सांगण्यासारखे काय आहे म्हणा

Submitted by बेफ़िकीर on 18 September, 2018 - 12:08

गझल - सांगण्यासारखे काय आहे म्हणा
=====

सांगण्यासारखे काय आहे म्हणा
झाकलेल्या मुठी, वाकलेला कणा

जे जहर निर्मिले ते स्वतः प्यायलो
आठवेना कधी काढला मी फणा

गाव असते करायास चर्चा उभे
आज तेथून येशील का साजणा

का जगावे इथे सांग खोटेच मी
एक कारण तरी दे खऱ्या कारणा

जन्मणे, संपणे, ह्यातही गुंतणे
काय वेडेपणा, काय वेडेपणा

चार भिंतीत स्त्रीवाद ठेचाळतो
दूर नेऊ नको तू तिला अंगणा

आज सुचली मला ही नवी कल्पना
आज माझ्याकडे हालला पाळणा

माणसे आतबाहेर करतात ही
मन तुझे केवढे 'बेफिकिर' कुंपणा

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाह! भारी!

माणसे आतबाहेर करतात ही
मन तुझे केवढे 'बेफिकिर' कुंपणा>> मस्त.

जबरदस्त. _/|\_

<<<
सांगण्यासारखे काय आहे म्हणा
झाकलेल्या मुठी, वाकलेला कणा
>>>
<<<
माणसे आतबाहेर करतात ही
मन तुझे केवढे 'बेफिकिर' कुंपणा
>>>

विशेष आवडले.

मस्त!
मतला विशेष आवडला

सांगण्यासारखे काय आहे म्हणा
झाकलेल्या मुठी, वाकलेला कणा