"करुणा" : भाग ०२ (अंतिम भाग)

Submitted by दिपक. on 5 August, 2018 - 04:31

लग्नानंतरचा एक–दीड वर्षाचा काळ आमच्यासाठी खूप सुखावणारा होता. माझ्या पुस्तकाच्या यशानंतर त्याचं वर्षी माझी आणखी दोन पुस्तकं प्रकाशित झाली. पुण्यातच एका चांगल्या ठिकाणी मी आमच्यासाठी घर घेतलं. त्यात करुणा आणि मी अगदी आनंदाने आपलं जीवन जगत होतो. करुणेची धाकटी बहीण चंदा आणि तिचे वडील दर एक–दोन आठवड्यातून करुणाला आणि मला भेटून जात होते. आणि नेहमी प्रमाणेच एक दिवस सकाळी १० च्या सुमारास चंदा आमच्या घरी आली आणि येताच तिने बडबड सुरू केली –

"अगं ताई, ती आपल्या कॉलेज मधली प्रियंका
आठवते का तुला?."
"हो.. आठवते ना.. काय झालं तिला?"
"काय झालं नव्हे.. काय होणार म्हणून विचार."
"म्हणजे?"
"अरे देवा.. तुला अजुन कळालं नाही तर!"
"कशाबद्दल?"
"अगं मुल होणारे तिला."
"काय.. प्रियंका गरोदर आहे?.. अगं चार
महिन्याआधीच तर लग्न झालं ना तिचं.."
"बघ ना, कमालच आहे.. आणि तुझ्या लग्नाला
दोन वर्षे होत तरी अजून आम्हाला गोड बातमी
ऐकायला मिळाली नाहीये."

इतकं बोलून चंदा स्वयंपाक घरात निघून गेली. करुणा अजूनही चंदाच्या बोलण्याचा विचार करत तशीच उभी होती. चंदा चेष्टा–मस्करित जे काही बोलून गेली ते कुठं ना कुठं तरी करूणेच्याही मनात खटकत होतं पण तिनं ते कधी कुणापुढे म्हणून दाखविलं नव्हतं एवढंच.
तसेच काही दिवस गेले. अन् एक दिवस मी सकाळी डायनिंग टेबलवर पेपर वाचत बसलो होतो तोच करुणा घाई घाईने तिथे आली.

"अहो.. लवकर अटोपा आपल्याला आता निघायचं आहे."
"कुठे निघायचं आहे? तेही इतक्या गडबडीने.."
"डॉक्टर कडे.. आज अपॉइंटमेंट घेतली आहे मी.."
"डॉक्टर! का गं?.. तब्बेत बरी नाहीये का?"
"नाही, मी ठीक आहे.. फक्त चेकअप साठी जायचं आहे"
" कसला चेकअप? आधी नीट सांग तरी काय भानगड आहे ती.."
"काही भानगड नाहीये. तुम्ही फक्त माझ्याबरोबर चला. तिथे गेल्यावर कळेल तुम्हाला.."
"बरं बाई चल.. पण आधी त्या डॉ. चा अड्रेस तरी दे.. की ते पण सरप्राइज ठेवणार?.."

करुणाने सांगितल्या प्रमाणे आम्ही त्या पत्त्यावर पोहोचलो. दवाखाना बाहेरून अगदी छोटा दोन तीन खोल्यांचा असावा असा मी तर्क लावला. पण जस जसं आम्ही आत गेलो, तो मोठा आणखी मोठा होत गेला. आजूबाजूच्या सगळ्या भिंतींवर लहान लहान नवजन्मलेल्या मुलांचे पोस्टर्स लावलेले होते. रिसेप्शन समोर सगळ्या गरोदर बाया व त्यांचे पती त्यांचा हात धरून चालताना दिसत होते. ते दृश्य पाहून माझ्या मनात एकच प्रश्न आला
"आपण या ठिकाणी का आलोय?" आणि तोच प्रश्न मी करुणाला विचारला.

"करुणा.. आपण इथे का आलोय?.."
"इथे ज्या डॉक्टर आहेत ना.. त्या पुण्यातील बेस्ट गायनाकोलोजिस्ट आहेत. खूप दिवसांपासून मी इथे येण्यासाठी खटपट करीत होते. आणि शेवटी मला आजची अपॉइंटमेंट मिळाली."
"अगं ते बेस्ट वगैरे ठीक आहे. पण सध्या आपण इथे कशासाठी आलोय ते अजूनही मला कळलेलं नाहीये."
"तुम्हाला काय वाटतं. आपण का असेल इथे?"
"बरं ठीक आहे.. मी गेस करतो हा.."
"हा करा.."

