खेळ -प्रा. मिलिंद जोशी

Submitted by बेफ़िकीर on 25 July, 2018 - 22:45

खेळ (लेखक प्रा. मिलिंद जोशी) - वार्‍यावर लहरणारा दुपट्टा
==========

प्रा. मिलिंद जोशी लिखित 'खेळ'हा कथासंग्रह नुकताच प्रकाशित झाला व तो वाचनातही आला. प्रा. मिलिंद जोशी हे माझे समवयीन असले तरीही त्यांचा व्यासंग आणि वक्तृत्व हे एखाद्या ज्येष्ठ वयाच्या साहित्यिकासारखे आहेत. मी त्यांच्या व्याख्यानांचा चाहता आहे. त्यांचे इतर साहित्य मी आजवर वाचलेले नाही. त्यांच्यातील कथाकार कसा आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता असल्याने खेळ हा संग्रह वाचला.

ह्या कथासंग्रहातील कथांची अनेक बरी-वाईट वैशिष्ट्ये जाणवली व त्याबाबत एक वाचक म्हणून कथन करत आहे.

अर्थातच प्रत्येक कथेचे कथानक स्वतंत्र असले तरी सायकलच्या स्पोक्ससारखे त्यांचे केंद्रस्थान काहीसे एकच असावे असे वाटत राहते. हे केंद्रस्थान आहे संस्कृतीतील समस्या! काही समस्या सामाजिक आहेत तर काही मानसिक, वैचारीक वगैरे! हा कथासंग्रह असल्याने एकुण कथांवर एकत्रित भाष्य करणे हे अवघड असले तरी ते मी लेखाच्या शेवटी करणारच आहे. मात्र त्यापूर्वी एकेक कथा वाचून जागृत झालेल्या जाणिवा, मनातील नैसर्गीक अभिप्राय, ह्या कथांचे आजमितीला असलेले स्थान, संदर्भ, समकालीनता, कथांमधून पुढे आलेला विचार, त्या विचाराची वाचकाला विचारात पाडण्याची क्षमता ह्यावर लिहिणे आवश्यक आहे.

खेळ ह्या कथेमध्ये नम्रता हे स्त्री पात्र आयुष्याच्या मध्यावर एका शिबिरामुळे अंतर्मुख होते व तिच्या स्वतःच्या वैवाहिक जीवनात तिनेच केलेल्या तीन स्वतंत्र प्रतारणांबाबत पश्चात्तापदग्ध होऊन स्वतःला दोष देऊ लागते. वास्तविक पाहता आपल्या संस्कृतीत स्त्रीने एक धाडसी पाऊल पुढे टाकून स्वतःहून स्वतःच्या वैवाहिक जीवनातील पावित्र्य उधळत स्वतःच्या मानसिक (शारीरिक किंवा निव्वळ शारीरिक तर नव्हेच नव्हेत) गरजा पूर्ण करण्याकडे झुकणे हे काहीसे अवघड आहे. पण मी म्हणेन की आजच्या काळातील स्त्री अशी पावले जबाबदारीने व विचारांती, किंवा काहीवेळा अविचाराने पण जबाबदारीने उचलतही असेल. ते प्रमाण वाढलेही असेल. मात्र ह्या कथेतील नम्रता एका अश्या टप्प्यावर येते जेथे तिला अंतर्मुख होऊन 'आपण हे काय केले 'असा विचार करावासा वाटतो. माझ्यामते ही कथा कित्येक प्रश्न, कित्येक समस्या समोर आणते.

