©जाणीव

Submitted by onlynit26 on 1 October, 2018 - 01:34

©जाणीव
फाटक उघडून शशांक व त्याचे कुटूंबिय येताना बघून मी घरात वर्दी दिली आणि त्यांच्या स्वागताला पुढे सरसावलो. तो आणि वहीनी पारिजातकाच्या झाडापाशी थांबले होते. झाडाखाली पडलेला पांढऱ्याशुभ्र नारींगी फुलांच्या सड्यावरून त्यांची नजर हटत नव्हती. सगळ्यांचेच असे व्हायचे. शशांकही त्याला अपवाद नव्हता.
शशांक दुबईला नोकारीसाठी असायचा. तो पहील्यांदाच गणेशोत्सवासाठी अलिबागला आला होता. तळकोकणात गावं असलेला शशांक आपल्या गावच्या गणपतीचे विसर्जन करून परत अलिबागला परतला होता. त्याचे नवरा , बायको आणि दोन वर्षाची मुलगी असे छान त्रिकोणी कुटुंब होते. त्याचे आई वडील अलिबागमध्येच राहायचे. त्यांच्यावर त्याचा आणि माझाही लक्ष होताच. त्याच्या नोकरीची अजून काही वर्षे बाकी होती. मग तो भारतात कायमस्वरूपी परतणार होता.
" ये शशांक " मी त्याचे स्वागत केले.
छोटीला खाली सोडल्याबरोबर ती दुडूदुडू धावत देवघराच्या दिशेने गेली.
शशांक आणि वहीनी बाप्पाचे दर्शन घेउन बाहेर आले.
" सुहास, तुमच्या घरची मुर्ती मोठी असते ना रे?"
" असायची, गेल्या वर्षापासून नाही." मी म्हणालो.
" म्हणजे? अलिबाग शहरात घरगुती गणेशमूर्तींमध्ये तुझीच मूर्ती सगळ्यात मोठी असायची ना?" शशांक थोडा चकीत दिसला.
इतक्यात प्रसाद घेऊन आमच्या सौ आल्या.
" निनाद कुठेय?" शशांकची बायको शर्मिलाने विचारले.
" हो ना, प्रसाद द्यायला तोच तर नाचायचा" शशांकने त्याला दुजोरा दिला.
निनाद सध्या मुंबईला आहे. त्याची पथनाट्ये चालू आहेत.
" सुहास काय यार, मुलगा अँक्टींग वगैरे करतो हे बोलला नाहीस कधी." शशांकने गंभीरपणे विचारले.
" अगं ऐकलसं का? फक्कडसा चहा कर, तो पर्यंत शशांकच्या सगळ्या शंका दूर करतो."
" वहीनी ,हळदीचे पान आणि आलं टाकायला विसरू नका " शशांक बसल्या जागेवरून म्हणाला.
" तुझ्या अजून लक्षात आहे का? तू येणार म्हणून सकाळीच म्हात्रेंकडून चार पाने घेऊन आलो बाबा " मी हसत हसत म्हणालो.
" ते जाऊदे, तू निनाद बद्दल सांग " शशांक खुपच उत्सुक होता.
" तुला निनादचे गणेश प्रेम माहीत आहे ना, त्याच्या जन्मापासूनच तर मी गणपती बसवतोय घरी. शिवाय त्याचे हे गणेश प्रेम दिवसेंदिवस वाढत जात होते. त्याप्रमाणे आमच्या मूर्तीची उंचीही वाढत होती आणि बाप्पाची आरासही वारेमाप होत होती. दोन वर्षापूर्वी आम्ही सालाबादप्रमाणे भव्यदिव्य मूर्ती आमच्या घरी बसवली . यथासांग पूजा करून सातव्या दिवशी विसर्जनही केली. नंतर निनाद आपल्या मावशीकडे मुंबईला गेला. तेव्हा तो चौदा वर्षाचा होता. दरवर्षी प्रमाणे त्याला त्या वर्षीही मुंबईमधील गणपती पाहायचे होते. त्याने आठव्या दिवसापासून अकराव्या दिवसापर्यंत जेवढे जमतील तेवढे गणपती पाहीले. त्याच वर्षी माझ्याकडून मोबाईलही घेवून गेला होता. छान छान फोटो काढून आम्हाला व्हाट्सअप्पवर पाठवत होता. तो अनंत चथुर्दशीचा दिवस होता. निनाद सकाळपासून बिझी असावा. त्यादिवशी त्याचा एकही कॉल आला नव्हता. गणपती मिरवणूकीत अगदी हीरीरीने भाग घेणारा निनाद जेव्हा विसर्जनाची वेळ येई तेव्हा मात्र तिथे थांबत नसे. त्याला तो वियोग सहन होत नसे. अगदी लहानपणापासूनच त्याला असं व्हायचे. त्या दिवशी पण चौपाटीपर्यंत न जाता रात्री आठ वाजताच घरी आला."
