Au 79 ( नवख्या गुप्तहेरांची कथा )

Submitted by अॅस्ट्रोनाट विनय on 27 July, 2018 - 04:56

आज शुभांगी घाईगडबडीत कॉलेजला निघाली होती. कुणीतरी नवीन शिक्षक केमिस्ट्री शिकवण्यासाठी रुजू झाले होते. त्यांचं आज पाहिलं लेक्चर होतं. आजपर्यंत गोचीड उर्फ महाले सरांच्या केमिकल जाचाला विद्यार्थी कंटाळले होते, त्यामुळे ते मोठ्या आशेने वर्गात जमा झाले होते, नवीन सर कसे शिकवतात हे बघायला सर्वजण उत्सुक होते. त्यांची बारावी विज्ञानची अ तुकडी फिजिक्स लॅबच्या खाली पहुडलेली होती. पहिल्या तासाला कधी नव्हे ते सगळे विद्यार्थी हजर होते, म्हणून ती वर्गखोली थोड्या नाराजीनेच उठली. मुलं-मुली हुल्लड करत आत घुसले. गडबड, गोंधळ, मारामाऱ्या यांना उधाण आलं. त्या गोंधळात बाहेरून येणारा बुटांचा आवाज कुणालाच ऐकू आला नाही. हळूहळू तो आवाज जवळ आला, अजून जवळ आला. काही क्षणांतच अजिबात लक्ष वेधून न घेणारी, पोरासवदा बटू मूर्ती वर्गात घुसली. घुसता घुसता त्याने अर्धवट दरवाजा धाडकन लोटला. त्यासरशी सगळा वर्ग शांत झाला. कमजोर दिलाचे दचकून खाली पडले.

त्या मनुष्याने वर्गाकडे एक कटाक्ष टाकला अन ऐटीत चालत तो फळ्याजवळ गेला. त्याचा हात खिशात थोडावेळ चाचपडला अन हळूच बाहेर आला. हाताच्या बोटांमध्ये खडू अडकलेला सर्वांनी पाहिला. ‘Acids and Esters’ हा मथळा मोठ्या अक्षरांत फळ्यावर उमटला. एव्हाना वर्गाला कळालं होतं की हे आपले नवीन सर आहेत.
“सर, तुमचं नाव काय आहे ?” गर्दीतून एक चिरका आवाज उमटला. सरांनी मागे वळून पाहिलं. त्यांची नजर आश्वासक वाटत होती, गर्दीची हिंमत दुणावली.
“सांगा न सर” “नाव सांगा”
“नाव” “नाव” “नावS S” “नाव नाव होडी” “काव काव” असे नानाविध शब्दस्वरांतील आवाज उमटू लागले. सरांनी खिशात घातलेला हात बाहेर काढून उंचावला. सर्वजण हळूहळू शांत झाले. इकडे विद्यार्थ्यांचा आवाज चूप झाला अन तिकडे सरांनी तोंड उघडलं – “ माझं नाव आहे… श्रीदीपकरावबोचे”
“आ S” दोनतीन मुखांतून प्रश्नार्थक उद्गार उमटले
“दीपक दीपक”
“आडनाव ?”
“बोचे”
“आ… आ… “ चा जाप वाढला. सरांनी आपलं नाव दोनतीन वेळा ओरडून सांगितलं.
“कोचे, खोचे, मोजे, साचे…” प्रत्येकजण सोईस्कर अर्थ काढू लागला. शेवटी मास्तर पागल झाले. त्यांनी एक खडू उचलला अन आपलं नाव मोठ्ठ्या अक्षरांत रेखाटण्यासाठी पवित्रा घेतला. पण तेवढ्यात समोरच्या रांगेतून कुणीतरी ओरडलं – “बोचे”
सर गर्रकन मागं वळले. “बरोबर बरोबर. हेच” असं म्हणत त्यांनी आपली मूठ डेस्कवर आदळली. सर्व विद्यार्थ्यांना ‘बोचे’ या नावाचा साक्षात्कार झाला.

सरांचे उच्चार फार संभ्रमित होते. त्यांच्या मुखातून बाहेर पडणारे शब्द शिस्तीत बाहेर पडत नसत, ते एकमेकांशी धक्काबुक्की करत, एकमेकांच्या पायांत पाय अडकवत. बरेच शब्द घाईघाईत समोर जाण्याचा प्रयत्न करायचे व अडखळून पडायचे. त्यामुळे ते श्रोत्यांच्या कानांत वेगळाच अर्थ उत्पन्न करायचे.

सरांनी प्रकरण शिकवायला सुरुवात केली. पाठीमागच्या बेंचेसवरील बऱ्याच विद्वानांनी आपल्या ट्युशन नोट्स उघडल्या होत्या. त्यामुळे सरांनी एखादी रिअॅक्शन फळ्यावर लिहण्याआधीच ती या विद्वानांच्या मुखी हजर असायची. बेसिक्स शिकवायला गेलं तर विद्यार्थ्यांना कंटाळा यायचा, अॅडव्हान्स शिकवायला जावं तर ‘ही पद्धत आम्हाला समजत नाही’ अशी बोंब उठायची. सरांना “अब क्या बच्चेकी जान लोगे” असं ओरडावंसं वाटत होतं. पण तो पर्याय उपलब्ध नसल्याने त्यांच्यावरील दबाव वाढत गेला. या दबावाखाली त्यांनी चुकीने एकदोन चुकीच्या रिअॅक्शन्स फळ्यावर मांडल्या. या कृतीची रिअॅक्शन लगेच उमटली. “चूक, चूक” “असं पाहिजे, तसं पाहिजे” असे विरोधकी सूर उमटले. हुल्लडबाजीला उधाण आलं.

नशिबानं त्याचवेळी टोल वाजला अन पिरियड संपला.

पण पहिल्या पिरियडमध्ये झालेल्या या मानहानीतून बोचे सर वर येऊ शकले नाही. याचा परिणाम म्हणजे ते ‘बोचे सर’ या दुहेरी नामावलीवरून घसरून “बोचे, बोच्या’ या एकेरी बिरुदावलीपर्यंत जाऊन पोहचले.

* * *

HAS ( हरगुनानी, आयलानी, शिंदे ) अकॅडमीत शुभांगी, रेणुका, अपेक्षा व स्नेहल ही चौकडी जॉईन झाली होती. अकरावी, बारावी सोबतच ते NEET च्या परिक्षेचाही नीट अभ्यास करून घेतात अशी अख्यायिका सर्वदूर पसरलेली होती. आज शनिवारचा दिवस असल्याने कॉलेज सकाळीच आटोपलं होतं, अन क्लास दुपारी होते.
अपेक्षाने आपली स्कुटी पार्क करून तोंडावरचा स्कार्फ काढला. साईड ग्लासमध्ये बघून केस नीट केले.

“ए आप्पे”

तिने आवाजाच्या दिशेने वळून बघितलं. शुभांगी, रेणुका अन स्नेहल तिच्या दिशेने येत होत्या.
“काय झालं गं ?”
“कावळे सरांनी एक्स्ट्रा प्रॅक्टिकल ठेवलंय. लगेच निघावं लागणार कॉलेजला” शुभांगीने माहिती पुरवली.
“शीट यार, या मास्तरला एक्स्ट्रा गोष्टींची फारच सवय आहे.” अपेक्षा नाराजीने म्हणाली
“हो न यार, पण करणार काय, जावंच लागेल” स्नेहल असहायता दर्शवत म्हणाली.

