राझी - उध्वस्त होण्याला दिलेली मान्यता

Submitted by माधव on 20 July, 2018 - 00:01

बहुतेक भारतीयांना भगवद्गीतेबद्दल महिती असते - कुणाला ती तोंडपाठ असते, कुणी नीत्यनेमाने वाचतात तर कुणी त्यावर चर्चा करतात. पण फार थोड्या जणांना गीता खर्‍या अर्थाने समजलेली असते. गीता जऊद्या, ते खूप मोठे प्रकरण आहे (खरं तर गीतेत अनेक प्रकरणे (अध्याय) आहेत) पण ती ज्या प्रसंगात सांगितली गेली तसा प्रसंग आपल्यापैकी खूप कमी जणांच्या आयुष्यात येतो. कारण सोपं आहे - आपण पळपुटे असतो! युद्ध आणि आपण यांची सांगड प्रत्यक्ष आयुष्यात तर दूरच, आपण स्वप्नात देखील घालत नही. आपण ज्या काही तथाकथीत लढाया लढतो त्या स्वहीत आणि त्यानंतर आपल्या कुटुंबाचे भले येवढ्याच मर्यादीत हेतूने केलेल्या असतात. आता युद्धच करायचे नाही म्हटल्यावर आपल्या प्रियजनांशी युद्ध करायचा प्रश्नच उद्भवत नाही. मग जर का कोणी आपल्याला सांगितले की आधी प्रेमाची नाती तयार करा अणि मग त्या जीवलगांशी युद्ध करा तर ?

"येडंच आहे! मी काय कोळी वाटलो का ? आधी जाळे विणायला आणि मग त्यात न अडकायला? अरे इथे गणपती गेल्यानंतर आरास काढायला जीवावर येते. इतक्या चटकन् निर्जीव गोष्टीत जीव अडकतो माझा आणि म्हणे जीवलगांशी युद्ध!"

पण काही जण हे करू शकतात आणि त्यातलीच एक म्हणजे सेहमत - आपल्या सिनेमाची नायिका! नाही नाही! ती कोणी लष्करातली अधिकारी नाहीये ना कोणी प्रशिक्षीत हेर. ती एक कॉलेजात शिकणारी साधी मुलगी आहे. एक तुरुतुरु पळणारी खार एका गाडीखाली येणार असते आणि तिला आपल्या जीवाची पर्वा न करता वाचवताना सेहमत पहिल्यांदा भेटते आपल्याला. आपल्या मनातही येत नाही की हा प्रसंग सिनेमात पुढे खूप महत्वाचा ठरणार आहे.

तर अशी ही सेहमत भारतासाठी हेरगीरी करायला तयार होते ते केवळ आपल्या वडलांच्या शब्दाखातर. देशाबद्दल प्रेम प्रत्येकालाच असते. पण त्याकरता प्राण द्यायला फार कमी जण तयार असतात आणि केवळ वडलांचा इच्छेखातर देशासाठी प्राण द्यायला तयार होणारे अगदीच विरळा. पण सेहमत तयार होते - राझी होते.

सेहमतच्या वडलांना पकिस्तान भारताविरुद्ध काहीतरी कारस्थान रचतोय आणि नजीकच्या काळात काही तरी घडणार आहे याची कुणकुण लागते. ते भारतासाठी हेरगीरी करत असतात आणि त्याचाच एक भाग म्हणून पकिस्तानी सैन्यातल्या अधिकार्‍यांच्या घरी त्यांची उठबस असते. कारस्थानाची माहिती काढणे त्यांना शक्य असते पण त्यांच्याकडे वेळ आणि शक्ती दोन्ही नसते. त्यांचे अफेअर सुरू असते - कॅन्सरशी! आणि त्यापासून अलिप्त राहणे त्यांना आता अशक्य असते. दुसर्‍या कोणाला त्यांची जागा घेता आली असती पण इतक्या कमी वेळात विश्वास संपादून इतक्या आतल्या गोटात पोहचणे निव्वळ अशक्य असते. त्यांचा डोक्यात एक अतर्क्य प्लॅन तयार होतो - आपल्या पोटच्या मुलीला पाकिस्तानी अधिकार्‍याची सून करून पुढची माहिती काढायची. तो प्लॅन अतर्क्य आपल्याकरता असतो पण त्यांच्याकरता तो अगदी सहज असतो कारण त्यांची हेरगीरीची कारकिर्द सुरू झाली असते अशाच एका शब्दाखातर! सेहमतच्या कानावर ते आपला प्लॅन घालतात आणि ती वेडी तयार होते.
सेहमत राझी होते पण ती कशाला तयार झाली आहे ते ना तिला कळत ना आपल्याला. तिचे हेरगीरीचे प्रशिक्षण सुरू होते आणि आपण हेरगीरीवरचा सिनेमा आहे असे समजून सिनेमा पहायला लागतो. सिनेमाच्या प्रोमोजमध्ये पण तेच सांगितले होते. आपणही तेच ग्राह्य धरतो.