इतक्याच प्रेरणा चहा घेऊन आली होती आणि निनादचा फोनही तेवढ्यातच वाजला. दिवसातून दोनदा खुशालीचा फोन करायचा त्याचा शिरस्ता कधी मोडला नाही. त्याची ख्वालीखुशाली घेऊन मी फोन त्याच्या आईकडे दिला.
चहा पिता पिता मी सांगू लागलो " अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो तेव्हा निनादचा सकाळीच कॉल पाहून मी काहीसा चकीत झालो. सकाळचे साडेसहा, ही काय त्याची कॉल करायची वेळ नव्हती.
" हॅलो बाबा....." त्याला पुढे बोलवेना. तो फोनवरच ओक्साबोक्शी रडू लागला.
" निनाद काय झालं बेटा?" तो अधिकच रडू लागला. काय झाले कळायला मार्ग नव्हता. त्याने लगेचच फोन बंद केला. मी त्याला परत फोन लावला. तो उचलत नव्हता. मला जाम टेंशन आले. त्याहीपेक्षा प्रेरणा घाबरली. तिने लगेच आपली बहीण सरीताला कॉल लावला .
" निनाद घरी नाहीये " घाबऱ्याघुबऱ्या आवाजात सरीता म्हणाली तेव्हा आमच्या दोघांच्या काळजाचे पाणी झाले. फोनवर सरीताही रडायला लागली होती. मी तिला जमेल तेवढा धीर देवून आम्ही लगेच मुंबईला जायच्या तयारीला लागलो. आम्ही त्याला फोन करत होतो. एकदा दोनदा फोन घेतला पण काहीही न बोलता नुसता स्फुंदत होता. फोन लागतोय आणि उचलतोय म्हटल्यावर थोडं टेन्शन कमी झालं तरी मुंबईत काय होईल काही सांगता येत नव्हते. आम्ही बोटीत बसलो तेव्हा सरीताचा कॉल आला. निनाद सुखरुप आहे , पण तुम्ही लवकरात लवकर या. असे ऐकल्यावर हायसे वाटले. आम्ही दोन तासामध्ये मुंबईत पोचलो. टॅक्सीने गिरगांव मध्ये पोचलो तेव्हा घरी न जाता थेट चौपाटीच्या दिशेने निघालो. चौपाटीवर बरीच गर्दी जमली होती. टॅक्सीतून उतरून मी आणि प्रेरणा धावतच तिथे पोचलो. तिथले दृष्य पाहून आमची पावले थबकली. निनाद वेडासारखा इकडे तिकडे धावत होता. त्याचा गोंधळ पाहून लोक तरी त्याला वेडाच बोलत होती. तुटलेल्या मोडलेल्या प्रत्येक गणेश मूर्तीला कुरवाळून रडत होता. पण तो वेडा नव्हता. त्याचे वागणे माझ्या लक्षात आले होते. आदल्या दिवशी विसर्जन झालेल्या सगळ्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती समुद्राने परत किनाऱ्यावर फेकल्या होत्या. गणेशजीचे मोठमोठाले अवयव विखुरलेल्या अवस्थेत घाणेरड्या चिखलात बरबटलेले होते. धडापासून वेगळी झालेली श्रीमुखे पाहून माझे मनही उद्विग्न झाले. विसर्जन केल्यानंतर आम्ही कधीच तिकडे फिरकत नसायचो. विसर्जन झालं की आपण सगळं विसरून जात होतो. पण हे सगळे प्रत्यक्षात पाहून मनात कुठेतरी स्वताची लाज वाटू लागली.
" बाबा, हे बघा काय ते, तुम्ही तर सांगायचे कि आपले बाप्पा विसर्जनानंतर समुद्राच्या तळाशी बसून छान गप्पा मारतात, खोटं आहे सगळे, बघा कशी हालत झालीय आपल्या बाप्पांची" असे बोलून ओक्साबोक्शी रडत निनाद माझ्या गळ्यात पडला. मी त्याला तसाच थोपटत राहीलो. सारे लोक अवाक झाले होते. निनादचे गणेश प्रेम आम्हालाच माहीत होते पण आता पूर्ण मुंबईला माहीत पडत होते. हे सारं दृष्य टिव्हीवर दाखवले जात होते. निनाद फुल व्हायरल झाला होता.
