"कोवळ्या उन्हांची" उब

Submitted by साद on 3 October, 2018 - 03:06

मध्यंतरी माबोवरील गणेशोत्सवात ‘खेळ शब्दांचा- मराठी लेखक व पुस्तके’ या उपक्रमात मी भाग घेतला. त्यानिमित्ताने अनेक आवडत्या पुस्तकांची आठवण चाळवली गेली. त्यापैकीच ‘कोवळी उन्हे’ हे एक. त्यावर मनात खदखदत असलेले काही लिहावे अशी प्रबळ भावना झाली. म्हणून हा लेख.

‘कोवळी उन्हे’ हा विजय तेंडुलकरांचा ललित लेखसंग्रह आहे. २००५मध्ये प्रकाशित झालेली त्याची पाचवी आवृत्ती माझ्या संग्रही आहे. गेल्या १३ वर्षांत मी त्याची अनेक वाचने केलेली आहेत. म्हणजेच ते माझे खूप आवडते आणि माझ्यावर प्रभाव टाकलेले पुस्तक आहे, हे उघड आहे. मला ते वाचण्याची प्रेरणा कशी मिळाली, मला ते का आवडले आणि उपयुक्त वाटले आणि त्यातून लेखकाच्या कोणत्या पैलूंचे दर्शन घडले, हे सर्व मी तुमच्यासमोर मांडणार आहे. हा लेख म्हणजे रूढ अर्थाने पुस्तक परीक्षण नाही. मी या पुस्तकाच्या प्रेमात का पडलो याचे हे मोकळेपणाने केलेले कथन आहे इतकेच.

वाचन प्रेरणा
तर त्याची सुरवात अशी झाली.
एकदा मी अशोक जैनांचे एक पुस्तक वाचत होतो. ते स्वतः वृत्तपत्रातील जेष्ठ पत्रकार. त्यांच्या पुस्तकात वृत्तपत्रातील सदरलेखनासंबंधी काही विवेचन होते. ‘कोवळी उन्हे’ हे मुळात म.टा. या दैनिकातील रोजचे सदर होते. तेंडुलकरांनी ते साधारण १९६२-६३ च्या दरम्यान लिहीले होते. उत्तम सदरलेखन कसे असावे याचा तो वस्तुपाठ होता. त्याचे यथार्थ कौतुक जैनांनी त्यांच्या लेखात केले होते. पुढे जाऊन त्यांनी असे म्हटले होते की या सदरानंतर अनेक लेखकांनी अनेक पेपरांत सदरलेखनाचे रतीब घातले होते. पण, अशा अनेक सदरांना ‘कोवळी उन्हे’ची सर काही आली नाही. हे वाचल्यावर मी अचंबित झालो आणि या पुस्तकाचे कुतूहल वाटले. त्याला अजूनही एक कारण होते. तेव्हा मी एका वृत्तपत्रात सदरलेखन करीत होतो. म्हणून चांगल्या तत्सम लेखनाचे हे पुस्तक मला नक्कीच मार्गदर्शक ठरणार होते. मग ते पुस्तक विकत घ्यायचा निर्णय घेतला आणि यथावकाश पुस्तक प्रदर्शनातून ते आणले.

‘तें’च्या नाटकांचा मी चाहता आहे. मात्र त्यांचे कथालेखन मला विशेष आवडले नव्हते. आता हे सदरलेखन वाचून बघायचे होते. अर्थात जैनांची शिफारस हा माझ्यासाठी मोठा आधार होता. पुस्तकावर एक नजर टाकता प्रथम त्याची १४ पानी प्रस्तावना – खुद्द लेखकानेच लिहिलेली – नजरेत भरली. सामान्य वाचकाच्या दृष्टीने प्रस्तावना हा प्रकार ‘बोअर’ असतो आणि बहुतेक वेळेस तो ती पाने उलटूनच पुढे जात असतो. पण मला ‘तें’ बद्दल आकर्षण असल्याने मी तसे केले नाही. पुढे ती प्रस्तावना वाचल्यावर तर अगदी भारावून गेलो. आता त्याबद्दल लिहिणे क्रमप्राप्त आहे.