मी दोन मिनिटांसाठी विचार केला तेव्हा ‘गायनाकोलोजिस्ट’ या शब्दावरून एकच गोष्ट माझ्या ध्यानात आली.
"करुणा.. म्हणजे तू प्रेग्नेंट आहेस की काय?.. आणि ही गोष्ट तू सर्वात आधी मला सांगायचं सोडून ह्या डॉक्टरला सांगायला आलीस होय!."
(करुणा निराशेने डोक्याला हात लावत म्हणाली)

"अरे देवा!.. प्रेग्नेंट नाहीये म्हणून तर इथे आलिये.."
"म्हणजे?.."
"आपल्या लग्नाला किती वर्ष झाली?.."
"दीड.. दोन वर्षे होत आली.. का गं, असं का विचारतेय स?.."
"तेच... दोन वर्षे होत आली तरी अजूनही.."
(करुणा पुढे काही बोलणार इतक्यात एक नर्स तिथे आली. आणि म्हणाली–)

"मीसिज करुणा देशमुख, तुम्हाला डॉक्टर सुमित्रांनी चेकअप साठी बोलावलं आहे."
करुणा उठून त्या नर्सच्या मागे जाऊ लागली आणि जाताना मागे वळून बोटांच्या इशाऱ्याने "पाचं च मिनिटे लागतील" असं खूनवून गेली.

एका अर्ध्या–पाऊण तासाने करुणा बाहेर आली आणि तिच्या मागे ती नर्सही आली आणि माझ्याकडे बघून म्हणाली –

"यशवंतराव देशमुख, तुम्हाला.."
(तिचं वाक्य पूर्ण होण्या आधीच मी म्हटलं–)
"डॉक्टर सूमित्रांनी बोलावलं आहे ना.. चला.."
मला वैतागलेलं पाहून करुणा डोक्याला हात लावून हसू लागली. डॉक्टर सूमित्रांनी मला काही प्रश्न विचारले आणि काही टेस्टस् केले आणि शेवटी त्या म्हणाल्या –

"सगळे टेस्टस् करून झाले आहेत. पण इतक्यात काही सांगता येणार नाही. उद्यापर्यंत तुमच्या रिपोर्ट्स येतील मगच नक्की काय ते कळेल. लेट्स होप फॉर द बेस्ट!"
"थँक्यू डॉक्टर.."

मी करुणाला परत घरी घेऊन आलो. हॉस्पिटल मधून परत आल्यापासून ती माझ्याशी काहीच बोलली नव्हती. नेहमी फुलाप्रमाणे टवटवीत राहणारी करुणा त्या दिवशी खूपच उदास आणि मृदू वाटत होती. उद्या सकाळी आज केलेल्या टेस्ट स रिपोर्ट मिळणार होती. ती रात्र आम्हां दोघांसाठीही खूप मोठी आणि त्रासदायक होती.

रात्री काहीकेल्या मला झोप लागत नव्हती. आपल्या घरातील घड्याळ टक टक असा आवाज करतं हे मला त्याच रात्री पहिल्यांदा जाणवलं होतं. करुणा रात्रभर हॉल मधील सोफ्यावर बसून होती. रात्री खूपवेळा माझ्या मनात विचार आला की तिच्या जवळ जाऊन बसावं. तिच्या बोलावं. पण न जाणे का, मी गेलो नाही.. तसाच आपल्या बेडवर पडून राहिलो.. रात्र उजाडे पर्यंत...
आणि सकाळ होता होता माझा डोळा लागला. रात्रभर जगल्यामुळे पहाटे नकळत माझी झोप लागली.

मला परत जाग आली ती घराचं दार उघडण्याचा आवाज ऐकुन. मी धडपडीने उठून आधी घड्याळावर नजर टाकली. १२ वाजून गेले होते मला १० वाजता हॉस्पिटल मधे रिपोर्ट आणण्यासाठी जायचं होतं..
मला स्वतःचा खूप राग येत होता. मी इतका गैरजबाब दार होऊन असं बेसावधपणे कसा झोपलो याचंच मला आश्चर्य वाटत होतं.

मी गडबडीने अंथरुणातून उठून बाहेर आलो. तर टेबलावर पडलेली फाईल आणि करुणाचा उदास चेहरा बघून मला स्थितीचा थोडाफार अंदाज आला. मी करुणा समोर गेलो आणि आपली चर्या गंभीर दिसता कामा नये याची काळजी घेत हसऱ्या सुरात म्हणालो –

"अगं बघ ना, रोज सकाळी ६ ला उठून बसतो आणि आज कशी काय मला जाग आली नाही कोण जाणे.. बहुतेक काल रात्री मी जरा उशिरा झोपलो त्यामुळे असं झालं असेल. त्यात डॉक्टर कडून रिपोर्ट आणायचं पण चक्क विसरलो मी.. ती रिपोर्ट मी आत्ता जाऊन आणली तर चालेल ना?.."
"त्याची काही गरज नाहीेये.. मी घेऊन आलीये.."
"अच्छा.. काय आलं आहे त्या रिपोर्ट मधे?.."