निनादने मिठी सैल करून जेव्हा मोबाईल मधला एक व्हिडिओ दाखवला ते पाहून खुप वाईट वाटले. चार पाच मोठी मुले मोठ्या गणेश मूर्तीच्या मोठ्या तुटलेल्या अवयवांवर बसून पाण्यात खेळत होती. गणेशमूर्तीची पार विटंबना चालली होती. हे पाहूनच निनादला रडूच आवरले नव्हते. खरतरं तो विसर्जन झाल्यावर कुतूहलापोटी सकाळी चौपाटीवर आला होता आणि हे सारे दृष्य त्याला दिसले होते. नंतर मुंबईमध्ये व्हायरल न्यूजमुळे बऱ्याच जणांनी मुंबई चौपाटीच्या दिशेने धाव घेतली होती. निनादच्या रडण्याने पुऱ्या मुंबईला जागं केले होते. त्याच्या वागण्याचे कौतुक सगळीकडे होत होते. टिव्ही रिपोर्टरने घेतलेला निनादच्या छोट्याशा बाईटने साऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले.
थोड्या वेळात आम्ही तिथून निघालो. अलीबागला आल्यानंतर निनादला सावरायला बरेच दिवस लागले.
आणि एक दिवस निनाद हे बोलणार मला माहीत होतं "बाबा, आपण आता कधीच मोठी मूर्ती आणायची नाही, मातीने बनवलेली छोटीशी मूर्तीची पूजा करायची."
आता आम्ही खर्च तेवढाच करतो. किंबहुना जास्तच पण छोटी मूर्ती आणून साजेशी आरास आणि गणरायाचे यथोचित पूजा करतो. वाचलेले बरेचसे पैसे गणपती सणासाठी गरीबांघरी वाटतो. आमचा निनाद मराठी शाळेत जातो. तिथे त्याला बरीच गरजू गरीब मुले दिसतात. त्यांच्यासोबत त्यांच्या घरी जावून खऱ्या गरजूला बरोबर पारखतो. बाप्पाच्या कृपेने आमचा निनाद लहान वयातच बराच प्रगल्भ झालाय रे. गणपती सणाचे पहीले दोन तीन दिवस सोडले तर पुढील सारे दिवस त्याची ' गणेशोत्सव आणि व्याप्ती' या विषयावर पथनाट्ये सुरू असतात. त्याने त्याचे कार्यक्षेत्र ही मुंबई निवडलय. निनाद आणि त्याचे दहा सहकारी जमेल तशी जन जागृती करत असतात. त्याचा चांगला आणि हो एक सांगायचेच राहीले बाप्पाचे विसर्जन आम्ही घरच्या आवारातच प्लास्टिक टबमध्ये करून ती पवित्र माती पारीजातकाच्या मुळात गाडतो. आता गणराया आमच्यावर पारीजातकाच्या रूपाने सुंदर पुष्पोवर्षाव करत असतो. खुप छान वाटते रे आणि निनादचा अभिमानही वाटतो. मघाशी येताना जो पारिजातकाचा सडा पाहीलास ना? तो आमच्या बाप्पाचाच पुष्पोवर्षाव रूपी आशीर्वाद आहे रे" हे सगळे ऐकून शशांक आणि वहीनी यांचे डोळे भरून आले होते.
"असा पारीजातक प्रत्येकाच्या दारी फुलायला हवा.."
कंठ दाटून आलेल्या शशांकने मला मिठी मारली.
" सुहास मी देखील निनादच्या या उपक्रमास हातभार लावणार. अरे निनाद जे काही करतोय ते खरचं खुप छान आहे. सद्यस्थितीत त्याच्या वयाच्या मुलांनी असा विचार करणे दुर्मिळ आहे. निनादला झालेली ही जाणीव संपूर्ण महाराष्ट्राला झाली पाहीजे. तरच पूज्य बाळ गंगाधर टिळकांनी ज्या उद्देशाने गणेशोत्सव चालू केला होता त्याला कुठेतरी पुर्वीचे रूप येईल." शशांकलाही निनादसारखी जाणीव झाली होती.
'बाप्पा अशी जाणीव प्रत्येकाला होऊ दे' असे मनोमन म्हणत मी शशांकला थोपटू लागलो.