नाईलाजाने त्या चौघी बायोलॉजीच्या लॅबसमोर हजर झाल्या. पण तिथे कुणीच नव्हतं. चौघींनी मोजून तीनचार मिनिटं वाट बघितली अन आत प्रवेश केला. आतमध्येही कुणीही नव्हतं. त्या परत फिरणार तेवढयात कोपऱ्यातल्या ऑफिसमधून असिस्टंट प्रगट झाला. “काय आहे ?” त्याने गुरकावत विचारलं
“सर, प्रॅक्टिकल आहे, सेक्शन A” अपेक्षा अपेक्षेने म्हणाली.
“प्रॅक्टिकल सकाळीच कॅन्सल झालं. सर शेंडीच्या जेवणाला गेलेत.” एवढं बोलून तो अंतर्धान पावला. चौघींची तोंडं एवढूशी झाली.
“सरांनी शेंडी लावली यार आपल्याला.”रेणुका निराशेने म्हणाली
“नाही तर काय. तुला कुणी सांगितलं होतं गं” स्नेहल
“त्या टपऱ्या कॅटरिनाने”
“पागल आहे का ? कुणाच्या बोलण्यावर विश्वास ठेवायचा कळत नाही का तुला ?”
“डोन्ट वरी, चक्कर फुकट नाही गेली. आलोच आहोत तर काहीतरी टाईमपास शोधूच.” शुभांगी
“ते कसंकाय ?”
“हे पहा लॅबमधले केमिकल्स.”
“तू चक्क चोरले ??”
“शु SS हळू बोल. संपत आलेल्या बॉटल्स होत्या. आता घरच्यांचे ब्लड ग्रुप तपासू. ” ती आपल्या हातांतील केमिकल्सच्या बाटल्या दाखवत म्हणाली

बोलता बोलता चौघीजणी कॉलेजच्या मुख्य पार्किंगमध्ये आल्या. आता एकाबाजूला बाहेर पडणारा रस्ता होता तर दुसरीकडे
कै. पंढरीनाथ पाटील वसतिगृह. कॉलेज आवाराच्या थोडंसं बाहेर असलेलं हे पडकं होस्टेल. कॉलेजची स्थापना झाली त्यावेळी हे वसतिगृह बनवलं होतं. कॉलेजच्या सर्व जुन्या इमारती पाडून नवीन बनवल्या होत्या, ही एकमेव जुनी इमारत शिल्लक होती. याच्या आजूबाजूला आता बरीच झाडी वाढली होती. यामुळे अन काही अफवांमुळे इकडे कुणी फिरकायचं नाही. कुणी जाऊ लागलं तर शिपाई जाऊ द्यायचे नाही.

“एS मी काय म्हणते..." इति शुभांगी
"काय ?"
"त्या पडक्या वसतिगृहात जायचं का आपण ?"
"आता हे काय अचानक ?" स्नेहल
"अचानक नाही. माझी खूप दिवसांपासून इच्छा होतीच जायची, पण संधी सापडत नव्हती. आज आपण चौघीच आहोत इथे, शिवाय आपल्याला अडवणारं कुणी दिसत नाहीये.”
"ग्रेट. मलाही कधीतरी जायचं होतंच. आज मौका भी है और दस्तुर भी" रेणुकाने सहमती दर्शवली.
“नाही नाही. ही शुभांगी न, काहीपण काढत असते. आधी चोरी, आता घुसखोरी !” अपेक्षा त्राग्याने म्हणाली. स्नेहल तर स्कुटीवर बसलीसुद्धा.
“काय फट्टू आहात ग दोघी. भीती वाटते हे सरळसरळ सांगा न” शुभांगी
“आम्ही भीत नाही पण… झाडी खूप वाढलीये न. तिकडे सापबीप असले तर !”
“काही होत नाही, चला”
शुभांगी अन तिच्या पाठोपाठ रेणुकाही निघाली, मग बाकी दोघींचा नाईलाज झाला.

दाट झाडीतून रस्ता काढत, ओढण्या फांद्यांत अडकून फाटणार नाही याची काळजी घेत चौघी होस्टेलजवळ पोहोचल्या. तिनमजली असलेलं हे होस्टेल. चुना अन विटांमधलं बांधकाम होतं. जुन्या रचनेच्या खिडक्या अन दरवाजे जवळून बघितल्यावर अधिक भकास दिसत होते. प्रवेशद्वार दिसायला भक्कम होतं पण थोडा धक्का देताच ते कुरकुरत उघडलं. चौघींचे चार हात हातांत अन चार पाय एकाचवेळी पायऱ्यांवर पडू लागले. पावलं मोजता येतील एवढा संथ वेग होता. सगळीकडे जाळे जळमटे यांचं प्रस्थ वाढलेलं, ढासळलेल्या भिंतींमुळे चुना अन धूळ यांचं अजब मिश्रण सगळीकडे पसरलेलं, वाळकी पानं होस्टेलभर साचलेली. पावलागणिक ‘कुर्र कुर्र’ आवाज उमटत होता. दुरून ऐकणाऱ्याला जुन्या काळचा राजाच आपले वाजणारे बूट घालून चालतोय असा भास व्हावा.

एकदोन चुनकळी वळणं घेऊन चौघीजणी दुसऱ्या मजल्यावर पोहोचल्या, तिथे थोडं फिरून तिसऱ्या मजल्यावर गेल्या. विटांची पडझड झालेली खिडकी, जिच्याकडे त्या बऱ्याचवेळा भीतीने बघायच्या व जिथे कुणीतरी उभं आहे असा भास व्हायचा त्या खिडकीत या हिंमतावान चौघी उभ्या होत्या.

त्या मजल्यावरही विशेष काही नव्हतं, होती फक्त जिकडेतिकडे पसरलेली चुनखडी अन अंगावर धाव घेणारी शांतता. चौघीजणी शांततेत फिरत होत्या. त्या मजल्यावरील सगळ्या खोल्यांत त्यांनी डोकावून पाहिलं. पण विटा, मोडक्या टेबल खुर्च्यांचे तुकडे, जाळे जळमटे, छोटी छोटी झुडुपं वाढलेली याव्यतिरिक्त काहीच नव्हतं. कंटाळून त्या परत फिरणार तोच कॉरिडोरच्या एका अंगाला असलेल्या छोटेखानी खोलीने त्यांचं लक्ष वेधलं.
ही खोलीही रिकामी होती. खोलीच्या बरोब्बर मध्यभागी दोन खुर्च्या समोरासमोर तोंड करून बसल्या होत्या. त्यांच्या मध्ये एक टेबल वरच्या बंद लाईटाकडे टक लावून उभा होता. अव्यवस्थित मजल्यावरची ही व्यवस्थित रचना बघून चौघींना आश्चर्य वाटलं. त्या खुर्च्यांजवळ जाऊन पोचल्या. दोहोंपैकी एक खुर्ची जरा मोडलेली होती. तिच्या पृष्ठभागावर एका ठिकाणी टोकदार पट्टी बाहेर निघाली होती. सूर्याचा प्रकाश सरळ आत येऊन त्या खुर्च्यांवर पडत होता. त्यामुळे खुर्चीवरचे चारपाच रक्तथेंब अपेक्षाच्या नजरेस पडले.
“ हे बघा रक्त “ ती दचकून ओरडली.
“रक्त ??! खरंच की”
“इथे खुर्चीची तुटलेली पट्टी दिसत आहे. निष्काळजीपणामुळे हिची टोकदार कडा कुणालातरी टोचली असेल अन रक्त निघालं असेल.” शुभागींने अंदाज मांडला.
“कुणाचंतरी म्हणजे भुताचं की काय ? मला तर भीती वाटते बाई” अनपेक्षित प्रसंग समोर आल्याने अपेक्षाची भीती बाहेर पडली.
“असं भूतबीत काही नसतं” शुभांगी
“मी काय म्हणते, आपण एक गंमत करायची का ?” रेणुका
“कुठली गंमत ?” अपेक्षाच्या आधी स्नेहल उत्सुकतेने बोलली
“आपण ब्लड ग्रुप टेस्टिंग करून टाकू. प्रॅक्टिकलपण होईल आणि…”
“आणि भुताचा ब्लड ग्रुपही चेक होईल. हा: हा: हा:” रेणुकाच्या वाक्याला शुभागींने पूर्ण केलं.

अपेक्षाने रक्ताच्या एकेका थेंबावर Antigen A, Antigen B आणि RH Factor या रसायनांचे थेंब टाकले. Antigen A आणि RH Factor टाकलेले थेंब फाटलेल्या दुधासारखे दिसू लागले.
A Positive रक्टगट आहे असा निष्कर्ष निघाला.
“अजून काही राहिलं का ?”
“काही नाही, चला आता”

मग त्या चौघी तिथून बाहेर पडल्या. येतांना अपेक्षा अन स्नेहलच्या मनात जी भीती होती तिचा लवलेशही आता उरला नव्हता. पावलांचा कुरकुर वाजणारा आवाज विचित्र भासत नव्हता.

