निर्दोष

Submitted by somu on 29 July, 2018 - 22:35

लेखक - संकुल ( संतोष कुलकर्णी, http://sancool172.blogspot.com )
माझ्या नावाने ही कथा कोठेही छापण्यास माझी परवानगी आहे..

पात्र परिचय :
श्रवण कुलकर्णी -
वय ३० वर्षे, एक प्रथितयश वकील... गुन्हेगारी खटले चालवण्यात हातखंडा... फी पेक्षा पदरमोड जास्त...

सई -
वय २६ वर्षे, सुंदर, नाजूक, कुरळे केस, बिनफ्रेमचा चष्मा, श्रवनची सेक्रेटरी, मनापासून श्रवनवर प्रेम

सुलतान -
वय ३२ वर्षे, व्यवसाय पहिलवान, श्रवनचा बालमित्र... त्याच्या प्रत्येक भानगडीत साथीदार.. त्याचेच घरी राहायला

सोहम -
वय १९ वर्षे, गोरा गोमटा.. आत्ताच टेलीकम्युनिकेशन इंजिनीरिंगला ऍडमिशन घेतले होते ( घरी दाखवायला )
प्रोफेशनल हॅकर, कोणताही मोबाईल, कॉम्पुटर, नेटवर्क हॅक करणे डाव्या हाताच्या खेळ.

अजिंक्य जाधव -
सिनियर पोलीस निरीक्षक, गुन्हे अन्वेषण शाखा... श्रवनचे चांगले मित्र.

डॉक्टर न्याती जोशी - फॉरेन्सिक एक्स्पर्ट

श्रवण, अजिंक्य आणि न्याती तिघे शाळेपासूनचे मित्र...
-----------------------
श्रवण सकाळी लवकर उठला होता. व्यायाम आवरून गरम गरम कॉफी घेऊन बाल्कनीमध्ये बसून एका केसचा विचार करत होत, इतक्यात दरवाज्याची बेल वाजली. इतक्या सकाळी कोण आले म्हणत त्याने उठून दार उघडले... बाहेर एक वयस्क जोडपे उभे होते. दोघे बरेच दमलेले दिसत होते बहुदा रात्रभर झोपले नव्हते.
त्याने दोघांना आत घेऊन दार लावून घेतले.
" मी गजानन देसाई आणि ही माझी पत्नी अपर्णा देसाई. आम्ही कोल्हापूरला असतो. मी करवीर नागरी पतसंस्थेमध्ये क्लार्क आहे. " हात जोडत त्यांनी स्वतःची ओळख करून दिली.
" बोला, मी काय करू शकतो तुमच्या साठी " श्रवनने विचारले.
" आमचा मुलगा राहुल सॉफ्टवेअर इंजिनिअर असून नोकरी निमित्ताने पुण्याला असतो. तीन दिवसांपूर्वी आम्हाला त्याच्या कंपनीमधून फोन आला की त्याला खुनाच्या आरोपावरून भारती विद्यापीठ पोलिसानी अटक केली आहे. "
थोडे क्षण थांबून गजानन म्हणाले " आम्ही पोलिस स्टेशनला जाऊन राहुलची भेट घेतली. तो म्हणतोय की त्यानेच खून केलाय. पण आम्हाला विश्वास आहे की राहुल असे करणार नाही. त्याला कोणीतरी अडकवताय या आरोपात. " जवळपास रडत गजानन बोलत होते.
" आमच्या मुलाला वाचवा यातून. मी पाया पडते तुमच्या. तुमचे नाव ऐकून येथे आलो आम्ही. " अपर्णा हात जोडून म्हणाल्या.
" काकू, मला शक्य असेल ते सर्व मी करेन, पण जर राहुल निर्दोष असेल तर. जर त्याने खून केला असेल तर मात्र मी या मध्ये काही मदत करणार नाही " श्रवनने सांगितले.
" मला नक्की काय झाले ते सांगा "
" तानाजी म्हस्के , राहुलच्या बिल्डिंग समोर राहणार मुलगा. MPSC च्या अभ्यासाची तयारी करत होता. मूळचा जळगावचा. राहुलवर आरोप आहे की त्याने तानाजीचा खून केला. आणि राहुलने गुन्हा कबूल केला आहे . राहुलचे म्हणणे आहे की, त्याचे आणि तानाजीचे भांडण झाले आणि रागाच्याभरात त्याने तानाजीला चाकूने भोसकले आणि त्याचा खून केला "
" मग, तुम्हाला असे का वाटते की तो निर्दोष आहे "
" राहुल एकदम शांत मुलगा आहे आणि तो इतका चिडेल हे आम्हाला पटत नाही "
" ठीक आहे , काका, तुम्ही सध्या कोठे राहत आहेत ? "
" राहुलच्या रूम वर "
" ठीक आहे.मला रूमचा पत्ता द्या आणि तुम्ही दोघे रूमवर जाऊन थोडा आराम करा. मी दहा वाजता पोलीसस्टेशनवर जाऊन राहुलला भेटून येईन.... मग सविस्तरपणे बोलू सगळे "
" ठीक आहे " म्हणत दोघे तेथून निघाले.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------
" सई, सकाळच्या अपॉईंटमेंट पुढे ढकल. आपल्याला भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनला जायचे आहे "
" श्रवन, कांही नवीन केस ? "
" हो " म्हणत श्रवनने सईला सर्वकाही सांगितले.
दोघे श्रवनची होंडा सिटी घेऊन पोलिस स्टेशनला निघाले...
श्रवणला पाहून हवालदार मोरे पूढे आले.. " बोला श्रवणसाहेब, आज काय काम काढले ? "
" नमस्कार मोरेसाहेब, मला राहुल देसाईंना भेटायचे आहे. त्यांची केस माझ्याकडे आहे. पण चला तुम्हाला वेळ असेल तर चहा घेऊन येऊ. सई तू बाकी फॉर्मलिटी पूर्ण कर, आलोच आम्ही. " मोरेना घेऊन श्रवण बाहेर गेला...
गप्पा मारता मारता त्याने एकदम मुद्द्यालाच हात घातला.
" मोरे साहेब, काय वाटतंय तुम्हाला या पोराबद्दल ? "
" कांही खरं नाही पोराचं... गुन्हा कबूल केला आहे त्याने पण मर्डर त्याने केलाय असं नाही वाटत "
" का ? "
" पोरगं बघाल तर पाप्याचे पितर.. एकूण वजन ५५ किलो. तो तानाजी पैलवान गडी होता. एका हातानं चिरडले असतं त्याने याला. हा काय भोसकतोय त्याला. अनेक वार केलेत याने त्याच्यावर. गुन्ह्यात वापरलेला चाकू हा पण छोटा आहे, ता चाकूच्या तीन ते चार वारात तानाजी संपेल असे वाटत नाही, यांनी पहिला वार केल्यावर तानाजीने प्रतिकार केला असता. नक्की काय ते समजत नाही. "
" हम्म. चला भेटून बघतो त्याला काय म्हणतो ते " उठत श्रवण म्हणला.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------
" हाय राहुल, मी श्रवण कुलकर्णी, मी वकील आहे. तुझे आई आणि वडील आले होते माझ्याकडे तुझ्या केस संदर्भात. श्रवनने ओळख करून देत सांगितले.
" मी सांगितले होते त्यांना. मीच मारलंय तानाजीला. मला नको आहे वकील "
" अरे, नक्की काय झाले होते ते तरी सांगशील का ? म्हणजे तू त्याला मुद्दाम मारले की अपघाताने हे समजेल आणि तसे मुद्दे मांडता येतील आपल्याला "
" त्या दिवशी तानाजी आणि माझे भांडण झाले आणि रागाच्या भरात मी त्याला चाकूने भोसकले. हा गुन्हा मला मान्य आहे " एका वाक्यात राहुलने सांगितले.
" चाकू कोठून घेऊन आलास ? "
" तिथे पडलेला होता "
" बिल्डिंगकच्या टेरेसवर चाकू कोण टाकेल ? "
" माहिती नाही "
" बरं.... कशावरून भांडण झाले तुमच्यात ??? पैसे ? "
"..."
" मुलगी ? "
"..."
" अरे तू बोलला नाही तर कसा सोडवू मी तुला यातून ? "
" तुम्हाला सांगितले ना, मला वकील नको. तरी मला का प्रश्न विचारत आहात ? ""
" ठीक आहे, बोलतो मी तुझ्या बाबांशी " म्हणत श्रवण तिथून उठला.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------
" सई, हा मुलगा कोणत्या तरी मुलीच्या भानगडीत अडकला आहे. आणि ती मुलगीच या खुनाचे कारण आहे. "
" कशावरून असे म्हणतो आहेस ? "
" तो माझ्याशी बोलायला तयार नव्हता, पण जेव्हा मी कारण विचारले तेंव्हा मुलगी म्हणल्यावर एकदम रिऍक्ट झाला. आता आपल्याला शोधले पाहिजे की कोण आहे ती मुलगी आणि त्या दिवशी नक्की काय झाले होते "
" हम्, मग प्लॅन काय आहे ? "
" नेहमीचाच "
------------------------------------------------------------------------------------------------------------------------
घरी आल्यावर श्रवनने सोहमला बोलावले.
" हां दादा ? "
" सोमी, जर तुझ्या आंतरजालावर राहुल देसाई बद्दल काय माहिती मिळते ते बघ. हा घे त्याचा फोटो. कोणा मुलीच्या भानगडीत आहे का ते बघ" म्हणून त्याने सोहमला केस बद्दल माहिती दिली.
" ठीक आहे. रात्री बोलू " सोहम बोलेला.
" ठीक आहे, जेवताना बोलू "
रात्री श्रवण, सोहम, सई आणि सुलतान सगळे जेवणाच्या टेबलवर जमले. जयश्रीमावशींनी जेवण वाढले.
" बोल काय माहिती काढलीस ? "
" राहुल देसाई, मूळचा राहणारा शिवाजी पार्क, कोल्हापूर.
वडील क्लार्क, आई हाऊसवाईफ,
शाळा सेंट मेरी सेकंडरी स्कूल, दहावीला ९४% मार्क,
बारावी कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स, मार्क 96 %,
इंजिनीरिंग, पाटील कॉलेज ऑफ इंजिनीरिंग, चारही वर्षे कॉलेज टॉपर. कॅम्पस सिलेक्ट.
सध्या टेक्नोसॉफ्ट मध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणुन काम करतोय. २ वर्षे. त्याचे कंपनी मेल बघता, कामामध्ये सिंसिअर दिसतोय,
Twitter आणि instagram वर पण नॉर्मल लोकांना follow करतो. हिंदी मध्ये आलिया भट आणि मराठीमध्ये प्रिया बापट आवडती अभिनेत्री...
Facebook वर शाळा, कॉलेज आणि ऑफिसचे मित्रांना कनेक्टेड आहे..." सोहमने पाण्याचा ग्लास उचलला आणि तोंडाला लावला.
" सोहम दिसतो गुणी बाळ, पण आहे खतरनाक. कोणीही यांच्यापासून वाचू शकता नाही " सई सोहमच्या डोक्यावरून हात फिरवत बोलली.
" दीदी, सांगू का, तूझ्या मोबाईलवर कोणाचे फोटो आहेत आणि सारखे कोणाचे प्रोफाइल बघत असते " तिला डोळा मारत सोहम बोलला.
" पुढे सांग.. " गंभीरपणे श्रवण बोलला.
" हम्म, आत्ता पर्यंत सर्व ठीक होते पण गेल्या एक वर्षांत एक मुलगी त्याची एक फेसबुक फ्रेन्ड झाली आहे. प्रियांका पाटील, दिसायला सुंदर आहे. हा तिचा फोटो " म्हणत त्याने प्रियांका चा फोटो श्रवनला दाखवला.
" राहुल तिचे फोटो, पोस्ट लाईक करत असतो. मला वाटते, तीच असावी ती मुलगी "
" मग मी त्याचे gmail हॅक केले आणि तिथून त्याचे मोबाईल बिल डाउनलोड केले.
844 xxx xxxx या नंबर वर राहुलचे लेट रात्री कॉल असतात म्हणून मी त्या मोबाईलवर कॉल करून चेक केले तर तो तिचा होता. तिला थोडे ऍडचे अमिश दाखवून तिला माझी URL पाठवली आणि प्रोफाइल रजिस्ट्रेशन करायला सांगितले..
तिने लिंक क्लीक केली आणि माझा virus तिच्या मोबाईलवर इन्स्टॉल झाला.
तिने ragistration करताना प्रियांका पाटील, फ्लॅट नंबर B-606, मधू-मालती, दत्तनगर, जांभुलवाडी, कात्रजचा पत्ता दिलाय आणि तिचा gmail मेल आयडी दिला.
तो gmail आयडी हॅक केल्यावर तिचे अजून सहा फेक आयडी मिळाले.
प्रियांका पाटील
राधिका गिरी
श्रुती सुर्वे
केतकी यादव
सर्वांगी म्हात्रे
सोनाली बापट
आणि तिचे खरे नाव आहे सुकन्या करपे, मूळ गाव जळगाव.
तिच्या मोबाईलवर, तिचे बऱ्याच मुलांबरोबर फोटो आहेत.
मला वाटतंय ती मुलांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून ब्लॅकमेल करत असेल.
तानाजी हा तिच्या गावचा. दोघांचा संपर्क होता "
" मस्त माहिती काढलीस, शाब्बास. तुला रॉ वाले शोधत येणार हे नक्की " सोहमचे कौतुक करत श्रवण बोलला.
" थँक्स, दादा हे घे तिचे वेगवेगळ्या मुलांबरोबरचे आक्षेपार्ह फोटो " म्हणत त्याने लॅपटॉप श्रवनकडे सरकवला.
" गुड जॉब, let me copy these on my cell phone "

