मा. ल. क. - ३

Submitted by हरिहर. on 20 July, 2018 - 08:53

मा.ल.क. - २

एका गावातुन दुसऱ्या गावात जायचे असल्यास मधले काही मैलांचे जंगल पार करुन जावे लागत असे. जंगलातुन जाणारा रस्ता अतिशय सुंदर होता. घनदाट वनराई, मधेच गवताळ कुरणे, विस्तिर्ण जलाशय, लहाण-मोठ्या टेकड्या. पण रस्ता कितीही सुंदर असला तरी निर्जन होता. त्यामुळे वाटमारी करणाऱ्यांचा हा आवडता परिसर होता. गावातुन रस्ता ज्या ठिकाणी जंगलात शिरायचा तेथे एक टुमदार धर्मशाळा होती. कारण कुणालाही जंगल पार करायचे असले की तो या धर्मशाळेत थांबे. सकाळपर्यंत दोघे-चौघे जमा होत. मग एकमेकांच्या सोबतिने जंगल पार केले जाई. एकट्याने जायची सोयच नसायची दरोडेखोरांमुळे.

आषाढाचे दिवस होते. पावसाने नुसता धिंगाना घातला होता. दुर कुठेतरी विज कोसळली होती. बोचरे वारे वहात होते. एक एक करत धर्मशाळेत चार जण जमा झाले होते. एकमेकांची ओळख करुन घेत ते शेकोटीभोवती शेकत होते. भरुन आलेल्या आभाळामुळे सकाळ झाल्याचे त्या चौघांच्या ऊशीरा लक्षात आले. मग मात्र त्यांनी बांधून आणलेल्या दशम्या खावून घेतल्या आणि जंगल पार करण्यासाठी त्यांनी धर्मशाळा सोडली. जंगलात शिरायच्या आधी त्यांना मागुन कुणी तरी मारलेल्या “अहो, थांबा माझ्यासाठी” अशा हाका ऐकू आल्या. चौघांनीही मागे पाहीले. एक वाटसरु आपली पिशवी सांभाळत त्यांना येवून सामील झाला. चौघांनाही बरे वाटले. “चला, अजुन एक सोबती मिळाला” पण त्यांचा आनंद काही क्षणच टिकला. कारण सकाळपासुन थांबलेला पाऊस अचानक सुरू झाला. जणू काही येणाऱ्या नविन वाटसरुने येताना आपल्या सोबतच पाऊस आणला होता. पण आता थांबण्यात अर्थ नव्हता. त्या पाचही जणांनी मनातली हिम्मत गोळा केली आणि भर पावसात जंगलामध्ये पाऊल टाकले. मंद गतीने का होईना पण त्यांची पावले रस्ता मागे टाकू लागली. थोड्याच वेळात त्यांच्यात गप्पा सुरु झाल्या. पण त्या चौघांनी नविन आलेल्या वाटसरुला काही आपल्या गप्पांमध्ये सामावून घेतले नाही. त्यांना मनोमन वाटत होते की “हा आला आणि पाऊस सुरु झाला. याच्या येण्याने आपल्या अडचणीत भर पडली” आता मानवी स्वभावच असा आहे त्याला काय करणार. पण नविन वाटसरु मात्र “आपल्याला सोबत मिळाली” या समाधानाने चौघांबरोबर वाट चालत होता.

साधारण मैलभर अंतर पार केले असेल पाचही जणांनी. अचानक त्यांच्या समोर प्रचंड आवाज करत लखलखीत विज जमिनीवर ऊतरली. पाचही जणांचे डोळे त्या तेजाने विस्फारले. घाबरलेले ते काही वेळातच सावरले. आपण अगदी थोडक्यात वाचलो याची जाणीव होऊन त्यांच्या अंगावर काटा आला. काही अंतर जाताच परत एकदा त्यांच्या मागे काही अंतरावर विज कोसळली. सगळ्यांनी जलद पावले ऊचलायला सुरवात केली. पण काही वेळातच पुन्हा त्यांच्या डावीकडे, अगदी जवळच विज लखलखली. थोडे दुर जाताच परत तशीच विज समोर ऊतरली. अर्धा मैल पार करेपर्यंत विज सातत्याने त्यांच्या आजुबाजूला कोसळतच राहीली. आता मात्र त्या सगळ्यांच्या लक्षात आले की “आपण काही नशिबाने वाचत नाही आहोत” हा काही तरी वेगळा प्रकार असावा. पाचही जण कोसळत्या पावसात काही क्षण थांबले. विजेचे कोसळणे सुरुच होते. त्यांनी आपापसात बराच विचार केला, खल केला आणि निष्कर्ष काढला की “आपल्या पाच जणांमध्ये कुणीतरी नक्कीच पापी, कुकर्मी, वाईट असणार. त्याच्यासाठीच विज वारंवार कोसळते आहे. वेळीच त्या ईसमाला आपल्यातुन दुर केले नाही तर ही विज काही आपला पिच्छा सोडणार नाही.” पण ‘ती’ व्यक्ती कोण हे कसे ठरवायचे? कुणीही कबुल होईना “मीच तो पापी आहे ज्याच्यासाठी विज सारखी जमिनीवर ऊतरतेय” शेवटी सगळ्यांच्या संगनमताने यावर एक ऊपाय काढला गेला.