* * *

शनिवारी चुकलेलं बायोलॉजी प्रॅक्टिकल बुधवारी दत्त बनून हजर झालं. बायोची लॅब चांगली ऐसपैस होती, जिकडेतिकडे मार्बल्स लागलेले होते. लांबरुंद टेबल्स एकमेकांत अंतर सोडून ठेवलेले होते. टेबलांना जोडून बरेच स्टूल होते. समोरच्या भिंतीवर काळतोंडया फळा होता, Earthworm Dissection अशी अक्षरं त्याच्या तोंडावर उमटलेली होती. फळ्यासमोर एक छोटेखानी टेबल होता, त्यावर निमुळत्या तोंडाचा काचेचा चंबू ठेवलेला होता. तो मोठमोठ्या गांडुळांनी गळ्यापर्यंत भरलेला होता. संपूर्ण लॅबमधून कावळे सर मारक्या म्हशीसारखे फिरत होते.

“आज आपल्याला या गांडुळांचं डिसेक्शन करायचं आहे. खास गोव्याहून मागवलेले आहेत. भरपूर घ्या अन कापा.” कावळे सर खुशीत म्हणाले
“सर, ह्यांना घरी नेता येतील का ?” रिंढेने शंका उपस्थित केली
“घरी नेऊन का भाजी करायची आहे का ?” सर हसत हसत म्हणाले व त्यांचा हात नकळत ढेरीकडे गेला. त्यांनी एका earthworm चं डिसेक्शन स्वतः करून दाखवलं, नंतर सर्व मुली गांडुळांवर भिडल्या. प्रत्येकीने एकेक दोनदोन earthworms चिमट्यांत पकडले व ट्रेमध्ये ठेवले. त्यांच्या दोन टोकांना दोन टाचण्या टोचल्या अन डिसेक्शन नाईफने मधला भाग उभा फाडला.

“ई S S” कोमल किंचाळली
“काय झालं कोमे ? डिसेक्शन कर न” तिच्या बाजूला उभी असलेली शुभांगी गुरगुरली
“डिसेक्शनचं सोड, कुणीतरी माझ्या अंगावर थंडगार earthworms टाकले.”
शुभांगी काही बोलणार तेवढ्यात पलीकडून रेणुका ढुसुकण्या देत आली “हे उरलेले earthworms कुठे टाकायचे गं ?”
“टाक त्या कावळे मास्तरला, खायची गोष्ट म्हटलं की तो काहीही खाईल. खी: खी: खी:” कोमल
“मी तर म्हणते…”

तेवढ्यात कावळे सरांचा जाडजूड आवाज कानांवर पडला, ते प्रयोगशाळेच्या पुढ्यात उभं राहून सूचना देत होते. सर्व सूचना देऊन झाल्यावर ते म्हणाले, “तर अशा पद्धतीने कशाचंही डिसेक्शन करता येतं”
“सर, कशाचंही ?!” कोपऱ्यात उभ्या असलेल्या रिंढेने डोळे मोठ्ठे करत विचारलं. काही मुली छद्मीपणे हसू लागल्या.
“अरे SS कशाचंही म्हणजे बारक्या प्राण्यांचं. बकरीचं डिसेक्शन करू नका” सर ओरडून म्हणाले. बकरीचं नाव निघताच त्यांच्या मनातील राग उफाळला, पोटस्मृती जाग्या झाल्या. त्यांनी थोडासा पॉज घेतला व एका हातावर दुसरा हात आपटत म्हणाले, “साली बकरी, कुठूनही घुसती अन कुरुकुरु पानं खाती. मी गुलाबाची रोपं लावली होती. पण दुसऱ्या दिवशी सगळे सफाच S S क. साली बकरी S S” सर रागाने थरथरत होते अन मुली मुक्यातोंडी हसत होत्या.

तेवढ्यात शांततेचा भंग करणारा कसलातरी गोंधळ ऐकू आला. सर्वजण धावत लॅबबाहेर पडले. पटांगणात चिल्लमचिल्ली माजली होती. “पडले पडले, गेले गेले” अशा आरोळ्या ऐकू येत होत्या. सर्वजण धावायला लागले. XII B च्या गेटजवळ विद्यार्थ्यांचा सागर उसळला होता. गर्दीच्या मध्यभागी महाले सर बेशुद्ध पडलेले होते. दोनतीन मुलांनी त्यांना हातांवर तोललं होतं. नव्याने येणारे बरेचसे विद्यार्थी गर्दीतून डोकावण्याचा प्रयत्न करत होते, टाचांवर उभं राहून आत पाहण्यासाठी धडपडत होते.
हळूहळू गर्दी वाढत गेली, धक्काबुक्की सुरू झाली. बेशुद्ध सरांजवळ एका मुलाने हातात पेला पकडला होता, त्यातील पाणी तो त्यांच्या तोंडावर शिंपडत होता. इकडे धक्काबुक्की अजून वाढली, गर्दीतून एक झिंगुर ( विद्यार्थी ) उसळत आला व त्याच्या धक्क्याने पेला सांडला. सरांना सोडून मुलांच्या मारामाऱ्या सुरू झाल्या. तेवढ्यात तिथे एक कार येऊन थांबली, त्यातून बोचे सर अन अजून दोघेजण उतरले. त्यांनी महाले सरांना खांदा दिला ( सॉरी, खांद्यावर उचललं ) अन गाडीत टाकलं. डोळ्यांचं पातं लवतं न लवतं तोच गाडी दिसेनाशी झाली. थोड्याच वेळात गर्दीही चहुदिशांना पांगली.

महाले सर अकरावी बारावीला केमिस्ट्री II शिकवायचे. वयाची हाफ सेंच्युरी ओलांडलेली, पक्के हार्ट पेशंट. परंतु XII B मध्ये लेक्चर घेतांना ते धाडकन कोसळले होते, झोपेत पेंगुळलेले विदयार्थी खडबडून जागे झाले होते.

दोन दिवस उलटूनही या घटनेविषयी चर्चा सुरूच होत्या. गप्पा गप्पांतच शुभांगी अँड कंपनी केमिस्ट्री लॅबमध्ये पोहोचली. लांबीला जास्त, रुंदीला कमी अशी लॅब, लांबच लांब टेबल्स, त्यावर केमिकल्सच्या रॅक्स, सर्वत्र पसरलेला विचित्र वास अन गरीब बिचाऱ्या विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकलचा त्रास अशी एकूण परिस्थिती होती. लॅबला दोन दरवाजे होते. त्यातल्या मुख्य दरवाजाच्या समोरच, ऑफिसच्या बाहेर बोचे सर मस्तपैकी रेलून बसले होते. एक जुनाट पंखा त्यांना नाईलाजाने हवा पुरवत होता. वापरात नसलेलले दोन बेसिन निमूट बसले होते. ऑफिसजवळची बॅलन्स रम बंद दिसत होती.

“तुम्हीमागच्याप्रॅक्टिकल्ला आल्या होत्याका ?” नुकत्याच आलेल्या शुभांगी अँड कंपनीवर बोचेने बॉंब टाकला.
“न… न… नाही सर” कोमल जरा अडखळतंच म्हणाली.
“मग तुमचं स्वागत आहे. याइकडेयेऊनरांगेतउभ्याराहा” बोचे खुर्चीवरून उठता उठता म्हणाला. खुर्ची जराशी कुरकुरली. चौघीजणींना आधी काही कळालं नाही, पण बाजूची रांग पाहून त्यांनी अंदाज लावला अन रांगेत घुसल्या.
“हे पहा, माझ्याकडेहजेरी आहे. मलाफसवून का, चुपचापबाहे रया” बोचे हातातील हजेरी उंचावत ओरडला. अर्ध्याअधिक मुलींना काहीच कळालं नाही.
शब्द कळाले नाही तरी हजेरीकडे बघून दोघीतिघी समोर आल्या
“लॅबबाहेर या” एवढं बोलून बोचे झटक्यात दरवाजाकडे वळला, पुन्हा परत आला. शब्दांना जेव्हा हातवाऱ्यांची जोड मिळाली तेव्हा मुलींना समजलं अन त्या बाहेर पडल्या.
“कशाला जायचं बाहेर ?” शुभांगी
“हो न. थांबू इथेच.” रेणुका
“ये S ते पहा घुबड. इकडेच येतोय.” अपेक्षा दचकली व हळू आवाजात किंचाळली.
कॉलेजमध्ये कुठेही भटकणारं घुबड आपले बटबटीत डोळे वटारत या चौघींकडेच येत होतं. सर्व विद्यार्थ्यांचं जगणं त्याने हराम करून टाकलं होतं.
“तुम्हाला कळत नाही का ? बाहेर जायला सांगितलं न. फुटा इथून.” घुबड, उर्फ लॅबोरेटरी असिस्टंट कुत्र्यासारखा वसकावला.
बिनपंखांच्या घुबडावर दातओठ खात मुली बाहेर गेल्या.