समाप्त..

© या कथेचे सर्व हक्क लेखकास्वाधीन आहेत. लेखकाच्या नावासहीत ही पोस्ट शेअर करायला हरकत नाही. तसे न झाल्यास कायदेशीर कारवाई अनिवार्य आहे.
-------------------------------------------------------
लेखक - नितीन राणे.
सातरल - कणकवली
सध्या वास्तव्य - बदलापुर (ठाणे )
मोबाईल नं. ९००४६०२७६८
दिनांक - ३०.०९.२०१८

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

छान आहे कथा !!! हि जाणीव सर्व गणेशभक्तांमध्ये पसरली पाहिजे, थोडी थोडी पसरतसुद्धा आहे. मोठ्या गणेशमूर्तींचे विसर्जन करताना त्या मूर्ती पडण्याचे, तुटण्याचे विडिओ सुद्धा बघवत नाहीत.

खूपच छान आहे कथा...गणपती विसर्जन च्या बाबतीत हा बदल खरंच घडला पाहिजे...मी बेंगलोर ला राहते आणि इथले बरेचसे लोक मातीचा गणपतीबाप्पा आणून बकेट मध्ये विसर्जन करतात आणि ते पाणी झाडांना घालतात.. अतिशय योग्य मार्ग Happy

खूप छान कथा.
विसर्जनाचे वेळी वाईट वाटतंच पण दुसर्या किंवा तिसर्या दिवशी जेव्हा असे बाप्पाचे अवशेष पाण्याबाहेर येतात तेव्हा काळीज चिरल्यासारखं वाटतं. खूप मोठी मुर्ती हवी पण मग जास्त जड नको म्हणून POP ची मुर्ती आणली जाते. पाण्यात विरघळत नाही. अजून बाकी शेकडो मुर्त्या असतात... एकमेकांवर आदळून त्यांचे तुकडे होतात. आणि असे किनार्यावर वाहून येतात. बाप्पाचे पावित्र्य आणि आदर फक्त १० च दिवस. नंतर ते तुकडे पायदळी तुडवणेही फार कठीण जात नाही लोकांना. अशा प्रकारानंतर बाप्पाला पुढच्या वर्षी पुन्हा येणे किती हवेसे वाटत असेल तोच जाणे. Uhoh

