स्टिकरयातनानुभव

Submitted by mi_anu on 2 October, 2018 - 14:07

चांगली 2 ऑक्टोबर ची सुट्टी, दुपारी आराम करायची संधी सोडून आम्ही तिघे हातात कटर, ओट्यावरचे पाणी ढकलायचा झाडू,शेजारून उसनी घेतलेली कोणत्या तरी दुकानात फुकट मिळालेली मापन पट्टी घेऊन फ्रीज ला भिडलो होतो.

हा विषय चालू झाला तो 'फ्रीज पेंट करावा की त्याला स्टिकर लावावा' या ऑनलाइन घडलेल्या चर्चेवरून.कोणीतरी दिलेल्या अमेझॉन च्या लिंक वर सुंदर सुंदर फ्रीज स्टिकर बघायला मिळाले.एकावर लिंबू, दुसऱ्यावर स्ट्रॉबेरी, तिसऱ्यावर कॉफीबिया, चौथ्यावर पाणी आणि त्यात विहार करणारे हंस,पाचव्यावर जंगल अशी मोहक खैरात होती.

'पण स्टिकर का?नवा घेऊ शकतो ना फ्रीज? 13 वर्षं झाली याला.'
'शू, असं बोलायचं नाही.त्या बिचाऱ्याने ऐकलं तर त्याला कसं वाटेल?आपली स्कुटी आपण 11 वर्षं आणि 50000 किलोमीटर चालवून 12000 मध्ये विकली.आपली कार आपण 9 वर्षं चालवून विकली.फ्रीज आणि वॉशिंग मशीन 2005 चं आहे.किमान 2020 पर्यंत तरी चालवायला नको का?परत मिळतात का अशी यंत्रं?काय करायचेत स्टील चे दरवाजे नि 2 भाज्यांचे ड्रॉवर?आतलं यंत्र 4 वर्षात बिनकामी झालं तर?फ्रीज बदलायचा नाही.जोवर त्याला दारं जोडलेली आहेत आणि वस्तू गार होतात तोवर तर अजिबात नाही म्हणजे नाही.स्टिकर ने फ्रेश लूक येईल.'
'उंची मोजणारा हत्ती विसरलीस का?'

इथे डोळ्यासमोर लाटा येऊन मन फ्लॅशबॅक मध्ये गेलं.
5 वर्षांपूर्वी असाच हौसेने उंची मोजणारा हत्ती स्टिकर ऑनलाइन मागवला होता.हत्ती, उंचीच्या खुणा,भोवती 5 उडणारे पक्षी,हिरवळ आणि 1 झाड असा सेट फोटोत दिसत होता.
आता सामान्य बुद्धिमत्तेच्या माणसांचा असा समज होईल की हे सगळं एक किंवा दोन प्लॅस्टिक शीट च्या पार्श्वभूमीवर काढलेलं असेल आणि माणसाला भिंतीवर 2 आयताकृती कागद एकाखाली एक चिकटवायचे असतील.तसा विचार करत असाल तर तुम्ही अज्ञ आहात.त्या सेट मध्ये 75 तुकडे होते.हत्तीचे 7 तुकडे(कसे ते आता आठवत नाही, सोंड एक तुकडा, ढु एक तुकडा,पोट 3 तुकडे, पाय 2 तुकडे असे काही गणित होते.),इंचाचे 8 तुकडे, पक्षी 5 तुकडे,प्रत्येक पक्ष्याभोवती हिरवळ 5 तुकडे असा जगव्यापी सरंजाम.आता काही छिद्रान्वेषी मंडळी म्हणतील की यांची बेरीज 75 होतच नाही मुळी.75 तुकडे चिकटवल्यावर परत बरोबर बेरीज पण करेन अशी अपेक्षा असेल तर ती मानवी हक्कांची पायमल्ली आहे.

