क्षितिजापुढे उडावे

Submitted by निशिकांत on 19 September, 2018 - 00:35

क्षितिजापुढे उडावे ही एक आस आहे
थकलेत पंख पण मी करतो प्रयास आहे

घोंघावतो जरी मी कोणी न लक्ष देती
वादळ शमेल याची खात्री कपास आहे

लावून षड्ज गाणे, गाता मला कळाले
तू आसपास नसता मैफिल उदास आहे

आव्हेरले मला तू अन् विश्व शुन्य झाले
उरलो जगात आता घेण्यास श्वास आहे

वृत्तांत जीवनाचा लिहिता कळून आले
मजकूर तूच अन् मी नुसता समास आहे

घर शोधणे सखीचे अवघड मुळीच नाही
जिकडून गंध येतो तिकडे निवास आहे

नटतेस तू अशी की, आय्याश आरसाही
विसरून भान, तुझिया बघतो रुपास आहे

स्वार्थी जगा हवीशी गोडी उसातली पण
खातील त्यास याची भीती मुळास आहे

"निशिकांत" पंढरीची धरलीस वाट का तू?
संसारपाश तोडुन खडतर प्रवास आहे

निशिकांत देशपांडे मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Group content visibility: 
Public - accessible to all site users