गावाकडची ओढ

Submitted by रमेश भिडे on 23 September, 2018 - 01:05

कोकणातली बहुतांश मंडळी मुंबईत स्थिरावली आणि त्यांचं नामकरण ‘चाकरमानी’मध्ये झालं. लालबाग-परळसारख्या भागातल्या सर्व मिल (गिरणी)मध्ये सर्वात जास्त गिरणी कामगार हा कोकणातलाच होता. इथल्या सर्व विभागात कोकणी माणूस काम करत होता आणि नोकरी करणारा हा कोकणी माणूस चाकरमानी म्हणून ओळखला जात होता. कालांतराने मिल बंद झाल्या, बंद केल्या गेल्या. कोकणी माणसाने तुटपुंज्या पगारात मुंबईत छोटं-मोठं घर घेतलं ते मुंबईत स्थिरावले; मात्र कित्येक जणांना त्यावेळी मुंबई सोडावी लागली.

आज कोकणातून मुंबईत येणारी मंडळी कमी असली तरी त्यावेळी त्या चाकरमान्याचा रुबाब आजही आठवतो. आज तशी परिस्थिती नाही. गावाकडे मोलमजुरी करून, व्यवसाय करून कोकणी माणूस स्वयंसिद्ध होत आहे. शेतीच्या व्यवसायासोबत जोड व्यवस्था यालाही प्राधान्य दिलं. कोकणात रस्ते, पाणी व्यवस्था झाली. ग्रामीण भागात शासनाच्या नवनवीन योजना या भागात अमलात येऊ लागल्या. आर्थिक सुबत्ता आली. आज मे महिना आणि गणपतीसाठी चाकरमानी गावी जातात तसे ते कोकण रेल्वेच्या माध्यमातून अगदी कमी तासात गावी सहज जाऊन येतात. आज सर्व बदल झाले. मुंबईकरांची कोकणाकडची ओढ वाढली.

गावात नवनवीन बंगलोज झाले. बैठी घरे नव्या रूपात दिसू लागली. थोडक्यात काय तर आलिशान घरे माझ्या खेडेगावातही दिसू लागली याचा आनंद आहे. मात्र खंत एका गोष्टीची, या घरात राहायला माणूस नाही. मे महिना अथवा चतुर्थीशिवाय ही घरे उघडली जात नाहीत. मे महिन्याच्या ३० दिवसांचा या घरात घरोबा दिसतो आणि गणपतीला ११ दिवस. नंतर ही टुमदार घरे भल्यामोठया कुलपाने बंद होतात, ओसाड वाटतात. ही परिस्थिती सगळीकडेच आहे.

महिनोन्महिने ऊन, वारा, पावसापासून संरक्षण करत ही घरे माणसांची वाट बघत असतात. इथली देवखोली बंद. वाळलेल्या जास्वंदीच्या फुलांकडे पाहात इथला ओटा सुनसान असतो. छपराकडे पाहात. अंगणात पालापाचोळयाने ताबा घेतलेला असतो. सुंदर तुळशीवृंदावनातली तुळस सुकून गेलेली असते. मोठया गाजावाजात लावलेले नारळाचे झाड आणि लिंबाचे झाड सुकून पावसाच्या पाण्याची वाट पाहात असतात.

शेतीवाडी करणारी माणसं आता यांत्रिक बनली. आता नवीन पिढीला शेतीवाडीत रस नाही. पण गावाकडची ओढ तरी असावी एवढं त्याच्या आई-वडिलांनी शिकवावं असं वाटणारी म्हातारा-म्हातारी गावाकडे असतात. पण इथल्या मोकळया वातावरणात रमलेली ही जोडी मुंबईत चार भिंतीमध्ये स्वत:ला कोंडून घ्यायला तयार नसतात. ‘आम्हाला सारखं गावी लक्ष द्यायला जमणार नाही, त्यापेक्षा तुम्ही मुंबईतच राहा.