तर हत्तीची सोंड जमिनी पासून 115 सेंटीमीटर वर येत नाही हे प्रथमदर्शनी कॉमन सेन्स ने जाणवणे, मग आधी सेंटीमीटर खुणा पट्टीने मोजून योग्य जागी चिकटवणे, मग हत्तीचं पोट तिरकं न करता,पोट एकमेकांवर येऊ न देता,पोटात फट न पाडता 3 तुकडे नीट जोडून टाके घालणे(सॉरी हात फिरवणे),हत्तीचे पाय जमिनीपासून 5 इंच वर जोडणे, हत्तीला शिंक येऊन सोंडेतून पक्षी बाहेर पडल्या सारखे पक्षी चिकटवणे,प्रत्येक पक्षी भोवती हिरवळ चिकटवणे,नंतर शेवटच्या पक्ष्याची हिरवळ दाराबाहेर गेल्याने अर्धी कापणे हे सर्व गणित एका नवरा नावाच्या प्राण्याला करावं लागलं तर यावरून किंचित भांडणं होऊन पुढचे काही दिवस स्वप्नात उंची मोजणारा हत्ती दिसणे साहजिक आहे.काही माहितगार शॉपिंगबाज व्यक्तीना मी त्या हत्तीखाली कळवळून लिहिलेला रिव्ह्यू पण सापडेल ज्यात 'हत्तीसारखा जड प्राणी जमिनीपासून 5 इंच वर लटकावत ठेवावा ही मूर्ख कल्पना कोणाची?' वगैरे अर्थाची जळजळीत वाक्य वाचायला मिळतील.

लाटा परत.बॅक फ्रॉम फ्लॅशबॅक.
'यावेळी उंची मोजणाऱ्या हत्ती सारखं नाही होणार.एकच स्टिकर असेल.'
'ठीक आहे.मागव, पण यावेळी नीट प्लॅन करून लावायचा स्टिकर.'
तर मी कॉफीबिन, पाण्यात पोहणारे हंस वगैरे कडे वळले.स्वस्त पण होते.पण कोणत्याही कंपनीचे मालक मेले हिंजवडीत किंवा सौदागर मध्ये डिलिव्हरी करत नव्हते.हिंजवडीत डिलिव्हरी नाही???(इथे धक्का बसलेल्या चेहऱ्यावर 3 वेळा कॅमेरा आणि ढाण असे 3 दा पार्श्वसंगीत.) 'अरे तुमच्या सारख्यानी असं केलं तर मोठ्या मोठ्या कंपनीत 10 तास काढणाऱ्या, नंतर रोज 3 तास हिंजवडीतून आपल्या हडपसरी किंवा कोथरुडी निवासात पोहचायला काढणाऱ्या, आयुष्यात लागणाऱ्या रुमालापासून चड्डीपासून ते डायपर पर्यंत सर्व गोष्टी ऑनलाइन विकत घेणाऱ्या लोकांनी कोणाच्या तोंडाकडे पाहायचं?कोणाच्या?(प्रतिध्वनी)' स्वगत आटोपतं घेऊन आधी एरिया डिलिव्हरी देणाऱ्या कंपन्या शोधल्या.त्या कंपन्या फ्रीज स्टिकर विकतात का ते पाहिलं.एक कंपनी विकत होती, पण फारच विविधरंगी डिझाइन होतं.ते चिकटवल्यावर फ्रीज उत्तरेकडच्या रंगपंचमीत रस्त्यावर सापडल्या सारखा दिसणार होता.पण कंपनी डिलिव्हरी देत होती.'हातात सापडलेला एक पक्षी रानात लांब असलेल्या 2 पक्ष्यांपेक्षा नेहमी बरा' ही म्हण आठवून पटकन मागवून टाकले.

