भूक ...(शत शब्दकथा)

Submitted by धनुर्धर on 24 July, 2018 - 10:16

किती तरी वेळ तो पोटातली भूक दाबून तसाच बसला होता. बुवा जीवनावर कितीतरी मौलिक विचार आपल्या प्रवचनातून सांगत होते पण भूकेमुळे त्याला काही कळत नव्हते आणि कळण्याचे त्याचे वयही नव्हते. शेवटी प्रवचन संपले. आरतीला सुरुवात झाली. एक एक क्षण त्याला युगासारखा भासू लागला. आरती संपली. लोक पंगत धरून बसू लागले. लगबगीनं जावून त्याने कडेची जागा पटकावली. पत्रावळ्या वाटल्या जावू लागल्या. भात, आमटी, भाजी , जिलेबी पत्रावळी भरून गेली. क्षणभर त्याला मोह झाला पण त्याने आवरला. 'वदनी कवळ घेता ' स्पीकरवर चालू झाले आणि भरली पत्रावळी घेऊन तो सुसाट सुटला.
धपापत त्याने झोपडीचे दार उघडलं. लहानगा भाऊ रांगत आला. पोटातली भूक शमू लागली..

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults