कमिटमेंट

Submitted by VB on 31 August, 2018 - 08:23

त्रिशा अन संभवमध्ये कडाक्याचे भांडण झाले, इतके की परत एकमेकांचे तोंडही बघणार नाही असे ठरविले, अगदी ब्रेकअप करून निघाले दोघे.

घरी आल्यावर त्रिशाने तर स्वतःला आपल्या खोलीत कोंडून घेतले, खूप खूप रडली. अगदी शिव्याशापही दिला तिने संभवला. रात्री जेवली देखील नाही. नाही म्हणायला आज जे झाले ते अगदीच काही अनपेक्षित नव्हते त्रिशासाठी, तरी दरवेळी इतकीच किंवा थोडी जास्तच दुःखी व्हायची ती.

संभव अन ती, दोघेही पूर्णतः वेगळे होते, दोघांच्या आवडीनिवडी वेगळ्या होत्या, खरेतर दोघांचे पूर्ण विश्वच वेगळे होते. तरीही काहितरी समान धागा होता त्यांच्यात, कदाचित त्यामुळेच दोघांच्याही नकळत प्रेमात पडले दोघे एकमेकांच्या.
असेच एक दिवस संभवने त्याच्या तिच्याबद्दलच्या प्रेमाची कबुली दिली तिला, अन तिनेही जास्त आढेवेढे न घेता सरळ होकार दिला. इतरांसारखे त्यांचेही सुरुवातीचे दिवस अगदी जादूमय असल्यासारखे गेले. अन हळूहळू इतके दिवस जे घडले नाही ते होऊ लागले.

आता त्रिशाला लग्न करून संसार थाटायचा होता, तर संभवच्या इच्छा आकांक्षा वेगळ्या होत्या. त्यावरून हल्ली फक्त वाद होत दोघांत, भांडणे तर नेहमीचीच झाली होती. तसेच आजही झाले होते, दोघे दरवेळी भांडत , ब्रेकअप करत पण दुसऱ्याच क्षणी सगळे विसरून एकत्रदेखील येत. पण असे किती दिवस चालणार न, काहीतरी ठाम निर्णय घेणे गरजेचे होते. त्याशिवाय दोघांचे थांबलेले आयुष्य पुढे जाऊच शकणार नव्हते.

आजच्या या भांडणानंतर त्रिशाला त्याची जाणीव प्रकर्षाने झाली अन मनाविरुद्ध पण गरजेचा असा निर्णय घेतला तिने. अन लगेच संभवला मेसेज केला, उद्या ऑफिस नंतर त्यांच्या रोजच्या ठिकाणी भेटण्याचा.

