©गोफ

Submitted by onlynit26 on 17 July, 2018 - 01:19

समिधाने चेहऱ्यावर पावडर लावत डोळ्यावर येणारी बट मागे सारली. ओठांना मुद्दामच लिपस्टिक लावायची टाळत तीने ओठावरून नुसती जीभ फिरवली. मुळातच गुलाबी असेलेले ओठ अजूनच आरक्त झाले. काहीही म्हणा ती दिसायला साधारण असली तरी आज मात्र तिचे रूप खूपच खुलले होते. तिने वयाची चाळीशी गाठली होती.
ती घराबाहेर पडली तेव्हा सकाळचे दहा वाजले होते. अनिकेतच्या घरी सकाळी १०.३० पर्यंत तरी पोहोचायला हवेच होते. म्हणजे अनिकेत आणि त्याच्या वडिलांशी निदान तासभर मोकळेपणाने बोलता आले असते. आज ११.३० नंतर त्यांना कुठेतरी बाहेर जायचं होतं म्हणून मग तिने बसने जायच्या ऐवजी रिक्षाने जायचे ठरवले. यामुळे पुढच्या दहा मिनीटात ती अनिकेतच्या घरी असणार होती. तिला रिक्षा लगेचच मिळालीही. बाहेर छान हवा सुटली होती. तिला सारखे वाटत होते , आज आपले आई वडील हवे होते. डोळ्यासमोर येणा-या बटा मागे सारता सारता तिच्या मनाने नकळत भुतकाळात प्रवेश केला.

ते मार्च महीन्यातले दिवस होते. समिधा आपल्या कुटुंबासमवेत पिकनिकला निघाली होती. आई, वडिल , छोटी बहीण छबू आणि मोठा भाऊ सदा सगळे अगदी मजा करत गाडीतून निघाले होते. गाडी वळणावळणांच्या घाटातून जात होती. एका बाजूला ऊंचच ऊंच डोंगर आणि दुस-या बाजूला थरकाप उडवणारी दरी. मुलं आणि आई हे निसर्गाचं विहंगम रूप मनात साठवत होते आणि बाबा मात्र नेहमीच्या सराईतपणे गाडी चालवित होते. आता थोडाच घाटरस्ता बाकी होता, तेवढ्यात अचानक समोरून एक वावटळ गोल गिरक्या घेत गाडी समोर आली. अचानक उडालेल्या धुळीच्या लोटामुळे समोरून येणारा ट्रक गाडी चालविणा-या वडिलांना दिसला नाही आणि घडू नये ते घडले. समोरून येणा-या ट्रकची कारला जोरात धडक बसली आणि क्षणार्धात कार दरीत कोसळली. त्यात समिधा तेवढी वाचली. तिच्या कुटुंबातील सर्वजण तिला एकटीला सोडून निघून गेले.

तब्बल दोन महीन्यानंतर जेव्हा समिधा शुद्धीत आली तेव्हा तिच्या जवळ जवळचे असे कोणीही नव्हते. शुद्धीवर आलेली समिधा कळपातून हरवलेल्या कोकरासारखी सगळीकडे पाहू लागली. इतक्यात तिथे डॉक्टर अनिकेत आले . तिच्या डोळ्यातून वाहत असलेले पाणी पाहून त्यांनी तिच्या डोक्यावर हात ठेवला. ती शांत होईपर्यंत ते तसेच तिला थोपटत राहीले. तब्बल दोन महीने डॉक्टर अनिकेत यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून तिला वाचवले होते. शुद्धीवर आल्यानंतर तिला सारे काही आठवले होते. आपल्या आजुबाजुला निपचित पडलेल्या कलेवरावरून ती कारमध्ये अडकलेल्या स्थितीतून रांगत बाहेर पडली होती. मदतीसाठी ती बराच वेळ हाका मारत राहीली होती. अशातच तिची शुद्ध हरपली होती आणि आज तब्बल दोन महीन्यानंतर ती शुद्धीवर आली होती.
हॉस्पिटलमधून जेव्हा तिला घरी पाठवले तेव्हा घरी कुणीही नव्हते. वयाच्या एकोणिसाव्या वर्षी पुर्ण कुटुंब गमावलेल्या समिधाला घरात थारा होईना. पण नाईलाजास्तव तिला तिथे राहावे लागले होते. एके दिवशी या पोरक्या मुलीचे कौमार्यही काही वासनांध नराधमांनी कुस्करले .या गोष्टीने तर ती पारच कोलमडून गेली . समिधा घराच्या बाहेर पडेनाशी झाली. तिने शिक्षणही अर्धवट सोडले. तिचे, आई आणि वडील दोघेही अनाथाश्रमात वाढलेले . त्यामुळे रक्ताचे किंवा जवळचे असे कुणीच तिला नव्हते. डॉक्टर अनिकेतना समिधावरील अत्याचाराची बातमी पेपर मध्ये वाचून समजली. हॉस्पिटलमधून डिस्चार्ज दिल्यानंतर काही दिवस ते समिधाच्या संपर्कात होते. पण नंतर कामाच्या गडबडीत जमले नाही.