पुस्तकाची प्रस्तावना
ही ‘उन्हातले दिवस’ या शीर्षकाने खुद्द तेंनीच लिहीली आहे. त्यामध्ये ‘म.टा.’ स्थापनेचा इतिहास, असे सादर त्यात चालू करण्यासंबंधी तेंनी केलेली आणि नंतर त्यांच्याच गळ्यात पडलेली सूचना, ते स्वतः सोसत असलेले बेकारीचे चटके आणि या लेखनाने त्यांना दिलेला आनंद या सर्वांचे त्यांनी रसभरीत वर्णन केले आहे.

१९६२मध्ये मा. यशवंतराव चव्हाणांच्या सल्ल्याने म.टा.ची स्थापना झाली. द्वा.भ. कर्णिक हे त्याचे पहिले संपादक. तेंडुलकर त्याकाळी बेकार होते आणि मुंबईत राहत. दिवसभर फोर्ट भागातील भपकेदार दुकानांचे बाहेरील काचेतून निरीक्षण करीत वेळ काढणे हा त्यांचा धंदा होता ! असेच एकदा ते मटाच्या कचेरीत घुसले. संपादकांची त्यांची ओळख होती. त्यामुळे त्यांनी तेंना तिथे नोकरीत घ्यायचा प्रयत्न केला. पण त्यासाठीच्या चाचणी परीक्षेत तें चक्क नापास झाले. त्यामुळे त्यांची बेकारी चालूच. एव्हाना दैनिक चालू झाले होते परंतु त्यात रोजच्या ठराविक मजकुराव्यतिरिक्त खास लक्षवेधी असे काही प्रसिद्ध होत नव्हते. त्यामुळे संपादक काहीसे अस्वस्थ होते. त्यामुळे त्यांनी तेंना अशी विनंती केली की हे दैनिक वाचकांशी संवाद साधेल असे काहीतरी लेखन सुचवा.

तेंचे मुंबईचे निरिक्षण जबरदस्त होते. त्यांच्या मते या महानगरीसारखे रंग बदलणारे दुसरे शहर भारतात नव्हते. तर दैनिकाच्या वार्ताहरांनी मुंबईत फिरताना जाणवलेले तिचे विविध पैलू सदरलेखनातून सादर करायची सूचना तेंनी केली. त्यानंतर काही काळ गेला पण त्या सूचनेला काही यश आले नाही. अखेर कर्णिकांनी असे लेखन करण्याची जबाबदारी खुद्द तेंच्याच गळ्यात घातली. बेकारीचे चटके खात असलेल्या तेंना त्याबद्दल चांगले मानधनही देऊ केले. वास्तविक असे सदरलेखन हे लेखनातले नीच काम असते अशी तेंची भावना होती. पण शेवटी ते कर्णिकांच्या आग्रहाला बळी पडले. मग रोज एक लेख यापद्धतीने ते सदर सुरु झाले. अशी ही कोवळी उन्हेची जन्मकथा. या प्रस्तावनेत ती तेंच्या भाषेत वाचणे हा एक अवीट आनंद आहे. “संकट म्हणून जे पत्करले ती आनंदयात्रा झाली,” या त्यांच्या वाक्यातच या सदराच्या यशाचा सारांश आहे.
अशी ही रोचक प्रस्तावना वाचूनच वाचक आनंदाने निथळतो. मी तिचे सहा महिन्यातून एकदा तरी पुनर्वाचन आवडीने करीत असतो.
आता वळतो मुख्य पुस्तकाकडे.

