सिवाजी..द बॉस्स

Submitted by mi_anu on 29 September, 2018 - 09:43

सुरुवातीलाच एक मनुष्य घोषणा देणाऱ्या प्रचंड जनसमुदायातून एका तुरुंगात जातो.शेजारचा तुरुंग वाला त्याला 'काय केलंस म्हणून तुरुंगात आलास' विचारत असतो.आपण नै का, शेजारी कोणी राहायला आलं की 'मूळचे कुठचे, इथे बदली झाली का, अमक्या गावचे का, शिवाजी पेठेशेजारी वाडा आहे त्या अमक्या काकांना ओळखत असाल' वगैरे हिस्टरी दारातच घेतो तसे.इथे आपला नायक सिवाजी 'लोगोका भला किया इसलीये जेल हुई' सांगतो. या सीन मध्ये सिवाजी ची तजेलदार त्वचा,व्यवस्थित ट्रिम केलेली फ्रेंच दाढी आणि नुकतेच कंडिशनर स्पा केलेले सुळसुळीत केस पाहून तो 'ब्युटी पार्लर का बिल नही दिया इसलीये जेल हुवा' सांगेल की काय अशी बऱ्याच प्रेक्षकांना शंका येते.

तर हा सिवाजी काही वर्षे अमेरिकेत राहून 200 कोटी रुपये जमा करून भारतात समाजकार्य करायला कायमचा आलेला असतोय.'अमेरिकेत 'सिस्टम सॉफ्टवेअर इंजिनीयर' म्हणून नोकरी करून लग्नायोग्य वयाचं असताना 200 कोटी रुपये कमावून भारतात परत येता येतं' ही अनिष्ट अभद्र अफवा पसरवल्याबद्दल अनेक कंपन्या मधून 1-2 वर्षं अमेरिकेत राहणारी आणि दिवस रात्र पाव, बटाटे, कांदे आणि अंडी खाऊन पैसे वाचवणारी लग्न वयाची मुलं अति संतप्त आहेत असं आमच्या आतल्या सूत्रांकडून कळतं.भारतात विमानतळावर उतरल्या उतरल्या 'हे काय, नोटांचं पोतं कुठेय?तो सिवाजी सिस्टम सॉफ्टवेअर मध्ये काम करून 200 कोटी घरी घेऊन आला.तुला मेल्याला प्रोग्रामर असून साधे 2 कोटी घेऊन यायला जमेनात होय?आमचाच दाम खोटा' म्हणून आईबाप हताश डिसगस्टेड सुस्कारे टाकू लागले.

तर आता हा असा 200 कोटी घेऊन आलेला मुलगा भारतात येणार म्हटल्यावर लग्नी मुलींची रांग लागणं साहजिक.त्याही म्युझिक आल्बम च्या ऑडिशन ला आल्यासारख्या जीन्स ची शॉर्ट आणि आखूड शर्ट घालून सिवाजी च्या आईबापांवर भावी वधू म्हणून इम्पो टाकायला आलेल्या असतात.पण सिवाजी निग्रहाने सगळ्यांना 'मला भारतीय वधु आणि स्वागताला भारतीय संगीत पाहिजे' म्हणून सगळ्यांना कटवुन एकदम नदी किनारी गाणं म्हणायला जातो.या गाण्यात सिवाजी च्या बाजूचे नर्तक अनुक्रमे पोटावर सिंह, मडकं आणि रजनीकांत अशी चित्रं(3 कडवी 3 चित्रं) रंगवून नाचतात आणि सिवाजी (बहुतेक) चेन्नई मध्ये असूनही 'जहां लस्सी से स्वागत होगा' वगैरे गाणे म्हणतो ही बाब अती मनोरंजक आहे.सिवाजी अमेरिकेत किती वर्षं राहिला हा एक विचाराधीन विषय आहे.त्याला पाहून कोणीही त्याला 'आपका बच्चा कौनसे कॉलेज मे पढता है' असं न विचारता 'बेटा तुझे कैसी लडकी पसंद है' विचारतात.अश्या प्रकारचा समजूतदारपणा या देशात अपेक्षित आहे.200 कोटी जमवता जमवता होतं असं कधीकधी.