पाऊस कोसळतच होता. समोरच मोठे गवताळ मैदान होते. सगळे एका झाडाखाली ऊभे राहीले. त्यांचे ठरले होते की प्रत्येकाने पाळीपाळीने समोरच्या मैदानात जावून ऊभे रहायचे. ज्याच्यासाठी विज येते आहे तो मैदानात ऊभा राहीला की विजेचे काम सोपे होईल व बाकिच्यांचा जीव वाचेल. ठरल्या प्रमाणे पहिला जीव मुठीत धरुन मैदानात जावून ऊभा राहीला. बराच वेळ झाला पण काही झाले नाही. तो आनंदाने ऊड्या मारत झाडाकडे परतला. आता दुसऱ्याची पाळी होती. तोही जावून खुप वेळ मैदानात ऊभा राहीला पण काहीही झाले नाही. तोही नाचतच झाडाकडे परतला. मग तिसरा गेला. तोही परत आला. त्यानंतर चौथा घाबरत गेला. पण तोही “वाचलो, वाचलो” ओरडत माघारी आला. आता नविन आलेल्या वाटसरुची पाळी होती. विज अजुनही कोसळतच होती. चौघांनीही अतिशय तिरस्काराने त्या वाटसरुकडे पाहीले. नाहीतरी सगळ्यांचे त्याच्याविषयी पहिल्यापासुनच वाईट मत झाले होते. त्यांच्या पैकी एकाने नविन वाटसरुच्या दंडाला धरुन त्याला मैदानाकडे ढकलले. नविन वाटसरु जड पावले टाकत मैदानाकडे निघाला. तो मैदानाच्या मधोमध जाऊन ऊभा राहीला मात्र कडाडून आवाज करत एक लखलखीत विज खाली आली आणि चौघैजण ज्या झाडाखाली ऊभे होते त्यावर कोसळली.

मार्मिक घु था

(कथासुत्र-अज्ञात, शब्दांकन-माझे)

मा.ल.क. - २
https://www.maayboli.com/node/66831

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पूर्वी ऐकली होती , पण त्यात असं होत की एक स्त्री म्हणजे पाचवी व्यक्ती असते , लोक विचार न करता तिला पापी ठरवतात आणि वरील विजेची घटना घडते .
ती स्त्री वाचते
शब्दांकन आणि कथा नेहमीप्रमाणे उत्तम Happy

मस्त शब्दांकन.
सु शि यांची या थीम वर एक गोष्ट आहे.घरातून पळून आलेला तरुण, सगळीकडे आलेला पूर, महादेव मंदीरात आसरा घेतलेले अनेक विवीध लोक, सर्वांनी केलेली पापे.
अनेक भयंकर पापे सांगून सुद्धा बाहेर गेलेला एक एक जण वाचतो.शेवटी तरुण जातो.त्याने आयुष्यात काहीच पाप केलेलं नसतं.
तो बाहेर गेल्यावर वीज कोसळून पूर्ण मंदिर कोसळतं.

छान आहे कथा, आधी ऐकली / वाचली आहे.

@हायझेनबर्ग:
मला जाणवलेले मर्म असे की, पाप पुण्य असे काही नाही, वीज कोसळायची तेथे कोसळते. योगायोगाने त्यावेळी नेमका तो पाचवा वाटसरू तिथून दूर गेला होता.

छान आहे कथा, आधी ऐकली / वाचली आहे. + ११११

>>>>@हायझेनबर्ग:
मला जाणवलेले मर्म असे की, पाप पुण्य असे काही नाही, वीज कोसळायची तेथे कोसळते. योगायोगाने त्यावेळी नेमका तो पाचवा वाटसरू तिथून दूर गेला होता. >>>> मानव मला वाटले की ते ईतका वेळ ज्याला अपशकुनी समजत होते, खरेतर त्याच्यामुळेच ते चारजण वाचत होते अन त्याला दुर केल्या क्षणी त्यांच्यावर विज कोसळली.