------------------------------------------------------------------------------------------------------------------------
" नमस्कार साहेब, कशी आठवण काढली गरिबांची " विठ्ठल फोनवर श्रवनला बोलला.
" अरे एक काम होते, दत्तनगर जांभुलवाडी मध्ये मधू-मालती नावाची बिल्डिंग आहे. तिथे फ्लॅट नंबर B 606 मध्ये प्रियांका पाटील नावाची मुलगी राहते. तिचा पूर्ण बायोडेटा हवाय.. "
" होऊन जाईल काम साहेब "
------------------------------------------------------------------------------------------------------------------------
" तुम्हाला एकदा सांगितले ना की मला वकील नको आहे म्हणून, तुम्ही परत का आलात ? " वैतागत राहुल बोलला
" मूर्ख मुला, तुझ्या आई वडिलांसाठी आलो आहे मी येथे " थोडे ओरडत श्रवण बोलला " ऐक आता, त्या प्रियांका पाटीलच्या नादाला लागून स्वतःचे आयुष्य बरबाद करायला लागला आहेस "
प्रियांकाचे नाव ऐकताच राहुल चमकला... " तुम्हाला प्रियंकाची माहिती कशी मिळाली ? तिचा काही संबंध नाही या खुनाशी "
" अरे, हीच ना प्रियांका ? " म्हणत श्रवणने मोबाईल मधील फोटो त्याला दाखवायला सुरू केले... जसे जसे इतर मुलांसोबतचे फोटो त्याने बघितले तो हताश होऊन खाली बसला.
" हिचे खरे नाव प्रियांका नाही आणि तुझ्या सारख्या मुलांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांच्याकडून पैसे उकळणे हा तिचा धंदा , तुझ्या आधी तिने बऱ्याच मुलांना फसवले असणार "
" खरे नाही वाटत "
" हेच खरे आहे, माझ्याकडे पुरावे आहेत. ती सध्या सहा नावाने वावरते. तानाजी हा तिच्या गावाकडचा.... आता मला सांग, नक्की काय झाले होते त्या दिवशी ? "
" साधारण एक वर्षांपूर्वी, प्रियांका माझ्या समोरच्या बिल्डिंग मध्ये राहायला आली. ती एकटीच राहत होती. किराणा मालाच्या दुकानात माझी तिची ओळख झाली आणि मग गप्पा सुरु झाल्या.
ती टीचर आहे म्हणून तिने सांगितले होते.
आमची मैत्री वाढत गेली, वीकएंडला मूवी बघायला जायचो आम्ही.. आम्ही एकमेकांकडे प्रेमाची कबुली दिली होती. एक दोन वेळा आम्ही माथेरान आणि महाबळेश्वरला पण जाऊन आलो. सर्व मर्यादा पार केल्या आम्ही त्या वेळी... "
" पैसे मागितले का कधी तिने ? "
" हम्म, पगार झाला नाही म्हणून तिने माझ्याकडून वीस, तीस हजार असे घेतले होते दोन चार वेळा. परत देत होती पण मीच नको म्हणले "
" कांही महाग गिफ्ट दिलेस का तिला ? "
" तिचा मोबाईल चोरीला गेला म्हणून मी तिला Samsung Galaxy 8 फोन घेऊन दिला होता . "
"बर, त्या दिवशी नक्की काय झाले ? "
------------------------------------------------------------------------------------------------------------------------
" हॅलो डिअर, कोठे आहेस ? " राहुलच्या फोनवर प्रियांकाचा फोन आला.
" ऑफिसवरून निघतोय "
" आलास की भेटुयात बिल्डिंगच्या गच्चीवर. तुला आज मी गोड surprise देणार आहे. "
" आलोच " म्हणून मनात surprise चा विचार करत राहुलने गाडी स्टार्ट केली.
बिल्डिंगच्या खाली गाडी पार्क करून राहुल लिफ्टने वर गेला. प्रियांका तेथे उभी होती. राहुल तिच्या जवळ गेला.
प्रियांकाने त्याचा हात हातात घेऊन स्वताच्या पोटावर ठेवला आणि लाजून म्हणाली "तू बाबा होणार आहेस "
" काय ? खरंच " खुश होत राहुल म्हणाला " मी, आई बाबांना बोलावून घेतो आणि सांगतो आपल्याबद्दल. आपण लगेच लग्न करू " असे म्हणत राहुलने प्रियांकाच्या कपाळावर किस केले " तू थांब, मी खाली जाऊन गोड घेऊन येतो "

