तुमच्या आयुष्यातील सर्वोत्तम निर्णय कोणता होता??

Submitted by कटप्पा on 18 July, 2018 - 23:08

आज गप्पा चालल्या होत्या, आयुष्यातला सर्वोत्तम निर्णय कोणता होता( best decision in your life).
माझे मन भूतकाळात गेले - इंजिनिरिंग 2010 मध्ये पास झाल्यानंतर मला एका मोठ्या आयटी कंपनीत जॉब लागला होता. बंगलोर ला पोस्टिंग, 25 हजार पगार - माझ्यासारख्या गावाकडे 10वी पर्यंत शिक्षण झालेल्या मध्यम वर्गीय मुलासाठी स्वप्न सत्यात उतरल्या सारखे होते.
2011 पर्यंत स्वप्नांना तडा गेला असे वाटू लागले, काम ते नव्हते जे मला अपेक्षित होते. गाणी ऐकत दिवस दिवस कोडींग वगैरे माझ्या अपेक्षा होत्या पण मी इथे एक्सेल शिटा भरत होतो.डेटा मॅपिंग करत होतो.
कॅन्टीन मध्ये जायचो लोक म्हणायचे, लकी आहेस हा प्रोजेक्ट मिळाला, या प्रोजेक्ट मधून 2 वर्षात onsite मिळते म्हणजे मिळतेच.
काही मित्र आधीच मास्टर्स करायला तिथे गेले होते, फोटो टाकत होते, पार्ट टाईम जॉब करून पैसे कमवत होते. अमेरिकेत जायला मिळेल, डॉलर्स मिळतील आणि मी अशा प्रोजेक्ट मध्ये होतो.
2011 च्या ऑक्टोबर मध्ये मॅनेजर म्हणाला पुढच्या वर्षी साठी तुझा व्हिसा प्रोसेस आपण सुरू करणार आहोत.

आणि दोन आठवड्यात मी पेपर टाकले ( राजीनामा दिला).

का?? कारण US ला जायचे म्हणजे हे काम बंगलोर मध्ये 1 ते 2 वर्षे करा आणि नंतर onsite जाऊन पुढची 2 ते 4 वर्षे हेच काम. म्हणजे 6 वर्षे मी फक्त एक्सेल मध्ये, आणि मग अडकून रहा आणि असे रोल करत रहा.

तर मी onsite नको म्हणालो, US ला नको म्हणालो आणि मी एक स्टार्ट अप जॉईन केली. जिथे मला रोज नवीन चॅलेंजिंग काम होते,इंटरेस्टिंग होते आणि मला आवडणारे होते.

तर अशा प्रकारे मी 1 लाख + एम्प्लॉयी वाली कंपनी सोडून टोटल 15 जण असणाऱ्या स्टार्ट अप ला आलो. 30% पगार कट घेतला( कमी पगारावर आलो). सगळे म्हणाले मी चुकीचा निर्णय घेतला आहे. पण तोच निर्णय मला 2016 मध्ये अमेरिकेत घेऊन गेला आणि ते देखील मला आवडणाऱ्या कामात , जवळजवळ तिप्पट पगार जो मला जुन्या onsite position मध्ये ऑफर झाला होता आणि अशा कंपनीत जिथे माझा resume जुन्या स्किल्स वर कधीच सिलेक्ट नसता झाला.

आयुष्यातील सर्वोत्तम निर्णय - पैशाच्या मागे न धावता, आवडत्या क्षेत्रात जाणे.

तुमच्या आयुष्यातील( करियर, लाईफ कशातीलही) सर्वोत्तम निर्णय कोणता होता???

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

26 जुलैच्या भयंकर पावसात प्रवास थांबून मागे फिरण्याचा. स्टेशनपर्यत पोचते तोच रौद्र रूपाचा पाऊस सुरू झालेला .
सिक्सथ सेन्स नावाच्या प्रकाराच्या अनुभव त्या दिवशी घेतला . तशीच रेमटून पुढे गेले असते तर अडकून पडले असते .

२५ वर्षांची असताना, बाकी कोणताही फायनांशिअल बॅकअप नसताना एकटीने पिंचिंत घर विकत घेणे.
माझ्या वयाच्या आसपासची बरीच मुलं त्याकाळात हे करत होती पण मुली जवळपास नगण्य होत्या.