पहिले म्हणजे, कुटुंबव्यवस्थेला अधिष्ठान मानून शतकानुशतके तगणार्‍या आपल्या संस्कृतीने हे कधीच मान्य करू नये का, की स्त्रीला ह्या चाकोरीतून, भले कोणत्याही कारणासाठी, पण बाहेर पडावेसे वाटू शकते? मग ते कारण तिचा उथळपणा असो वा नवर्‍याची उदासीनता किंवा सहजीवनातील तिला जाणवणारी निरर्थकता! किंवा अगदी केवळ एक व्यक्तीस्वातंत्र्य म्हणून स्त्रीला हे पाऊल उचलावेसे वाटलेच तर अजून किती काळ आपली संस्कृती तोंडात बोटे घालून अग्गोबाई, बापरे, म्हणत बसणार? नम्रताला अपराधीच वाटायला हवे असे तिचे संस्करण का केले जाते? विशेषतः जेव्हा तमाम पुरुष जमात हे स्वातंत्र्य छुपेपणाने किंवा उघडपणे भोगताना आढळते तेव्हा स्त्रीने संस्कृती जोपासण्याची धुरा एकटीने का खांद्यावर घ्यावी? येथे स्वैराचाराचे समर्थन नसून निव्वळ एक साधा प्रश्न आहे की मनातील विचारांना प्रत्यक्षात आणण्यावरील बंधने ही स्त्री पुरुषांसाठी कमी-जास्त असणे आजच्याही काळात योग्य राहील का? मिलिंद जोशी कदाचित त्यांच्याही नकळत हा प्रश्न पेरून जातात. दुसरे म्हणजे लालासाहेब ह्या ज्येष्ठ व्यक्तीने नम्रताला अजिबात अपेक्षा नसताना व्यक्त केलेली इच्छा व काहीश्या'' बळजबरीने केलेली इच्छापूर्ती नम्रताला एका रात्रीतरी शांत झोप देऊन जाते हे कशाचे लक्षण मानायला हवे? भावनिक घुसमटीला आयुष्याचा अविभाज्य भाग मानून चालणार्‍या स्त्रीला मिळू शकणार्‍या मानसिक तृप्ततेची चुणुक ह्यातून दिसत नाही काय? ही कथा अजिबात लैंगीक नाही. किंबहुना, कोणतीच कथा लिहिताना मिलिंद जोशींच्या भाषेचा तोल जराही ढळणे तर दूरच राहो, भाषाशैली शक्य तितकी प्रासादिक व गंभीर ठेवण्याकडे त्यांचा विशेष कल स्पष्ट दिसतो. 'देऊन देऊन तू काय देणार'ह्या मिहिरच्या प्रश्नानेही अंतर्मुख होणारी नम्रता वाचकाला नकळतपणे एक प्रश्न विचारून जाते की स्त्रीकडे देण्यासारखे फक्त स्त्रीत्वच असते का? तिचे स्त्रीत्व हेच तिचे सर्वस्व ह्या संस्करणामुळे आपल्या समाजातील स्त्रीने भोगलेली अगणित व अमोज दु:खे अचानक बोलकी होतात. अर्थात, मिहिर तिला हे वेगळ्या विचारामुळे विचारतो, पण कथा मात्र हाच प्रश्न सादर करते.