राहुल मिठाई घेऊन परत टेरेसवर आला आणि एकदम गोंधळून गेला...... समोर तानाजी रक्ताच्या थारोळ्यात पडला होता आणि प्रियांका हातात चाकू घेऊन उभी होती...
" प्रियांका ? " राहुल एकदम ओरडला आणि त्याने पळत जाऊन टेरेसचे दार बंद केले.
राहुलला आलेला बघून प्रियांका रडायला लागली....
तिला राहुलने जवळ घेतले...
" राहुल, हा मला खूप त्रास देत होता... सारखी छेड काढायचा माझी... आज मी एकटी उभी बघून याने माझ्यावर अतिप्रसंग करायचा प्रयत्न केला म्हणून मी मारले याला. " तिने रडत रडत सांगितले.. " तू कोणाला सांगू नको की मी याला मारलंय नाही तर तुझ्या घरचे मला स्वीकारणार नाहीत... मला माझी नाही तर आपल्या बाळाची काळजी वाटते "
" हम्म, चल आपण खाली जाऊ तुझ्या फ्लॅट मध्ये. आणि कोणाला काहीच बोलायला नको " म्हणत राहुल प्रियांकाचा हात धरुन दाराकडे गेला तेवढ्यात जिन्यातून मुले वर येताना आवाज आला.
" हे बघ, मुले जिन्यात आहेत. आपण खाली जाऊ शकत नाही. तू टाकीमागे लप मी खाली धावत जातो, माझ्या अंगाला पण रक्त लागलाय, घाबरून मुले पळून जातील त्याच वेळी तू तुझ्या फ्लॅट मध्ये जा आणि लगेच कपडे बदल. "
" अरे पण तुझ्यावर आळ येईल ना "
" येऊ दे. मी सांगेन काही तरी आणि शिक्षा कमी करून घेईन, पण तुझ्या पोटात आपले बाळ आहे. मी सगळे सांगतो आई बाबांना, ते सांभाळतील तुला.... आता वेळ नको करू "
असे म्हणून तो दरवाजा उघडून खाली गेला. खालून एकदम मुलांचा किंचाळण्याचा आवाज आला आणि मुले पळून गेली..
प्रियांकाने कानोसा घेतला आणि तानाजीच्या प्रेताकडे कुत्सितपणे बघत म्हणाली " आला मोठा मला समजावणार... आता वरती जाऊन आईला समजावं माझ्या "
समोरून टाकीच्यामागून तो आला आणि दोघे तिच्या फ्लॅट मध्ये शिरले...
" आता काय करायचे ? " तिने विचारले
" बघूया काय होईल ते, राहुल पोलिसात गुन्हा कबुल करेल आणि स्वतःचे तोंड उघडणार नाही हे नक्की.... after all तू त्याच्या होणाऱ्या बाळाची आई आहे ना " म्हणत त्याने तिला टाळी दिली..
इकडे, राहुलने खाली येऊन सरळ गाडी स्टार्ट केली आणि तो सरळ भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनला आला.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------
" मोरे, पासपोर्टच्या oppoientment साठी लोक आलेत का ?. " हेड ऑफिसवरून परत आल्यावर इन्स्पेक्टर अजिंक्य जाधवनी हेड कॉन्स्टेबल मोरेना विचारले.
" हो सर, मी लिस्ट देतो तेवीस लोक आलेत "
" मोरे, म्हणजे आज पण बारा वाजवणार तुम्ही. मला जर तुमच्या वहिनींनी घटस्फोट दिला तर मी तुम्हाला जबाबदार धरणार " हसत जाधव म्हणाले...
" होस्टेलच्या मुली आणि मुले असतील त्यांना प्रथम पाठवा"
" हो "
" नाव आणि पत्ता काय तुमचा " जाधवांनी समोरच्या मुलीकडे बघत विचारले.
" इशा दळवी "
तेवढ्यात बाहेर गोंधळ ऐकू येऊ लागला म्हणून जाधव बाहेर आले... मोरेंच्या समोर राहुल बसला होता, कपड्याना रक्त...
" पाणी प्या " मोरेंनी राहुलला पाणी दिले आणि बसायला सांगितले.
जाधव गंभीरपणे येऊन मोरेंच्या शेजारी बसले.
" बोला काय झाले ? "
" सर, माझ्या हातून एक खून झालाय "
मोरे चपापले आणि त्यांनी जाधवांकडे पाहिले.
" कोठे आणि कोणाचा " जाधवनी शांतपणे विचारले.
" तानाजी म्हस्के, जांभूळ वाडी मध्ये, मधू- मालती अपार्टमेंटच्या टेरेसवर "
" मोरे, गाडी काढा "
" पवार, ambulance ला फोन करून तिकडे यायला सांगा "
" सावंत, आत घ्या याला. पाणी, चहा काय हवे ते द्या "
तेवढ्यात फोन वाजला, जाधवांनी फोनर कानाला लावला
" ह्रल्लो, भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन. इन्स्पेक्टर अजिंक्य जाधव बोलतोय. "
" सर, मी सुधाकर बर्वे बोलतोय. मधू- मालती अपार्टमेंटमधून... आमच्या अपार्टमेंटच्या टेरेसवर एक खून झालाय. खून करून खुनी राहुल देसाई पळून गेलाय "
" हो, समजले आम्हाला, येतोय आम्ही तिकडे...
तो पर्यंत कोणाला अपार्टमेंटच्या बाहेर सोडु नाका आणि कोणाला आत घेऊ नका...
बॉडी जवळ कोणीच जाऊ नका आणि कोणतीही गोष्टीला हात लावू नका "
" हो सर "
" आलो आम्ही लगेच "
बरोबर सातव्या मिनिटाला पोलीस गाडी अपार्टमेंटच्या गेटअधून आत शिरली..
जाधव, मोरे व इतर लिफ्टच्या दिशेने धावले.
सहाव्या मजल्यावर लिफ्टचे दार उघडून जाधव बाहेर आहे...
" सर, मी सुधाकर बर्वे, मीच तुम्हाला फोन केला होता. तिकडे आहे बॉडी. " म्हणत बर्वे जाधवना घेऊन टेरेसवर गेले...
मोरेंनी पुढे जाऊन नाडी तपासली आणि जाधवांकडे बघून नाही अशी खूण केली.
" outline काढून घ्या आणि बॉडी पोस्मार्टिम साठी पाठवा "
" कोणी बघितला खून होताना "
" नाही सर, पण मुले इथे खेळत होती.... एकदम समोरच्या बिल्डिंग मधला राहुल देसाई पळत आला, त्याच्या अंगावर रक्त लागले होते... त्याला बघून मुले पळत घरी आली. आम्ही यायच्या आत, तो पळून गेला गाडी घेऊन "
"हम्म, तो पोलिस स्टेशनला हजर झालाय आणि त्याने गुन्ह्याची कबुली पण दिली आहे "
जाधवांनी पुढे जाऊन बॉडी तपासली आणि काही मारामारी वगैरेचे पुरावे मिळतात का चेक केले....
" इथे CC TV नाहीत "
" नाही, इथे टेरेसवर नाही... आमचा CC TV फक्त गेटवर आणि पार्किंग मध्ये आहे. "
" एवढी मोठी अपार्टमेंट असून फक्त खालीच CC TV... आता वर आणि जिन्यात cc tv असता तर काय झाले ते समजले असते " बर्वेवर चिडत जाधव बोलले... " मोरे, CCTV चे 5 वाजल्यापासूनचे फुटेजची कॉपी बनवून घेऊन या . "
" बर्वे, मला राहुल आणि तानाजीची माहिती द्या "
" राहुल असे कसे वागला तेच कळत नाही. खूप चांगला मुलगा आहे तो आणि सगळ्यांशी मिळून मिसळून असतो..
आणि हा तानाजी पण इथे दोन आठवड्यापूर्वी राहायला आलाय.. mpsc चा अभ्यास करत होता.
तसा या दोघांचा काहीच संबंध नव्हता.... दोघांची तोंड ओळख पण नव्हती... "
" मग, असे काय झाले की राहुलने तानाजीचा खून करावा " जाधव स्वतःशीच बोलत होते.
जाधव आणि टीमने खाली जाऊन दुकानात, मेसमध्ये वगैरे चौकशी केली पण हातात काहीच आले नाही.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------
पोलिस स्टेशनला आल्यावर, जाधवांनी राहुलला घेऊन यायला सांगितले.
" ये राहुल बस, पाणी हवंय ? "
" नाही " राहुल बोलला.
" आता मला सांग, नक्की काय झाले ? तू का त्याचा खून केला ? "
" सर, मीच मारलंय तानाजीला "
" हो, पण का ? "
" तो पैसे मागत होता उधार, दहा हजार. मी नाही म्हणाले त्याला तर तो चाकू घेऊन मला मारायला आला.. मग, मी त्याचा चाकू घेऊन त्यालाच मारले.... "
" पण दोघे एकमेकांना ओळखत पण नव्हता असे सगळे सांगत आहेत... "
" हो, पण त्याने मला फोन करून पैसे मागितले आणि समोरच्या बिल्डिंगच्या टेरेसवर बोलावले..... मी नाही म्हणाले तर चाकू घेऊन मारायला धावला.. आमच्यात झटपट झाली, त्यात मी त्याचा चाकू घेऊन त्याला मारले... आणि पळून इकडे आलो.."
" अरे, तो धमकी देत होता तर तक्रार करायचीना पोलिसात "
" त्याने संधीच दिली नाही "
" ठीक आहे, मोरे, घेऊन जा याला "
थोड्या वेळात, " मोरे, काय वाटतंय तुम्हाला ? "
" नाही साहेब, मला नाही वाटत याने खून केला असेल. काहीतरी लपवतोय हा "
" एक काम करा, चार्जशीट दाखल करा. बघू पुढचं पुढे "
" ठीक आहे सर " म्हणत मोरे सॅल्युट ठोकून तिथून निघाले.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------
" श्रवण, मी पूर्णपणे फसलोय यात. "
" हम्म, सध्या तरी. मी जाधवांशी बोलतो. कोर्टातून पंधरा दिवसांचा रिमांड घ्या म्हणून.
आणि आत्ताच प्रियांकाबद्दल कांहीं बोलू नको. ती सावध होईल. अजून तिच्याबद्दल पुरावे गोळा करावे लागतील.
सध्या असलेल्या पुराव्यांवरून एवढे सिद्ध करता येईल की ती तुला फसवत होती. पण खून केला हे नाही "
" ठीक आहे, तू सांगशील तसाच वागेन मी "
" तिची आणि तुझी भेट नाही होणार हे पण बघतो मी. आणि मी आहे, माझ्यावर पूर्ण विश्वास ठेव. तुला कांही पण लक्षात आले तर मला सांग "
