माझा नाव प्रवास

Submitted by सदा_भाऊ on 3 September, 2018 - 05:39

माझा नाव प्रवास

माणसाचं नाव हे त्याच्या चेहऱ्यासारखं असतं. जणू ते त्याच्या चेहऱ्याला चिकटूनच बसलेलं असतं. नाव नुसतं आठवलं की त्या व्यक्तीचा चेहरा आणि स्वभाव डोळ्यासमोर येतात. जरी कोणी "नावात काय आहे?" म्हणून गेला असला तरी प्रत्येक जण नाव कमावण्याच्या प्रयत्नात असतो. पोरानं कतृत्व केलं तर म्हणतात "बापाचं छान नाव काढलं" किंवा बापाचं पण कौतुक करायचं असेल तर "बापाचं नाव राखलं". तेच जर पोरानं काही कृष्ण कृत्य केलं तर "नावाला काळीमा फासलं". सर्व संत-महात्म्यानी नाम महिमा काय कमी सांगितलाय? नामस्मरणानं वाल्याचा वाल्मिकी पण होऊ शकतो.

तर मुद्दा इतकाच हा "नावात काय आहे?" हा मुद्दा तद्दन खोटा व दिशाभुल करणारा आहे. सुजाण नागरिकानी अफवाना बळी पडू नये. जे नाव तुम्ही आयुष्यभर स्वत:चं म्हणून वागवत असता ते खरंतर तुम्ही ठरवलेलं नसतंच. एकतर अक्कल नसताना माथी मारलेलं असतं किंवा सासरच्या मंडळींच्या आवडीसाठी स्विकारलेलं असतं (त्यावेळी पण अक्कल असतेच असंही नाही). छान दिसावं म्हणून मॅचींगचे कपडे बदलता येतात, मेकअप करून रूबाब वाढवता येतो पण आज मला हे नाव हवं असा पर्याय नसतो. नाही म्हणायला काही मंडळी टोपण नावानं प्रसिद्ध अाहेत, पण मुळ नाव अबाधित ठेऊनच. तरीपण मला काही उदाहरणं अशीही माहीती आहेत ज्यानी नामांतरावर पण बरेच कष्ट घेतलेत. शहरांची, राज्यांची नावं बदलू शकतात तर आम्ही माणसं का मागं! माझ्या परिचयाच्या एका विद्वानाने त्यांचे आडनाव "मिश्रा" बदलून "मिश्र" करून घेतले होतं. त्यामुळं त्यांची खुप भरभराट होईल असा कोणीतरी महाविद्वानानं सल्ला दिला होता म्हणे. तो इतक्यावरच थांबला नाही तर त्याने त्याच्या दशवर्षीय पुत्राचे नाव पण "वरद" बदलून "यशवर्धन" करून घेतले. हा उपद् व्याप सरकारी दप्तरी सर्व ठिकाणी करून घेतला. त्यावर त्यानं बराच पैसा खर्च केला होता म्हणे.

असो. तर हा नाम महिमा मी वेगळा तो काय वर्णावा! इतकी माझी योग्यता नाही. तरी नाम प्रवास वर्णावा इतकी नावं मी नक्कीच गोळा केलीत. माझ्या शैक्षणिक कारकिर्दीमधे बरीच नावं संपर्कात आली. आता त्यातील बरेच चेहरे स्मृतीत हरवले पण नावं अजुनही लक्षात आहेत. तर माझ्या या अशा नावेतल्या प्रवासाला तसा बराच लौकर प्रारंभ झाला असला तरी खरा रूंद प्रवाह सापडला तो नोकरीत आल्यावर. असंख्य प्रकारची माणसं भेटली. त्यांची नावं ही त्यांच्या स्वभाव व चेहऱ्याला बांधून ठेवल्या सारखी वाटतात.