लेखसंग्रह

यात एकूण १०६ लेख आहेत. त्यापैकी बहुतांश हे मुंबईकेंद्रित आहेत. त्यामध्ये तेथील समाजजीवनाचा अप्रतिम धांडोळा तेंनी घेतला आहे. सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, कलाविष्कार, नाट्य-चित्रपट, साहित्य आणि वक्तृत्व अशा अनेक क्षेत्रांत त्यांनी फिरस्ती करून वाचकांना तिथले वैशिष्ट्यपूर्ण दर्शन घडवले आहे. लेखनविषयांचा हा व्यापक आवाका पाहूनच आपण थक्क होतो. इथे एक मुद्दा लक्षात घेतला पाहिजे. ६०च्या दशकात मुंबई जितकी सुधारलेली व आधुनिक होती त्या तुलनेत उर्वरित महाराष्ट्र हा खूप मागे होता. त्याकाळी मटा हे फक्त मुंबईहून प्रकाशित होऊन सर्व महाराष्ट्रात पोचत असे. त्यामुळे या सदराचा वाचक जरी मुख्यत्वे मुंबईचा असला तरी काही प्रमाणात का होईना उर्वरित महाराष्ट्रातील वाचकालाही त्यातून ‘मुंबई-दर्शन’ घडत होते. मुंबई ही पहिल्यापासूनच बहुसांस्कृतिक, बहुरंगी व बहुढंगी आहे. तिच्या या वैविध्यपूर्ण जीवनाचे दर्शन या लेखनातून सर्व महाराष्ट्राला झाले आहे. मी स्वतःही आजवर मुंबईत कधी सलग आठवडाभर राहिलेलो नाही. त्यामुळे तिथल्या समाजजीवनाचे अनेक पैलू मला या लेखनातूनच समजले. हा या पुस्तकाचा मी मोठा फायदा मानतो.

संग्रहातील काही लेख मात्र स्थलकालाच्या मर्यादा ओलांडून मूलभूत मानवी प्रवृतींना हात घालतात. त्यादृष्टीने हे लेख चिरंजीव आहेत. कधीही पुस्तक काढून त्यांचे पुनर्वाचन करणे हे आनंददायी असते.
या १०६ लेखांपैकी सुमारे तीन चतुर्थांश लेख मला खूप आवडले. या लेखात मी त्यापैकी फक्त लेखांची प्रातिनिधिक म्हणून निवड करीत आहे. मला त्यातले काय भावले हे सांगण्यासाठी. तसे आवडलेल्या प्रत्येक लेखावरच काही सांगण्याचा मोह होणार आहे पण मोठ्या मुश्किलीने तो आवरतो.

सुरवात करतो ‘चिअरप! बकप !’ या करमणूकप्रधान लेखापासून. त्याचा विषय आहे मुंबईत झालेली फक्त महिलांसाठीची मोटार शर्यत. त्यासाठी कालिनाच्या मैदानावर जमलेल्या ‘माहोला’चे काय जबरदस्त वर्णन केले आहे. त्या उच्चभ्रू बायका, त्यांचे कुटुंबीय, नोकर, कुत्री आणि कोलाहल याचा ‘आंखो देखा हाल’ हा मुळातूनच वाचला पाहिजे. शर्यतीतील बायकांची नावे बघा – रंगावाला, बिलीमोरीया, अलिमचंदानी, दाराशा....बस्स! ही यादी वाचतावाचताच मराठी माणूस गांगरून गेलेला आहे. मग एक हलकासा धक्का तें देतात तो रेखा भांडारे हे नाव घेऊन. शेवटी भांडारेना “बकप!, महाराष्ट्राच्या साऱ्या स्त्रीवर्गाची मदार तुमच्यावर आहे”, असे सांगून तें हा लेख संपवतात. यातून तत्कालीन वाचकाला उर्वरित महाराष्ट्राच्या तुलनेत मुंबई ही काय चीज आहे याची एक मस्त झलक मिळते.

‘बोटभर काव्य-विचार’ हा लेख आपल्याला साहित्यक्षेत्रात नेतो. एका काव्यसमीक्षकांनी त्यांच्या भाषणात “सगळे कवी एका बोटीत बसवून ती समुद्रात बुडवली, तर समाजाचे काहीही अडणार नाही”, अशी मल्लीनाथी केली होती. एकंदरीत समाजाचा कवितेकडे बघण्याचा दृष्टीकोन त्यातून प्रतीत होतो. परंतु तें आपल्याला त्यापुढे नेऊन सांगतात की निव्वळ कविता करणे म्हणजे जीवनातले काव्य नव्हे. आपल्या नादमय जगण्यातच किती ‘काव्य’ दडलेले आहे ते वाचकांना अनेक उदाहरणे देऊन तें सांगतात. “९.५७ ची फास्ट लोकल पकडण्यासाठी एका वेळी दोन पायऱ्या या वेगाने जिने उतरताना भावगीताची सुरावट गुणगुणणे, हे काव्य नाही तर अजून काय आहे?” असा खडा सवाल ते उपस्थित करतात. तेव्हा जर बोट भरून माणसेच बुडवायची असतील तर बिचाऱ्या कवींऐवजी लुच्चे राजकारणी, लबाड व्यापारी, बेमुर्वत बसवाहक आणि खुनी मोटारवाले यांना पकडा असे ते खडसावतात. वाचकाला अंतर्मुख करण्याची तेंची ताकद इथे लक्षात येते.

