हृदयात या सुखांचा दुष्काळ गात आहे

Submitted by रुपेंद्र कदम 'रुपक' on 22 September, 2018 - 13:04

नौका इथे मनाची बुडते भवात आहे
त्याच्यात चांदणेही आले भरात आहे

आवाज काळजाचा येतो सुरात आहे
हृदयात या सुखांचा दुष्काळ गात आहे

उपमा तुला फुलांची द्यावीच लागली तर
काटा कुणा म्हणावा या संभ्रमात आहे

अदृश्य सावली ही होते कशी दुपारी
बहुतेक घर तिचेही जळते उन्हात आहे

होणार दुःख नाही सरणावरी जिवाला
निर्जीव देह म्हणजे नुसतीच कात आहे

भजनी 'अनूप' होती तल्लीनता मनाची
शिरली कशी अचानक रंभा मनात आहे

सांगून टाक आता घेणार काय आहे
कॉफी चहा मदीरा सारे घरात आहे

उचकी अशी घराला लागे मध्येमध्येही
परतून पाखरांनी केली प्रभात आहे

© रुपेंद्र कदम 'रुपक'
✍ 22 सप्टेंबर 2018 पुणे

Group content visibility: 
Use group defaults