मरण केले

Submitted by रुपेंद्र कदम 'रुपक' on 3 September, 2018 - 00:35

जीवनाचे वार सारे सहन केले
एक रस्ता सरळ होता वळण केले

मी म्हणालो अजुन आहे जीव माझा
उचलले, तैयार त्यांनी सरण केले

भाकरीचे स्वप्न पडले पायरीला
आरतीला का तुपाचे हवन केले

युद्ध कोणाशी करावे प्रश्न आहे
जर सितेने रावणाचे हरण केले

वाढदिवशी चॉकलेटी केक होता
जेवणाला बिनमिठाचे वरण केले

पोट भरण्या मी पिलांचे धान्य झालो
भरडले चक्की स्वत:ला दळण केले

घातला होता घनाचा घाव ज्यांनी
स्थापिले त्यांनीच आणी नमन केले

फसवले आहे तुझ्या या चांदण्याने
भेटलो चंद्रास सारे कथन केले

वेळ आली भेटण्याची पावसाला
काळजाच्या माळराना लवण केले

अमृताच्या निर्झ~यांचा शोध घेण्या
'रूपका'ने जिंदगीचे मरण केले

© रुपेंद्र कदम 'रुपक'
✍पुणे 01 सप्टेंबर 2018

Group content visibility: 
Use group defaults