तर सिवाजी ला देशात ठिकठिकाणी मेडिकल कॉलेजेस काढून विद्यार्थ्यांना फुकट शिक्षण द्यायचे असते.यासाठी 200 करोड अमेरिकेत दर महिन्याला पिगी बँकेत टाकून बाजूला ठेवलेले असतात.शिवाय उरलेले पैसे आधीच पाठवून विमानतळाच्या धावपट्टीइतके मोठे पोर्च असलेला बंगला आणि गावात जमीन पण घेतलेली असते.शिवाय या कॉलेज बांधकामाला परवानगी मिळावी म्हणून अधून मधून 4 कोटी, नंतर पूर्ण रकमेच्या 25% अशी लाच द्यावी लागते.(म्हणजे आधी 4 कोटी देऊन उरले 196 कोटी.पुढे नंतर लाच देताना 196 कोटी चे 25%, मग नंतर त्याच्या पुढच्याला लाच देताना (196*(१/४))/४ असे रिवाईज करून गणित करावे लागेल.हा हिशोब फारच गुंतागुंतीचा झाला.तो करायला लागू नये म्हणून या बिकट प्रसंगातून सिवाजी ला आदिशेषन नावाचा एक शत्रूरुप मित्र वाचवतो आणि बांधकामावर स्टे आणतो.

आता हे सर्व चालू असताना सिवाजी चे वधू संशोधन पण चालू असतेच.त्याला एक सुशील मुलगी मिळाल्यावर तो तिच्या घरी निवडणूक आयोग क्लर्क चे रूप घेऊन नायिकेला भोचक प्रश्न विचारणे, ती सेल्सगर्ल असलेल्या वाद्याच्या दुकानात जाऊन तोडफोड करणे वगैरे सभ्य उपाय करून मुलीचे हृदय जिंकण्याचा प्रयत्न करतो.त्याचे आईबापही 'काय बै या हल्लीच्या मुली, सोन्या सारखा मुलगा घरी येऊन मागणी घालतोय आणि या अश्या शिष्ठ सारख्या वागतात' असे भाव आणून त्याच्या बरोबर राहतात.सिवाजी मुलगी व कुटुंबियांना घरी बोलावून पार्टी देतो.यात बदक, खेकडा, कासव असे अनेक प्राणी शिजवून वाढून त्याने मुलीकडच्यांचे मन जिंकले.प्रत्यक्ष मुलीचे मन जिंकणे मात्र कठीण.म्हणून सिवाजी ने तिला आपली खोली, त्यात तिच्या साठी घेतलेल्या कपाटभर साड्या, घरी नेसायच्या कपाटभर साड्या, तिच्या प्रेग्नन्सी मध्ये लागणाऱ्या प्रोटीन पावडरी,मुलगा/मुलगी दोघांसाठी घेतलेले कपाटभर कपडे हे दाखवल्यावर तिची खात्री पटते की हाच बै आपला वर.हल्लीच्या मुलींप्रमाणे ती 'हे काय, अगदीच कशी बै रंगांची जाण नाही?मी इतक्या डार्क जांभळ्याच्या शेड वापरते का कधी?आणि एकही कॉटन चा कुर्ता नाही?जीन्स नाही?कसली म्हणून मेली मॉडर्न पणाची हौस नाही.चांगलं इंग्लंड चं स्थळ सांगून आलं होतं.पण नशीब मेलं या आर्थोडॉक्स लोकांशी बांधलं गेलेलं ना' म्हणून रुसून न बसता पटकन हो म्हणते.