------------------------------------------------------------------------------------------------------------------------
" इन्स्पेक्टर साहेब, आत येऊ का ? " श्रवणने इन्स्पेक्टर अजिंक्य जाधवच्या केबिनच्या दरवाज्यातून विचारले.
" भxxxx, तू कधी पासून इतका सज्जन झाला रे ? " जाधवांनी त्याला बघून हसून म्हणले.
" साल्या, तुझ्या पोलिस स्टेशनमध्ये आहे. On duty पोलिस ऑफिसरला शिव्या घातल्या म्हणून आत घेशील आणि थर्ड डिग्री लावशील. काही नेम नाही तुझा. "
" बस, काय काम काढलेस ? "
" अरे, राहुलची केस माझ्याकडे आहे "
" पुअर गाय, असे का वागला हे नाही समजत "
" सांगतो " म्हणत श्रवनने जाधवना पूर्ण घटनाक्रम सांगितला.
" असं आहे तर, बोल पुढचा प्लॅन काय तुझा ? "
" आत्ता तर पंधरा दिवसाचा रिमांड घे म्हणजे मला थोडा वेळ मिळेल आणि त्या प्रियंकाला भेटायला देऊ नको राहुलला. धमकी किंवा ब्लॅकमेल करू शकते ती "
" तो पर्यंत, मी तिचे आणि तानाजीचे काय रिलेशन आहे ते बघतो "
" ठीक आहे. मला जमेल तसे बघतो "
------------------------------------------------------------------------------------------------------------------------
सकाळी अकरा वाजता, न्यायाधीश चंद्रचूड यांच्यासमोर केसचे हिअरिंग सुरू झाले.
सरकारी तर्फ ऍड. सावंत उभे राहिले...
" युअर ऑनर, ही केस म्हणजे माणुसकीस काळिंबा आहे.
एक mpsc चा अभ्यास करणारा होतकरू तरुण तानाजी म्हस्के यांचा आरोपी राहुल देसाई याने निघृण पणे खून केला आणि स्वतःबद्दल सहानभूती मिळावी म्हणून तो पोलिस स्टेशनला हजर झाला..
हे कृत्य त्याने शांतपणे आणि विचारपूर्वक केलेले असून माझ्या ह्या विधानास पोलिस आणि त्या बिल्डिंग मधील रहिवासी नक्कीच दुजोरा देतील असा मला विश्वास आहे.
माझी आपणास विनंती आहे की आपण आरोपीस सक्त शिक्षा सुनावून असल्या कृत्याना आळा घालावा "
" युअर ऑनर, मी माझे मित्र सावंत यांच्या विधानाशी सहमत नाही…
मी हे मान्य करतो की राहुल देसाई हा स्वतः पोलिस स्टेशनला हजर झाला असून त्याने खुनाचे स्टेटमेंटपण दिले आहे.
पण ह्या झालेल्या खुनामागील मोटिव्ह तसेच कोणत्या परिस्थिती मध्ये हा खून झाला हे अजून स्पष्ट झालेले नाही.
तरी माझी आपणास नम्र विनंती आहे की, आपण या केसची सुनावणी पंधरा दिवस पुढे ढकलावी "
" पोलिसांच काय मत आहे यावर " न्या. चंद्रचूडनी विचारले.
" युअर ऑनर, आमचे पण हेच म्हणणे आहे. आम्हाला राहुलचा पंधरा दिवसांचा रिमांड हवा आहे. या वेळेत आम्हाला त्याच्याकडून खुनाचा मोटिव्ह आणि काही परिस्थितीजन्य पुरावे गोळा करता येतील. "
" ठीक आहे. पंधरा दिवसांचा रिमांड मंजूर करण्यात येत आहे.. "
------------------------------------------------------------------------------------------------------------------------
त्या रात्री श्रवनच्या घरी, श्रवण, सई, सोहम, सुलतान आणि अजिंक्य जाधव आणि शिवास रिगल यांची मीटिंग भरली.
सई आणि सोहम त्यांचा आवडता अँपल जुस घेऊन आणि इतर सर्व शिवास रिगल ऑन द रॉक्स घेऊन बसले होते. समोर चीझ, खारावलेले काजू वैगरे साहित्य होते.
" जिंक्स, आत्ता आपल्याकडे इतके पुरावे नाहीत की आपण लगेच प्रियंकाला हात लावू शकतो ,आणि तिच्या पाळतीवर राहिले पाहिजे नाहीतर ती गायब होऊ शकते"
" हम्म, मी माझे कांही माणसे तिच्या मागे लावून ठेवतो " तिची पूर्णवेळेची खबर आपल्याला मिळत राहील "
" गुड...
सोहम, तू तिचे कोणाकोणाला कॉल होतात,
तिच्याकडे किती हँडसेट आहेत त्या सर्वांचे IMEI नंबर, तिचे चालू असलेले फोन नंबर, बँक अकाउंट्स, क्रेडिट कार्ड्स, तिची सध्या सुरू असलेली अफेअर.... सगळी माहिती काढ.
May be आपल्याला तिचे बँक आणि क्रेडिट कार्ड्स ब्लॉक करावे लागतील, त्याची पण तयारी ठेव "
" अरे, मी पोलिस आहे रे, माझ्या समोर तरी असले सायबर crime ची भाषा करू नका राव "
या वाक्यावर सगळे हसले...
" सुलतान, तू तुझी थोडी माणसे लावून तानाजी आणि प्रियांका उर्फ सुकन्याबद्दल बद्दल माहिती काढ "
" जिंक्स, उद्या आपल्याला मर्डर स्पॉटवर जावे लागेल. बघू काही पुरावे मिळतात का आपल्याला... "
" ठीक आहे "
" PM चे रिपोर्ट आले का काही ? "
" उद्या येतील न्यातीकडून. बोललोय तिला तुझी केस आहे म्हणून "
" छान "
" छान काय, डोक्याला हात लावला तिने "
------------------------------------------------------------------------------------------------------------------------
सकाळी बरोबर नऊ वाजता, अजिंक्य आणि श्रवण डॉ. न्यातीच्या केबिनमध्ये होते.
"चाकूचे पाठीवर तीन वार आहेत, त्यातील एक वार हा डाव्या बरगडीमध्ये केला, त्याच्या मुळे लिव्हरला धक्का लागून हा मरण पावला..... "
" गुड कॅच "
" वार करणारा व्यक्ती हा कमीत कमी साडे सहा फूट उंच आहे कारण झालेला वार हा जमिनीपासून साडे चार फूट उंचावर आहे.... "
" श्रवण, याचा अर्थ असा आहे की, प्रियांकसोबत कोणीतरी होते तिथे "
" जिंक्स, मला वाटतंय, प्रियांका जेंव्हा ती गरोदर आहे आणि ते बाळ राहुलचे आहे हे सांगत असणार त्या वेळी कोणीतरी त्यांचे शूटिंग करत असणार... जे दाखवून ते नंतर राहुलला ब्लॅकमेल करू शकतात. जेंव्हा राहुल खाली गेला त्या वेळी तानाजी टेरेसवर पोहचला आणि प्रियांका आणि तिच्या साथीदारकडुन त्याचा खून झाला.. "
" बरोबर आहे, मी पूर्ण महिन्याच्या CCTV फुटेज मागवून घेतो. म्हणजे बिल्डिंमध्ये कोणी कोणी आलंय हे बघता येईल "
" हम्म, राहुलला घेऊन मर्डर स्पॉटवर जात येईल का ? " श्रवनने विचारले
" जशी आज्ञा " हसत अजिंक्य बोलला...
------------------------------------------------------------------------------------------------------------------------
" राहुल, तू आणि प्रियांका जेंव्हा बोलत होता तेंव्हा कोण कोठल्या दिशेला होते ?....
असे समज की मोरे हे प्रियांका आहेत..."
" प्रियांका इथे भिंतीला टेकून उभी होती... " मोरेना भिंतीजवळ उभे करत राहुल बोलला " आणि मी इथे उभा होतो "
" तेथेच थांब " श्रवण बोलला आणि तो चालत राहुलच्या मागे येऊन उभा राहिला आणि तेथून समोर बघितले तर त्याला पाण्याची टाकी दिसली.
" अजिंक्य, तिथे पाण्याच्या टाक्याच्या जवळ बघू.. "
तिथे दोन मोठ्या पाण्याच्या टाक्या ठेवल्या होत्या... आणि त्या दोन टाक्याच्या मध्ये दोन इंचाची गॅप होती.. त्या टाक्यांच्या मागे एक माणूस उभा राहील इतकी जागा होती. ती जागा राहुल उभा होता तेथून सहा फुटावर होती.
तिथे बसून त्यांचे बोलणे रेकॉर्ड करणे शक्य होते आणि पाण्याच्या टाक्या असल्यामुळे तिथे लाईट पण नव्हता... संध्याकाळच्या अंधारात तिथे कोणी बसला तर समोरून दिसणे शक्य नव्हते..
अजिंक्यने तेथे जाऊन बघितले, तर तेथील मातीमध्ये कोणीतरी बसले असल्याच्या खुणा होत्या... खाली बुटाचे छाप होते आणि त्याला तिथे एक गुटख्याचे फोडलेले पाकीट मिळाले...
फोटोग्राफर ला बोलावून त्याने तेथील बुटाचे छापचे फोटो घ्यायला सांगितले... आणि ते पाकीट चिमट्याने उचलून पुराव्यांच्या पिशवीत टाकले..
" मोरे, सेक्रेटरीना बोलवा "
सेक्रेटरी तिथे आले... "आम्हाला तुमचे CCTV फुटेज कॉपी करून घ्या जेवढे आहे तेवढे "
" ठीक आहे सर "
" मोरे, तुम्ही थांबून CCTV फुटजची कॉपी घेऊन या "
" येस सर "
------------------------------------------------------------------------------------------------------------------------
" दादा एकदा केसच्या मागे लागला की तहान भूक विसरून जातो ना " सोहमने सईला विचारले..
" बघ ना, किती वेळ गेलाय. मी आपली वाट बघत बसली आहे जेवायला "
" म्हणूनच सांगतोय तुला, दादाच्या मागे लागू नको... नंतर पस्तावशील... "
" चल.... "
" आ हा हा... काय एक माणूस लाजतंय तरी "
" सोहम, तू पण ना "