माझा एक दक्षिणी सहकारी होता. त्याचं नाव होतं "मुथूकुमार पिचुमणी". सगळे त्याला "मुथू" हाक मारायचे. मला ज्यावेळी त्याला बोलवायचा प्रसंग आला त्यावेळी मला कसंतरीच झालं. आमच्या शेजारील एका तेलगू कुटूंबाने त्यांच्या सुकन्येचे नाव ठेवले होते "शरण्यालोशिनी". मला शंभरटक्के खात्री आहे की ती कन्या वयाच्या किमान दहा वर्षापर्यंत स्वत:चं नाव सांगू शकली नसेल. पुढं जाऊन अशा भयंकर नावाच्या व्यक्तीच्या मुलानं जर प्रण असा केला की "मी बापाचं नाव लावणार नाही." तर मी त्यांची व्यथा समजू शकतो. अतिउत्साही दांपत्यं त्याच्या कुलदिपकाचं किंवा कुलपणतीचं नाव ठेवताना कमालीची कल्पकता पणाला लावतात. काय नाव ठेवतील काही नेम नाही. साधं सोपं सुटसुटीत नाव ठेवायला काय होतं याना काही कळतंच नाही. आमच्या समोर एक गुजराथी कुटूंब रहात होते. त्यानी त्यांच्या कन्येचे नाव ठेवले होते "ध्वनी". माझी द्वी वर्षीय कन्या त्यावेळी नुकतीच बोलायला लागली होती. अनेक शब्दांच्या अपभ्रंशामधे त्या मुलीला पण तिने सोडले नाही. तिला ती "धोंडी" अशी हाक मारायची. नशिब त्या गुजराथी मंडळीना या शब्दाचा अर्थ माहीत नव्हता किंवा त्यानी लहान पोर म्हणून दुर्लक्ष केले असावे. एखादा कोल्हापूरी असता तर धोंडाच घेऊन भांडायला आला असता. एकदा आमच्या शेजारी एक नवे कुटूंब रहायला आले. त्याना एक लहान रांगणारं बाळ होते. त्या गृहस्थाचे नाव होते "श्री. मुन्ना लाल". त्यानं दारावर पाटी लावली "M Lal". माझ्या अर्धांगीला त्यामुळं त्यांच्या खऱ्या नावाची काही कल्पना नव्हती. सौ लाल शी तिची थोडीशी तोंडओळख झाली होती. दुसरे दिवशी सहज बाहेर दिसल्यावर माझ्या सुविद्य पत्नीने त्याना विचारले "मुन्ना किधर है? खेल रहा है क्या?" मी हा संवाद घरातून ऐकला. त्या महिलेची मात्र फारच केविलवाणी अवस्था झाली असावी. ती कदाचित बावचळली. यजमानाना अचानक कोणी तरी असं काहीतरी संबोधावं याची तिची तयारी नसावी. मग मला चटकन पुढं होऊन सावरावं लागलं. "आपका बेटा कहाॅं है? और मुन्नाजी आॅफीस गये है क्या?" तसे आपल्याकडे पण "बाळ" नाव ठेवतात ना!

खरी मजा आली आम्ही सिंगापूर ला स्थायीक झाल्यावर. तिथं बरीच चायनीज नावं आम्हाला समजून... लक्षात ठेऊन... पाठ करून घ्यावी लागली. माझे तीन सहकारी आहेत. त्यांची नावं "वाय सेंग", "वाई चाॅंग", "वा हेंग". तिघंही रंग रूप वजन उंची वय सर्व बाबतीत अतिशय भिन्न. तरीपण मला सुरवातीस प्रचंड त्रास व्हायचा त्याना नावासह लक्षात ठेवण्याचा. माझ्या व्हिएतनाम च्या एका कस्टमरचे नाव आहे "हा". माझ्या आॅफीसच्या तिथल्या एका इंजिनीयरचं नाव होतं "हाई" आणि दुसरा होता "त्वुआन". तिथला आमचा सेल्स मॅनेजर आहे "बाव". अजून एका व्यक्तीचं नाव आहे "फंग". आता तुम्हीच सांगा, माझ्यासारख्या शुद्ध मराठी मातीत वाढलेल्या माणसानं हे सर्व कसं लक्षात ठेवायचं! सिंगापूर मधे माझी एक महिला सहकारी होती. तिचं नाव होतं "लिंग जी". तिच्याशी जाऊन बोलणं दूर, तिला कामाचे एक इमेल सुद्धा काय संबोधून लिहावं असा सांस्कृतिक प्रश्न मला पडला होता.

माझ्या एका कोरियन बाॅस नाव आहे Gi Il. बरेच दिवस मला या विचाराने ग्रासलं होतं की याच्या नावाचा उच्चार कसा करायचा. नंतर कोणीतरी समजावलं नुसतं "जी आय" म्हणायचं. माझ्या शाळेतील इंग्रजी अध्यापकानी अक्षरांवरून शब्दोच्चार कसा करावा या दिलेल्या शिक्षणाला पुरता सुरूंग लागला होता. माझ्या एका कस्टमर कडं काम करणाऱ्या दोन गृहस्थांची नावं होती "हो" आणि "वी". तो वी जरा खोचक होता आणि हो फार बडबड्या. मी त्यांच्याशी मिटींग झाल्यावर असा विनोद करण्याचा प्रयत्न केला होता "वी नुसता विचकत होता आणि मी फक्त हो ला हो म्हणत होतो." कामानिमीत्त माझा संबंध कोरियन आॅफीस बरोबर बराच आला. तिथं तर मला वाटतं "ली" या आडनावाचाच अख्खा देश असावा. किती लोकांची आडनावं तीच! माझ्या एका कोरियन "ली" ला उद्देशून लिहीलेल्या इमेलला कस्टमरकडील आठ "ली" नी उत्तरे दिली. काही नावं सुद्धा इतकी गमतीशीर... एकाचं नाव "हो जंग ली", दुसरा "नु सुंग ली", अजून एक "चाऊ ली". मला नक्की खात्री आहे की जरा अजून शोध घेतला तर धरली, पळाली, सोडली अशी सर्व मराठी क्रियापदं कोरियामधे सापडतील. इतकंच नव्हे तर कोरियन संस्कृतीचे मुळ मराठी मातीतच कैक वर्षांपुर्वी रूजले होते असा जर कोणी शोध लावला तर मला मुळीच नवल वाटणार नाही. आपल्या गुजरातमधे महिलांना आदरानं संबोधण्यासाठी त्याच्या नावानंतर "बेन" लावतात. कोणीही मराठी माणसानं त्याचा "बहिण" असा अर्थ लावू नये. कारण तिथं नवरा पण आपल्या पत्नीला "बेन" लावूनच संबोधतो. शिवाय मुलं सुद्धा आईचं नाव बेन वापरूनच सांगतात. हेच "बेन" चायनीज लोकांमधे एक स्वतंत्र नाव होऊ शकते. त्याहून गंमत अशी की ते पुरूषाचं नाव आहे. अजून एक न उलगडलेलं कोडं... "किम" हे नाव कोरियन मुलाचे असते तर तेच चायनीज मुलीचे असू शकते. चायनामधे आडनावं ठेवण्यात फारच कंजूषी. आमच्या सारखी भारदस्त कुलकर्णी, देशपांडे त्याना सुचत नसावित. त्यांची आडनाव काय... लिम, टॅन, गोह, ओव, लाॅंग, हॅन. आडनावांच्या बाबतीत आळशी असावेत असा माझा काही दिवस समज होता.