त्या टेबलावरील ती फाईल बघून माझी भीती आणखीनच वाढली. करुणाही माझ्या प्रश्नाचं उत्तर देत नव्हती.. मी तिला पुन्हा एकदा विचारलं.. आणि यावेळी माझ्या चेहऱ्यावरून आणि आवाजातून माझ्या मनातील भीती स्पष्ट जाणवत होती..–
"करुणा, काय आहे रिपोर्ट मधे?.."
"काही नाही."
"काही नाही म्हणजे?"
"काही नाही म्हणजे काही नाही."

करुणाच्या अश्या बोलण्यामुळे मी आणखीनच घाबरलो. आपल्या कोणत्याही प्रश्नाचं करुणा नीट उत्तर दे नाही हे पाहून, शेवटी वैतागून मी ती फाईल उचलून चाळायला सुरुवात केली.. करुणाची आणि माझी रिपोर्ट वरतीच लावलेली होती ती मी हातात घेतली.

रिपोर्ट वाचल्यानंतर एक गोष्ट स्पष्ट झाली. कमतरता करुणात नाही.. माझ्यात होती. माझं मन सुन्न झालं. असा धक्का मला याआधी कधी लागलेला ते सुद्धा आठवत नव्हतं.. “मी कधीच बाप होऊ शकत नाही” याचं दुःख मला एकवेळी सहनही झालं असतं.. पण फक्त माझ्यामुळे करुणालाही आई होण्याचं सुख उपभोगता येणार नाही. या विचाराने तर माझ्यावर जणू दुःखाचं आभाळच कोसळलं. करुणाला सांभाळावं की स्वताला?.. काहीच कळत नव्हतं.. गळ्यात काहीतरी मोठ्ठी वस्तू अडकल्यासारख वाटत होतं.. जीला ओखताही येत नाही.. आणि गिळताही येत नाही.

करुणा शून्य भावाने माझ्याकडे एक टक लावून बघत होती. इतका वेळ डोळ्यात दाबून ठेवलेलं दुःख करुणाला बघून एकदम उसळून आलं.. मला रडताना पाहून करुणाच्या ओठांवर किंचीतसं हसू आणि डोळ्यात कितीतरी प्रेम भरून आलं.. ती उठून माझ्याजवळ आली. माझा हात आपल्या हातात घेऊन त्यावर एक अलगद चुंबन घेतलं, आणि माझ्या केसांवरून कितीतरी मायेनं तिनं आपला हात फिरविला.
माझ्या डोळ्यातून वाहणारा प्रत्येक थेंब करुणा आपल्या प्रेमळ हातांनी पुसून, एका समाधानाने भरलेल्या नजरेनं माझ्याकडे बघत होती. अशा परिस्थितीतही करुणाच्या चेहऱ्यावरील त्या समाधानाचं रहस्य मला त्यावेळी कळणं शक्यच नव्हतं.. आणि मी ते जाणून घेण्याचा प्रयत्नही केला नाही. मी फक्त रडत होतो. एका लहान मुलाप्रमाणे.

इतका वेळ एकही शब्द न बोललेली करुणा शेवटी आपल्या साडीचा पदर घेऊन माझ्या तोंडावरून हात फिरवत म्हणाली –
"अजून किती रडणार आहात?.. साडी भिजत आली माझी."

इतक्या दुःखात असूनही करुणाच्या अश्या बोलण्यावर मला हसू आल्यावाचून राहिलं नाही. अर्धा–पाऊण तास रडल्या नंतर शेवटी माझ्या तोंडावरील हसू बघून करुणा म्हणाली –

"असं होतं तर आधीच हा जोक मारला असता ना मी.. उगाच माझी साडी भिजली की."
"होय होय.. तू गप्प.. मी काय मुद्दाम रडत होतो का?"
"काय माहित.. तुमचं काही सांगता येत नाही."

करुणाला अशी गम्मत करताना पाहून मला माझ्या मनावरचं ओझं कितीतरी कमी झाल्यासारखं वाटलं. पण तरीही एक प्रश्न माझ्या मनात खुंपत होता–