वाडासंस्कृती चितारलेली वाडा ही कथा भीषण असली तरी प्रेडिक्टेबल आहे. सुसंस्कृत, उजळ माथ्याने वावरणार्‍या तथाकथित उच्चवर्णियांच्या घरात चार भिंतीआड घडणारे विदारक प्रसंग वाडा ह्या कथेतून संयतपणे समोर येतात. कथा रंगवण्यासाठी आलेली वर्णने तितकीच रंगतदार असायला हवीत ही माझी एक वाचक म्हणून असलेली अपेक्षा येथे पूर्ण होत नाहीत. मिलिंद जोशींमधील कथाकार एकोणीसशे सत्तरच्या दशकातील कादंबर्‍यांप्रमाणे चित्रे रंगवतो व समकालीनता नसल्याने कथेचा अंत येईपर्यंत असे वाटू लागते की मूळ कथानक वेगळे होते व जे आत्तापर्यंत वाचत आलो ते निराळेच! ह्या वर्णनशैलीवर जुन्या (/जुनाट) कथाकारांच्या शैलीचा प्रभाव आढळतो. आजच्या वेगवान युगात पहिल्या पाच ओळींत वाचकाला क्लँप करून टाकणे आवश्यक झालेले आहे. मात्र ही कथाही अनेक सामाजिक समस्या तितक्याच ताकदीने समोर आणते. बेअब्रू होऊ नये म्हणून स्त्रीची केली जाणारी घुसमट आणि पुन्हा बेअब्रूच होऊ नये म्हणून समस्यांना सामोरेच न जाण्याची अलिप्तता हे कलंक आहेत की नाहीत हा प्रश्न कथा विचारते. मुख्य म्हणजे हे विशिष्ट दोन प्रश्न आपल्या समाजात कोणत्याही आणि आजच्याही काळात तितकेच रिलेव्हंट आहेत हा आणखीन निराळाच प्रॉब्लेम कथा पुढे आणते. आपण समाज म्हणून मागासलेलोच आहोत हे सिद्ध होते. बहुतांशी कथांच्या केंद्रस्थानी स्त्री व्यक्तीरेखा असणे हा मिलिंद जोशींच्या कथांमधील मला ताकदवान धागा वाटतो. त्यांनी त्यांच्या शैलीनुसार किंवा कदाचित त्यांच्याही नकळत असे काही प्रश्न विचारलेले आहेत जे फार मूलभूत आहेत. जे अभ्यासक एखाद्या निर्जीव गोष्टीला कथाकाराने जिवंत केले व जणू एक पात्र म्हणून उभे केले वगैरे तथाकथित उच्च अभिरुचीची किंवा स्वयंघोषित व्यासंगी विधाने करतात त्यांची मला कीव येते. ह्या कथेत वाडा हे पात्र आहे की नाही हा प्रश्न महत्वाचा नसून वाडासंस्कृतीने काय काय दडपले हे महत्वाचे आहे. माझ्या धाकट्या व वाया गेलेल्या भावाने माझ्याच सुनेवर हात टाकला हे कुठेही बोलायचे नाही हा वाडामालकाने गडीमाणसांना दिलेला इशारा हे कथेतील सर्वात महत्वाचे वळण आहे असे मला वाटते. येथेच सुनेची बाजू उचलून धरण्याची संधी होती हे तथाकथित उच्च संस्कृतीने जर तेव्हाच मान्य केले असते तर कदाचित आज काही स्त्रिया तरी उजळ माथ्याने जगू शकल्या असत्या. मिलिंद जोशींनी हा प्रसंग मोठ्या आर्ततेने चितारलेला आहे.

झोपाळा कथा हे 'खेळ'ह्या कथासंग्रहाचे सर्वात मोठे आकर्षण ठरायला हवे. मानवी बुद्धीला न झेपू शकणार्‍या व शास्त्रीय निकषावर अजिबात सिद्ध होऊ न शकणार्‍या संकल्पनांनी अद्भुततेचा पेहराव लेवून आजवर किती घोळ घातले आहेत ह्याचे उत्तम उदाहरण म्हणजे ही कथा! एक अख्खे जिवंत व हाडामांसाचे माणूस कसे निरर्थक व वेडे ठरवले जाते आणि त्याची कारणे कशी अज्ञानात दडलेली असतात हे ही कथा फार प्रभावीपणे सांगते. मला झोपाळा कथा प्रचंड आवडली. कथानायिका जगत असतानाही आणि मेल्यावरही अंधश्रद्धा तिची साथ सोडत नाहीत. झोपाळा कथा तर इतरही कित्येक प्रश्न उभे करते. नवर्‍याची बायकोच्या बाबतीत काही ठाम व सपोर्टिव्ह भूमिका असणे किती आवश्यक आहे, एक डोळस समाज बनण्याच्या प्रवासात आपण किती मागे आहोत, मुलांना घरातल्या परिस्थितीबद्दल काय सांगितले जायला हवे, स्त्रीच्या माहेरच्यांनी तिची साथ नेमकी केव्हा द्यायला हवी असे अनेक प्रश्न मनात उमटतात. माझ्यामते झोपाळा ही कथा मिलिंद जोशींची सिग्नेचर कथा ठरावी. इतके विविधरंगी भाष्य पूर्वी वाचलेले नाही. आई मुलाला रात्री आठ वाजता जबरदस्तीने आंघोळ घालते हा ह्या कथेचा सर्वोच्च बिंदू आहे. त्या आईला चोवीस तास मुलाचेच करायचे असते, पण सगळीकडे सामसूम झाल्यावरच तिच्या मनात हे धाडस निर्माण होते ही बाब इतकी हृदयद्रावक आहे की स्वतः एक कथाकार असलेला मी मिलिंद जोशींच्या सूक्ष्म कंगोरे टिपण्याच्या ह्या वृत्तीला सलाम करतो.