स्टिकर आला.तो 5 फुटी फ्रीज चा नसून 8 फुटी पूर्ण दरवाज्याचा आहे.पण 'जे का दूरच्या दारी| तेथे करी सामानी डिलिव्हरी| तोचि साधू ओळखावा| पैसा तेथेचि द्यावा||' म्हणून हा मोठा वालाच चालवून घेणार होतो.आधी ती प्रचंड गुंडाळी सोडवताच येईना.डिझाईन कसं आहे बघू म्हणून उलगडायला जावे आणि कागद सटकून मांडीवर आपटावा असं झाल्यावर 2 मेम्बराना 2 टोकावर बसवून कागद उलगडला.डिझाईन फारच भयाण रंगीबेरंगी होतं.नारायण धारप भयकथा वाचलेल्याना त्यात अमूर्त घातकपणाचा निर्यास सोडणारे अमानवी आकार आणि बाकी आम जनतेला पिकासो आणि व्हॅन गॉग वगैरे मंडळींची नवचित्रं दिसत होती.

'तुला सांगत होतो.ही कामं प्रोफेशनल लोकांकडून करून घ्यायची असतात.वॉलपेपर्स चिकटवणारे वगैरे.'
'पण मग ते प्रोफेशनल बनेपर्यंत त्यांनी किती वॉलपेपर ची नासाडी केली असेल?'
'एकही नाही.जेव्हा हातावर पोट असतं तेव्हा त्या हातांना चुका करण्याचा अधिकारच नसतो.लहानपणापासून आयुष्याच्या तव्यावर बोटं पोळत ते कामाच्या सुंदर भाकऱ्या बनवत असतात.'
(स्वगत: अरे देवा!! हा प्राणी किती सेंटी मारतो!! खरंच फ्रीज ला रंग देणाऱ्या कडे सोडणं परवडलं असतं.)

फ्रीज ची मापं घेण्याचं काम ज्या मेंबर ला दिलं होतं तो लांबी इंचात, रुंदी सेंटीमीटर मध्ये लिहून गोंधळ वाढवत होता.एकंदर ती मापं वापरून कागदावर खुणा केल्यावर ही फ्रीज ची नसून सिग्नल च्या खोक्याची मापं बनतायत असा शोध लागला.मग पेपर कापण्यापूर्वी परत एकदा मापं घेऊन खुणा केल्या.

फ्रीज वर तो स्टिकर चिकटवणं हे एक वेगळंच अग्निदिव्य.तो स्टिकर कागद काढल्या काढल्या चारुदत्ताला भेटणाऱ्या वसंतसेनेच्या आतुरतेने जे समोर दिसेल त्याला चिकटतो.मग एका मेम्बर ने गुंडाळी धरणे.दुसऱ्याने उभं राहून कागद उलगडणे. तिसऱ्या मेंबर ने मध्ये मध्ये नाचत सूचना देणे, हे सर्व झाल्यावर हा कागद चिकटवून झाला.उभं राहून अभिमानाने त्याच्याकडे बघताना जाणवलं की या कागदावर 'माय नेम इज केशव पुट्टी, बिर्ला व्हाइट वॉल पुट्टी करे पपडी की छुट्टी' जाहिरातीतल्या भिंतीसारखे असंख्य फुगे आले आहेत.यापेक्षा उंची मोजणारा हत्ती बरा होता की.निदान बिघडला तर 75 पैकी एक तुकडा बिघडत होता.इथे म्हणजे एकच एक मोठा स्टिकर. 'चुकीला माफी नाही.'