डॉक्टर अनिकेत जेव्हा भेटायला आले तेव्हा समिधा एका कोपऱ्यात बसून होती. भेदरलेल्या अवस्थेमध्ये असलेल्या समिधाला धीर देवून डॉक्टर तिथून निघाले खरे पण त्यांना तिला असं सोडून जाताना काहीतरी चुकल्यासारखे वाटत होते. काही दिवसांनंतर त्यानीच तिला एका अनाथाश्रमात पाठवून तिथे रहायची सोय केली. समिधाची जागा बदलली असली तरी तिच्या मनावर झालेल्या आघातानी आपली जागा मात्र पक्की केली होती. तिचे कशातच लक्ष लागत नव्हते. कायम आढ्याकडे नजर लावून बसून असायची. अनाथाश्रमातील इनचार्ज , डॉ.अनिकेतना समिधाचा रोज रिपोर्ट द्यायच्या. तिच्यात काहीच सुधारणा होत नव्हती. तिच्या मनावरचा ताण काही केल्या कमी होत नव्हता. पण डॉ. अनिकेत यांनी आशा सोडली नाही तिच्या संपर्कात राहून त्यांनी समिधाला बरेच सावरले. वर्षभरात समिधा खूपच सावरली. ती परत कॉलेजमध्ये जावू लागली. आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करत ती एका खाजगी कंपनीमध्ये नोकरीला देखील लागली. पुढच्या दोन चार वर्षात सारे काही सुरळीत झाले .
समिधा दिसायला साधारण. त्यात लैंगिक अत्याचार झालेला असल्याने तिच्याशी लग्न करायला कोणीही तयार नव्हते. डॉ. अनिकेत यांची सहानुभूती मात्र तिच्या पाठीशी होती.
"मॅडम, साद बंगला आला बघा" रिक्षा वाल्याने हाक मारल्याबरोबर ती भानावर आली. तिने त्याचे पैसे देऊन ती घाईघाईत डॉक्टरांच्या बंगल्याकडे निघाली.

अंजना सकाळपासूनच गुश्शात होती. तशी अंजना अल्लड असली तरी खूप समंजस होती पण आज तिला काय झाले होते ते डॉ. अनिकेत आणि त्यांचे वडील वासुदेवराव या दोघांनाही काहीच कळत नव्हते. सकाळपासून तिने काहीच खाल्ले नव्हते. एवढा मोठा राग करण्याची ही तिची पहीलीच वेळ होती. रविवार असल्यामुळे सगळेच घरी होते. डॉक्टर अनिकेतला एक वेगळीच चिंता लागून राहीली होती. १०.३० वाजता समिधा येणार होती. तशी ती बऱ्याच वेळा अनिकेतला भेटली होती. पण असं घरी भेटायची मात्र ही त्यांची पहीलीच वेळ होती. नाही म्हटलं तरी मनावर थोडं दडपण होतचं. समिधापासून एक सत्य त्याने लपवून ठेवले होते. तो तिला आज सांगणार होता. खरतरं हा निर्णय त्याने वडीलांच्या वारंवार होणाऱ्या आग्रहाखातर घेतला होता.

