्या जळक्या घराचे अवशेष दुर झाले, तिथे नविन घरही झालं. पण आठवणीची जळकी लक्तर कायत मनात लटकत राहीली. एक हसतं खेळत कुंटुंब क्षणात उध्वस्त झालं. ईश्वरी, रमेश काकांची खुप लाडाची होती. ते नेहमी म्हणायचे माझ्या ईशुचं लग्न झाल की मी तिच्याच सोबत जाईल. आणि बघा काय दैव सासरी नाही पण देवाघरी मात्र सोबतच गेले.
मंदिरातील घंटेच्या आवाजानी मी भानावर आली. बघा मन किती वेगवान आहे. एक क्षणात आठवणीच्या गावाला फेरुटका मारुनही आलं. कार्तिकीला आवाज दिला तसं तीने मागे पाहीलं. पण ओळख काही पटेना. मी नाव सांगीतल्याबराबर तीला सगळया आठवणी जीवंत झाल्यासारखं वाटलं. तिच्यासोबत एक गोड छोटी मुलगी होती. मी विचाारलं ही छोटी कोण गं तुझ्या बरोबर. ती म्हणाली" ही माझी मुलगी ईश्वरी. ताईचच नाव ठेवलं. आणि या छोटया ईश्वरी मुळेच आई बरी झाली . सर्व नवस झाले, डॉक्टर झाले पण या चिमुकली नी आल्या आल्या एका क्षणांत सर्व ठीक केल. माझ लग्न झालं माझा नवरा मंदार यांनी आईला सोबतच ठेवायचा आग्रह धरल.मलाही बरं वाटल. कारण आईला अस एकट सोडायला मन तयार होत नव्हत. वर्षभरांनी ही चिमुकली आली. तिला मांडीवर घेताच आई खुप रडली आणि इतक्या दिवसांच साठवलेल दु:ख सर्व वाहून गेलं. म्हणुन आम्ही या परीचं नाव ईश्वरीच ठेवल. आईला बरं करायलाच जणु ही आली ग. घरी चल ना आईला भेटायला. "
देवीच दर्शन घेतल व तृप्त मनाने मी ही सुनंदा काकूला भेटायला कार्तिकी सोबत निघाले..
----------------------------------------------------------------------------------------

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

लिखाण छान आहे..
गोष्ट मात्र चटका लावुन जाणारी ..

Sad आपल्या लहानपणी ते वातीचे स्टोव्ह असायचे ना, त्याचा कधी भडका उडेल सांगताच यायचे नाही. ते भरतांना रॉकेल पण सांडायचे. ईश्वरी व तिच्या बाबांबद्दल तसेच तिच्या कुटूंबाबद्दल वाचुन खरच वाईट वाटले. वैर्‍यासोबतही असे कधी होऊ नये.

सारीका , प्रतीसाद यायला वेळ लागतो. काही लगेच तर काही जण उशिरा प्रतीसाद देतात. याचा अर्थ हा नाही की कोणी वाचले नाही. फक्त वेळ लागतो. लिहीत रहा, तुला शुभेच्छा !

सारीका , प्रतीसाद यायला वेळ लागतो. काही लगेच तर काही जण उशिरा प्रतीसाद देतात. याचा अर्थ हा नाही की कोणी वाचले नाही. फक्त वेळ लागतो. लिहीत रहा, तुला शुभेच्छा !+१११११

लिखाण छान आहे..
गोष्ट मात्र चटका लावुन जाणारी .. ..>>> +१
पुलेशु..

लिखाण छान आहे..
गोष्ट मात्र चटका लावुन जाणारी .. ..>>> +१
माझी एक मैत्रीण अवघ्या २४ व्या वर्षी स्टोवचा भडका उडून त्यातच दगावली होती ते आठवले.

छान लिहिलंय..
कथा चटका लावून जाणारी>>+१
लिहीत रहा. पुढील लेखनास शुभेच्छा !

लिखाण छान आहे..
गोष्ट मात्र चटका लावुन जाणारी .. ..>>> +१

छान लिहिलंय..
कथा चटका लावून जाणारी>>+१
लिहीत रहा. पुढील लेखनास शुभेच्छा ! >>>+१११

धन्यवाद , मी पहिल्यांदा मायबोली वर लिहीत आहे. सर्वांनी छान प्रतिसाद दिला. आपल्या सर्वाचे खुप खुप आभार. असेच प्रोत्साहन देत रहा..........

छान लिहिलंय..
कथा चटका लावून जाणारी>>+१
लिहीत रहा. पुढील लेखनास शुभेच्छा ! >>>+१

छान लिखान!
पण कथा मन उदास करून गेली.

Pages