'थांब थांब.लाकडी उलथनं आण. आणि काच साफ करायचा मोठा मॉप.'
आता आम्ही लाकडी उलथनं, मॉप यांनी तो स्टिकर सपाट करून करून त्यात राहिलेले हवेचे फुगे एकमेकांना चिकटवणं, मग तो मोठा झालेला फुगा अजून दाबून ढकलत कडेला नेऊन त्यातली हवा काढणं हे काम करायला लागलो.या प्रोसेस मध्ये कधीकधी फुगा दबून कागदालाच सुरकुती पडते आणि तो '6 साईन्स ऑफ एजिंग' घालवणाऱ्या क्रीम मधल्या बाईच्या क्रीम लावण्या आधीच्या थोबाडासारखा दिसायला लागतो.
'अरे, आपण सगळ्या फुग्याना टाचणी ने भोक पाडुया का? सगळी हवा जाईल.'
'आणि पेपर भोकं भोकं वाला दिसेल.'
'मग आता काय बेनेडिक्ट कंबरबॅच च्या चेहऱ्यासारखा गुळगुळीत दिसतोय का पेपर?'
'उंची मोजणारा हत्ती मी पूर्ण लावला होता.आता ब्रश ने फुगे घालवायची आयडिया माझी आहे.फ्रीज च्या उरलेल्या 2 भिंतींना स्टिकर तू एकटी लावणार आहेस.अत्यंत पुअर प्लॅनिंग आहे तुझं.'
'मी रंग द्यायचं म्हणत होते.रंग देऊ नको म्हणणारा तू आहेस.उरलेल्या 2 भिंतींसाठी सपोर्ट देणं ही तुझी नैतिक जबाबदारी आहे.'
'माझी नैतिकता तू नवा फ्रीज घ्यायला नाही म्हटलं तिथेच पळून गेली.आता तू आणि तुझे स्टिकर काय वाटेल तो गोंधळ घाला.'

त्यामुळे आता फ्रीज ला 1 फुगेवाली रंगीत भिंत आणि 2 पांढऱ्या मळकट भिंती आहेत.त्यातली एक उद्या रंगीत फुगेवाली होईल.येताय का खालून पेपर धरायला?

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

असा काही स्टिकर असतो हे पहिल्यांदा कळलं. ऊंचीवाल्या हत्तीबद्दल सांगितलंत तेही बरं केलंत Proud धमाल लिहीलं आहे नेहेमीप्रमाणे.

छान लिहिलेय Proud
लॅपटॉप चा स्टिकर लावताना असाच अनुभव आला आहे Proud

मस्त लिहिले आहे. आवडले.

उंची मोजणारा हत्ती>> Lol
आम्ही उंची मोजणारे झाड आणले होते. सुदैवाने त्यात खूप तुकडे नव्हते. पक्षी कुठे ऊडवायचे आणि माकडे कुठे ठेवायची यावर बरीच चर्चा झालेली Happy

Lol उंची मोजण्याच्या स्टिकरवर आम्ही पण माकडं आणि नारळाच्या झावळ्या आणि उडणार्‍या पक्षांवरुन बरीच चर्चा केलेली आठवली. स्टिकर लावला आणि घर बदलायची वेळ आली.
नव्या जागेत एका टबच्या आजूबाजूला मासे आणि अन्य जलचर प्राणी बायकोने परस्पर मागवून मी मोलाचे सल्ले देण्याआधीच लावून टाकले. त्यातील एक मासा उलटा लागलाय हे मी पोराला शिकवलय आणि तो दरवेळी आंघोळ करताना बोबड्या आवाजात ते आईला दाखवून देतो. Proud

त्यातील एक मासा उलटा लागलाय हे मी पोराला शिकवलय आणि तो दरवेळी आंघोळ करताना बोबड्या आवाजात ते आईला दाखवून देतो.>> मानेगिरी चा वारसा का?smiley2.gif

खल्लास लिहिलंय,
उंची मोजायचा जिराफ चिकटवताना हे भोगून झालंय.

दुसरे भोग म्हणजे भिंत डेकोरेट करणारे स्टिकर,
एक सीन पाहून मागवला, तर 5 ढग, 8 चिमण्या, हिरवळीचे 4 5 तुकडे, 4 हॉट एअर बलून, 4 माकडे , 2 झाडे आणि एक सूर्य आला,
आपला आपण सीन कम्पोज करून घ्यायचा होता.
हे सगळे आयटम , जमिनी पासून वेगवेगळ्या अंतरावर, पण जमिनीशी समांतर चिकटवणे was अ टास्क, सीन कसा कम्पोज करायचा या बाबत एकमत होणे was अ बिगर टास्क.