" तुमच्या लग्नाचा साक्षीदार... दादाकडून करवला म्हणून उभा राहणार.... आणि तुझ्या भाऊ म्हणून दादाचे कानपण पिळणार..... पण दोन्ही घरचा पाहुणा म्हणून मला उपाशी ठेवू नका... "
" कोण उपाशी आहे " श्रवनने आत येत विचारले.
" कोणी नाही " सईने पटकन उत्तर दिले..
" आत्ता तर म्हणत होती की, धनी कधी येणार... भरपूर भूक लागली आहे...धनी आल्या बिगर एक घास पण जायचा नाही मला "
" असं... माफ करा कारभारीण बाई. या पुढे अशी आगळीक नाही होणार.." श्रवण मिश्कीलपणे हसत बोलला...
" तुम्ही दोघे म्हणजे अती आहेत... जेवण वाढते मी "
" तुम्ही जेवून घ्या, उगीच कबाब मध्ये हड्डी कशाला.. " म्हणून लॅपटॉप घेऊन सोहम आत निघून गेला.
" जेवून घायचे ना. कशाला वाट बघत बसलीस. हे घे " म्हणत श्रवनने एक घास सईला भरवला..
" लग्न होईपर्यंत तरी धीर धरा... " आतून सोहम बोलला..
दोघेही खळखळून हसले...
जेवण झाल्यावर श्रवण, सई, सुलतान आणि सोहम तिघेही ऑफिसमध्ये आले...
" कांही नवीन माहिती ? " श्रवनने सोहमला विचारले.
" तिच्याकडे सध्या तीन फोन आहेत...
samsung galaxy 8,
One plus 5T
vivo v7
यातील samsung आणि one plus ती नेहमी वापरते.. आणि vivo हा तिचा पर्सनल नंबर आहे. या नंबरवर फक्त तिच्या घरचे आणि गावाकडील फोन येतात..
तानाजी हा तिच्या गावाकडील असल्यामुळे त्याचा फोनपण तिच्या ह्याच पर्सनल नंबरवर यायचा... तो कधीतरी फोन करायचा... फोन हे फक्त एक दोन मिनिटे चालायचे... "
" मला वाटते, तानाजी mpsc च्या अभ्यासासाठी पुण्याला आला असेल आणि इथे रूमवर राहायला आल्यावर त्याला प्रियांका दिसली असेल...
तिचे नवीन नाव आणि नवीन रूप दिसल्यामुळे त्याने तिला जाब विचारला असेल...
आणि तो घरी सांगेल म्हणून तिने त्याचा काटा काढला " सईने शक्यता व्यक्त केली...
" बरोबर, असेच झाले असेल "
" सई, तू तिला फोन कर आणि तिचे ऍड फिल्म साठी selection झालय...... आणि दोन चार दिवसात update देते म्हणून सांग....
चार पाच ऍड आहेत आणि एखादी सिरीयल किंवा फिल्म पण मिळेल आणि चांगले पैसे मिळतील म्हणून सांग "
" त्याने काय होईल ? "
" ती निदान पळून गेली तरी सई च्या संपर्कात राहील "
" सोहम, खुनाच्या वेळेच्या आधी तीन तास प्रियंकाला कोणाचा फोन आले होते ती पण लिस्ट काढ "
" ठीक आहे "
------------------------------------------------------------------------------------------------------------------------
" या काका, मी आहे राहुलबरोबर... तुम्ही काळजी करू नका " श्रवण समोर बसलेल्या गजाननरावना म्हणाला.
" तुमच्या विश्वासा वर तर आहे आम्ही... तुमचा लहान भाऊ म्हणून सोडवा राहुलला यातून "
" नक्की काका ? "
" कांही पैसे.... ? "
" राहुल यातून सुटला की मग सांगेन मी "
गजाननरावांच्या डोळ्यातून पाणी ओघळले..
------------------------------------------------------------------------------------------------------------------------
" सुलतान, त्या वेळच्या CCTV फुटेजची कॉपी आणली आहे अजिंक्यकडून ती बघूया चल... "
" हा राहुल आला बाहेरहून....
१५ मिनिटात, तो बाहेर गेला....
तानाजी आत येताना दिसत आहे...
२० मिनिटांनी तो परत आला, हातात मिठाईचा बॉक्स आहे. म्हणजे तो खरे बोलतोय...
याचा अर्थ खून हा प्रियांका आणि त्या लपून बसलेल्या व्यक्तीनेच केला आहे... "
" हम्म " श्रवण उद्गारला
" CCTV मध्ये बाहेरचे कोणीही दिसत नाही आणि खून हा दोन व्यक्तींनी केला आहे याचा अर्थ दुसरा व्यक्ती हा त्या बिल्डिंग मधीलच आहे "
" सुलतान, एक काम कर, तुझ्या माणसाला मतदार यादी घेऊन त्या बिल्डिंग मध्ये पाठव आणि सर्व व्यक्तीकडून मतदार यादी update करून घे आणि प्रत्येक व्यक्तीची सही घ्यायला सांग...
सही घेताना त्याला लक्ष ठेवायला सांग की कितीजण डाव्या हाताने सही करतात...
त्यात कितीजण एक सहा, साडे सहा फूट उंच आहेत...
आणि कोणी खुनाच्या दिवसापासून बाहेरगावी गेला आहे का ? "
" हो लावतो मी माणसे कामाला "
" हे काम तीन दिवसात झाले पाहिजे. कोर्टात जाण्याच्या आधी मला ही लिस्ट हवी आहे "
" हो... "
" आणखी, सुलतान, तू थोडे त्या एरिया मधील टपरीवर फिर आणि RM गुटखा कोठे मिळतो ते बघ...
आणि एकदा ती टपरी कळली की मग या बिल्डिंग मधून कोण ते विकत घेतो ते बघ... "
" चला लागा कामाला "
------------------------------------------------------------------------------------------------------------------------
तीन दिवस हे पूर्ण माहिती गोळा करण्यात निघून गेले.... रात्रभर श्रवण व्हाइट बोर्ड वर काहीतरी लिहत होता आणि पहाटे समाधानाने झोपी गेला....
सकाळी.....
" जिंक्स, आज दुपारी केसच्या वेळेस मला मधू-मालती अपार्टमेंटचे सर्व सदस्य हजार हवे आहेत. बाकीच्यांना मी बोलावतो... "
" ठीक आहे, पण समजले का तुला काही ? "
" हो, पण तुला नंतरच सांगेन " म्हणून श्रवनने फोन ठेवला
" सुलतान, त्या पानपट्टीवाल्याला घेऊन दुपारी कोर्टात ये "
" सोमी, तू आणि तुझा लॅपटॉप दुपारी कोर्टात या... "
------------------------------------------------------------------------------------------------------------------------
कोर्टात पूर्ण गर्दी झाली होती, मधू-मालती अपार्टमेंटच्या सर्व रहिवासी कोर्टात हजर होते...
गजानन आणि अपर्णा देसाई पुढच्या रांगेत बसले होते.. शेजारी न्याती, सई आणि सोहम बसले होते.
मधल्या रांगेत, प्रियांका, बर्वे आणि एक दोन रहिवासी बसले होते. प्रियांका मनातून थोडी घाबरली होती पण चेहऱ्यावर शांत भाव ठेवून मोबाईलवर काहीतरी टाईप करत बसली होती.
त्या मागील रांगेत मधू-मालती सोसायटीचे इतर रहिवासी बसले होते...
श्रवण त्याच्या जागेवर येऊन बसला. त्याला बघून गजानन आणि अपर्णा देसाई उभे राहिले.. गजाननरावांच्या हात हातात घेऊन श्रवण बोलला, " काका, संध्याकाळी माझ्या घरी छोटी पार्टी आहे राहुल यातून सुटला म्हणून... तुम्ही नक्की या "...
हे ऐकून त्या दोघांच्या डोळ्यातून पाणी आले...
इन्स्पेक्टर अजिंक्य, कॉन्स्टेबल मोरे आणि पाटील यांच्या समवेत राहुलला घेऊन तेथे आला.... राहुलला गुन्हेगाराच्या कटघरयात उभे केले गेले. त्याला तसे पाहून अपर्णा देसाईंना अश्रू आवरेनासे झाले.
बरोबर एक वाजता न्या. चंद्रचूड यांचे आगमन झाले. त्यांच्या कारकुनाने कॅसेचे पेपर त्यांच्या समोर ठेवले.. त्यांनी पपेरवर एक नजर टाकली..
" ऍड. साळुंखे proceed "
ऍड. साळुंखे उभे राहिले... त्यांच्या दृष्टीने ही एकदम शुल्लक केस होती..
" माय लॉर्ड, आरोपी राहुल देसाई याने पैश्याच्या कारणावरून श्री. तानाजी म्हस्के यांचा अतिशय निघृण पद्धतीने खून केला असून त्याने तशी कबुली पोलिसांसमोर दिली आहे....
तरी माझी कोर्टास विनंती आहे की आरोपी राहुल यास कठोरातील कठोर शिक्षा करून मयत तानाजी यास न्याय द्यावा "
" आरोपीच्या वकिलांचे काय म्हणणे आहे या वर "
" माय लॉर्ड, ही open and shut आहे. त्यांना काय बोलायचे असणार " उपहासाने सावंत म्हणाले...
" सावंत, जर एवढी खात्री आहे तर शिक्षाच का नाही सुनावत तुम्ही " श्रवण उभे राहुन बोलला...
" माय लॉर्ड, माझा आशिल निर्दोष आहे... " श्रवण न्या. चंद्रचूड यांच्याकडे बघत बोलला..
" पुरावे लागतात यासाठी... " सावंत मागून बोलले..
" ते माहिती आहे मला आणि ते आहेतच माझ्याकडे... आणि माझा आशिल गुन्हेगार आहे असे पुरावे तुमच्याकडे असतीलचना, ते सादर करा प्रथम "
सावंत पुढे येऊन बोलले " माझे प्रथम साक्षीदार आहेत इन्स्पेक्टर अजिंक्य जाधव "
अजिंक्य साक्षीदारांच्या कटघरयात येऊन उभा राहिला आणि त्याने न्या. चंद्रचूडना कडक सॅल्युट ठोकला.
शपथ झाल्यावर सावंत त्याच्याजवळ आले आणि आपला चष्मा आपल्या रुमालाने पुसत म्हणले " इंस्पेक्टर, त्या दिवशी काय काय घडले ? "
अजिंक्यने राहुल पोलिस स्टेशनमध्ये आल्यापासूनचा पूर्ण घटनाक्रम विस्तृतपणे सांगितला....