असा माझा नावेतला प्रवास थायलंड मलेशिया इंडोनेशिया मधे पण बराच रोमांचक आहे. माझा थायलंडचा एक सहकारी होता "तानीन". त्याचं असं म्हणणं होतं की तो शब्द संस्कृत भाषेतून आला आहे. मी वाद न घालता थाय संस्कृत ला ताबडतोब मान्यता दिली. अजून एक सहकारी होता "वटाना". तो अतिशय अजागळ असल्यामुळं त्याला "वाटाण्या" अशी हाक मारण्याची खुप इच्छा व्हायची. माझ्या एका इंडोनेशियातील सहकारी आहे "हेंड्रा". मला उगाचाच त्याला हेंगाडा म्हणून बघावं असं वाटतं. माझ्या एका कस्टमरचं नाव होतं "बुच". मला दाट शक्यता वाटते की त्याच्या बायकोचं नाव बाटली असावं. माझ्या मलेशियातील एका सहकाऱ्याचं नाव आहे "गोह ची वी". त्याला सगळे "गोची" म्हणतात. पण गंमत अशी की कोणालाच गोची चा अर्थ माहीती नाही. तिच खरी गोची! माझ्या एका इंजीनीयरचं नाव आहे "यी" तर दुसरा "केनी". यांच्याबरोबर काम करताना मला जीभेलासुद्धा त्रास. मला एकदा बाॅसनं सांगितलं की एका प्रोजेक्टवर "शीन यींग" काम करेल. तू काम समजाऊन दे. मी नकळत चटकन प्रश्न विचारला.. "मुलगा का मुलगी". त्यावर बाॅस नं हसून उत्तर दिलं "अरे नावावरून कळतं ना! मुलगी ते!!" अन मी काहीतरी विनोद केल्यासारखा तो हसला. पण त्याला कसं समजावू की मला खरंच नावावरून स्त्री पुरूष भेद करता नाही येत. माझ्या एका चायनीज बाॅसचं नाव होतं "हाॅन मुन". मला भीती वाटायची की मी त्याला चुकून हनिमुन म्हणतो का काय! आमच्या जनरल मॅनेजर चं नाव होतं "पाक वान". देवाशप्पथ सांगतो या सर्व नावांमधे कोणतीच अतिशयोक्ती नाही. पण ही सर्व नावं अशी मराठी शब्दाना मिळती जुळती कशी हा एक सखोल अभ्यासाचा विषय होऊ शकतो.

जपानी नावांचं एक वैशिष्ट्य असतं. अधिकाधीक "आ" स्वराचा वापर करायचा आणि शक्य झालं तर एखादं अक्षर दुमडायचं. "ओकामू", "शिनाबो", "ओकावा", "अराता", "सुवाझा", "सुगावा", "धरावा", "मोडावा", असं काहीही ... असो. आपल्याकडं आदरानं कसे "राव" म्हणतात, तसे बऱ्याच देशात भिन्न परंपरा आहेत. जपान मधे सॅन लावतात "संदीप सॅन". इंडोनेशियामधे पाक लावतात "पाक संदीप", थायलंड मधे तर कहरच "खुन संदीप". मी अशा खुनाच्या धमक्या बिनधास्त बऱ्याच दिलेल्या आहेत आणि पचवल्यात पण.

असा हा नावांचा प्रवास अखंड चालू राहणार. या सर्व गदारोळात प्रभुच्या नावाचा विसर पडू नये इतकीच स्व नावापासून इच्छा!

[आपल्या नावावर विनोद करून वाहवा मिळवण्यात मला मुळीच रस नाही. या लेखात जर कोणाचे चुकून नाव आले असले तर तो केवळ योगायोग समजावा.]

~संदीप कुलकर्णी
+६५ ९८२२१०६०

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

बोकलत - मग वाचल्यावर काय वाटलं ते पण सांगा.धन्यवाद

किल्ली - धन्यवाद. इतर कुलपाना सुध्दा आवडेल अशी अपेक्षा. Happy