तीन देवियां - भाग १

Submitted by प्रकाशपुत्र on 18 August, 2018 - 23:25

मला दहावीपर्यंत जरा अक्कल कमीच होती, मुली म्हणजे तापदायक आणि त्रासदायक विषय वाटायचा. वर्गात मी हुशार समजला जायचो, म्हणून काही मुली गणित, सायन्सचे प्रश्न घेऊन यायच्या, पण मी त्यांना काहीच भाव द्यायचो नाही. त्याशिवाय मी नाटक, भाषण यात भाग पण घ्यायचो आणि तिथेपण मुलींबरोबर काम करायला लागायचे, पण या सगळ्या अपूर्व संध्या मी वाया घालवल्यात. तर तात्पर्य काय मला दहावीपर्यंत या विषयात काही अक्कल नव्हती. बायकोचे असे म्हणणे आहे कि मला अजूनही कोणत्याच विषयात काहीच अक्कल नाही. असो, परत कथानकाकडे वळू .

पण अकरावीत काहीतरी एकदम बदल झाला, मुली म्हणजे काहीतरी गोड, सुंदर गोष्ट वाटू लागली. त्यांच्याकडे बघत राहावे वाटायला लागले. त्यात माझ्या कॉलेज मध्ये तर गुलाबाची बागच फुलली होती. असे म्हणतात ना कायम शाकाहारी असणारा माणूस जेव्हा चिकन, मटण पहिल्यांदा खायला लागतो तेंव्हा त्याला हे खाऊ कि ते खाऊ अशी खा खा सुटते, मला पण तसेच झाले होते. हि बघू का ती बघू असे झाले होते. मी एवढी वर्षे मुलींशी फटकून वागत होतो त्याची शिक्षा सगळ्या मुली छान छान दिसून देत होत्या.

अशातच मला एक दिवस ती दिसली, खूप सुंदर होती, घारे डोळे आणि एक छान छोटीशी वेणी. पाहिल्या पाहिल्या खूप आवडली. ह्रुदयात हूरहुर का काय म्हणतात ती चालू झाली, थोडे ठोके चुकायला लागले, सगळे जग सुंदर वाटायला लागले. एकदा कॉलेज संपल्यावर तिच्या मागे मागे जाऊन तिच्या घरचा पत्ता शोधून काढला. अहो आश्चर्यम ! ती आमच्या कॉलनीतच रहात होती. आमचे घर मेन रोडवर होते आणि तिचे जरा आत होते. हि परी इतके दिवस माझ्या कॉलनीतच राहतीय आणि आम्ही मात्र दहावीपर्यंचा सगळं वेळ त्रैराशिके सोडण्यात घालवला. निखिल , व्यर्थ घालवलेस आत्तापर्यंचे आयुष्य ! (तर माझे नाव निखिल )

मग कॉलेजला जाताना बरोब्बर वेळ साधून तिच्यामागे जाणे हे चालू झाले. क्लासमध्ये ती दिसेल अशा जागी बसणे, तिच्या मागे फिरणे चालू झाले. मित्रांनी चिडवले की गुदगुल्या होऊ लागल्या. मित्र पण सगळे वाह्यात. एकदा क्लास चालू होता. माझे नेहमीप्रमाणेच क्लासमध्ये काही लक्ष नव्हते आणि शेजारी माझा मित्र गाणे गुणगुणत होता.

जेथे सागरा धरणी मिळते !
तेथे तुझी मी वाट लावते !! वाट लावते !!

"वाट लावते" हे ऐकून मला एकदम फस्स करून हसू आले. मग काय, सरांचे माझ्याकडे लक्ष गेले आणि भर वर्गात आमचा सत्कार झाला.

मग एकदा धाडस करून तिच्याशी बोललो. आनंदाची गोष्ट म्हणजे 'एक हुशार मुलगा' म्हणून मी तिला माहिती होतो. मुद्दाम लेक्चर चुकवून मग तिच्याकडून लेक्चरच्या वह्या मागणे चालू केले. जर क्लासमध्ये सर तिला काही येत नाही म्हणून ओरडले तर सरांचा राग येऊ लागला.

यातच एक दिवशी तिने 'बाबानी घरी बोलावलय असे सांगितले'. माझी तर जाम ...... रात्री तिच्या घरी गेलो. वाटले होते की ते आता ओरडतात. पण ते म्हणाले की एक मुलगा तिला त्रास देतोय, तू आणि तुझे मित्र चांगले आहात, तर कॉलेजला आणि क्लासला जाताना तिला जरा सोबत करा. (हे म्हणजे खरे तर चोराच्या हातात तिजोरीच्या चाव्या देण्यासारखे होते, पण मला काय, मी माझी ड्यूटी खूप निभावली.) नंतर ती मला Bye करण्यासाठी फाटकापर्यंत आली. आकाशात छान चांदणे पसरले होते आणि ती समोर अप्सरेसारखी दिसत होती. आणि मी दुनियेवर विलक्षण खुश होतो.

कॉलेजमधील माझ्या या सगळ्या एक्स्ट्रा करिक्युरल ऍक्टिव्हिटीज मुळे बारावीला माझ्या मार्कांची वाट लागली, तरीपण कसेबसे Engineering College ला मला admission मिळाले. ती BSc ला गेली. मी जिथे राहायचो त्या शहरात Engineering College हे Science कॉलेजच्या समोरच होते. त्यामुळे माझे एकतर्फी प्रेम चालूच राहीले. काहीतरी कारण काढून तिला रस्त्यात गाठणे चालूच ठेवले. बेटा बघताना 'धक धक' माधुरीच्या जागी तीच दिसायला लागली. दामिनी बघताना सन्नी देओलच्या जागी स्वत:ला बघायला लागलो. असे करता करता Third Year Engineering ची परीक्षा संपल्यावर मित्रांबरोबर गोव्याला गेलो असताना जाणीव झाली की I miss her too much. त्याचवेळी एक दोन सिनेमे असे बघितले कि ज्यात नायक खूप वेळ वाट बघतो आणि मनातील गोष्ट लवकर सांगत नाही त्यामुळे नायिका दुसऱ्याची होऊन जाती. म्हणून ठरवले की तिला प्रपोज़ करायचे. परत आल्यावर लगेच तिला गाठले आणि सांगितले की मला तुझ्याशी बोलायचे आहे.......

दुसरा भाग https://www.maayboli.com/node/67260

--प्रकाशपुत्र

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान.
म्हणजे ही पहिली. आणि अजून दोन असं असणार का?

प्रतिसादाबद्दल धन्यवाद. दुसरा भाग कधी टाकावा याबद्दल काही मार्गदर्शन ? मी मायबोलीवर नवीन आहे. एकदम लागोपाठ कथा टाकू नये असे म्हणतोय पण त्याचबरोबर खूप उशिरा टाकली तर लोक आधीचा संदर्भ विसरतील असे पण वाटतेय.

काही लोक पहिल्या भागावर अमुक एवढे प्रतिसाद (अर्धशक , शतक)असे टार्गेट ठेवून मग पुढचा भाग टाकतात.

काही लोक पुढचा भाग कधी अशा पुरेशा विचारणा झाल्या की टाकतात.

पण बहुतेक सिरीयस लेखक, आपल्या जमेल त्या वेळेत, पुढचा भाग लिहून झाला की तो टाकतात आणि बहुतेक सर्वांनाच ते अर्थात आवडते.

जर तुमचे सर्व भाग आधीच तयार असतील तर दार तीन चार दिवसांनी टाका.