आणि हे सगळे लावून झाल्यावर तिसऱ्या दिवशी कन्यारत्नाने एक चिमणी उचकटून हातावर ठेवली Sad

हाऽऽहाऽऽ भारी! Lol
तो स्टिकर कागद काढल्या काढल्या चारुदत्ताला भेटणाऱ्या वसंतसेनेच्या आतुरतेने जे समोर दिसेल त्याला चिकटतो. Lol Proud

आणि हे सगळे लावून झाल्यावर तिसऱ्या दिवशी कन्यारत्नाने एक चिमणी उचकटून हातावर ठेवली Lol

मी कालच स्टिल डोअरचा फ्रिज पाहून आलो होतो. आता तोच घ्यावा वाटतय. Happy

Rofl Rofl
मस्त लिहलं आहे.
फोटो टाक तिन्ही बाजूना स्टिकर लावून झालं की!

धमाल लिहिलंय.
माझी मजल सेलफोनाला स्क्रॅचगार्ड लावण्यापलीकडे जायची नाही. त्यातही प्रोफेशनल लोकांच्या हाती काम सोपवलं असतं, तर बरं झालं असतं असं वाटून राहिलं.

तुम्ही विरामचिन्हांनंतर जागा सोडत नाही, त्यामुळे वाचताना गिचमिड वाटते. अर्थात एवढं सगळं फोनवरून लिहीत असाल तर ते स्टिकरआड करायला हरकत नाही.

झक्कास लिहिलय.. असे सहज मिष्किल लिहिणे छान जमले आहे , अवघड असते असे लिहिणे.

पण एक लक्षातअसूदे , फ्रीजच्या बाजूच्या भिंती Heat Exchange करण्यासाठी "design" केलेल्या असतात. त्यावर प्लास्टिक्ची स्टिकर लावल्याने फ्रीजची ऊष्णता फ्रीज बाहेर फेकायची क्षमता कमी होणार !

होय होय, फोन वर नोटपॅड वरून लिहिते.पण यापुढे नीट फॉरमॅट करेन.

हो, हिट सिंकिंग कमी होईल हे खरं.अजून 3 वर्षं तरी चालवायचा आहे फ्रीज.

उंची मोजणारा हत्ती हा
https://m.snapdeal.com/product/cherrylite-elephant-height-chart-vinyl/63...

त्याच्या साध्या दिसण्यावर जाऊ नका.हे दुसरे प्रॉडक्ट आहे.बहुतेक आता 1 पीस मिळतो.मला मिळाले होते त्यात खूप तुकडे होते. ☺️☺️☺️

माझा लिहिलेला रिव्ह्यू मिळत नाही, बहुतेक अमेझॉन वर लिहिला होता, तिथून त्यांनी प्रॉडक्ट काढले असेल.

हा अर्धा स्टिकर लावलेला फ्रीज आणि पुढची भयंकर मळकट बाजू.तिचा नट्टापट्टा आज होईल.आता जी बाजू स्टिकर वाली आहे ती बाहेरच्या दारातून दिसते.
IMG_20181003_082330.jpg

छान लिहीलय. वाचतांना अगदी अगदी झालं. असंच एक भिंतीवर लावायचं झाडाची फांदी, पक्षी, आणि त्यांची घरटी असलेले स्टिकर एकटीने चिकटवल्याची वेदनामय आठवण जागी झाली. त्यात अक्षरश: प्रत्येक पानासाठीसुद्धा एक एक स्टिकर होतं. हात वर करून करून चिकटवून जाम रडकुंडीला आले होते.

धमाल Rofl

भारी लिहिलंय Biggrin
त्या वरच्या चित्रात, फ्रिजवर जे काही चिकटवलंय ते खरंच नारायण धारपांच्या एखाद्या पुस्तकावरचं वाटतंय Wink

१०-१५ दिवसांपूर्वीच चिरंजीवांच्या रुम च्या छताला चंद्र, तारे , रॉकेट, वगैरे रेडियम चिकटवून झाले आहेत. अजून एक गिफ्ट मिळालेल्या झाडाच्या फांद्या, त्यावर बसलेले, थोडे उडणारे पक्षी अश्या एका स्टिकर ची गुंडाळी आहे. भिंतीला लावायचा मुहूर्त अजून लागायचाय !