लॅबच्या बाहेरील पॅसेजमध्ये कठड्याला टेकून बोचे उभा होता, आजूबाजूला मुलीच मुली पसरलेल्या होत्या. त्यांच्याकडे तो भिकारड्यांकडे पहावं अशा नजरेने बघत होता, शब्दांच्या फाकफुक ट्रेननं सर्वांना घायाळ करत होता. सर्व मुलींनी आपल्या माना खाली टाकलेल्या होत्या ( शरमेने नव्हे तर आपले हसू लपवण्यासाठी )
“तुमच्यामायाबापांना फसवूनकातुम्ही. Synthetic fibres, amines, Ether हे लहान प्रकरणं आहेत. ते ट्युशनमध्ये शिकवत नाहीत. कारण त्यांनाच्तेयेत्नाहीत.” बोचेच्या मनातील राग उफाळून बाहेर पडत होता.
“शिकवलं आम्हाला” कोमलने त्याचं वाक्य मधेच तोडलं.
“पण तुम्हाल्ते समजलं का ?” बोचे कावेबाजपणे हसत म्हणाला
“समजलं आम्हाला” यावेळी दुसरंच कुणीतरी बोललं. गर्दीतून “समजलं” “समजलं” असे चारपाच आवाज उमटले. या अनपेक्षित हल्ल्याने बोचे जरा गडबडला पण लगेच सावरत म्हणाला “जर समजलं असेल, अभ्यास झाला असेल तर अभिनंदन. नाहीतर ( तोंड बंद, तुम्ही गेले बेटेहो असं सांगणारी हालचाल.) पण तुमच्या मायाबापांना फसवू नका तुम्ही” बोचेने आपला फेवरेट डायलॉग मारला.
“बरं आपलापिरियड कितवाहे आज ?”
“चौथा” कुणीतरी उत्तर दिलं
“यावेळी तुम्हाला सोडतो. आज्माझं लेक्चर अटेंडकरा, नाहीतर पुढच्या प्रॅक्टिकलला बसू देणार नाही.”
“पण सर, प्रॅक्टिकलला तर उभं राहावं लागतं” एक आवाज
“तेच ते. जा, पळा आत” एवढं बोलून तो लॅबमध्ये घुसला मुलीसुद्धा मेंढरं पळत सुटतात तशाच उड्या मरत लॅबमध्ये घुसला. सर्वांनी भराभर टायट्रेशन्स संपवले, आयत्या रिडींग छापल्या, हवे ते कलर दुरूनच सरांना दाखवले, उरलेले केमिकल्स फेकून दिले. टेस्टट्यूब्स फटाफट धुवूनही टाकल्या. प्रेझेंटी देऊन सर्वांनी लॅबचा निरोप घेतला पण काहीजणी मागेच रेंगाळल्या.
“सर, सोमवारी प्रॅक्टिकल आहे का ?” शुभागींने 'नाही' या उत्तराच्या अपेक्षेने विचारलं
“प्रॅक्टिकल आहे” बोचे
“कोणतं ?”
“प्युरीफिकेशन”
“कशाचं ? मेटल की नॉन मेटल ?” अपेक्षा
“ऑल मेटल्स”
“वा S म्हणजे कुठल्याही धातूची...अगदी सोन्याचीपण प्युरीटी चेक करता येईल का ?” रिंढेने डोळे मोठे करत विचारलं. बोचे थोडा चूप बसला, मुली अजून काही प्रश्न विचारणार त्याआधी ओरडला “दिमागखाऊनका, लेक्चरला जामी आलोच”

मुली चुपचाप बाहेर पडल्या. बोचेच्या धमकीचा बराच परिणाम झाला होता. आधी तरी त्याच्या लेक्चरला चारपाच जण थांबायचे, आता सगळा वर्ग गायब होता. मग ह्या चौघीसुद्धा हसत खिदळत निघून गेल्या. आज कावळे सर सुट्टीवर होते, नाहीतर वर्गातून पळणारे विद्यार्थी दोनच मिनटांत उलट दिशेने पळत यायचे. अनेक prefixes suffixes मिरवणारे कावळे सर मुलींच्या डोक्यांवर चापटा अन मुलांच्या पायांवर काड्या मारत त्यांना बैलांसारखं हाकत आणत. पण आज रान मोकळं होतं.

“तुम्हाला एक गोष्ट सांगायचीच राहिली” शुभांगी कॉलेज गेटवर पोहोचता पोहोचता म्हणाली
“कोणती ?” अपेक्षाने थोडं थांबून विचारलं
“महाले सरांचा ब्लडग्रुप A Positive आहे”
“तुला कसं समजलं ?” स्नेहलने शंका उपस्थित केली
“मी शिक्षकांची प्रोफाईल चेक केली, लायब्ररीतच तर पडलेली आहे”
“मग ?”
“मग काय ? वसतिगृह, ब्लड ग्रुप टेस्टिंग… आठवतंय का ?”
“हो, पण अजून बऱ्याच लोकांचे ब्लडग्रुप A Positive असतील, काहीपण तर्क काढतेस तू”
रेणुका मात्र विचारांत गुंतलेली होती
“आधी मला क्षुल्लक वाटलं होतं पण आता कळालं” ती स्वतःशीच बोलल्यासारखी बोलली
“काय ?”
“त्या दिवशी वसतिगृहातून परत येतांना पायऱ्यावर मला गोळ्यांचं पाकीट दिसलं होतं”
“मग त्यात काय एवढं ?” स्नेहलने ती गोष्ट झटकून टाकली
“त्या Blood Pressure च्या गोळ्या होत्या. माझ्या शेजारचे काकासुद्धा ह्या गोळ्या घेतात.”
“हो का ? मग तिथे महाले सर असू शकतात.”
“मी काय म्हणते, उद्या रविवार आहे. कॉलेजमध्ये कुणीच नसणार. आपण वसतिगृहात जाऊ अन काही क्ल्यू मिळतो का हे शोधू. चालेल ?” अपेक्षाने तिघींकडे बघत विचारलं.
“ठीक आहे” शुभागींने मान डोलावली.

दुसऱ्या दिवशी पहाटेच त्या चौघी होस्टेलमध्ये आल्या. रेणुकाने नोंदी घेण्यासाठी वही घेतली होती.
त्या चौघीजणी तिसऱ्या मजल्यावरच्या खोलीत गेल्या. तिकडे कुणीच फिरकत नसल्याने सर्व वस्तू जिथल्या तिथे होत्या. पावलांचे ठसेही तसेच होते.
“शुभांगी, हे बघ इथे दोन प्रकारचे ठसे आहेत.” स्नेहल ठसे दाखवत म्हणाली
“बरोबर. बाकी आपल्या सँडल्सचे आहेत.”
त्यांनी ते नवीन ठसे काळजीपूर्वक बघायला सुरुवात केली.
“हे ठसे चपलांचे असतील की बुटांचे गं ?”
“ते कसं सांगणार ! हा, पण एका प्रकारचे ठसे छोटे आहेत अन दुसरे मोठे. छोटा ठसा स्नेहलच्या सॅंडलएवढाच आहे”
“म्हणजे त्या माणसाची उंची जवळपास हिच्याएवढी असेल.”
“माणूसच कशावरून ?”
“कारण याची टाच स्पष्ट उमटलेली आहे. म्हणजे सॅंडल असेल किंवा बूट. पण याचा सोल बघ किती रुंद आहे, सॅंडल अशी रुंद नसते”
“पटतंय.”
“मलाही पटतंय.”
“ए, हे दुसरे ठसे बघ. अर्धवट उमटलेत. समोरचा भाग दिसत नाही.”
“गुड निरीक्षण. ती कोल्हापुरी चप्पल असेल. कारण त्याचं समोरचं तोंड वरच्या दिशेने वळवलेलं असतं. शिवाय ठसे बरेच मोठे आहेत, म्हणजे तो माणूस उंच असावा.”
“महाले सर कोल्हापुरी चपला घालतात, ब्लड ग्रुप, B. P. च्या गोळ्या अन आता हे ठसे. त्या दिवशी नक्कीच महाले सर आले असतील.”
“युप्प. हुशार आहोत ग आपण. खी: खी:”
“हो, शुभे, तुझ्या मोबाईलमध्ये फोटो काढून ठेव दोन्ही ठशांचा”
“ओक्के.”

