तिकडून जाण्याऐवजी

Submitted by बेफ़िकीर on 31 July, 2018 - 11:55

गझल - तिकडून जाण्याऐवजी ( तरही )

विसरायची इच्छा तुझी विसरून जा केव्हातरी
तिकडून जाण्याऐवजी इकडून जा केव्हातरी

आकाश आधीसारखे श्रीमंत नाही राहिले
हासून थोडे चांदणे उधळून जा केव्हातरी

आक्रोशुनी वाऱ्यावरी उडतात काही प्रार्थना
असलास तर उतरून त्या ऐकून जा केव्हातरी

जगतो असा मी की जणू मी एकटा जगतो इथे
माझ्या अहंकारा मला सोडून जा केव्हातरी

हल्ली पुरेशी वाटते धारोष्ण दुःखांची नशा
फेसाळता अंमल तुझा सांडून जा केव्हातरी

कौमार्यभंगाची सजा प्रत्येक स्वप्नाला कशी
निद्रिस्तशी न्यायालये बांधून जा केव्हातरी

संधीप्रकाशासारखे ग्रेसाळणे नाही बरे
तू ऊन किंवा सावली होऊन जा केव्हातरी

राहील अपुले नांव.... त्याची सोड चिंता 'बेफिकिर'
जिंकून हरलेली मने, संपून जा केव्हातरी

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आकाश आधीसारखे श्रीमंत नाही राहिले
हासून थोडे चांदणे उधळून जा केव्हातरी

आक्रोशुनी वाऱ्यावरी उडतात काही प्रार्थना
असलास तर उतरून त्या ऐकून जा केव्हातरी

छानच! खुप सुरेख! बाकीचे शेरही ऊत्तम!

आकाश आधीसारखे श्रीमंत नाही राहिले
हासून थोडे चांदणे उधळून जा केव्हातरी

आक्रोशुनी वाऱ्यावरी उडतात काही प्रार्थना
असलास तर उतरून त्या ऐकून जा केव्हातरी

जगतो असा मी की जणू मी एकटा जगतो इथे
माझ्या अहंकारा मला सोडून जा केव्हातरी>>>>>>>> खरच जबरी आहेत्.