ओयासिस - भाग १

Submitted by somu on 24 August, 2018 - 02:42

ओयासिस - भाग १

"छान झाले फेशियल, तुझ्या हातात जादू आहे बघ" मिसेस सानेनी केलेले कौतुक ऐकून स्मिता सुखावली.

"नेक्स्ट टाइम, थोडा वेळ काढून या, आपण हेअर मसाज आणि स्पा पण करूयात. आत्ताच मी एक नवीन कोर्स अटेंड स्पा साठी केला होता. जर तुम्हाला चालणार असेल तर तुमच्या पासून नवीन टेक्निकची सुरवात करू"

"न चालायला काय झाले. उगीच गेले ८ वर्षे येत नाही तुझ्याकडे. येण्याच्या आधी फोन करते. आणि माझ्या दोन मैत्रिणींना मी तुझ्याबद्दल सांगितले आहे त्या पण येतील तुझ्याकडे"

" Thank you, तुमच्या सारख्या कस्टमर कम मैत्रिणींमुळेच माझा हा बिझनेस चांगलं सुरू आहे "

" स्वाती, नुसता रेफेरेन्स असून नाही चालत, कला पण आहे तुझ्याकडे आणि तुझा नम्रपणा, कस्टमरशी बोलण्याची पद्धत... काम नसेल तरी पण तुला येऊन भेटावं आणि दोन शब्द बोलावे असे वाटते बघ... चल निघते आता नाही तर तास भर अजून बोलत बसवशील " म्हणून मिसेस साने स्मिताच्या पार्लर मधून निघाल्या.

सगळी साफसफाई आणि आवरा आवर करून स्मिता खुर्चीत बसली "पावणेचार वाजले आता चार वाजता मिसेस जोशी येतील... तो पर्यंत थोडा आराम आहे" असे म्हणत तिने चहा मागवला

आणि फोन हातात घेऊन व्हाट्स अँपवर जाऊन मेसेज टाईप केला "गोलू, आहेस का फ्री ? "

पलीकडून काहींच रिप्लाय नाही बघून थोडीशी हिरमुसली आणि बसून विचार करू लागली...

स्मिता गोखले, एक नॉर्मल मुलगी. सुस्वरूप, मितभाषी, घरकामात दक्ष, कोणाला उलट बोलणे नाही...

तिची आई ती पाच वर्षांची असतानाच देवाघरी गेली असल्यामुळे वडिलांनी दुसरे लग्न केले आणि लग्न करून दुसरी आई आणली... पण आई ही आपली आईच असते आणि दुसरी आई ही दुसरीच असते आणि याचा प्रत्यय तिला पदोपदी येत होता..

अगदी लहानपणीच तिला समज आली होती.. मुलगी आहे तिला सगळे काम जमलेच पाहिजे हे गोंडस कारण सांगून तिच्याकडे घरातील सर्व कामांची जबाबदारी आली.

सकाळी लवकर तिचा दिनक्रम सुरू होत होता, सकाळी घर आणि अंगण लोटून काढून सडा रांगोळी झाल्यावरच तिला कपभर दूध मिळत असे...

अंघोळ झाल्यावर दुपारचे जेवण तयार करून मग शाळेला जायचे. संध्याकाळी आले की परत जेवणच्या तयारीला लागायचे. जेवण झाल्यावर भांडीकुंडी घासून मगच तिला अभ्यासाला वेळ मिळायचा...

तिचा होमवर्क हा कायमच अपूर्ण असायचा. शाळेतील शिक्षकांना तिची परिस्थिती माहिती असल्यामुळे तिला जास्त ओरडा नाही मिळायचा..

त्यामुळे ती शाळेतच जमेल तितका अभ्यास करायची, शिक्षक काय शिकवतात याकडे जास्त लक्ष देऊन ते आत्मसात करायची म्हणूनच काय तिला उत्तम नसले तरी चांगले मार्क मिळायचे..

बाबा नोकरीनिमित्त दिवसभर घरी नसायचे. संध्याकाळी ते घरी यायच्या वेळेस दुसरी आई काहीबाही काम करत बसायची आणि स्मिता तिचे सर्व काम संपवून अभ्यासाला बसलेली.. त्यामुळे त्यांना घरातील कामे स्मिताला करावी लागतात हे समजायचे नाही. त्यांच्या लेखी त्यांची बायको घरातील काम करते आणि मुलगी अभ्यास.

दहावीला स्मिता चांगल्या मार्कने पास झाली... पण मार्क समजल्यावर दुसऱ्या आईने असा काय आकांडतांडव केला...

"मी घरातील काहीच काम करायला लावत नाही हिला, नुसती आरामात बसून अभ्यास करायचा असतो तरी पण कमी मार्क पडले..."

बाबांनी त्या दिवशी तिला भरपूर मारले होते आणि जेवण पण दिले नाही. स्मिता रात्रभर तिच्या आईचा फोटो घेऊन रडत बसली होती.

दुसऱ्या आईने तिचे पुढील शिक्षणच बंद करायचा खूप प्रयत्न केला पण तिच्या मामाने तिला पाठिंबा दिल्यामुळे तिला अकरावीला ऍडमिशन घेता आली.

कॉलेजमध्ये तिच्या घराशेजारील एक मुलगा पण होता.. मनोज.

तो आणि स्मिता लहानपासूनचे एकत्र वाढलेले. त्याला तिच्या घरची पूर्ण परिस्थिती माहिती होती. दोघे एकत्र कॉलेजला जायचे.. तो तिला भरपूर मदत करायचा.. तिला लागतील त्या नोट्स मिळवून दे, तिचे जर्नल राहिला असेल तर पूर्ण करून दे.. दोघे एकत्र कॉलेजला जायचे यायचे. दोघांची चांगली मैत्री होती..