" धन्यवाद इन्स्पेक्टर "
" cross question mr. kulkarni " श्रवणकडे बघत साळुंखे बोलले.
" माय लॉर्ड मी इन्स्पेक्टर जाधवना नंतर cross question केले तर चालेल का ? " श्रवनने न्या. चंद्रचूडना विचारले.
" परवानगी आहे "
अजिंक्यने परत एक सॅल्युट ठोकला आणि तो जागेवर जाऊन बसला.
" माझी पुढील साक्षीदार आहे डॉ. न्याती जोशी"
न्यातीने साक्षीदारांच्या कटघरयात येऊन शपथ घेतली.
" डॉक्टर, आरोपीच्या कपड्यांवर जे रक्त होते ते मयत तानाजीचे होते का ? "
" होय, ते रक्त तानाजीचे होते "
" आणि जो चाकू घटनास्थळी मिळाला त्या चाकूवर पण तानाजीचे रक्त होते का ? "
" होय, त्या चाकूवर पण तानाजीचे रक्त होते "
" आणि त्या चाकूवर आरोपीच्या हाताचे ठसे आहेत का ? "
" होय, त्या चाकूवर आरोपीच्या हाताचे ठसे आहेत "
" thats all माय लॉर्ड... आरोपीचा कबुली जबाब, आरोपीला अटक केली त्या वेळी त्याच्या कपड्यांवर असलेले मयताच्या रक्ताचे डाग, ज्या चाकूने खून झाला त्यावर असलेले आरोपीच्या हाताचे ठसे, यावरून हे सिद्ध होते की आरोपी राहुलनेच हा खून केला आहे "
" माय लॉर्ड, मला डॉक्टर न्यातीना cross question करण्याची परवानगी मिळावी " श्रवण शांतपणे उभा राहून बोलला.
" parmission granted "
श्रवणने एक कागद घेऊन न्यातीकडे दिला आणि " डॉक्टर न्याती, हा तुमचा फॉरेन्सिक रिपोर्ट आहे काय ? "
" होय "
" नक्की वाचून सांगा की हा तुमचाच रिपोर्ट आहे आणि तुमची सर्व ओबसर्वशन्स यामध्ये आहेत "
न्यातीने पुन्हा एकदा रिपोर्ट वाचला आणि म्हणाली " होय, हा माझाच रिपोर्ट आहे आणि माझी सर्व ओबसर्वशन्स यात आहेत "
" डॉक्टर न्याती, परत एकदा कन्फर्म करा की ही सर्व ओबसर्वशन्स तुमचीच आहेत आणि मी यात काहीच फेरफार केला नाही "
" श्रवण, नक्की काय म्हणयाचे आहे तुम्हाला "
" माय लॉर्ड, मला एवढेच म्हणायचे आहे की, माझ्या वकील मित्रांनी फक्त त्यांना हवे ते मुद्दे त्या रिपोर्ट मधून घेतले आहेत आणि बाकीचे मला वाटतंय माझ्यासाठी सोडले आहेत "
" नक्की काय ते बोला "
" होय माय लॉर्ड, मी मुद्द्यावरच येत आहे...
डॉक्टर न्याती मला सांगा, मयत तानाजीवर एकूण किती वार झाले आहेत ? "
" एकूण तीन वार झाले आहेत. सर्व वार हे पाठीवर आहेत "
" आणि त्याची दिशा काय आहे "
" तीनही वार हे त्याच्या पाठीच्या डाव्या बाजूला आहेत ..... "
" माय लॉर्ड, जर उजव्या हाताच्या व्यक्तीने जर समोरच्याच्या पाठीवर वार केला तर तो उजवीकडे असतील पण हे वार डाव्या बाजूला आहेत, याचा अर्थ तो व्यक्ती डाव्या हाताचा आहे.....
बरोबर आहे का डॉक्टर ? "
" बरोबर "
" तसेच, जसे रिपोर्टमध्ये लिहिलेले आहे की हा वार साडे चार फुटावर आहे... याचा अर्थ तो व्यक्ती उंचापुरा आहे...
बरोबर आहे का ? "
" बरोबर आहे.. रिपोर्ट मध्ये मी हे नमूद केलेले आहे "
" आभारी आहे डॉक्टर...
" माय लॉर्ड, मी इन्स्पेक्टर अजिंक्यना बोलावू इच्छितो "
" परवानगी आहे "
" इन्स्पेक्टर अजिंक्य, तुम्ही घटनेवेळाचा cctv फुटेज चेक केला असेल ना ? त्यातील तुमचे निरीक्षण काय आहे ? "
" खुनाच्या वेळेपासून थोडा वेळ आधी राहुल आला बाहेरहून.... १५ मिनिटात, तो बाहेर गेला.... आणि तानाजी आत आला... तानाजी आत आल्या पासून २० मिनिटांनी राहुल हातात मिठाईचा बॉक्स घेऊन आला... "
" आभारी आहे इन्स्पेक्टर जाधव... तुम्हाला परत बोलाविण्यात येईल.. "
" माय लॉर्ड, मी राहुलला एक प्रश्न विचारू शकतो का ? "
" परवानगी आहे "
" राहुल, तू मिठाई कशासाठी घेऊन आला होता "
राहुलने प्रियंकाकडे नजर टाकली.... तिच्या चेहऱ्यावर काहीच भाव नव्हते..
तू न्यायमूर्तीकडे बघून बोलेला... " माझे मधू-मालती अपार्टमेंट मध्ये राहणाऱ्या प्रियांका पाटील हिच्यावर प्रेम होते आणि आम्ही दोघे लग्न पण करणार होतो..
त्या दिवशी, प्रियांकाने मला टेरेसवर बोलावले आणि ती गरोदर आहे हे सांगितले..
ते ऐकून माझ्या आनंदाला पारावार राहिला नाही आणि मी तो क्षण सेलिब्रेट करण्यासाठी मिठाई आणायला बाहेर गेलो..
मी बाहेरून मिठाई घेऊन टेरेसवर परत आलो तर मला तेथे तानाजी रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला आणि तेथे प्रियांका हातात रक्ताळलेलाचाकू घेऊन उभी होती "
" धादांत खोट बोलतोय हा " प्रियांका चवताळून बोलली....
" आय ऑब्जेक्ट, हा केसला भरकटवण्याचा प्रकार आहे " ऍड. सावंत उभे राहून बोलले... " हे स्टेटमेंट राहुल आत्ता देतोय, मागच्या हिअरिंग मध्ये त्याचे वेगळेच स्टेटमेंट होते "
" श्रवण, हा काय प्रकार आहे ? " न्या. चंद्रचूडनी विचारले.
" माय लॉर्ड, मला माझे प्रश्न पूर्ण करू द्यावेत ही विनंती आणि प्रियांका तुम्हाला इथे बोलावून विचारण्यात येईल त्या वेळी तुम्ही तुमचे स्पष्टीकरण द्या.. " श्रवनने तिला सांगितले.
आणि राहुलला बोलला " पुढे काय झाले ? "
" माझे तिच्यावर भरपूर प्रेम आहे म्हणून मी तो गुन्हा हा माझ्यावर घेऊन तसा कबुलीजबाब मी कोर्टात आणि पोलिसाना दिला"
" आभारी आहे राहुल, माय लॉर्ड मला प्रियांका पाटील यांना कांहीं प्रश्न विचारायची परवानगी मिळावी ही विनंती "
" परवानगी आहे "
प्रियांका येऊन साक्षीदारांच्या कटघरयात उभी राहिली.
" प्रियांका पाटील, आपले नाव काय ? "
" काय हा प्रश्न आहे.. ? " ऍड. सावंतनी उभे राहुन विचारले.
" प्रियांका याचे योग्य उत्तर देतील " श्रवण प्रियंकाकडे बघून उद्गारला.
प्रियांकाने गडबडून लोकांमध्ये बसलेल्या तिच्या मित्राकडे बघितले..
" उत्तर द्या "
" प्रियांका उदय पाटील " प्रियांका उद्गारली
" ते तुमचे आत्ता धारण केलेले नाव, मी तुम्हाला तुमचे खरे नाव सांगायला आहे "
" हेच माझे खरे नाव आहे "
" माय लॉर्ड, मला वाटते या विसरल्या आहेत... let me help her...
तुम्हाला "राधिका गिरी" आठवतात का ?...
त्या आठवत नसत तर "सर्वांगी म्हात्रे" तरी आठवतात का ?...
निदान "सोनाली बापट" आठवतात का ?...
आणि या सर्व आठवत नसतील तर तुमचे स्वतःचे मूळ नाव तरी आठवत असेल ना
मिस.सुकन्या करपे "....
प्रियांका एकदम श्रवनच्या तोंडाकडे आ वाचून बघत बसली..
" श्रवण, काय प्रकार आहे हा " न्या. चंद्रचूडनी विचारले.
" सर, या आहेत आजच्या जमानाच्या लेडी लाखोबा लोखंडे..
नवीन नाव धारण करून नवीन शहरात राहायचे....
मुलांशी ओळख वाढवायची, त्यांच्या बरोबर प्रेमाचे नाटक करायचे...
त्यांना सर्वस्व अर्पण केले असे भासवायचे आणि त्यांच्यापासून गरोदर आहे असे भासवून त्यांना ब्लॅक मेल करायचे...
हिचे, आत्ताचे नाव प्रियांका पाटील आणि तिने राहुलशी प्रेमाचे नाटक मांडले होते..
हे त्याचे सर्व पुरावे... " म्हणून श्रवनने तिच्या फेसबुक प्रोफाइलच्या प्रिंट न्या. चंद्रचूडना दिल्या.
" तिने फसवणूक केलेल्या सर्व तरुणांशी माझे बोलणे झालेले असून, ते सर्व साक्ष द्यायला तयार आहेत "
" मयत तानाजी हा सुकन्याचा बालमित्र, दोघेही जळगावचे. तिच्या किंवा त्याच्या दुर्दैवाने तो परीक्षेसाठी पुण्यात आला आणि त्याने, मधू-मालती अपार्टमेंटच्या समोर राहायला रूम घेतली... त्याने तिला ओळखले पण सुकन्याने त्याला ओळख नाही दाखवली..
त्याने तिला तिच्या जुन्या फोनवर संपर्क पण केला. जेंव्हा तानाजीला तिचे कारस्थान लक्षात आले आणि त्याने दोघांच्या मागावर राहायचे ठरवले...
खुनाच्या दिवशी, तो राहुलच्या मागे मागे टेरेसवर गेला, जेंव्हा राहुल मिठाई आणायला गेला तेंव्हा त्याने सुकन्याला जाब विचारला...
त्या बिचार्याला काय माहिती की त्या मुळे त्याचा हकनाक जीव जाणार आहे ...
आणि तो जाब विचारत असताना त्याचा खुन झाला "
" पण, तुम्हीच मगाशी सांगितले की खुनी हा डावखुरा आणि साडेसहा फूट उंच आहे, आणि प्रियांका ही एवढी उंच नाही " ऍड. सावंतनी उभे राहून विचारले...
" बरोबर, मी कोठे म्हणलंय की, सुकन्याने खून केलाय... ती तानाजीशी बोलत असताना, पाठीमागून येऊन तिच्या साथीदारांने तानाजीच्या पाठीत चाकू खुपसला...