तर तेव्हा एक मित्र म्हणत होता "तू ना घर घेण्यापेक्षा कार घे. घर तुझा नवरा घेईल. म्हणजे कमी काळाच्या कमी लोनची जबाबदारी तुझ्यावर पडेल. आम्ही असंच करणार आहे. बायकोच्या पगारतून कार आणि घरखर्च चालवणे आणि माझ्या पगारातून घर घेणे."
मी त्याला विचारलं "घर कोणाच्या नावावर असणार? घरात राहणार कोणकोण? घरची किंमत वाढत जाणार कि कमी होणार? कार कोणाच्या नावावर असणार? ती वापरणार कोणकोण? कारची किंमत वाढत जाणार कि कमी होणार? घरखर्च कोणकोणाचा असणार? त्याचा हिशोब कसा ठेवणार?
तुझ्या बायकोला लहानपणापासून वाढवायचं काम तुझ्या आईबापाने केलंय का म्हणून तीचा पैसा यांच्यासाठी वापरला जातोय?
#^&$&* कोणाला येडा बनवायलास भाऊ??"

मग गप बसला....

अ‍ॅमी खरंच मस्त.चांगलं सेव्हिंग आणि घरात फार पैश्याची गरज नसलेल्या प्रत्येक नोकरीवाल्या मुलीने विचार करावा असा निर्णय.

च्रप्स , हो Happy
अंतर्मनाचा कौल वगैरे कथा कादंबरीत वाचलेलं . त्या दिवशी प्रत्यक्ष अनुभूती आली .

बाकी, मोस्टली सगळे निर्णय वर्क-इन-प्रोग्रेस आहेत/ असतात, निर्णय घेतल्यावरची uncertainty विसरता येत नाही, चांगला निर्णय होता का नाही ते ठरवताना.

Startup लोकं पैश्यांसाठी (पगार, stock option) join करतात >> हे ब्लॅंकेट विधान झालं थोडं. ऑप्शनचा पार्ट खरा आहे, पण 99 टक्के स्टार्टअप फेल होतात किंवा वेगळ्या शब्दांत सांगायचं तर युनिकॉर्न (बिलियन $) होत नाहीत. स्टार्टअप मध्ये किती राउंड फंडिंग झाल्यावर जॉईन होताय, स्टॉक किती डायल्यूट झालाय, हार्डवेअर प्रॉडक्ट् आहे का सॉफ्टवेअरची फोडणी बसून व्हॅल्यूएशन वाढायची शक्यता आहे, कॉम्पिटिशन कोण आहे या आणि अशा अनेक गोष्टी येतात. स्टॉक ऑप्शनच्या बदल्यात थोडा कमी पगार इ प्रकार भारतात आणि वॅलितही बघितले आहेत.

1. मी 2008 मध्ये नवऱ्याचा पगार फक्त 30,000 असताना त्याला घर घ्यायला लावलं जबरदस्तीने.
तेव्हा सर्व माझ्यावर रागवलेले पण नवऱ्याने मध्यंतरी हा तुझा बेस्ट डिसीजन होता माझ्यासाठी हे कबूल केलं

2. 2014 मध्ये मुलीच्या जन्मानंतर मी माझं पीक वर असलेलं करियर सोडलं ( खूप नाराज होते मी ) पण आज आम्ही दोघांनी स्वतःचा बिझनेस डेव्हलप केलाय आणि मुलीकडे ही छान लक्ष देता येतंय. सो तो डिसीजन पण माझ्यासाठी सर्वोत्तम होता.

मागे बघितल्यावर आज वाटते की माझ्या जीवनातले सगळेच निर्णय अतिशय उत्तम होते .... त्या त्या वेळी ते बावळट आणि बिनडोक वाटत असले तरी.

मागे बघितल्यावर आज वाटते की माझ्या जीवनातले सगळेच निर्णय अतिशय उत्तम होते >> एकदम मनातलं बोललात. भूतकाळात प्लान ए वर्क झाला नाही म्हणून घेतलेला तो प्लान बी किंवा सी असला तरी मागे वळून बघाताना त्याने प्रचंड आत्मविश्वास दिला हे जाणवतं. आपण कुठेही गेलो तरी टिकाव धरून राहूच याचा आत्मविश्वास. यालाच कोणी अहंकार म्हणतील, पण हा संपूर्ण वेगळा आहे. अर्थात अनुकूल परिस्थिती, भेटलेली माणसं आणि शुद्ध लक याचा वाटा आहेच.

भूतकाळात प्लान ए वर्क झाला नाही म्हणून घेतलेला तो प्लान बी किंवा सी असला तरी मागे वळून बघाताना त्याने प्रचंड आत्मविश्वास दिला हे जाणवतं. आपण कुठेही गेलो तरी टिकाव धरून राहूच याचा आत्मविश्वास>>>+११

भूतकाळात प्लान ए वर्क झाला नाही म्हणून घेतलेला तो प्लान बी किंवा सी असला तरी मागे वळून बघाताना त्याने प्रचंड आत्मविश्वास दिला हे जाणवतं >>>> खर आहे . तो प्लॅन फेल गेला तरी आपण 100 टक्के प्रयत्न केला हे समाधान कायम असत Happy

रुडयार्ड किपलिंग ची 'इफ' नावाची कविता वाचा.
जो कोणता निर्णय घेतला त्याच्या परिणामाची पूर्ण जबाबदारी घेणे हे सर्वोत्तम.