मनोजला स्मिता आवडायची आणि स्मिता त्याच्यात आधार शोधायची..

आणि तिच्या आयुष्यातील काळाकुट्ट दिवस उजाडला..

बारावीची परीक्षेचा शेवटचा पेपर देऊन ती आणि मनोज परत येत होते. येताना मनोज तिला कॉफी शॉपमध्ये घेऊन गेला

"हे घे" म्हणत त्याने स्मिताला एक ग्रीटिंग कार्ड दिले..

" काय आहे हे "

" वाचून बघ "

स्मिताने कार्ड उघडले.. त्यातून " I Love You " अशी ट्यून वाजायला लागली... स्मिताला काय बोलावे ते समजेना..

" मनोज, अरे तुला माझ्या घरची परिस्थिती माहिती आहे. मी या सर्वांचा कधीच विचार केला नाही.

मला कॉलेज नंतर स्वतःचे करीयर घडवायचे आहे, स्वतःच्या पायावर उभे राहायचे आहे.. आईच्या जाचातून मुक्त व्हायचे आहे..

त्यामुळे सध्या आपल्या दोघांत मोकळी मैत्री राहू दे.. "

" स्मिता, मी आदर करतो तुझ्या भावनांचा.. मला माहिती आहे सर्व आणि मी नेहमीच तुझ्या बरोबर असेन याची खात्री बाळग "

" thank you, manoj for understanding " म्हणत तिने कार्ड परत दिले..

" स्मिता, एक ऐकशील माझे "

" बोल "

" हे कार्ड राहूदे तुझ्याकडे.. या प्रसंगाची आठवण म्हणून... जेंव्हा पण तुला वाटेल की आता आपण स्वतःच्या पायावर उभी राहिली आहेस त्या वेळी आपण परत विचार करू या बाबत "

" ठीक आहे, पण त्या वेळेपर्यंत फक्त मैत्री आणि अभ्यास "

दोघे घरी आले, स्मिताने ठरवले की रात्री कार्ड तिच्या कपाटावरील आईच्या बॅगमध्ये ठेवू... दुसरी आई त्या बॅगला हातपण लावत नव्हती...

घरी पोहचल्यावर ती फ्रेश व्हायला गेली असताना तिच्या भावाने पेन घेण्यासाठी तिची पर्स उघडली आणि त्या वेळी ते कार्ड पर्समधून खाली पडले.

दुर्दैवाने दुसरी आई तेथे होती. तिने ते उघडले आणि जो अवतार धारण केला... स्मिताला मारतच तिने मनोजच्या घराकडे नेले आणि त्याच्या दारात त्याच्या घरच्यांसमोर तमाशा केला..

मनोजने सांगण्याचा प्रयत्न केला की ही माझी चुकी आहे आणि स्मिताला यातील काहींच माहिती नाही पण तिने काहीही ऐकून घेतले नाही..

शेवटी मनोजच्या आईने स्मिताला तिच्या तावडीतुन सोडवले आणि तिला घरात घेऊन गेल्या..

त्यांना प्रथम मनोजकडून सर्व हकीकत जाणून घेतली आणि दोघांना म्हणाल्या

" मनोज, स्मिता एक चांगली, सर्वाना आवडेल अशी मुलगी आहे...

पण तुला तिच्या घरची परिस्थिती माहिती आहे ना ?

मग, असे का वागला तू ? काय परिणाम झाले ते बघितले ना तू ? मी आणि बाबा बोलतो तिच्या वडिलांशी "

स्मिता त्यांच्या कुशीत पडून रडायला लागली.. त्यांनी मायेने तिच्या डोक्यावरून हात फिरवला.. स्मिताला बऱ्याच दिवसांनी मायेची ऊब मिळाली..

पण संध्याकाळी स्मिताचे बाबा परत आल्यानंतर दुसऱ्या आईने कांगावा केला की स्मिता मनोजबरोबर पळून गेली आहे आणि मनोजच्या घरच्यांना हे मान्य आहे...

ते मनोजच्या घरी जायला निघाले तर तिने अट घातली की असे परत होऊ शकते, त्यामुळे जर तिचे लग्न लावून देणार असाल तरच तिला परत घरात घेईल...

स्मिता घरी आली खरी पण तिचा भरपूर छळ सुरू झाला.. तिचे कॉलेज बंद केले गेले. दिवसभर नुसत्या कामाच्या रगाड्यात अडकून गेली..

तिच्यासाठी स्थळे बघणे सुरू झाले, पण अजून अठरा वर्षे पूर्ण न झाल्यामुळे कोणीही लग्नासाठी तयार होत नव्हते..

अश्यात एक स्थळ सांगून आले, नारायण सप्रे, साधासा जॉब, दिसायला बरा पण वयात जवळपास दहा ते बारा वर्षाचे अंतर.. घरी तो आणि आई यांच्याशिवाय कोणी नव्हते...

बाबांना स्थळ बरे वाटले आणि स्मिताला तर विचारण्याचा प्रश्न तर नव्हताच...

लग्न करून ती स्मिता गोखलेची आता स्मिता नारायण सप्रे झाली...

नवीन संसार सुरू झाला, घरी सासू आणि नवरा. स्मिताने सासरी आल्यापासून घरातील पूर्ण जबाबदारी सांभाळली.

क्रमश
संकुल

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

छान Happy

mast