खिचिक
खिचिक

“ए जायच्या आधी एक सेल्फी काढुयात आपला”
चौघीजणी खुर्च्याँच्या आजुबाजुला बसल्या. प्रत्येकीने एकेक पोज घेतली. स्नेहलने फ्रंट कॅमेरा सुरू करून मोबाईल दूर धरला

खिचिक
खिचिक

चौघीजणी अजून थोडावेळ फिरल्या, पण त्यांना अजून काही सापडलं नाही किंवा त्यांचा तर्क यापलीकडे गेला नाही. शेवटी कंटाळून त्या खाली आल्या. परत येताना...
“हा आवाज कसला येतोय ?” अपेक्षाने आवाजाकडे लक्ष वेधलं
“या भिंतीच्या पलीकडे स्टोअर रूम आहे. आला असेल बोच्या नाहीतर घुबड” अपेक्षा
“घुबड साला, रविवारीपण हिंडतो. चला घरी जाऊ”
नंतर त्या चौघी आपापल्या घरांकडे चालत्या झाल्या.

दुसऱ्या दिवशी केमिस्ट्रीचं प्रॅक्टिकल होतं. Purification Of Metals असं फळ्यावर मोठ्ठ्या अक्षरांत लिहलेलं होतं. त्याखाली किडमिड्या अक्षरांत संपूर्ण मेथड मांडलेली होती. विद्यार्थी त्यानुसार वेगवेगळे केमिकल्स बिनधास्त ओतत होते. चुकलं तरी चिंता नव्हती. कॉलेजचे अर्धे केमिकल्स वापरले जात होते व अर्धे फेकून दिले जात होते. अधूनमधून काही ना काही फुटायचं, जहाल केमिकल्स गायब व्हायचे, लिटमस पेपर पळून जायचे. कॉलेजच्या उपकारांचे पांग फिटायचे.

नेहमीप्रमाणे शुभांगी अँड कंपनी थोड्या उशिरानेच उगवली. लॅबमध्ये कुंभमेळ्यासारखी गर्दी उसळली होती, कुणाचा कुणाला मेळ नव्हता. कारण आज मुलामुलींच्या बॅचेस एकत्र करण्यात आल्या होत्या. त्यामुळे ह्या चौघी आल्याचं कुणाच्या लक्षात आलं नाही. पण टेबलावर जागाच रिकामी नव्हती. शेवटी त्यांना ऑफिसच्या बाजूचे दोन रिकामे बेसीन्स दिसले, पैकी एका बेसिनवर चंचुपात्र, परिक्षानळी वगैरे उपडे ठेवलेले होते. चौघीजणी धावत तिथे गेल्या. केमिकल्स वगैरे गोळा केले. स्नेहलने लोखंडाचे काही तुकडे आणले.

“थांब गं, आधी मला डब्बा धुवू दे.” स्नेहल जेवणाचा संपलेला डबा बॅगबाहेर काढत म्हणाली.
“बाहेरच्या नळावर धू ना पागल. इथे पाणी सांडलं तर मास्तर ओरडेल ना” अपेक्षा
“काही नाही होत गं, आपलंच कॉलेज आहे.”
स्नेहलने भरपूर पाणी सांडून खळाळून डबा धुतला. गर्दीमुळे कुणाचंच तिकडे लक्ष नव्हतं.
“शीट यार”
“काय झालं ?”
“सगळं पाणी बेसिनमध्येच साचलं. बहुतेक पाईपात कचरं अडकलंय” स्नेहल
“तरी मी हिला सांगत होते इथे डबा धुवू नको. कुणी बघितलं म्हणजे”
स्नेहलने इकडेतिकडे बघत बेसिनची जाळी उपसली. नंतर पाईपात पेन टाकून आत फसलेलं कचरं बाहेर काढलं. रस्ता मोकळा झाल्यामुळे सगळं पाणी सुळ्ळकन निघून गेलं. चौघींनी सुटकेचा निःश्वास टाकला.
“हे कचऱ्यात अडकलेलं पिवळं काय आहे ?!” रेणुका
शुभांगीने जवळ जाऊन निरखून पाहिलं
“खरंच की ! धातूचे कण दिसताहेत”
“गोल्ड तर नसेल ? !!” अपेक्षा उसळत म्हणाली.
“वेडी आहेस का ? एवढं महाग सोनं इथे कसंकाय येईल, पितळ असेल ते” शुभांगीने तिचं म्हणणं उडवून लावलं.
“बहुतेक. पण याचंही प्युरीफिकेशन करूयात” अपेक्षा

चौघींनी फळ्यावरील लिखाणाचा कसाबसा अर्थ लावून प्युरीफिकेशन केलं. यामुळे धातूचा रंग एकतर बदलणार होता किंवा त्यावर वेगवेगळ्या रंगांचा थर चढणार होता. त्यावरून तो कुठला धातू, शुद्ध की अशुद्ध वगैरे समजणार होतं. प्रॅक्टिकल बुकमध्ये त्याचं कोष्टक दिलेलं होतं. दिलेल्या प्रक्रियेप्रमाणे सगळा प्रयोग करण्यात आला. पिवळ्या धातूच्या तुकड्यावर पांढरट रंगाची झाक चढली. कोष्टके चाळण्यात आई.
“White layered AuO2, Metal : Gold, Purity : 80 – 90 %” हा परिणाम वाचताच “वॉव S S” असे चार उदगार एकाचवेळी बाहेर पडले.
“म्हणजे हे सोनं आहे !! Pure gold” स्नेहल किंचाळली
“चूप बैस” तिचं तोंड दाबत शुभांगी म्हणाली
“एक तुकडा आधीच पाईपात होता म्हणजे…”
“… म्हणजे आपल्या आधी कुणीतरी हे टेस्टिंग केलं. त्याने या स्नेहलएवढं पाणी सांडलं नसेल. म्हणून पाईप चोकअप झालाय हे त्याच्या लक्षातच आलं नाही.” रेणुकाने शुभागींचं वाक्य पूर्ण केलं.
“आज सोमवार. शनिवारी आपलं टायट्रेशन झालं होतं. आता सकाळचे आठ वाजलेत, म्हणजे काल कुणीतरी हे काम केलं असावं.” अपेक्षा घड्याळाकडे पाहत म्हणाली.
“काल आपल्याला आवाज ऐकू आला होता. सरांना विचारू ?” म्हणता म्हणता स्नेहल सरांकडे निघाली.
“थांब इथेच. सध्या कुणाजवळ काहीच नका बोलू. आपण पाहू नंतर काय करायचं ते” शुभांगी तिचा हात ओढत म्हणाली.
“आज्तुम्ही PurificationOfMetals केलं, पुढच्या वेळी Non Metals घेऊ. तुमच्यापैकी बरेचजण चुकीचं लिहतात. रिंढे, Ferrous, Zink असं पूर्णवाक्यात्न्सतात लिहत. फक्त Fe, Zn असं लिहायचं.” बोचे दटावणीच्या सुरात म्हणाला.
“सर तुम्हीच तर लिहिलंय फळ्यावर” रिंढे फळ्याकडे बोट दाखवत म्हणाली.
सर्वांच्या नजरा गर्रकन फळ्याकडे वळल्या, त्यावरसुद्धा रसायनांची पूर्ण वाक्यात नावे लिहलेली होती. ते बघून बोचे चिडला.
“ते S सोडा. फक्त तुम्ही बरोबरलिहा. तुमच्या मायबापाला...”
“… फसवू नका तुम्ही” एका विद्यार्थ्याने त्याचं वाक्य पूर्ण केलं
“शटाप. मी शॉर्ट फॉर्मच वापरतोनेहमी”
या वाक्याबरोबर लॅबमध्ये बारीक हसण्याचे आवाज उमटले. चेहरे मात्र दिसले नाहीत. ते बघून बोचे अजून चिडला.
“तुम्हाला खोटंवाटतंका ? हे बघा” असं त्याने खिशात असलेला हात मोबाईलसकट बाहेर खेचला. त्यावर मॅसेज बॉक्स उघडला. “हे पहा मी मॅसेजसुद्धा शॉर्ट फॉर्ममधेच पाठवतो.” त्याने दुरून मोबाईल दाखवत म्हटलं
“बघू बघू” म्हणत त्याला काही कळण्याच्या आतच दोनचार मुलींनी मोबाईल खेचून घेतला.
“अरे, मोबाईल्आणा इकडे” बोचे ओरडला. पण मुलींवर काहीच परिणाम झाला नाही. त्या भराभर मॅसेज वाचत होत्या. बोचे धडपडत समोर आला. तेवढ्यात मागून मुलींची परत एक टोळी आली अन त्याला धक्का देऊन समोर घुसली. बराच वेळाने त्याला मोबाईल मिळाला.

