मा. ल. क. - ११

Submitted by हरिहर. on 7 September, 2018 - 10:29

एकदा देव फार फार म्हणजे फारच कंटाळला. या ब्रम्हांडांचा कारभार हाकताना खुपच वैतागला. ‘रोज काय तेच तेच!’ म्हणत चिडला. त्यानेच निर्माण केलेल्या या विश्वाच्या पसाऱ्यात त्याला मन मोकळं करावं असं कोणी बरोबरीचं दिसेना.
अचानक त्याच्या लक्षात आले “अरे, आपणच निर्माण केलेला मानवप्राणी नक्कीच बुध्दीमान आहे. तो थोडावेळतरी नक्की आपले मनोरंजन करु शकतो.”
देवच तो. मग काय, काहीही कल्पना नसताना तो अचानक त्याच्या एका भक्त असलेल्या माणसापुढे प्रकट झाला. माणूस प्रथम गडबडला. मग चार वेळा “देवा तुम्ही! देवा तुम्ही!” म्हणत पाया पडत राहीला.
देव म्हणाला “हे बघ, तुझे पाया पडणे झाले असेल तर जरा माझं ऐकतोस का?”
“ऐकतो का म्हणजे काय देवा, तुम्ही आज्ञा करायची.”
देवाने मोठ्या आशेने त्याला सगळं सांगीतले व म्हटले “माझा कंटाळा जाण्यासाठी तू माझे मनोरंजन करशील का?”
माणूस म्हणाला “देवा, मी काय तुमचे मनोरंजन करणार? पण मी आजवर जे केलं आणि पुढील आयुष्यात जे करणार आहे त्याबद्दल सांगतो हवं तर.”
देव म्हणाला “ठिक आहे. सांग तू.”
माणूस म्हणाला “मी यंव केलय, मी त्यंव केलय. आणि त्यंवसुध्दा मीच केलय. शिवाय मी यंव करणार आहे. त्यंवसुध्दा मीच करणार आहेच.

आणि देव खो खो हसला. अगदी पोट दुखेपर्यंत हसला.

मार्मिक लघू कथा.
(कथासुत्र: माहीत नाही.)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शाली तुमच्या कथा आवडतात, त्यातलं मर्म/तात्पर्य सांगण्याचा तुमचा प्रयत्न जाणवतो. मात्र या कथेत 'दैववादाला' प्रमोट केलंय असं वाटतंय. 'मीपणा' चुकीचाच, त्यानं नुकसानच होतं हे बरोबर. पण दैवावर हवाला न ठेवता कर्म/प्रयत्न करत रहायचं (गीतेतला विचार) असं जास्त बरोबर वाटेल. आपण प्रयत्नांती परमेश्वर म्हणतोच, म्हणजे प्रयत्न करा हा महत्वाचा विचार आहे त्यात.

मस्तच.. आज दिवस जरा वैतागवाणा चालला आहे आणि ही कथा वाचुन मस्त हसू आलं. धन्यवाद शाली.

@अंजली - विश्वकर्त्याला माणूस मी हे केलं, ते केलं, करणार आहे वगैरे ऐकवतो आहे. जगाचा गाडा चालवणार्‍याला "आपले कर्तुत्व" सांगणारा माणूस एवढा साधा विनोद वाटला मला तरी. हे म्हणजे गेली ३५-४० वर्षे घर चालवणार्‍या आई बाबांना मी आज एक भाजी केली हे छाती पुढे काढुन सांगण्यासारखे झाले. दैववाद वगैरे काही मनातही आलं नाही माझ्या Happy

चौकट राजा >> Happy
खरंच की. असाही अर्थ असू शकतो. धन्यवाद.

मस्त