जेंव्हा, सुकन्या राहुलला सांगत होती की ती गरोदर आहे.. त्या सर्व घटनेचे शूटिंग हे तेथे असलेल्या दोन पाण्याच्या टाक्यांच्या मागे बसलेला तिचा साथीदार करीत होता... हे त्या ठिकाणचे फोटो " म्हणत श्रवणने फोटो न्या. चंद्रचूड कडे दिले..
त्यांनी फोटो निरखून बघितले, त्यात सरळ दिसत होते की कोणीतरी त्या धुळीत बसले होते..
" आम्ही जेंव्हा, cctv चेक केले त्यातून लक्षात आले की त्या वेळी, राहुल आणि तानाजीशिवाय कोणीच बाहेरचे बिल्डिंगमध्ये गेले नव्हते, याचा अर्थ तिचा साथीदार हा त्या बिल्डिंगमधील कोणीतरी असणार. आणि त्यासाठीच मी इन्स्पेक्टर जाधवना सांगून बिल्डिंगच्या सर्व सभासदांना येथे बोलावले आहे "
बिल्डिंगच्या सर्व सभासदांमध्ये चुळबुळ सुरू झाली आणि सर्वजण एकमेकांकडे बघू लागले...
" शांत राहा " न्या. चंद्रचूड " श्रवण, u proceed "
" तर, डॉक्टर न्यातीचा रिपोर्ट प्रमाणे खुनी हा डावखुरा आहे आणि त्याची उंची ही साडे सहा फूट आहे, म्हणून, मी माझ्या माणसांना निवडणूक अधिकारी म्हणून बिल्डिंग मध्ये पाठवले आणि सर्वांच्या सह्या घ्यायला सांगितले.. त्यात आम्हाला लक्षात आले की बिल्डिंग मध्ये पाच लोक हे डावखुरे आहेत...आणि त्यातील तिघांची उंची ही साडेसहा फूट आहे..
आता प्रश्न उरला की त्या तिघातील कोण ?...
तर, हा दुसरा पुरावा, गुटखा पाकीट जे आम्हाला पाण्याच्या टाकीमागे मिळाले " म्हणून श्रवनने दुसरा पुरावा न्या. चंद्रचूडकडे दिला..
" तर प्रश्न होता की त्या तिघांमधील गुन्हेगार कोण ?... तर तो प्रश्न सोडवला गोविंदाने ज्याची मधू-मालती अपार्टमेंटच्या शेजारी पानपट्टी आहे आणि या तिघांमधील एकजण हा त्याचा नेहीमीचा गिऱ्हाइक आहे, बरोबर आहे का मिस्टर सुधाकर बर्वे... ? "
त्या बरोबर, बर्वे लागलीच उठून तिथून जाऊ लागला.. मागे बसलेल्या सुलतानाने त्याला एक उडीत पकडून जेरबंद केला. इन्स्पेक्टर अजिंक्यनी त्याला अटक करून साक्षीदारांच्या कटघरयात सुकन्या शेजारी उभे केले..
" बर्वे, काय झाले ते तुम्ही सांगता की मी सांगू " श्रवण बर्वेकडे रोखून बघत बोलेला..
" मीच मारला तानाजीला, आमचा पूर्णत्वाला आलेला डाव हा त्याच्यामुळे उधळत होता... "
" काय झाले ते विस्तारून सांगा "
" सुकन्या उर्फ प्रियांका जेंव्हा मॉडेलिंग साठी 2012 साली मुंबईला आली. त्याच सुमारास मी पण मुंबईमध्ये फिल्म इंडस्ट्री मध्ये छोटी मोठी कामे करत होतो. अश्याच एका कामाच्यावेळी माझी आणि सुकन्याची भेट झाली आणि आमची मैत्री वाढत गेली...
एका मॉडेलिंगच्या कामावेळी, आमचे एक प्रोड्युसर हे तिच्या मागे लागले होते... तिने मला ते सांगितले.. माझ्या डोक्यात एक प्लॅन आला, मी त्याला तिच्या जाळ्यात अडकवायला सांगितले.. ती सुरवातीस तयार नव्हती पण पैशाच्या आमिषाने ती तयार झाली..
त्याप्रमाणे तिने त्या प्रोड्युसरला जाळ्यात अडकवून संबंध प्रस्थापित केले आणि मी चोरून त्यांचे फोटो आणि विडिओ बनवला आणि ते फोटो आणि व्हिडिओ त्याला दाखवून भरपूर पैसे उकळले आणि ते फोटो आणि व्हिडिओ त्याला दिले...
या मुळे आमच्या लक्षात आले की, असे करून आपण भरपूर पैसे कमवू शकतो... पण आमचे एक तंत्र होते की, पैसे भरपूर पण एकदाच घ्यायचे आणि नंतर मात्र त्याला त्रास द्यायचा नाही.. त्या मुळे, ब्लॅक मेल होणारा पोलिसात जात नाही आणि ते प्रकरण तिथेच संपते.
दर वेळी मी नविन शहरात जायचो, नवीन नावाने माझे बस्तान बसवून झाले की सुकन्याला बोलावून घ्यायचो आणि मग सावज शोधायचो...
राहुलला आम्ही असेच शोधलं होते, तो स्वतः चांगल्या कंपनी मध्ये नोकरीला, त्याच्या कडून चार पाच लाख काढणे सहज शक्य होते... "
" तानाजीचा संबंध काय ह्यात ? "
" तानाजी हा सुकन्याचा बालमित्र. तो खुनाच्या पंधरा दिवस आमच्या समोरच्या अपार्टमेंट मध्ये राहायला आला. त्याने, सुकन्याला ओळखले, पण तिने ओळख नाही दाखवली..
त्याने तिला तिच्या जळगावच्या फोन वर फोन पण केला, पण सुकन्याने ती मुंबईला नोकरी करते सांगून ती पुण्यात असण्याचे नाकारले...
पण, त्याचे समाधान झाले नाही म्हणून तो तिच्या पाळतीवर राहिला आणि त्याला राहुलचे आणि तिचे सुरू असलेले प्रेम संबंध समजले...
खुनाच्या दिवशी, त्याने राहुलला मधू-मालती अपार्टमेंट मध्ये जाताना पाहिले आणि तो त्याला सावध करायला अपार्टमेंट कडे निघाला. तो तेथे पोहोचे पर्यंत राहुल मिठाई आणायला गेला होता..
मी पाण्याच्या टाकीमागे बसून दोघांच्या बोलण्याचे शूटिंग करत होतो...
तानाजी बिल्डिंगच्या टेरेसवर पोहचला आणि तिथे त्याला सुकन्या दिसली..."
------------------------------------------------------------------------------------------------------------------------
" सुकन्या, तुझे हे राहुलबरोबर काय सुरू आहे आणि तू नाव बदलून का राहत आहेस "
" हे बघ तानाजी, मी तुला कित्येकदा सांगितले आहे की माझे नाव प्रियांका आहे.. आणि मी कसे वागायचे हे तू मला शिकवू नको "
" ठीक आहे, तसे असेल तर मी काकाना फोन करून सर्व सांगतो आणि त्यांना बोलावून घेतो आणि येऊ दे राहुलला, त्याला पण सर्व कल्पना देतो.. मग दे उत्तर सर्वाना "
" अरे, तानाजी, नको ना पडू तू यात... " सुकन्या काकुळतीला येऊन त्याला बोलली..
बर्वेला वाटले की तानाजी आपला उधळून लावणार म्हणून तो आपल्या खिशातला चाकू घेऊन तानाजीच्या मागे आला आणि त्याने मागून तानाजीच्या गळ्याला धरून त्याच्या पाठीत चाकूने चार वार केले..
" मोठा आला होता आम्हाला समजावणारा "
" आता, याचे काय करायचे ? " सुकन्याने बर्वेला विचारले
तेवढ्यात, लिफ्टचा दरवाजा वाजला...
" हा घे चाकू आणि राहुलला तयार कर आळ त्याच्यावर घ्यायला" म्हणून बर्वे टाकीच्या मागे पळाला..
------------------------------------------------------------------------------------------------------------------------
" सुकन्याने गोड बोलून राहुलला तयार केले आळ घ्यायला, तो खाली गेल्यावर आम्ही दोघे तिच्या फ्लॅट वर येऊन फ्रेश झालो आणि मग टेरेसवर येऊन पोलिसाना फोन केला..
" thats all माय लॉर्ड... माझी आपणास विनंती आहे की आपण माझे आशिल राहुल देसाई याला निर्दोष मुक्त करून सुधाकर बर्वे यास अटक करावी "
" येस, या सर्व प्रकरणातुन मी राहुल देसाई याची मुक्तता करत आहे. त्याने कबुलीजबाब देऊन कोर्टाची दिशाभूल करण्याचा गुन्हा केला पण एकंदरीत परिस्थिती पाहता मी सध्या त्याला वॉर्निंग देऊन सोडत आहे...
आणि इन्स्पेक्टर जाधव तुम्ही सुधाकर बर्वे आणि प्रियांका उर्फ सुकन्या करपे यांना अटक करा आणि पूर्ण तपासणी करून नव्याने खटला दाखल करा.. "
------------------------------------------------------------------------------------------------------------------------
रात्री श्रवनच्या घरी सर्वजण जमले होते.. एक छोटी पार्टी संपल्यावर...
" तुमचे आभार कसे मानायचे हे समजत नाही " गजाननराव श्रवनच्या हात हातात घेऊन बोलले.
" काका, उगीच मला लाजवू नाका, तुमचा ठाम विश्वास होता की राहुल निर्दोष आहे म्हणूनच मी हे केस घेतली.."
" अजिंक्य, सोहम तुला सगळे डिटेल्स देईल, बर्वे आणि सुकन्या बाबतचे.. म्हणजे तुला केस नव्याने सुरू करता येईल "
एक एक करत सगळे गेल्यावर दिवाणखान्यात फक्त श्रवण, सोहम आणि सई होते..
" सोहम, जा, सईला घरी सोडून ये" श्रवण बोलेला
" काही नको, तो बिचारा दमला असेल. मी जाते कॅबने "
" अग, नाही दमलो, येतो सोडायला.. " सोहम बोलेला " की तुलाच बदली ड्राइवर हवा आहे "
सई गप्प उभी राहिली..
मिश्कीलपणे हसत श्रवणने गाडीची किल्ली हातात घेतली आणि म्हणला " Madam, your driver is here at your service.. Let's go "
आणि त्याची आवडती होंडा सिटी त्याच्या बंगल्यातून बाहेर पडली आणि जाऊन थांबली naturals ice cream वर..