नंतर ते तुकडे पायदळी तुडवणेही फार कठीण जात नाही लोकांना. अशा प्रकारानंतर बाप्पाला पुढच्या वर्षी पुन्हा येणे किती हवेसे वाटत असेल तोच जाणे>> खरे आहे हे
आळन्दीला एक सन्स्था आहे, स्वयंसेवक विसर्जन केलेल्या मुर्ती लगेच पाण्याबाहेर काढतात आणि घाटावर एक स्टेज आहे तिथे ठेवतात, नन्तर एक वाहन येते आणि सगळ्या मुर्ती घेऊन जाते. पुढे त्यान्चे काय होते माहित नाही, पण नदी आणि मुर्ती दोन्ही वाचतात Happy

आळन्दीला एक सन्स्था आहे, स्वयंसेवक विसर्जन केलेल्या मुर्ती लगेच पाण्याबाहेर काढतात आणि घाटावर एक स्टेज आहे तिथे ठेवतात, नन्तर एक वाहन येते आणि सगळ्या मुर्ती घेऊन जाते. पुढे त्यान्चे काय होते माहित नाही, पण नदी आणि मुर्ती दोन्ही वाचतात Happy

--- आता महाराष्ट्रात बर्‍याच ठिकाणी ही पद्धत वापरली जात आहे. इतक्या वर्षांचे प्रबोधन करुन आता छान परिणाम दिसू लागला आहे. ह्या वेळी अनेक शहरांत वेगवेगळ्या ठिकाणी कृत्रिम हौदात विसर्जन व मूर्तीसंकलन केले गेले. त्या मूर्तींची परत रंगरंगोटी डागडुजी करुन पुढच्या वर्षी विक्रिला ठेवतात असे उडत उडत कळले. खरे काय ते माहित नाही. कदाचित डम्पिंग करत असावेत किंवा केमिकल मध्ये विरघळवत असावेत. एकदा मूर्तीचे विसर्जन झाले की त्यातले प्राण अनंतात विलिन होतात, मूर्तींशी तसा काही संबंध राहत नाही.

आता महाराष्ट्रात बर्‍याच ठिकाणी ही पद्धत वापरली जात आहे. इतक्या वर्षांचे प्रबोधन करुन आता छान परिणाम दिसू लागला आहे.>> हे खरच सकारत्मक चित्र आहे Happy
हल्ली शाळा पण गणपती मुर्ती बनवण्याच्या कार्यशाळा घेतात म्हणे, ह्या वर्षी आम्च्या कुटुमातील बर्‍याच छोट्या मुलानी बापा बनवला होता

एकदा मूर्तीचे विसर्जन झाले की त्यातले प्राण अनंतात विलिन होतात, मूर्तींशी तसा काही संबंध राहत नाही.+११

चांगली कथा आहे.

--- आता महाराष्ट्रात बर्‍याच ठिकाणी ही पद्धत वापरली जात आहे. इतक्या वर्षांचे प्रबोधन करुन आता छान परिणाम दिसू लागला आहे. >>>> हे वाचून छान वाटले.

आणि गणपतीसमोर आजकाल जे गाणे वाजवले जातात आणि त्या गाण्यांवर गणपतीसमोर दारू पिऊन मुलं & विचित्र कपडे घातलेल्या मुली नाचतात, तोही विचित्र भाग आहे..

खूप छान कथा आहे. असाच बदल घडायला हवा. ज्या गणेश मुर्तीची आपण 10 दिवस मनोभावे पूजा अर्चना करतो तिची विसर्जना नंतर अशी विटंबना करण्यापेक्षा मातीची मुर्ती केव्हाही चांगली.
मोठ्या मुर्तीं चे दरवर्षी विसर्जन न करता नविन रंग देवून त्याच मुर्ती वेगवेगळ्या गणेश मंडळात
आलटून पालटून वापरल्या तर मंडळात दरवर्षी नविन मुर्तीही राहील आणी त्या अनुषंगाने होणारी मुर्तीची विटंबना, पाणी प्रदूषण आणी पर्यावरणाची हानी टाळता येईल.