"करुणा, इतकं सगळं कळूनही तुला माझ्यावर राग नाही येत आहे का?"
"कसला राग?.. जे काय झालं त्यात तुमची चुकी थोडीच आहे.."
"पण तरीही, माझ्या कमतरतेमुळे तुला कधीच आई होण्याचं सुख मिळणार नाही.. तरीही तू माझ्यावर इतकं प्रेम**"
"कोण म्हटलं की आई होण्याचं सुख मिळणार नाही.. ते तर आत्ताच काही क्षणापूर्वी मी अनुभवलं आहे.."
"म्हणजे?.."
"एखाद्या लहान मुलाप्रमाणे तुम्ही रडत होता. तुमच्या डोक्यावरून हात फिरविताना मला जो आनंद झाला.. तो माझ्यासाठी त्या सुखापेक्षाही कितीतरी मोठा आहे.."
"मग काल रात्री तू सोफ्यावर बसून जागत का होतीस?... आणि जेव्हां तुझी बहिण तुला मुलाबद्दल बोलली.. त्याच्या काही दिवसानंतर तू मला हॉस्पिटलला तुझा चेकअप करण्यासाठी म्हणून नेलंस आणि तुझ्यासोबत माझाही चेक अप करून घेतलास.. याच्या मागे काय कारण होतं?.."
(करुणा डोळे मिचकावत म्हणाली –)
"काही नाही.."
"म्हणजे तुला आधीपासूनच माहीत होतं की दोष तुझ्यात नाही माझ्यात.."
(माझं वाक्य पूर्ण होण्या आधीच करुणा म्हणाली–)
" काही गोष्टी रहस्यच राहू दिलेल्या उत्तम असतात.."

इतकं बोलून ती स्वयंपाक घराच्या दिशेने चालू लागली. जाताना एकदा तिने मागे वळून माझ्याकडे पाहिलं. आणि ती म्हणाली –
"आता परत रडू नका हा.. आधीच आर्धी साडी भिजवली तुम्ही माझी.."

त्या दिवसानंतर मी करुणाशी कधीच त्या विषयावर बोललो नाही. आणि तिनेही कधी माझ्यासमोर त्याविषयी दुःख दाखविलं नाही. चार–पाच वर्षानंतर मी एकदा तिला मूल दत्तक घेण्याबद्दल विचारलं.. पण तिने नकार दिला आणि आपल्या सवयीप्रमाणे ती चेष्टेत म्हणाली –
"तुम्ही असताना मला मुल दत्तक घेण्याची काय गरज आहे?.. तुम्हाला सांभाळूनच बास्स झालंय.. आणि त्यात अजून एक मुल म्हणजे..."

आज लग्नाच्या पन्नास वर्षांनंतर सुद्धा माझी करुणा थोडीसुद्धा बदलली नाहीये.. मला ती अजुनही तशीच दिसते जशी मी तिला पहिल्यांदा पाहिलं होतं.. ‘अनारकली ड्रेस घातलेली करुणा मधुबाला पेक्षा कमी दिसत नव्हती.’
हा... आता फरक फक्त एवढाच की तिनं अनारकली ड्रेस घालणं बंद केलं..

बरं मंडळी!... शेवटी फक्त एवढंच म्हणेन की माझ्यासारख्या बेरोजगार माणसाशी प्रेम करणं त्याकाळी काळी सोपं नव्हतं.. आणि ते आताही सोपं नाहीये.. माझ्या करूणे शिवाय दुसऱ्या कुणालाही ते जमलं नसतं.
आणि त्याच्या बदल्यात मी काय दिलंय तिला?.. उलट आई होण्याचं सुख सुद्धा मी तिच्याकडून काढून घेतलं..
पण तिने कधीच तक्रार केली नाही.. पन्नास वर्ष मला सहन केलं.. आणि अजूनही करतेय..."

यशवंतरावांचे डोळे पाणावले होते. त्यांनी बोलायला सुरुवात करून आता बराच वेळ झाला होता.. तरीही हॉल मधील प्रत्येकजण त्याच उत्साहाने त्यांचं बोलणं ऐकत होते आणि शेवटी यशवंतरावांसोबत सगळ्यांचेच डोळे पाणावले होते.. शेवटी यशवतरावांनी हॉल मधील मंडळी कडे बघून नमस्कार केला आणि ते म्हणाले –

"बरं मंडळी.., मला वाटतंय माझं भाषण जरा जास्तच लांबलं.. इतकं बोलायची सवय नाहीये मला.. पण आज जरा.."
यशवतरावांचा गळा दाटून आला.. आपलं शेवटचं वाक्य पूर्ण करण्याचाही त्यांच्यात आता धीर उरला नव्हता. ते स्टेजवरून खाली उतरले.. संपूर्ण हॉलभर टाळ्यांचा कडकडाट झाला.. यशवंतराव करुणा बाईंच्या शेजारी जाऊन बसले.. करुणाबाईंनी त्यांचा हात आपल्या हाती घेतला.. आणि त्यांचे पाणावलेले डोळे बघून त्या हळूच त्यांच्या कानाजवळ जाऊन म्हणाल्या –

"आज पण माझी साडी भिजवणार वाटतं.."

————————— समाप्त –————————

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Khup chhan !!