समाप्त
लेखक - संकुल ( संतोष कुलकर्णी )
http://sancool172.blogspot.com
माझ्या नावाने ही कथा कोठेही छापण्यास माझी परवानगी आहे..

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

प्रतिसादा बद्दल धन्यवाद...

माझी इथे टाकलेली एक कथा सुटका परवा फेसबूक वर बघितली म्हणून खास टीप टाकावी लागली...

छान.
>>सुलतान -
वय ३२ वर्षे, व्यवसाय पहिलवान, श्रवनची बालमित्र- श्रवनचा पाहिजे.

iPhone hack करायला स्वतः ऍपल ला दोन ते चार दिवसात लागतात आणि सोहम एवढ्या कमी वेळात करतोय?

छान कथा, थोडी थोडी सुशीची आठवण झाली,
पण कोर्टरूम drama थोडा जास्त झालाय, असा अमुक आरोपी सोडून द्या आणि तमुक ला पकडा असे कोर्टात होत नाही, हअ प्रसंग पोलीस स्टेशन मध्ये घडला असता तर खरा वाटला असता

लिखाण छान Happy
मनोरंजक कथा Happy थोडी dramatic वाटली पण

अटक भारती विद्यापीठ पोलिसांनी केली आणी श्रवण गेला हिंजवडी पोलीस स्टेशनला? >> हो अणि मुळात मधु मालती अपार्टमेंट आहे भांडारकर रोडला Happy

प्रियांका पाटिल ऐवजी प्रियांका बर्वे झालं आहे एका ठिकाणी.
बाकी कथेचा ओघ चांगला आहे. तुरळक त्रुटी सोड्ल्यास मला आवड्ली कथा.