ट्रेनींग सुरु होते आणि आपल्याला भेटतो मीर - सेहमतचा प्रशिक्षक आणि तिच्या वडलांचा सुहृद! तिच्याविषयी वाटणारे कौतुक आणि माया तो कडक शिस्तीच्या बुरख्यात लपवून ठेवतो. तिला कसलीही उसंत न देता, 'छोटीशी चूकही तुझ्या जिवावर उठू शकते' हे तिच्या मनावर बिंबवत तो तिचे ट्रेनींग पूर्ण करतो. पूर्ण करतो म्हणण्यापेक्षा जेवढे शक्य असते तेवढे तो तिला शिकवतो. सेहमत पुरती तयार झाली नाहिये हे त्याला माहित असते पण नाईलाज असतो, सगळे यथासांग करण्याइतका वेळ नसतो. तो एक मात्र करतो - परक्या मुलखात सेहमतसाठी अनेक पळवाटा बनवून ठेवतो.

मग वेळ येते ती बिदाईची आणि पडद्यावर येते ते एक अप्रतिम गाणे - दिलबरो. लग्न, आपला जोडीदार याबद्दल कधी फारसा विचारच केलेला नाहीये, ज्याला भेटणे तर दूरच कधी पाहिले पण नाहीये अशा शत्रू देशातल्या माणसाबरोबर लग्न झालय, वडलांना परत कधीच भेटू शकणार नाही हे पण कळलंय आणि मग घराचाच नाही तर देशाचाच उंबरठा ओलांडायची वेळ येते. सेहमतची मनस्थीती ते गाणे अगदी तंतोतंत मांडते. गाणी हा आपल्या सिनेमाचा अविभाज्य भाग आहे आणि मी हिंदी सिनेसंगीताचा प्रचंड चाहता आहे. पण बर्‍याचदा हे गाणे आत्ता का आहे हा प्रश्न मला पडतोच. प्रसंगाला अनुसरूनच नाही तर तो प्रसंग अधीक गहीरा करणारी गाणी आपल्या सिनेमात फार कमी असतील. दिलबरो त्यातलेच एक. गाणे सुरू झाल्यावर अंगावर काटा आला होता माझ्या. गाणं ऐकताना हे पण जाणवलं की समोर चालू आहे ती हेरकथा नाहीये, एक वेगळंच रसायन आहे. खूप वेगळं आणि गहीरं!

लग्नाबरोबर सेहमतच्या आयुष्यात इक्बाल येतो. "आपलं लग्न केवळ आपल्या वडलांच्या निर्णयावरून झालेय पण आपण मात्र एकमेकांना अनोळखीच आहोत." पहिल्या दिवशीच इतका समजूतदारपणा दाखवणार्‍या नवर्‍याच्या प्रेमात न पडणे कठीण आहे पण तरीही सेहमत स्वतःला सावरते. पण ते सावरणे तात्पुरते ठरते. त्याच्या समजुतदारपणापुढे आणि प्रेमापुढे ती हतबल होते. आत्तापर्यंत मला तीन उमदे माहित होते - पहिला उमदा हा एक व वनस्पती तूपाचा ब्रँड होता, दुसरा गोष्टीतला राजकुमार (राजा किंवा इतर पुरुष कधीच उमदे नसायचे) आणि तिसरा उमदा म्हणजे घोडा. राझीत चौथा आणि खराखुरा उमदा बघायला मिळाला - इक्बाल.

घरात सगळ्यांना तिचे कौतुक असते - फक्त अब्दुल सोडून. त्याला तिच्यावर कायम संशय असतो. हळूहळू ती नविन घरात रुळू लागते आणि कामातही. पण ती काही सराईत हेर नसते, हातून लहान सहान चुका होतच असतात. आणि अशीच एक चूक अब्दुलच्या लक्षात येते. काही पर्यायच उरत नाही तिच्यापुढे. एके काळी गाडीखाली येणार्‍या खारीला वाचवणारी सेहमत आता....

