तारुण्याचा गंध विरेना

Submitted by निशिकांत on 13 August, 2018 - 02:41

दुरावल्याने सखी अताशा, एक एक पळ कसा सरेना?
तरी लोक का म्हणती थांबत नसतो केंव्हा काळ, कळेना?

समानता हे गोड स्वप्न अन् फक्त विषमता वास्तव असते
खूप संपदा कुठे, तर कुठे घाम गाळुनी पोट भरेना

गुर्‍हाळ एरंडाचे झाले जीवन, त्यातुन काय मिळावे?
वैफल्याने ग्रस्त एवढा! ओठावरती हास्य फुटेना

क्षितिजापुढती नांदायाची जरी आवडे रम्य कल्पना
पाय टेकुनी जमिनीवरती जगावया पर्याय मिळेना

हळू चालते जाताना जी, गाय परतते जलद गतीने
ओढ वासराची येताना, तर जाताना पाय निघेना

हास्यक्लबातिल कृत्रिम हसणे बिनकामाचे, लोक हिणवती
गेल्यावरती सत्य उमगते, उदास बसण्याहुनी बरे ना!

नवस बोलुनी, देवकृपेने घरात मुलगा जसा जन्मला
नको नकोशी अधीच होती, अता तर तिला कुणी पुसेना

क्षोभ जनाचा बघून ठरली, बैठक होती मार्ग शोधण्या
लाचविरोधी निर्णय घ्याया, चोर त्यातला कुणी धजेना

कसा काय "निशिकांत" बरसतो ओला श्रावण मावळतीला?
यत्न करोनी सुरकुत्यातला तारुण्याचा गंध विरेना

निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Group content visibility: 
Public - accessible to all site users