पण प्लास्टिक बंदीच्या काळात सतत बदलणाऱ्या नियमांप्रमाणे नायिकेचे विचार सतत बदलत राहतात.परत भेटायला आल्यावर ती नायकाच्या हाताजवळ हात नेऊन 'तू माझ्या इतका गोरा नाहीस' सुचवते.सिवाजी अत्यंत समजूतदार माणूस असल्याने 'काय गं भवाने, माझ्या घरी बसून कासवाच्या पिल्लाचे कटलेट खाताना दिसला नाही होय माझा रंग' म्हणून न झापता पटकन घरी जाऊन 'रंग माझा वेगळा' म्हणायची तयारी चालू करतो.स्ट्रॉबेरी खाणे, मुलतानी मातीत आंघोळ करणे,बरेच लेप लावणे यानंतर तो आरस्पानी गोरा बनून आपले गोरे पाय व पोटऱ्या दिसतील अशी कॅप्रि पॅन्ट घालून नायिकेकडे परत जातो.गोरापान रजनीकांत बघायच्या कल्पनेने घाबरलेले प्रेक्षकांचे मन नायिकेच्या स्वप्नात गोरा, ब्लॉन्ड विग वाला रजनीकांत आणि ब्लॉन्ड विग वाली नायिका गाण्यात बघून 'वर्स्ट केस' ला तयार होतेच.नायिका प्रत्यक्षात अत्यंत साधी भोळी संस्कारी मुलगी असली तरी सर्व स्वप्न गीतात ती आपली मॉडर्न कपडे घालायची हौस भागवून घेते.स्वप्नं ही भौगोलिक मर्यादा बाळगत नसल्याने ग्रीक मुकुट घातलेला नायक, ईजिप्तीशियन कपडे घातलेली नायिका,पर्शियन बेलीनृत्य अशी बहू-सांस्कृतिक कॉम्बिनेशन आपल्याला 3 गाण्यात बघायला मिळतात.आता नायक बिचारा इतका गोरा झाला तरी हिला लग्न नाहीच करायचंय.

शेवटी नायक एका लोकल खाली जीव द्यायला निघतो.इथे लोकल चा वेग, डोंगरावर असलेली नायिका, सांध्यात अडकलेला पाय या सर्वातून शेवटी नायिकेचे प्रेम (आणि लाल ओढणी काढून लोकल च्या दिशेने नायकाच्या पुढे धावत जाणे.लोकल चालकाला एवढा मोठा ढळढळीत रजनीकांत बराच वेळ समोर उभा दिसला नाही तरी अचानक लाल ओढणी हलवत धावत आलेली नायिका दिसून गाडी थांबवता येणे यामुळे 'लाल रंगाची तरंगलांबी इतर रंगांपेक्षा जास्त असते आणि तो लांबून डोळ्याला दिसतो' हा भौतिकशास्त्रातील सिद्धांत नव्याने पक्का होतो) यामुळे नायकाचा जीव वाचतो आणि ती फायनली 'वाजी वाजी वाजी, मेरा जीवन है सिवाजी' असे गाणे म्हणून लग्नाला होकार देते.(लग्नात उखाणा म्हणून हेच गाणे गद्य रुपात म्हणता येईल.उगीच वेगळा बनवायला नको.'सामने की अलमारी मे चांदी की थाली, सिवाजी के बिना पुरी दुनिया को मै देती गाली' किंवा 'मंगल मंगल मंगल,खाऊं सिवाजी के हाथ का पोंगल' असा काहीतरी.)या गाण्यात सर्व नर्तकांच्या कपड्यात इतके रंग वापरले आहेत की लग्नाच्या वऱ्हाडाचा बस्ता नव्याने न बांधता हेच कपडे जरा नीट इस्त्री करून वापरावे असा बेत असावा.

आता लग्न आघाडी वर पूर्ण गॅरंटी मिळाल्यावर सिवाजी अनेक राजकारणी लोकांना मारून मारून सरळ करून त्यांचे पैसे काळ्याचे पांढरे करतो.ते कसे ते प्रत्यक्ष बघण्याची गोष्ट आहे.शिवाय तो सगळ्या दुर्गम भागात हेलिकॉप्टर ने जातो.तिथे उघडी नागडी(लहान) मुलं त्याचं स्वागत करतात.आणि हा देशात सगळीकडे सुबत्ता आणतो.