प्रॅक्टिकल संपल्यावर सगळ्या मुली बाहेर पडल्या.
“मी एक विशेष मॅसेज वाचला मोबाईलवर” शुभांगी हळूच म्हणाली
“कुठला गं ?”
“Au 79 - Send Send “ असं लिहिलेलं होतं”
“काय अर्थ असेल याचा ?”
“Au 79 वरून काय वाटतं ? Au म्हणजे काय ?”
“ऑरम – सोने”
“त्याचा अनुक्रमांक काय ?”
“ओह… 79 ! Au 79 Send Send म्हणजे पाठवा पाठवा” स्नेहल चुटकी वाजवत म्हणाली.

“तू इतक्यात महाले सरांना कॉन्टॅक्ट केलाय का ?” रेणुकाने लॅबबाहेर पडताच प्रश्न फेकला.
“नाही, पण का ? तू लावला का ?”
“नाही, पण माझ्या वडिलांना त्यांच्याशी काम होतं तर लावला होता. पण सर बोलत नाहीत, त्यांच्या घरचं दुसरंच कुणीतरी बोलतं.”
“सर कसे बोलणार, ते कोमात आहेत न” शुभांगी
“मी ऐकलंय की ते त्यांच्या नातेवाईकांकडे मुंबईला आहेत, ट्रीटमेंट घेत आहेत” स्नेहलने माहिती पुरवली.
“अच्छा.” रेणुकाने मान डोलावली पण तिच्या डोक्यात वेगळेच विचार सुरू होते.
“शुभांगी, तू वसतिगृहातील जे दुसरे ठसे आहेत ते चेक केलेत का ?”
“हो, माझ्या ओळखीचे काका आहेत ज्यांचं चपला बुटांचं दुकान आहे. त्यांना त्या ठशाचा आकार सांगितला अन फोटो दाखवला.”
“मग ?”
“ते म्हणाले की तो सहा नंबरच्या बुटाचा ठसा आहे. मग मी सगळे ब्रँडेड बूट काढून बघितले, त्यांचे तळवे चेक केले.”
“अरे वा ! सापडलं का मग काही ?”
“हो तर. त्या ठशावर जी डिझाइन आहे ती बाटाच्या बुटावर सापडली.”
“गुड जॉब शुभे”
“थँक्स. आज मी बूट चेक करत होते. गेस मला काय सापडलं ?”
“काय ?”
“बोचे सरही बाटाचा बूट वापरतात. पाच किंवा सहा नंबरचा असेल.”
“हू… हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. प्रश्न हा आहे की अजून खात्री कशी करायची” अपेक्षा डोकं खाजवत म्हणाली.
“पाठलाग करायचा का ? ”
“नको. कुणी पहिलं तर आपल्याला टपोरी समजतील. खी: खी:”
"बोचे फोनवर बोलतांना चुपचाप ऐकायचं का ? प्रॅक्टिकल सुरू असताना वगैरे ”
“ते गुप्त गप्पा कॉलेजमधून थोड्याच करणार आहेत ?”
“मला तर वाटतं फोन टॅप व्हायच्या भीतीने ते दोघे बोलतच नसतील. नाहीतर मॅसेज कशाला पाठवले असते”
“हो, हे पटण्यासारखं आहे. पण मॅसेज कोणत्या नंबरला पाठवले हे कसं कळणार ?”
“आपण…”
“काय आपण ?”
“नाही जाऊदे”
“सांग न”
“आपण बोचेचा मोबाईल चोरला तर ?”
चौघींनीही एकमेकींकडे पाहिलं. त्यांच्या चेहऱ्यावर गुप्तहेरी हास्य पसरलं होतं.

पुढच्या प्रॅक्टिकलपासून बोचेवर नजर ठेवायला सुरुवात झाली. पूर्वी टेबलावर मोबाईल ठेवून बिनधास्त हॉलभर फिरणारा बोचे इतक्यात मोबाईल खिशातच ठेऊ लागला होता. फोनवर बोलायचं असलं किंवा व्हाट्सअॅप खेळायचं असलं तरच तो बाहेर पडायचा. मोबाईल पळवणं खूप अवघड गोष्ट होती. पण तरीही ह्या चौघीजणी संधीच्या शोधात होत्या. प्रॅक्टिकलच्या प्रत्येक बॅचला त्यांच्यातल्या दोघीतरी बसू लागल्या. मोबाईल टेबलावर असला की त्यांच्यातलं कुणीतरी बोचेला बोलवायचं. पण तो मोबाईल सोबत घेऊन यायचा. त्यामुळे तो पळवणं जमायचं नाही. हवी तशी संधी मिळत नव्हती.

अखेर चार दिवसांनी तशी संधी मिळाली.
चौकडील्या दोघीजणी बोचेच्या समोरच्या रांगेतील उजव्या बाजूला अन दोघी डाव्या बाजूला उभ्या होत्या. त्यांच्यापासून दरवाजा जवळच होता. बोचे मोबाईल चार्जिंगला लावून व्हाट्सअॅप खेळत बसला होता. प्रॅक्टिकल सुटलं, हुल्लड माजली. सर्व विद्यार्थी लॅबबाहेर पडायला तडफडू लागले. बोचेचं तिकडे अजिबात लक्ष नव्हतं. तेवढ्यात…

‘टचकन’ ‘टचकन’

उजव्या बाजूने एक परीक्षानळी अन एक चंचुपात्र फुटण्याचे आवाज ऐकू आले. दोनतीन जणी घाईघाईत सटकण्याचा प्रयत्न करू लागल्या. पण बोचे जरी फाकफूक्या असला तरी त्याचे कान तिखट होते. तो घाईघाईत उठला “थांबा, इकडं या” असं ओरडत आवाजाच्या दिशेने पळत गेला. मुलींचा गोंधळ उडाला, त्याने मुलींना गाठलं अन झापझाप झापलं. शेवटी “पळा” असं ओरडून तो परत आला. पण आता गोंधळण्याची वेळ त्याची होती, कारण मोबाईल गायब झाला होता.
चार्जरचं शेपूट मजेत झोके खेळत होतं.

* * *

“चला काम फत्ते झालं” आपल्या घरी खुर्चीत बसत शुभांगी म्हणाली. इतर तिघी तिथेच बसलेल्या होत्या.
“बोंबला… हा तर लॉक केलेला आहे. ‘पॅटर्न लॉक’.” अपेक्षा डोक्याला हात लावत म्हणाली
बाकी तिघींनी एकमेकींकडे पाहिलं अन टाळ्या देत हसू लागल्या.
“हसायला काय झालं !?” अपेक्षा
“त्या मोबाईलचा पासवर्ड अर्ध्या कॉलेजला माहीत आहे, तुलाच कसा नाही माहीत !” स्नेहल हसता हसता म्हणाली. तिने मोबाईल हिसकावून घेतला अन क्षणभरात पासवर्ड टाकून उघडला.

मग त्यांनी मॅसेज वाचले, ते कोणत्या नंबरला पाठवलेत ते बघितलं. कॉललिस्ट चेक केली. बरेचसे मॅसेज सांकेतिक भाषेत असल्याने त्यांना कळाले नाही. पण ते सगळे मॅसेज एकाच नंबरला पाठवलेले होते. तो नंबर कुणाचा आहे हे त्यांनी True Caller वर शोधलं. पण फायदा झाला नाही.