पुरुषोत्तम’ या लेखात आपल्याला भेटतो एक शरीर कमावलेला ताकदवान पुरुष. त्याच्या सौष्ठवाचे प्रदर्शन तो एका कार्यक्रमात करतो आहे. तो खूप लवचिक असल्याने त्याला ‘रबर मॅन’ हा किताब मिळालेला आहे. त्याच्या अनेक कसरती पाहून प्रेक्षक अवाक् होतात. आता कसरती संपल्यावर तो भाषण करू लागतो. त्यात तो स्वतःच्या गरीबीचे वर्णन करतो. त्याला असे कार्यक्रम परदेशात करून दाखवायची इच्छा आहे. मग तो आवाहन करतो, “ मायबापहो, त्यासाठी मला पैशांची खूप गरज आहे. तेव्हा आपण सर्वांनी मला मदत करा. अगदी चार आण्यांपासून ते चारशे रुपयांपर्यंत काहीही मी स्वीकारेन”. मग पैसे देण्यासाठी प्रेक्षकांची रांग लागते.
आता इथे तें एकदम लेखाला कलाटणी देतात. एवढा हा बलवान माणूस पण अशी याचना करून किती लाचार झाल्यासारखे दिसते. पैशांची याचना करणे हा सामान्य पांढरपेशांचा गुण. अशा बलवान माणसावरही ही वेळ यावी आणि तो एकदम ‘कॉमन मॅन’ होऊन जावा, याचा त्यांना खेद वाटतो. मग लेख संपवताना ते विचारतात, “ अरे, शेवटी हीही माणसे याचना करताना दिसू लागली, तर ताठ राहिले काय?” म्हणजे ‘बळी तो कान पिळी’ हे फक्त पुस्तकातच वाचायचे काय, असे त्यांना सुचवायचे असावे.

परदुःख’ हा लेख आपल्याला ‘परदुःख शीतल असते’ या वचनाचीच तीव्रतेने आठवण करून देतो. कोकणात भीषण वादळ झालेले आहे आणि तिथले एक गृहस्थ मुंबईत आलेले आहेत. तिथला हाहाकार बघून ते खूप व्यथित आहेत. पण इकडे मुंबईत येऊन वृत्तपत्रे पाहतात तर त्यांत सौंदर्यस्पर्धेत विजेत्या ठरलेल्या कुणा बयेच्या ‘मापांची’ चविष्ट वर्णने केलेली. वादळाच्या बातम्या विरून गेलेल्या. त्याने ते खूप बेचैन होतात आणि उद्वेगाने बोलू लागतात.
तेंना ते ऐकून खूप अपराधी वाटते आणि ते वाचकांना विचारतात, “असे का होते? आपल्या काळजात काही बिघाड आहे का?” ज्याला एखाद्या विध्वंसाची प्रत्यक्ष झळ पोचत नाही तो त्याबद्दल फक्त कोरडी हळहळ व्यक्त करीत आपल्यातच मश्गुल असतो खरे. आज तरी काय वेगळे चित्र आहे? उलट ते अधिक विदारक झाले आहे. आपल्यापासून बऱ्याच दूर अंतरावर एखादी भीषण नैसर्गिक आपत्ती आलेली असते. त्यात कित्येकांचे संसार उद्वस्त झालेले असतात. पण त्याबद्दल थोडीशी हळहळ व्यक्त करून आपणही कुठल्यातरी फालतू ‘बेकिंग न्यूज’ चे रतीब बघण्यात रमून गेलेलो असतो.