एक मासा उलटा लागलाय हे मी पोराला शिकवलय आणि तो दरवेळी आंघोळ करताना बोबड्या आवाजात ते आईला दाखवून देतो> Biggrin

Lol
मज्जा..
खूप दिवसांनी अनु!

आता मी व्हाइटबोर्ड स्टिकर रोल मागवणार होते आज. आयड्या क्यान्सल हे वाचून. Proud

Lol
मी या फंदात अजून तरी पडले नाहीये. ( पडलेच कधी तर आधी हा लेख परत वाचून काढणार म्हणजे आपोआप पुनर्विचार होईल Wink )
मस्त लिहिलंयस पण! मजा आली!
सगळ्यांचेच अनुभव त्रासदायक दिसतायत आणि.
अमितव, स्टिकर लावला आणि घर बदलायची वेळ आली, हे वाचून मला आधी वाटलं की स्टिकर लावल्यामुळे घर बदललं की काय! Lol
हे स्टिकर ( भिंतीवरचे) किती दिवस चिकटून राहतात नीट? म्हणजे एवढी धडपड केल्याचं चीज होतं ना? ( घ्यायचा विचार केलाच तर काही मोटिव्हेशन Wink )

साबणाच्या पाण्याचा हलका स्प्रे मारा मग स्टिकर लावा, हे मी लिहिलंय त्या धाग्यावर. स्टिकर च्या इंस्ट्रक्शन मध्येही असते.

मस्त मस्त!!! मजा आली वाचताना..

आम्हालाही भेट म्हणून मांजराची इकडे तिकडे बसणारी , लोळणारी पिल्ले मिळालेली.. ती भिंतीवर इकडे तिकडे बसवताना, लोळवताना जीव जाम जिकिरीस आलेला... बरे घरात मांजरप्रेमी असल्याने मरो ती मांजरे, फेकुन द्या स्टिकर म्हणायची बी सोय नव्हती....

>> चीज होतं ना? >>> चीज झालंच तरी भिंतीवर डकलेल्याचा काय उपयोग?? Wink
पण हो, छान चिकटतात आणि रेसिड्यू मागे सोडत नाहीत. अर्थात भिंतीच्या मटेरियलवर अवलंबून असेलच.
अनु, फ्रीज नवा घ्या. स्टीलचे मस्त दिसतात. स्टिकरचा लेख छान झालाय, सो पैसे वसूल झालेचेत. होऊद्या खर्च.

खरं तर इतकं कठीण नसतं.आम्ही पूर्ण आकाशगंगा फुगे न आणता चिकटवली मागच्या महिन्यात.पण फ्रीज वर पण भरपूर गंज वगैरे नॉन युनिफॉरमिटी होती त्यामुळे जास्त कष्ट पडले
आरारा तुमच्या सूचना परफेक्ट होत्या.वाचणारेच न चुकता गोष्टी बिघडवणारे असल्याने यु कान्ट हेल्प ☺️☺️

मस्त लिहिलंय, मजा आली वाचायला.

आम्ही छोटी 3 ft x 2ft ची स्टिकर लावलीत छान दिसतात. थोड्याफार सुरकुत्या पडल्यात पण त्या पटकन दिसत नाहीत. गुलाबाची फुल चा जरा प्रॉब्लेम झाला; फुलं, त्याची लांब डेख आणि पान वेगळं आले आणि गुंडाळी आडवी फुलं होती. आम्ही ती फुलं उभी लावली मस्त दिसतात. जरा फूल बरोबर आहे का? काठी कुठे लावू ? पानं कुठे? असं discussion झालं! प्रत्येकांनी एकेक स्टिकर लावलंय त्यामुळे कोणीच कोणाच्या स्टिकर ला काही बोलत नाही Happy कोणीही घरी आलं की कौतुक करतात! Dont loose hope Happy

Pages