“आता काय करायचं ग ?” अपेक्षाने परत डोक्याला हात लावत विचारलं.
“आता एकच ऑप्शन आहे.” शुभांगी
“कुठला ?” तिघींनी एकसाथ विचारलं.
“मी सांगते तो मॅसेज टाईप कर”
स्नेहलने बोचेच्या मोबाईलवर मॅसेज टाईप केला –
“Au 79 – Danger Danger – Come at 9.30 pm at our place ”
जाळं पसरलं गेलं होतं, बकरा खुद कटने को तयार था.

* * *

दिवसाला गिळून टाकत भयाण रात्र उगवली. कॉलेजचा वॉचमन होस्टेलच्या विरुद्ध दिशेला चकरा मारत होता. बंद वसतिगृहाच्या आवारात रातकीडा नावाचा एकमेव सजीव प्राणी होता. भकास परिसरातील निशब्द शांतता रातकिड्यांच्या तोंडून टाहो फोडत होती. साधारण ९ वाजण्याच्या सुमारास पंधरा वीस पावलं वसतिगृहात शिरली. दूरवरच्या झाडावर बसलेलं घुबड ( खरोखरचं ) दचकून मागे हटलं. पावले हळूहळू जिना चढून वर गेली, तिसऱ्या मजल्यावर दबत जाऊन थांबली.पुन्हा सगळीकडे शांतताच शांतता पसरली. आता अंधारराक्षस अधिकच भेसूर वाटू लागला. एकेक मिनिट तासासारखा भासू लागला. तिसऱ्या मजल्यावरच्या तुटक्या खिडकीकडे अंधाराचं लक्ष वळलं नाही, त्या खिडकीला डोळे फुटलेत हे त्यालाही कळलं नाही.

घड्याळाचा काटा ९.३० वर टेकला ९.३५, ९.४० पर्यंत पळत गेला. बरोब्बर ९.४० वाजता दोन पावलं घाईघाईत आली, अंधारातल्या डोळ्यांनी इकडंतिकडं बघितलं अन धडधड धडधड आवाज करत पावलं वरच्या मजल्यावर धावत गेली.
तिसरा मजला अंधारात डुंबलेला होता. फक्त कोपऱ्यातल्या खोलीतून प्रकाशाचे काही किरण बाहेर डोकावत होते. वर आलेली व्यक्ती उजेडाचा मागोवा घेत त्या खोलीत घुसली. खोलीच्या मध्यभागी एक टेबल होता, टेबलावर लटकवलेला बल्ब जळत होता. टेबलाच्या दोन्हीबाजुंनी खुर्च्या होत्या, पैकी एका खुर्चीवर कुणीतरी पाठमोरं बसलेलं होतं. नुकतीच खोलीत शिरलेली व्यक्ती निर्धास्त झाली. त्याने आपल्या तोंडावर गुंडाळलेली मफलर दूर केली अन विचारलं,
“बोला बोचे सर, कशाला बोलावलंय मला ?”
खुर्चीवरच्या व्यक्तीने मागे वळून पाहिलं...

“प्रिन्सिपल साहेब तुम्ही !!” ती व्यक्ती भीतीयुक्त आश्चर्याने ओरडली.
“फक्त तेच नाही, आम्हीसुद्धा आलोत महाले सर” मागच्या बाजूने जोरकस आवाज आला. आवाजाच्या दिशेनं महाले सरांनी झटकन वळून पाहिलं. पाठीमागे शुभांगी अँड कंपनी, त्यांच्या घरचे लोक अन पोलीस उभे होते. महाले सरांची बोबडी वळली. ते ततं ममं करत जागीच उभे होते.
“तुमच्यावर आम्ही अचानक झडप घालणार होतो, पण त्यामुळे तुम्ही खरोखरचा अटॅक येऊन कोसळले असता.” प्रिन्सिपल खड्या
आवाजात म्हणाले
“स… स… सॉरी सर. बोच्याने… तुम्हाला कसं…” महाले सर धड एक वाक्यही पूर्ण करू शकत नव्हते.
“ते तर तुम्हाला ह्या मुलीच सांगतील.” इन्स्पेक्टर चौकडीकडे कौतुकाने बघत म्हणाले. चौघीजणी समोर आल्या अन त्यांनी आलटून पालटून सगळी कथा सांगितली.
“मग… महाले सर, तुमच्या साथीदाराला भेटायला जाऊ. तिथेच सगळा खुलासा होईल.” इन्स्पेक्टर

सगळी फौज तडक बोचेच्या घरी धडकली. इन्स्पेक्टरची खणखणीत चापट कानाखाली बसल्यावर बोचे बरोब्बर लाईनवर आला.
“सांगतोसांगतो” एक हात गालावर ठेवून तो सांगू लागला. मोठ्या कष्टाने, काही वाक्य परत सांगायला लावल्यावर पोलिसांना खालील अर्थ लागला :
“साधारणतः तीन आठवड्यांपूर्वी या घटनेला सुरुवात झाली. मी एका रात्री सहकारी बँकेमागच्या झाडीतून चाललो होतो, एवढ्या रात्री तिथे कुणी नसतं. पण मला कुणाचीतरी चाहूल लागली, मी जागीच थांबलो अन कानोसा घेऊ लागलो. मला दिसलं की तोंडांना काळा कपडा बांधलेले काही लोक पळत आहेत. मी लपलो अन बघू लागलो. त्यांच्याजवळ एक बॅग होती, ती त्यांनी एका ठिकाणी खड्डा करून लपवली. नंतर ते पळून गेले. बहुतेक त्यांच्यामागे पोलीस लागले होते, कारण हायवेवर सायरनचे आवाज ऐकू येत होते. मी थोडावेळ तिथेच लपून बसलो अन सगळं शांत झाल्यावर बाहेर पडलो. तो गड्डा उकरून मी बॅग बाहेर काढली. आत चक्क सोनं होतं !”
“बँकेवर दरोडा टाकून चोरलेलं सोनं होतं ते” इन्स्पेक्टर
“मलाही तसंच वाटलं. मी स्वतःची समजूत घातली की हे सोनं आपण चोरलं नाहीये न. ते नशिबाने सापडलं. मग काय हरकत आहे स्वतःजवळ ठेवायला. तसही मी संस्थेत टेंपररी आहे, पर्मनंट व्हायचं असेल तर पंचवीस लाख भरावे लागणार आहेत अन पैसे मिळाल्याशिवाय अध्यक्ष…”
प्रिन्सिपल साहेबांनी घसा खाकरला “विषयांतर होतंय.”
“सॉरी, तर ते सोनं मी घरी किंवा बँकेत ठेवू शकत नव्हतो. मग माझ्या डोक्यात केमिस्ट्रीची लॅब अन तिथली स्टोअर रूम आली. पण तिथले प्रमुख महाले सर होते. सोन्याचा नुसता विषय काढला तर त्यांचा बीपी वाढला, मग त्याच्या रक्षणाचा भार कसा सोसवणार. म्हणून मी एक प्लॅन
बनवला.”
“सरांनी मला अटॅक येण्याचं नाटक करायला लावलं. नंतर मी माझ्याच घरात दडून बसणार होतो. त्यामुळे लॅबचा सगळा कारभार बोचेच्या हातात गेला. माझेही बरेच फायदे होणार होते. सोन्याचा हिस्सा मिळणार पण रक्षण करायचं काम नाही. शिवाय मला आरामही मिळणार अन पगारही चालू राहणार. तसाही मला शिकवायचा कंटाळाच यायचा. एवढी मोठी ऑफर नाकारणं शक्यच नव्हतं. पण या बोच्यानं गडबड केली…” त्यांनी दातओठ खात म्हटलं
“मी कायकेलं ?” बोचे चाचरत म्हणाला
“तुम्ही सोनं बाहेर काढलं होतं का ?” इन्स्पेक्टरने विचारलं
“हो. एकदा एकामुलीनेमला सोन्याच्या प्युरीफिकेशन बद्दलविचारलं. मगमलासुद्धा सोनंखरंआहेकीखोटंहे तपासून बघण्याची इच्छानिर्माणझाली. म्हणून मी रविवारी सोनं बाहेर्काढलं.”
“बोच्या, तू मला फसवलं. मला चुकीचा मॅसेज करून होस्टेलवर बोलावलं. हरामखोरा…” ते त्याची कॉलर पकडायला पुढे धावले, दोघा तिघांनी त्यांना मागे ओढलं
“तुम्हाला काहीतरी गैरसमज्झालाय. माझामोबाईल कालचचोरीलागेला. कोणत्या बदमासानं चोरलाकाय्माहीत”
“आम्ही चोरला.” चौकडी एकसाथ बोलली
“शिक्षक जर लाखो रुपयांचं सोनं चोरू शकतात तर त्यांच्या विद्यार्थ्यांना एक साधा मोबाईल चोरणं काय अवघड आहे.” प्रिन्सिपल साहेब आपली फ्रेंच कट दाढी खाजवत म्हणाले. बोचेची मान शरमेने खाली झुकली.
“वेल डन माय गर्ल्स. एखाद्या निष्णात गुप्तहेराला लाजवेल असं काम केलंत तुम्ही” प्रिन्सिपल शाबासकी देत म्हणाले
“थँक यु सर. कित्येक महिन्यांनी तुमचं दर्शन झालं” शुभांगी विनयाने म्हणाली
“ए, यांना तर केसं आहेत. ती टपरी कॅटरिना म्हणाली होती की आपले प्रिन्सिपल टकले आहेत.” स्नेहल शुभांगीच्या कानात कुजबुजली.
“चूप बस. बी सिरीयस.”