प्रवास पुढे चालूच राहतो - यशाच्या दिशेने. पण त्या वाटेवरचे प्रत्येक पाउल तिला उध्वस्त करत जाते. योद्ध्याला युद्धात विजय मिळाला तर तो काही अंशी तरी उपभोगता येतो. पण इथे सेहमतला विजय मिळूनही ती सर्व काही हरते. सिनेमा संपतो तेंव्हा रेहमत एका अतिशय साध्या (पडक्या म्हणाव्या अशाच) घरात एकटी असते. घरी लाडाकोडात वाढलेली, सासरीही ऐश्वर्य उपभोगलेली ती, आता अर्थ शोधत असते विजय, नाती, आयुष्य यांचा. त्यांच्यापुढे ऐश्वर्याची काय किंमत? त्या सीनमध्ये तिच्या बाजूला एक माठ दाखवला आहे. तिचे आयुष्यही आता त्या माठातल्या पाण्यासारखे आहे - शांत, थंड! पण एके काळी त्या पाण्याने त्सुनामी आणली होती.

आणि या सगळ्याला सुरुवात झालेली असते - तिच्या राझी होण्यापासून!

आलिया - काय लिहू तिच्याबद्दल? आजच्या घडीला तिच्यासारखी हरहुन्नरी अभिनेत्री दुसरी नसावी. सेहमत तीने अगदी सहज उभी केलीये आणि ही सहजता खूप गरजेची होती. हेरगीरीचे बेअरींग थोडे जरी जास्त झाले असते तरी सिनेमाचे गणित साफ कोसळले असते.

विकी कौशल - प्रत्येक चित्रामध्ये बॅकग्राऊंडला खूप महत्व असते. कुठल्याही सिनेमाचेही अगदी तसेच असते. महत्वाची भूमीका खुलून दिसण्याकरता बाकीच्या अभिनेत्यांची साथ खूप महत्वाची असते. इक्बालच्या भूमीकेत अभिनयाला फारसा वाव नव्हता पण त्याने त्याचे काम अगदी चोख केलय.

रजीत कपूर - बाप आणि सच्चा देशभक्त यांच्यातले द्वंद्व खूप सुरेख दाखवलय. व्योमकेश बक्षीनंतर तो पहिल्यांदाच इतका लक्षात राहिला.

मेघना गुलझार - सिनेमात फक्त आणि फक्त सेहमतची कामगीरी दाखवली आहे. आणि शेवटचा एक सीन, जो अनेक वर्षांनी घडतो. पण त्या एका सीनच्या जोरावर मेघना हेरकथेचे रुप पूर्ण पालटून टाकते. आणि मग ती होते सेहमतची कथा, तिच्या विजयाची, तिच्या अपरीमीत दु:खाची! गुलझारचे अनेक चित्रपट पडद्यावर अडीच तासात संपतात पण मनात मात्र वर्षानुवर्ष चालूच असतात. हा सिनेमा अगदी त्याच पठडीतला आहे. मेघना असली तरी शेवटी ती गुलझार पण आहेच.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिलंय! त्या खारीच्या प्रसंगाचा संदर्भ तुम्ही उलगडून दाखवलात तेव्हा लक्षात आला.
थोडा सुलभ केल्यासारखा वाटला पण मनात खूप काळ रेंगाळला हा सिनेमा.

छान लिहिलंय,
थेटर मध्ये पाहायचा राहून गेलेला, पण आता नक्की पाहणार.
थँक्स

मुनिरा च्या नवऱ्याला पण सेहमत मारून टाकते तेव्हा ची पण तिची जी मनस्थिती होते ते पण आलिया ने खूप मस्त दाखवलंय....

छानच लिहिलंय.
विकी कौशलची मी 'मसान'पासूनच टोटल फॅन झालेय.
आणि आलियाची 'हाय वे'पासून. (स्टुडन्ट ऑफ द इयर हा सिनेमा तिने केलाच कसा - असा जाब मला तिला विचारायचाय; त्यापुढे 'अक्कल कुठे पेंड खायला गेली होती?' हे पण म्हणायची इच्छा आहे Proud )

छान लिहिलंय,
थेटर मध्ये पाहायचा राहून गेलेला, पण आता नक्की पाहणार.
थँक्स +११११११११११११११