>> कोडींग सोडून अर्चिटेक्चर ला जाण्याचा.. आता हँडस ऑन नाही , जॉब चेंज शक्य नाही ☺️

नाही कळले. कोडींग नसल्याने हँडस ऑन एक्सपीरीयन्स नाही म्हणून जोब चेंज करणे आता शक्य नाही असे म्हणताय का? मग हा चांगला निर्णय कसा?

>> सी प्लस प्लस सोडून जावा ला शिफ्ट होण्याचा ☺️☺️☺️

हा चांगला निर्णय असे का वाटते (म्हणजे तुलनेने जावा सोपे आहे फास्ट डेवलपमेंट आहे म्हणून, कि जावा मध्ये सीपीपी पेक्षा जास्त जॉब संधी आहेत म्हणून कि अजून काही कारण?)

भूतकाळात प्लान ए वर्क झाला नाही म्हणून घेतलेला तो प्लान बी किंवा सी असला तरी मागे वळून बघाताना त्याने प्रचंड आत्मविश्वास दिला हे जाणवतं >>>> खर आहे . तो प्लॅन फेल गेला तरी आपण 100 टक्के प्रयत्न केला हे समाधान कायम असत>>>>>>>> +१

< मागे बघितल्यावर आज वाटते की माझ्या जीवनातले सगळेच निर्णय अतिशय उत्तम होते ....>>>
+१. धागा वाचल्यापासून आठवायचा प्रयत्न करत होते कि असा कोणता निर्णय आहे का की जो घेतल्याचा आता मला पश्चाताप होतोय. तर काहीच आठवत नाहीय. एकंदरच आपण आपल्या निर्णय आणि त्यांच्या परिणामांवर खुश, समाधानी आहोत.

इंजिनियरिंगला ऍडमिशन न घेण्याचा निर्णय माझा आयुष्यातला सगळ्यात मोठा अन सर्वोत्तम निर्णय होता!.

माझे निर्णय चुकत गेले. कधी कुणी गाईडन्सला नव्हते. चांगले वाईट समजत नव्हते. एक्स्पोजर कमी होता. वडलांची फिअर सायकॉलॉजी ( जे आता कळते) अनेक निर्णयांच्या आड आली. मी इमोशनल फूल मधे मोडत होतो. विमान कंपनीच्या मेण्टेनन्सला क्वालिटी कंट्रोलला नेमणूक झाली. यात आपल्याला क्रिएटिव्हिटीला काही वाव नाही असे पहिल्याच दिवशी वाटले. ती सोडली. एका आंतरराष्ट्रीय राक्षसी कंपनीत नेमणूक झाली. पुन्हा तिथे (दुर्दैवाने ) क्वालिटी कंट्रोल हेच डिपार्टमेंट मिळाले. त्या वेळी बायोडेटा लिहायची अक्कल नव्हती. क्वालिटी कंट्रोलचे कोर्सेस केले होते त्याची माहिती भरलेली होती. ती कंपनी वर्षभरात सोडली.
मग एका गेजेस बनवणा-या कंपनीत रुजू झालो. इथे क्रिएटिव्हिटीला पूर्ण स्कोप होता. शिवाय ज्ञान अप टू डेट ठेवावे लागत होते. या अनुभवाच्या जोरावर रिसर्चचे फिल्ड पुढे मिळाले. पण पैसे नाहीत मिळाले. ते आत्ता आत्ता मिळू लागले आहेत. खूप स्लो प्रोसेस.
मध्यंतरी कॉम्प्युटरचे क्लासेस घ्यायचो. माझ्या सर्टिफिकेटवर मुलं दुबई, ऑस्ट्रेलिया, अमेरिका अशा ठिकाणी गेले. काही तर कोर्स न करता सर्टिफिकेट्स मागत. मी ते दिले नाहीत. ही मुलं तिकडे जॉब मिळवून नंतर बाहेरून शिकून आज मोठ्या पदावर आहेत. पण आपण स्वतःच जावे असे कधीच डोक्यात आले नाही. हा निर्णय चुकलाच.
सुरूवातीला ४००० रु. गुंठ्याने एक गुंठा जमीन मिळत असे. वडलांनी विरोध केला म्हनून नाही घेतली. आज तिथे ३० ते ५० लाख रू. भाव चालू आहे गुंठ्याला. वडलांची पाच एकर जमीन गावातल्यांनी त्यावर कूळ लावून हडपली असल्याने त्यांना कायम भीती वाटायची.
सुरूवातीचं घर वडलांनी भाडेकरू कब्जा करेल या भीतीने विकायला लावलं. त्याचे आज एक करोड रूपये सहज आले असते. त्या वेळी निव्वळ सव्वा लाखात विकायची घाई केली वडलांनी. २००३ ला फ्लॅट घेतला. न विचारता भाडेकरू ठेवला. ते वडलांना समजल्यावर ते ही विकायला लावले. असे अनेक नुकसानीचे निर्णय घेतले.
अशातच कार घेतली. तिचे हप्ते फिटले. मुलांचं कसं करायचं याची चिंता असायची. नंतर मोठी कार घ्यायचं प्रेशर येऊ लागलं. फोक्सवॅगनची एक कार निश्चित केली. लाखभराची सूट पण मिळाली. कार लोन अवघ्या ७.२५% ने मिळाले. पण समाधान वाटत नव्हते. माझ्या जुन्या कारची किंमत खूपच कमी देऊ लागले. कारण ती कंपनी देश सोडून चालली होती. मनात आलं की फोक्सवॅगन सुद्धा विदेशीच की.