“आदरणीय बोचे सर, कृपया आम्हाला लॅबच्या आणि स्टोअर रूमच्या चाब्या द्याल का ?” इन्स्पेक्टर
“ऑफ कोर्स सर, माय प्लेझर” असं म्हणत बोचे सरांनी १८० च्या कोनात वळले, नंतर त्यांनी आपल्या करदोड्याला बांधलेल्या चाब्या काढून इन्स्पेक्टरच्या हवाली केल्या.
“हवालदार, घाला रे या माकडांना बेड्या. आज माल जप्त करू अन उद्या यांची धिंड काढू कॉलेजमधून.”
दोघांना हातकड्या घालण्यात आल्या. सर्वजण पोलीस जीपपर्यंत गेले तेवढ्यात तिकडून कावळे सर, भस्म्या सर, हिटलर सर ( ही एकाच व्यक्तीची नावे आहेत ) येताना दिसले.
“थांबा थांबा” असं ओरडत ते जीपपर्यंत आले. एवढ्याशा धावण्याने त्यांना धाप लागली होती.
“हवालदार, हा यांचा साथीदार दिसतो. पकडा याला” इन्स्पेक्टर
“नाही नाही. मी कावळे सर, झुलॉजीत M.Sc, Biology शिकवतो अन एक्स्ट्रा क्लासेस घेतो.” कावळे सर घाईघाईने म्हणाले
“बरं मग ?” इन्स्पेक्टरनी विशेष उत्सुकता दाखवली नाही.
“मी या मुलींना शिकवायला आहे. यांचं अभिनंदन करायला आलो.” सर मुलींकडे बघत म्हणाले.
“थँक यु सर” चौघींनी मान झुकवून आभार व्यक्त केले
“पोरींनी, आज तुम्ही फार मोठं काम केलं. तुमच्या वडीलांना घेऊन या एकदा घरी. मोठा बोकड कापू, हा: हा: हा:” स्वतःशीच हसता हसता ते स्वप्नात रंगले. इन्स्पेक्टर आरोपींना गाडीत कोंबून निघून गेले.
“बरं मी काय म्हणतो, तुम्हाला अजून एखादं रहस्य सोडवायला आवडेल का ?” कावळे सरांनी विचारलं
“नक्कीच” चौघीजणी आनंदाने उत्तरल्या.
“तुमचे ते क्लासेसवाले… त्यांना काही भेंडं येत नाही. आपण एक्स्ट्रा क्लास घेत असतो, कॉलेजमध्ये. पण तिकडं कुणी काळं कुत्रं फिरकत नाही. असं का होतं हे रहस्य तुम्ही शोधा. बक्षीस म्हणून माझ्यातर्फे तुम्हाला एक्स्ट्रा क्लास फ्री फ्री फ्री”
चारपाच वेळा ते फ्री फ्री ओरडले, नंतर ‘सगळ्या विद्यार्थ्यांनी ट्युशन्स सोडल्या आहेत अन ते कॉलेजच्या एक्स्ट्रा क्लासमध्ये बसलेले आहेत’ असं स्वप्न रंगवण्यात गुंगले. काही क्षणांतच दोन घोडी खिंकाळल्याचे आवाज आले. सरांनी दचकून त्या दिशेने पाहिलं तर चौघीजणी स्कुटीवरून पळताना दिसल्या.

भास की सत्य या नादात ते “थांबा थांबा” असं ओरडत रस्त्यावरून धावत सुटले.

---------------------------------------------------------------------

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान !
पण अजुन अपेक्षा होत्या..

आवडली Happy
बिनधास्त चित्रपटाची आठवण झाली

@अग्निपंख

थोडी 'छपरी' कॅटॅगरी कडे वळणारी आहे.
>> अगदी अगदी Lol
तोच प्रयत्न होता

छान जमलीय कथा! तुमच्या कथा वाचायला आवडतात! Happy पुढिल कथेच्या प्रतिक्षेत! Happy

Lol
टैम्पास, वन टाईम रीड !

केमिस्ट्री लॅबमधल्या वातावरणाचं वर्णन मस्त केलंय.

त्या मुली प्रथम जुन्या हॉस्टेलमध्ये जातात, तेव्हा खुर्चीवर रक्त 'सांडलेलं' कसं काय असतं, ते नाही कळलं.
बारावीच्या अभ्यासक्रमात आता ब्लड-ग्रूप टेस्टिंगचं प्रॅक्टिकल असतं का? आमच्यावेळी नव्ह्तं Proud

धन्यवाद ललिता-प्रीति Happy

>> “ हे बघा रक्त “ ती दचकून ओरडली.
“रक्त ??! खरंच की”
“इथे तुटलेली पट्टी दिसत आहे. मला वाटतं ही पट्टी लागल्यामुळेच कुणाचंतरी रक्त निघालं असेल.” शुभागींने अंदाज मांडला.
( जुन्या खुर्च्यांच्या सांध्यांना जोडण्यासाठी लोखंडी पट्ट्या वापरत, त्यातली एखादी निघाली असेल. तिची टोकदार कडा उठता / बसताना लागली. )

>> Blood group testing चं practical आताच्या अभ्यासक्रमात आहे

बर्याच दिवसांनी 'अॅस्ट्रोनाट विनय' नाव पाहिलं आणि लगेच वाचायला घेतली>>>> मी पण.
पण तितकी नाही आवडली. ओके वाटली. जास्त अपेक्षा होत्या

बर्याच दिवसांनी 'अॅस्ट्रोनाट विनय' नाव पाहिलं आणि लगेच वाचायला घेतली>>>> मी पण
चांगली आहे पण जरा जुळवलेली वाटली. त्या मुली जुन्या होस्टेलमध्ये काही विशेष कारणाशिवाय जातात हे तितकेसे पटले नाही. काहीही कारण देता आले असते.

@मॅगी.
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

त्या दिवशी कॉलेजमध्ये सुनसान वातावरण होतं, शिपाईसुद्धा दिसत नव्हता, म्हणून शुभांगीला या संधीचा फायदा घ्यावा असं वाटलं, अन तिने वसतिगृहात जाण्याचा विचार मांडला.
तिथे जाण्याची त्यांची आधीपासूनची इच्छा होती ( हे रेणुकाच्या वाक्यात आलेलं आहे )

कदाचित त्या paragraph मधून मला काय म्हणायचंय ते स्पष्ट झालं नसावं.म्हणून तुमच्या शंकेवर विचार करून हा मुद्दा मी अधिक स्पष्ट केलाय.

धन्यवाद सस्मित.
'जास्त अपेक्षा होत्या' हे वाचून आनंद वाटला.

@अॅस्ट्रोनाॅट विनय,
छान झाली आहे कथा. अजून खुलवायला स्कोप होता.
पुलेशु

Lol

नामही काफी है
अॅस्ट्रोनॉट विनय
अजुन लिहा
आणी नियमीत येऊ द्या

छान लिहिले आहे अॅस्ट्रोनाट विनय...तुमच्या कथा नेहमीच मस्त असतात त्या मुळे अपेक्षा जरा जास्तच उंच असतात Happy पण तरी ही ,ही कथा ही चांगलीच आहे ...थोडा लवकर टाकत रहा तुमच्या कथा..वाचायला आवडतात

Pages