ठरल्याप्रमाणे भेटले दोघेही, संभवला वाटले की ही आता भांडणार, परत लग्नाविषयी बोलणार, आयुष्यभराची कमिटमेंट मागणार. पण तसे काहीच झाले नाही. त्रिशाने काही न बोलता एक पत्र दिले त्याच्या हातात. तिच्या नोकरीच्या बदलीचे पत्र होते ते. त्रिशाने दुसऱ्या शहरात असलेल्या तिच्या ऑफिसच्या शाखेत तिची बदली करून घेतली होती. ते पत्र संभवच्या हातात देताना डोळे भरून आले होते तिचे. कसेबसे स्वतःला सावरून तिने संभवकडे एक वचन मागितले, त्याला समजावले की हल्ली आपण फक्त भांडतोय, वाद करतोय. हा, आपल्या वादांपेक्षा आपले प्रेम जास्त आहे अन म्हणून कदाचित दरवेळी आपण पुन्हा पुन्हा एकत्र येतो, पण असे कधीपर्यंत होईल ? एक दिवस हे सगळे असह्य होईल, त्यापेक्षा आपल्यात जास्त कटुता येण्यापूर्वी आपण वेगळे होऊ. कारण तुला कधीच आयुष्यभराची कमिटमेंट नकोय अन म्हणून तू लग्न टाळतोयएस, पण माझे असे नाही आहे, कितीही प्रेम असले तरी इतर कुठल्याही सामान्य मुलीप्रमाणे मलाही आपल्या नात्याला एक नाव हवे आहे. तसेही ठराविक वेळी प्रत्येक नात्याला एक निश्चितता ही लागतेच, सो हे सर्व इथेच थांबणे गरजेचे आहे, अन त्यासाठी मी हे शहर सोडायचे ठरविलेय, पण मला एक वचन हवेय तुझ्याकडून की तू यापुढे कधीच मला भेटायचा प्रयत्न करणार नाहीस, इतकेच काय अगदी भविष्यात कधी कुठे चुकून आपण भेटलो तरी ओळख देणार नाहीस. आधी संभवने नकार दिला, तिला समजवायचा प्रयत्न केला , थोडा वेळ मागितला, पण या वेळी त्रिशा पूर्ण निर्धाराने आली होती की काही झाले तरी यावेळी मागे हटायचे नाही. शेवटी संभवला तिला तसे वचन द्यावेच लागले. अन जड मनाने दोघांनी निरोप घेतला एकमेकांचा.
आता, त्रिशाला कितीही दुःख वाटत असले तरी एक समाधान होते की किमान यापुढे तरी ती संभवच्या प्रगतीच्या आड येणार नव्हती. हा निर्णय जो आता कठोर वाटतोय, तो त्या दोघांच्या हिताचाच होता. अन जी कमिटमेंट संभव तिला देऊ शकत नव्हता, ती कमिटमेंट तिने त्याने न मागता पूर्ण केली होती, त्याच्या आयुष्यातून निघून जाऊन. शेवटी प्रेम म्हणजे काय, ज्याच्यावर आपण प्रेम करतो त्याच्या सुखातच आपले सुखही दडलेले असते. अन त्याच्याच प्रेमासाठी त्याच्या आयुष्यातून निघून गेली होती ती कायमची.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिलय!
छोटे मोठे प्रसंग टाकून मस्त खुलवता आली असती कथा.

Aawadli Katha. Yoghya nirnay welet ghetlyamule doghanche aayushya kharab hou naye hi kaalji. Samanjas wichar karta yeto atireki nirnay na gheta he mandale tumhi. Khup Chan.

Vchi Preeti , खूप आभार☺️

अन खरंय, योग्य वेळी थांबणे प्रत्येकाला जमत नाही, रादर ते खूप कठीण असते

छान लिहिले आहे...पण शेवट कळला नाही ...तिने कमिटमेंट पूर्ण केली आणि त्याच्या प्रेमासाठी दूर गेली म्हणजे तिने फक्त त्याच्या भविष्यासाठी त्याग केला की ती स्वतः च्या आयुष्यातही पुढे जाणार आहे

तिने कमिटमेंट पूर्ण केली आणि त्याच्या प्रेमासाठी दूर गेली म्हणजे तिने फक्त त्याच्या भविष्यासाठी त्याग केला की ती स्वतः च्या आयुष्यातही पुढे जाणार आहे>>>> ओबविअसली ती पण पुढे जाणार,

माझ्या मनातील शेवट काहीसा असा होता की, स्त्रिया कितीही दुर्बल वगैरे असल्यातरी वेळ आल्यास योग्य निर्णय क्षमता त्यांच्याकडे जास्त असते. इथे तो कदाचित खरेच खूप प्रेम करत असेल तिच्यावर, पण त्याला कुठलीच कमिटमेंट द्यायची नाहीये, पण एखाद्या सामान्य मुलीप्रमाणे त्याच्या प्रेमाचा स्वीकार करताना त्याच्या सुखदुःखात त्याची साथ देण्याची कमिटमेंट तिने केलेली असते त्याने न मागता. अन म्हणून असा निर्णय घेऊन तिने त्याला सगळ्या त्रासातून-पेचातुन बाहेर काढून त्याचे एकतरी सुख त्याला नक्कीच दिले. अन स्वतःसुद्धा एका अनिश्चिततेतून बाहेर पडली☺️

अन हो, त्याग वगैरे असा कधीच काही नसतो, बरेचदा अपरिहार्य कारणांमुळे घेतल्या जाणाऱ्या निर्णयांना किंवा नको असलेल्या गोष्टीतून काढलेल्या पळवाटेला लोकं त्यागाच्या नावाखाली लपवितात असे मला वाटते☺️

छान