छान लिहिल आहे , माधवजी Happy

तुमचं लिखाण वाचून सारी गाणी परत आठवण्याचा प्रयत्न केला .
दिलबरो बद्दल अगदी अगदी झालं Happy
रजीत कपूर , पूर्ण चित्रपटात फार आवडला .
या गाण्यातही तो मुलीची सासरी पाठवणी करताना भावूक होउन रडणारा बाप नाहीये . लढाईसाठी जाणार्या आपल्या काळजाच्या तुकड्याला संयतपणे निरोप देणारा बाप दिसतो .
आपण दूसर्याची लाडकी लेक आपल्या घरी घेउन येतोय , ती तिचं घर्,देश सोडून आपल्यासोबत येतेय , तिला आणि घरच्याना वाईट वाटणं सहाजिक आहे , याची पूरेपूर जाणीव असणारा , या सगळ्याकडे काहीही न बोलता सहान्भूतीपूर्वक पहाणारा ईक्बाल आहे.
आपल्या मित्राची मुलगी आपली सून झालीय याचा आनंद ईक्बालच्या वडिलांच्या चेहर्यावर दिसतो तर घरच्या मोठ्या सूनेच्या अधिकाराने आणि प्रेमाने , सेहमतच स्वागत करणारी मुनिरा दिसते .

ए वतन .. गाण्यात , मुलं स्टेजवर गाताना , मागे उभी राहून स्वत:शीच गाणारी आलिया आहे.
ती जेन्व्हा भावूक होउन छातीवर हात ठेवून "तुझपे कुर्बान मेरी जान , तुझपे शाद रहे तू ' गाते , तेन्व्हा त्या ओळीचा संदर्भ लक्शात ठेउन प्रेक्षकांसाठीही ती एक टडोपा मुमेन्ट होते . अंगावर काटा येतो .
नातवाला आलाप घेताना पाहून भारावून गेलेले जनरल बेग , बायकोचं काम पाहून कौतुक आणि अभिमानाने फुलुनं गेलेला आणि आपल्या भावना नुसतं हलकसं हसू आणि डोळ्यातून पोचवणारा ईक्बाल एक्दम खरे वाटतात.

सुरेख लिहिलंय. 'इजाजत'नंतर मोठी गॅप घेतलीस.

खारीच्या प्रसंग आणि पुढचा प्रसंग ह्यातलं direction लक्षात आलं नव्हतं ते तू लिहिल्यामुळे समजलं. कदाचित मधल्या काळात सिनेमात खूप काही घडलं होतं त्यामुळे असेल.

विकी कौशल 'मसान' पासून आवडतोच. ह्या सिनेमापासून आलियाही आवडू लागली आहे.

मस्त लेख... चित्रपटही आवडला होताच... हायवेपासून आलियाचा आवडत्या अभिनेत्रींच्या यादीत समावेश झाला होताच.. जितक्या सहजतेने आणि ताकदीने ती जिंदगी, उडता पंजाब , राझी मधल्या भूमिका करते तितकीच छान ती हम्प्टी शर्मा की दुल्हनिया मधला रोलही करते... एकंदर मस्त आणि मस्तच वावर असतो तिचा..
विकी कौशलचे याआधीचे काम पाहिले नव्हते पण हा चित्रपट आणि संजू मुळे आता तो एकदम चर्चेत आलाय.. लंबी रेस का घोडा लगता है।
खारीचा प्रसंग नसता तरी चाललं असतं असं आधी वाटलं होतं, पण अब्दुलच्या प्रसंगाबद्दलचं तुमचं लिखाण वाचून आता तो संदर्भ लक्षात आला।
बाकी मेघना गुलजार बाबतच्या संपूर्ण परिच्छेदाला १००% अनुमोदन..
गुलझारचे अनेक चित्रपट पडद्यावर अडीच तासात संपतात पण मनात मात्र वर्षानुवर्ष चालूच असतात. हा सिनेमा अगदी त्याच पठडीतला आहे. मेघना असली तरी शेवटी ती गुलझार पण आहेच >>>> क्लास !!!

सुंदर सिनेमा !

आता प्राईमवर आला आहे. पुन्हा पाहणार. Happy

सुंदर लिहिलंय तुम्ही. एक एक शब्द तोलून मापून लिहिलाय.
याहून सुरेख ओळख नाही वाचली.
कालच बघितला. वर बाबा म्हणतायत तसा प्रगल्भ चित्रपट. डोक्यातून अनेक दिवस जाणार नाही.

छानच लिहिलंय.
विकी कौशलची मी 'मसान'पासूनच टोटल फॅन झालेय.>>>काही दिवसांपूर्वीच मसान पाहिलाय पण राझीचे प्रोमो, गाणी बघूनही हा तोच आहे हे समजलंच नाही. आजंच जुबान पाहिला, छान काम केलंय. राझी आता टीव्हीवर आला की नक्की बघणार...

Pages