पण ज्योतिष्याने कुंडलीत मृत्यूयोग सांगितलेला असतो ते प्रोजेक्ट एकदा उरकून टाकणे भाग असते.त्यामुळे हा सिवाजी तुरुंगात असतो.तिथे आदीसेशन येऊन त्याला मार मार मारतो.आदिसेशन चे कपडे अति पांढरे शुभ्र आणि कितीही मारामारी केली तरी न मळणारे असतात.शिवाय सिवाजी ला मायक्रो लुंगी गुंडाळून मारायचं असल्याच्या खास प्रसंगा प्रित्यर्थ आदीसेशन ने लेग वॅक्सिंग केले असावे अशी दाट शंका आहे.दर्शकांनी प्रत्यक्ष खात्री करून घ्यावी.

तर हा सिवाजी लाईव्ह फेज असलेल्या स्विच बोर्ड असलेल्या खोलीत सेशन कडून मार खातो.मग सेशन गेल्यावर पटकन स्विच बोर्ड उघडून स्वतःला वायरीने शॉक देऊन मारून टाकतो.आता खऱ्या खऱ्या मेलेल्या सिवाजी चा मृतदेह नेत असताना गाडी थांबते, आणि तो मृतदेह शेजारी थांबलेल्या मोठ्या वोल्वो च्या डिकीत ठेवला जातो, आणि मग ती वोल्वो अज्ञात ठिकाणी घेऊन जाऊन डॉक्टर लोक सिवाजी च्या बॉडी ला शॉक देऊन परत जिवंत करतात.

पण बाकी कोणाला हे कळतच नै.त्यांना वाटतं सिवाजी मेलाच. आणि एक नवाच एन आर आय अभिराम बच्चन येऊन (स्वतःच्या) टकलावर खारका मारत सगळा कारभार हातात घेतो.हा अभिराम बच्चन हेअरकट, ओव्हरकोट आणि मिश्या सिवाजी पेक्षा वेगळ्या बाळगत असल्याने भारतात कोणालाही ओळखू येत नाही.आणि सिवाजी ची कहाणी सुफळ संपूर्ण होते.

धड्याखालचे प्रश्न:
१. सिवाजी कोणता शाम्पू वापरतो?
२. विद्या भारती ला कोणत्या कोणत्या देशात नाचत असल्याची स्वप्नं पडतात?
3. सिवाजी चेन्नई मध्ये असून रोज फुलशर्ट,आत बनियान,वर सूट आणि टाय असे 3 लेयर वापरतो.त्याचा डिओड्रंट कोणता असेल?
4. आदी सेशन कडे पांढऱ्या कुरता लुंगीचे किती सेट आहेत?
5. आदी सेशन चे कपडे सर्फ एक्सेल ने धुतले जातात की एरियल ने?
6. अभिराम बच्चन अंगावर किती लेयर्स घालतो?
7. विद्या भारती चे स्वप्न गाण्यांमधले कपडे चेन्नई चा कोणता शिंपी शिवतो?
8. सिवाजी एकावेळी किती माणसे हात फिरवून हवेत उडवतो?
9. मे महिना आहे.(याचा गणिताशी काहीएक संबंध नाही पण विद्यार्थ्यांना गोंधळवायला जादा माहिती.)एक लोकल ताशी 120 किलोमीटर च्या वेगाने चेन्नई कडून बंगलोर कडे जाते आहे.एक सिवाजी ताशी 0 किलोमीटर च्या वेगाने लोकल कडे येतोय.एक विद्याभारती ताशी 10 किलोमीटर च्या वेगाने लोकल च्या दिशेने धावते आहे.वाऱ्याचा त्या दिवशी चा वेग ताशी 5 किलोमीटर आहे.तर विद्याभारती आणि लोकल एकमेकांना सिवाजी पासून किती अंतरावर भेटतील?

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शिवाजी : द बॉस , होय शिवाजीच म्हणायचे . तामिळ मध्ये श चे स्पेलिम्ग S असेच करण्याची पद्धत आहे. जसे श्रीदेवी Sridevi, शेषन seshan तसेच शिवाजी = Sivaji

हा टिपिकल रजनी अतिरंजित फॅण्टसी चित्रपट मी अनेक वेळा टीव्ही वर पाहिलाय अन एन्जॉय ही केलाय. तो अ. आनि अ. असूनही. अत्यण्त लॉजिक लेस असलेला चित्रपट मला फारच आवडतो. रजनी हा एक प्लीजन्ट माणूस आहे...