मग ठरवलं या वेळी आपल्या मनाचा निर्णय घ्यायचा. आताचा फ्लॅट हा स्वतःच्या मनाने घेतला हाच एक निर्णय बरोबर होता. त्यामुळे मुलांच्या भविष्याची चिंता थोडीशी कमी झाली होती. आता कारचा निर्णय रद्द केला. होम लोन वर टॉप अप केलं . साधारण तेव्हढंच लोन मिळालं. त्यात दुकान घेतलं. सोसायटी काढली. निर्णय चुकला तर तीन हप्ते भरताना मुलांच्या शाळेची फीस कशी भरायची हा प्रश्न उभा राहणार होता. पण रिस्क घेतली. माल भरला. फर्निचर केलं.

आता सहा महीन्यांच्या आत दुकान चांगलं चालू लागले आहे. बरेचसे खर्च दुकानाच्या जिवावर भागताहेत. हा निर्णय माझ्या आयुष्यातला सर्वोत्तम ठरू पाहत आहे. तो तसाच रहावा असे वाटते. वडील आता थकले आहेत. त्यांना कल्पनाच दिली नव्हती. आता ते ही खूष आहेत.

सुदैवाने मी आयुष्यात घेतलेल्या निर्णयांनी माझा फायदाच झाला आहे.

* स्वत:चे घर - २००९ साली जेव्हा माझा पगार फक्त २०की२१ हजार असताना मी घर बूक केलं. आज घरांच्या किंमती पाहता तेव्हा घेतलेला निर्णय योग्य वाटतोय.

* २००८ साली अ‍ॅडमिन डिपार्टमेंट सोडून प्रोजेक्ट अ‍ॅडमिन म्हणून शिफ्ट झाले तो निर्णय आज अतिशय योग्य होता हे पदोपदी जाणवतं. अ‍ॅक्चुअल बिझनेस काय असतो आणि तो कसा चालतो हे तेव्हा अजिबात कळायचं नाही. तुम्ही कितीही काहिहि करा अ‍ॅडमिनिस्ट्रेशन इज अ थँकलेस जॉब असं माझी एक बॉस म्हणायचा. शिवाय टिम असायची, त्यात बॉस लोक खूप डिव्हाईड अँड रूल करायचे. मला तो छळवाद वाटायचा. मग मी धाडस करून रामराम ठोकला आणि आता तसले काहीही फेस करावे लागत नाही. काम भरपूर असते, जागरण असते पण स्वातंत्र्य खूप आहे आणि डोकं शांत राहतं.

काम भरपूर असते, जागरण असते पण स्वातंत्र्य खूप आहे आणि डोकं शांत राहतं.> हे भारीये
माझा पगार फक्त २०की२१ हजार असताना मी घर बूक केलं>> एकाच नंबर काम केलत.. _/\_
आम्हालाही असं वाटत की लग्न झाल्याबरोबर लगेच घर बुक केलं असत तर कमी किंमत मोजावी लागली असती .. Happy

माझ्या एकाही प्रेयसीशी लग्न न करण्याचा निर्णय सर्वोत्तम होता.

10 वी आणि 12 वीत नापास होऊन पुढचं शिक्षण बाहेरून घेता घेता बाहेरच बोंबलत फिरणारा मी, माझं काहीच भवितव्य नाही असे समजून वडिलांनी एका मोठ्या कों ऑपरेट बँकेत नोकरी लागण्यासाठी लाखो रुपये भरले होते, मी ती नोकरी करणार नाही तुमचे पैसे फुकट जातील असे ठासून सांगितले, त्यांना पैसे माघारी घ्यायला लावले, मला आवडणाऱ्या विषयात पुढले शिक्षण घेतले, सध्या लाखाचा पगार नसला तरी , निर्णय सर्वोत्तम होता का नाही माहीत, पण समाधान आहे खंत नाही.

Pages