रिटायर होता होता..

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 1 September, 2018 - 12:20

सांगून बघतो
बघून सांगतो
करता करता
वर्षे गेली उलटून
बरेच काही
केले तरीही
वाटते अजून
बरेच काही करायचे
गेले आहे राहून

पंचवीस तीस
वर्ष आयुष्याची
तशी मोठी असतात
तरीही कशी
बघता बघता
सहज निघून जातात

अन एक दिवस
अचानक
येते कळून
अरे रिटायर
होणार आपण
म्हणजे हेच
आणि एवढेच
का होते जीवन
अन्न वस्त्र
निवारा अन
पुढच्या पिढीचे
भरण पोषण

अस्तित्वाला आपुल्या
वर्षानुवर्षे सांभाळत
साजरे करत
तेच सण तेच उत्सव
त्याच जयंत्या
अन त्याच पुण्यतिथ्या

मग
इतके दिवस
घट्ट बंद केलेली
आपली मुठ
होते चक्क
रिकामी ओंजळ

नाही म्हणजे
काही इन्क्रीमेंट
काही प्रोमोशन
थोडा अधिकार
वेगळा कारभार
याचे सुख
नव्हतेच असे नाही
पण ते प्रवासात
येणारे पुढचे स्टेशन
माहीत असावे
तसे होते काही

स्थैर्य आश्वासकता
अन उद्याची चिंता नसणे
होते त्यात
मग आणखी
काय हवे होते ?
बुचकळ्यात
पडलेले चेहरे
पाहता पाहता
आले सहज लक्षात
अरे मला पंख हवे होते
ते नव्हते त्यात

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मग
इतके दिवस
घट्ट बंद केलेली
आपली मुठ
होते चक्क
रिकामी ओंजळ.....अगदी ...अगदी .

बोकलत--....धन्यवाद Whatsap वर टाकू का? तुमची परवानगी असेल तर......हरकत नाही
शशांक ,
मंजुताई ,
गजानन,
धन्यवाद