नातवंडांनाही सोबत होईल’, असे म्हणणारे चाकरमानी अ‍ॅडजेस्टमेंट करतात ती व्यवस्थेशी जुळवून घेण्यासाठी; पण त्या गावाकडच्या मातीत जीव अडकलेले म्हातारे जीव हे जगणं जगायला तयार नसतात. काही ना काही निमित्त काढून गावी जाण्याचा बहाणा शोधणारे जीव, त्यांना या मुंबईत इंटरेस्ट नसतो.

काळ बदलला, युग बदलले, पण गावाकडची ओढ तीच असते. गावातली नवीन घरे वर्षातून दोनदा उघडतात हे वास्तव आहे. घरातली माणसं कमी झाली. शेजारीपाजारी कमी झाले. गावातल्या शाळांची पटसंख्या कमी झाली. जागोजागी तीच परिस्थिती आहे; पण मग खंतही तशीच वाटते.

वृद्धाश्रमात माणसे वाढू लागली तरी ब-याच प्रमाणात आजही कित्येक जण आपल्या आई-वडिलांना घरी सांभाळताना दिसतात. त्यांचं जगणं हे कुणाला अवघड किंवा अडचण वाटत असेल, तो माणूस कमनशिबी समजावा. कारण आई-वडिलांपेक्षा श्रेष्ठ असे या जगात काहीच नाही आणि ज्यांना आई-वडिलांची माया आणि प्रेम, आशीर्वाद लाभले ते आयुष्यात नेहमीच यशस्वी झालेले आहेत.

मुळातच बंद घरांचा हा विषय संपणारा नाही. कारण यापुढे ही परिस्थिती फार भयानक असेल. आज कोकणात सार्वजनिक उपक्रम किंवा वार्षिक जत्रोत्सवाला सहभाग दाखवतात. पण चाकरमानी नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने त्यांना प्रत्येक वेळी येणं शक्य नाही. पण गावात घरातली माणसे कमी झाली. नोकरी व्यवसायाला गेली तर इथे जाणवते उणीव माणसांची. चाकरमान्याला आल्यावर भेटणारा घोळका आणि मुंबईला जाताना कंठ दाटून येणारे आता कमी झाले. पण अजून ते दिवस आठवतात.

पावसाळयात कुडकुडत धगाकडे बसण्याचे, आंघोळ झाल्यावर फणसाच्या आठळया तव्यात नाही तर चुलीत भाजून खायचे. कवळे तोडताना संक्रांतीच्या वेळी कुंभाराने दिलेल्या बुडकुला (मातीचे भांडे) त्यातले फ्रीजसारखे गार पाणी पिताना, भात कापताना अंगाला खाज सुटली की नदीच्या पाण्यात डुबकी मारून घरी जाण्याचे. खडकावर वाडीवरच्या अराळ-फराळ गप्पा रंगण्याचे..

शाळेत जाताना इतरांच्या खोडया काढण्याचे. मात्र वडीलधा-यांचा आदर करण्याचे, कपडयाच्या चिंध्यांचा चेंडू घेऊन नळयाच्या खापराच्या लगोरी बनवून लगोरी चेंडू खेळण्याचे आणि रात्री म्हाता-या माणसांकडून भुताच्या गोष्टी ऐकण्याचे ते दिवस मनाला आनंद देतात.

आणि म्हणूनच ही टुमदार घरे जेव्हा पाहतो, तेव्हा त्यांच्या कुलुपाकडे पाहिले की गाव माझा असून माणसं नसल्यासारखा वाटतो. घरात शिल्लक राहिलेली एक म्हातारी घर सांभाळते. ती पण मुंबईकरांसोबत मुंबईला जाते आणि हे घर राहतं एकटंच शेजारपाजार नसल्यासारखं. ही खंत नेहमीच राहील. गावची ओढ कायमच राहील. पण बंद घराचं कुलूप उघडून गजबजाट सुरू होण्याची प्रतीक्षा दूरच राहील. पण ज्यांचे गावावर, तिथल्या मातीवर, माणसांवर मनापासून प्रेम आहे, त्यांनी केव्हातरी वेळ काढून गावी जावं. शेजार-पाजा-यांशी बोलून यावं. हीच अपेक्षा.

साभार : संतोष मर्गज / दैनिक प्रहार

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users