हा टिपिकल रजनी अतिरंजित फॅण्टसी चित्रपट मी अनेक वेळा टीव्ही वर पाहिलाय अन एन्जॉय ही केलाय. तो अ. आनि अ. असूनही. अत्यण्त लॉजिक लेस असलेला चित्रपट मला फारच आवडतो. रजनी हा एक प्लीजन्ट माणूस आहे...

>>>>>> + १

_/\_
धन्यवाद अनु. कबूल केल्याप्रमाणे लवकरात लवकर हे परिक्षण टाकल्याबद्दल. Happy बाकी ही भट्टी पण छान जमली आहे.

Lol

धमाल लिहीले आहे. खतरनाक निरीक्षणे. उखाणे सर्वात आवडले, तसेच लाल रंगाची तरंगलांबीही Happy

खतरनाक, मी उगाच कवतुक असेल म्हणून वाचावं की न वाचावं यावर विचार करत होतो
टू रीड और नॉट टू

पण लैच भारी मजा आली
खतरनाक पंचेस, लाल रंगाची तरंगलांबी वाला तर जबराट

खरंच महान आहेस _/\_
खतरनाक लिहिलंय Rofl Rofl

मला वाटतं रजनीचा मी एकच चित्रपट पाहिला आहे रोबो. आवडला होता Lol

झकास ! Biggrin
धड्याखालच्या प्रश्नात अजून एक अ‍ॅडा:
आदिसेशन सकाळी (त्याचे स्वतःचे ) दात घासायला काय वापरतो ?
पर्यायः १) विको वज्रदंती २) विको टर्मरिक

हे हे हे , मस्त लिहिलं आहे .
मलाही जाम आवडतो हा चित्रपट . बघायला मज्जा येते . रोबो पाहिला नाही अजून .

मस्त लिहिलंय.
बरेच्दा लागतो हा सिनेमा डब्ड सिनेम्यांच्या चॅनेलवर.
मी एकदाही सलग बघितला नाहीये.
आता हे वाचल्यावर तर आजिबात बघणार नाही Happy

मराठी 'तू ही रे' हा सिनेमा घ्या ना फाडायला, त्यात सुन्दर दिसणारी तेजस्विनी वगळता सगळच अ आणि अ आहे

तुम्ही आधी पाहिला नसेल तर नका पाहु, स्वजो आणि सई सहन होणार्‍यानीच पाहावा.

धम्माल Rofl

याचा आणि या सिरीजमधल्या बाकी लेखांचा समावेश 'मायबोलीवरील धम्माल धागे - संकलन' यात करा. मामींचा धागा आहे.

काय भन्नाट ग ! भारी लिहिलंयस Lol
काय गं भवाने, माझ्या घरी बसून कासवाच्या पिल्लाचे कटलेट खाताना दिसला नाही होय माझा रंग' >> Rofl Rofl

जबरी लिहीलय. एक राहिलं. त्या सिवाजी ला मुलीच्या घरी जाऊन आचरटपणा केल्याबद्दल अटक झाल्यावर, त्याचे आइ-वडील (सिवाजी च्या पाठीवरचा तिसरा भाऊ वगैरे म्हणून सुद्धा शोभू शकतील, अशा, ह्या वडीलांचं काय डील आहे ते तपासायला हवं), पोलिस स्टेशनात जाऊन, 'तुम्हाला कल्पना आहे का, की तुम्ही कुणाला अटक केलीये? हे पहा, त्याचं ग्रीन कार्ड, क्रेडिट कार्ड, पासपोर्ट अशी पुराव्यादाखल, कॅरेक्टर सर्टिफिकेट्स दाखवतात. अर्थ सरळ आहे - ग्रीन कार्ड होल्डर, क्रेडिटकार्ड धारी एनआरआय माणसाला, डाल डाल पर सोनेकी चिडीया बसेरा करणार्या भरतभूवर भारतीय संविधानातला कायदा लागू होत नाही.

Pages