अहम' या लेखातून तें आपल्या प्रत्येकातल्या अहंला चुचकारतात. आयुष्यात आपले काही जणांशी जोरदार बिनसते. बोलाचाली, भांडण असे बरेच काही होत असते. मग त्यातल्या एखाद्याचे आपण आयुष्यात ‘तोंड पाहणार नाही’ अशी प्रतिज्ञाही केलेली असते. मग कित्येक वर्षांनी असा प्रसंग उद्भवतो. आपल्या दारावरची बेल वाजते आणि आपण ते उघडतो. अन पुढ्यात चक्क ‘तो’ उभा असतो. काही अपरिहार्य कारणाने त्याला तुमच्याकडे यावे लागलेले असते. मग दोघांच्याही मनावर आलेली कडवट चव, कसेनुसे हसणे, एकमेकासमोर अवघडून बसणे हे सगळे होते. दोघांनाही मनातून वाटत असते की पूर्वीचे ‘महाभारत’ विसरून अगदी मोकळ्या मनाने पुन्हा मैत्री करावी. पण हे फक्त वाटण्यापुरतेच राहते ! कोणी पुढाकार घ्यायचा असा विचार करीत तो कोणीच घेत नाही. तेव्हा हा स्वतःतल्या ‘अहं’चा मोठ्ठा अडथळा तेंनी किती मस्त रंगवला आहे.

आता शेवटी वळतो ‘आदतसे मजबूर’ या खास मुंबईकेंद्रित लेखाकडे. घड्याळाच्या काट्यावर यंत्रवत धावणाऱ्या आणि कुठलाही चेहरा नसलेल्या मुंबापुरीची ही हकीकत. त्याचे हे वर्णन त्यांच्याच शब्दांत बघा:

“हे शहरच मुळी माणसाला एका साच्यात घालून आकार आणि सवयी देणारे आहे. इथे माणसाने राहावे कुठे, चालावे कसे, जेवावे कधी, झोपावे केव्हा, जगावे कसे हे त्या माणसाच्या हाती राहातच नाही”.

जरा विचार करा. ६०च्या दशकातील मुंबईची ही अवस्था आज किती पटीने खालावली आहे? यावर उत्तर तरी काय देणार आपण? मग तें हळूच मुंबईची तुलना चंडीगडशी करतात. ते शहर खरंच माणसासाठी आहे आणि किती सुंदर व सोयीस्कर असल्याचे सांगतात. पण.... गैरसोयी, कुबटपणा, अंधार, धक्काबुक्की आणि गर्दी यांशिवाय ‘जगणे’ असू शकते काय, असा हताश प्रश्न विचारत लेख संपवतात.
......
बस्स! अशा कितीतरी मर्मभेदी आणि विचारप्रवर्तक लेखांनी हे पुस्तक सजलेले आहे. ‘मटा’तील हे मूळ सदर त्याकाळी किती लोकप्रिय असेल याची आपण कल्पना करू शकतो. अत्यंत लोकप्रिय झालेले हे सदर अचानक व्यवस्थापनाच्या हस्तक्षेपाने कसे बंद करावे लागले हेही तेंनी प्रस्तावनेत लिहीले आहे. अखेरीस त्याकडे वळतो.

सदराचा अनपेक्षित शेवट
या लेखनात तें इतके ‘सदरमय’ झाले होते की ते अचानक थांबवण्याचा ‘वरचा आदेश’ हा त्यांच्यावर मोठा आघात होता. ते थांबवण्याचे कारण काय तर म्हणे स्टाफवर इतकी पगारी माणसे असताना रोज एक ‘बाहेरचा’ माणूस का लागतो ही ‘वरची’ विचारणा. यावर तेंनी तो निर्णय शांतपणे स्वीकारून स्वतःची समजूत कशी काढली, हे “सगळेच कधीतरी संपते”... या त्यांच्या स्वगतात वाचण्यातच खरी मजा आहे.

तर अशी ही कोवळी उन्हे आणि त्यांचा माझ्या मनावर पडलेला कवडसा. माझ्या पुस्तकसंग्रहातील हा अमूल्य ठेवा आहे. त्याच्या पुनर्वाचनातून मला त्या उन्हांची उब कायमच मिळत राहते.
* * *

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर्वांना धन्यवाद.
ज्या पुस्तक प्रेमींचे हे वाचायचे राहिले असेल त्यांनी जरूर वाचा.

नुकतेच मला हे पुस्तक प्रदर्शनात मिळाले. प्रस्तावना वाचली. या परीक्षणामुळे वाचायची उत्सुकता आहेच.
निवेदन शैली सुंदर आहे.

सुंदर गोषवारा..
पुस्तक वाचयला हवे...
धन्यवाद....