लग्नकल्लोळ ही कथा आणखीनच निराळे प्रश्न मांडते. भिक्षुकी करणारा नवरा मिरवता येत नाही, देशस्थांमध्ये असलेले फरकही कधीकाळी महत्वाचे समजले जात, लग्नात बेअब्रू होऊ नये ह्यासाठी काय काय करावे लागू शकते, निरागस वयात जडलेले प्रेम केवळ योगायोगाने प्राप्त झाले नसते तर काय, वरपक्षही कधी हात जोडण्याच्या अवस्थेत येऊ शकतो वगैरे बाबी केवळ थेट भिडतात.

मिलिंद जोशींची भाषाशैली प्रासादिक आहे. कथानके बरीचशी ब्राह्मणी वाटतात हे विधान मी स्वतः ब्राह्मण असूनही करतो ह्याचे कारण हे विषय समोर येणे अत्यावश्यक आहे. तथाकथित उच्चवर्णियांमध्ये असलेले छुपे भोंदूपण किंवा संस्कृतीला शरण जाण्याची वृत्ती आजच्या समाजाला कळायलाच हवी. जे कोणत्याही कारणाने पुढे आहेत त्यांनी मागच्यांना पुढे न्यायला हवे ह्या विचारांचा मी आहे. मिलिंद जोशींच्या कथा नेमके हेच सांगतात की जे पुढे आहेत तेही पुढे नाहीच आहेत. कथेत योजलेली पात्रांची नांवे मात्र कथांना उगीचच दशके मागे घेऊन जातात. आजकालची नांवेच वेगळी असतात. नावांना इतके महत्व द्यावे का ह्या प्रश्नावर मी असे म्हणेन की नावांमधून काळ कळतो. आजच्या घाईच्या युगात लोकांना नांवेही अशी ऐकायला, वाचायला आवडतात जी ते नेहमी आजूबाजूला ऐकतात. अर्थात, कथाच जुन्या काळावरील असल्या तर गोष्ट वेगळी, पण दोन ठिकाणी व्हॉट्स अ‍ॅपचा उल्लेख आहे, अनंता पस्तीस वर्षांनंतर वाड्यात परत जातो असा उल्लेख आहे.

मिलिंद जोशींच्या कथा सुरू होतात पण संपत नाहीत. पुस्तकात कथा संपल्यासारखी वाटते पण मनात ती सुरूच राहते.

एखाद्या तरुणीने आपल्या छातीवरील दुपट्टा एका हाताने छातीशीच धरून त्याचे दुसरे टोक तुफान वाहत्या हवेवर भिरभिरू द्यावे तश्या ह्या कथा आहेत. दुसरे टोक हातात सापडेलच असे नाही. ते लहरत राहील. तुम्ही सुरुवात त्या तरुणीच्या हृदयापासूनच करा, पण नंतर कुठे जाल हे मला माहीत नाही असे कथाकार म्हणताना दिसतो.

खेळ ह्या कथासंग्रहाच्या निमित्ताने मिलिंद जोशी ह्यांनी एक प्रश्नमालिका सादर केलेली आहे आणि त्याची उत्तरे देण्याचा प्रयत्न करणारा जर खरेच प्रामाणिक असेल तर तो म्हणेल की आजच्या समाजाच्या एकत्रित मानसिकतेतील भीषण त्रुटींचे मूळ नेमके कुठे आहे हे विचारले तर मी खेळ ह्या कथासंग्रहाकडे बोट दाखवेन.

- 'बेफिकीर'!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बेफी, काय आढावा आहे, वाह! खरंच खूप छान लिहिलंयत.
पुस्तक वाचायचा मोह होतोय खूप.>>>+१