आत किचनमध्ये जोरात भांडे पडल्याचा आवाज झाला. अनिकेत किचनमध्ये धावला. तिथे वासुदेवरावांसमोर अंजना रागाने फुणफुणत उभी होती. तिनेच तो काचेचा वाडगा फेकला असावा. अनिकेत तिच्या जवळ गेला. तिला जवळ घेतले.
" बेटा काय झालयं?" अशी का वागत आहेस तू?" तशी ती अनिकेतच्या गळ्यात पडून स्फूंदून स्फूंदून रडू लागली. अनिकेत तिच्या पाठीवरून काही न बोलताच हात फिरवत राहिला. एवढ्यात तिनेच अनिकेतला विचारले, "बाबा, तू परत का करतोयस लग्न?" असे बोलून ती परत गळ्यात पडून रडू लागली. वासुदेवराव, अंजनाचे हे शब्द ऐकून अवाक झाले. हिला कुठून कळली ही गोष्ट? अनिकेत आणि वासुदेवराव एकमेकांकडे पाहतच राहीले.
" बेटा, कोण बोलले तुला हे?" तिला हॉलमध्ये धरून आणत अनिकेत म्हणाला.
" बाबा, काल संध्याकाळी तुझं आणि नानूंचे बोलणे ऐकललय मी"
यावर अनिकेतला काय बोलावे ते सुचेना. तो विचार करू लागला. काल वासुदेवराव आणि अनिकेत समिधा बद्दल बोलत असताना अंजना घरी नव्हती. कसे कळले असेल तीला? त्याला अचानक आठवले ते दोघे बोलत असताना तिचा वासुदेवरावांना कॉल आला होता. अच्छा , बोलून झाल्यावर सवयीप्रमाणे त्यांनी कॉल बंद केला नसणार आणि आपले चालू असलेले सगळे बोलणे तिने मोबाईल वर ऐकले असणार.
" अग अंजू, बाबा असं का करतोय ते तुला या वयात नाही कळणार बेटा." वासुदेवराव समजूतीच्या स्वरात म्हणाले.
" मला एक गोष्ट मात्र कळतेय नानू, बाबाने आणि आपण गेल्या १७ वर्षात जितकं सोसलय ते परत व्हायला नकोय" अंजना काही लहान नव्हती. ती नुकतीच बारावीची परिक्षा पास झाली होती .
तिची समजूत काढता काढता दोघांनाही नाकीनऊ येत होते. ती आपले बाबा आणि समिधा यांच्या लग्नाच्या विरोधावर ठाम होती.

हे सारे बोलणे बाहेर उभी असलेली समिधा ऐकत होती. लाईट नसल्यामुळे तिने बेलचे बटन दाबले तरी बेल वाजली नव्हती. त्यामुळे ती दारावर तशीच ताटकळत उभी राहीली असताना हॉलमध्ये चाललेले सारे बोलणे तिने ऐकले होते. ती आल्यापावली मागे फिरली. अनिकेतचे सहज फाटकाकडे लक्ष गेले. समिधा गेटमधून बाहेर पडत होती. त्याला तिला हाक मारायचा मोह झाला पण त्याने स्वतःला आवरले.

समिधा तिथून निघाल्यावर तडक घरी निघाली. यावेळी रिक्षा न घेता चालतच जावू लागली. असं का बोलत असेल अनिकेतची मुलगी? अनिकेत यांनी आपल्या बद्दल तिला सांगितले नाहीये का? ती आता काही लहान नाहीये. आपण मागे फिरून काही चूक तर नाही ना केली? तिला आपण पाहीले देखील नाहीये. तिचा आवाज मात्र कुठेतरी ऐकल्यासारखा वाटत होता. डॉक्टर अनिकेत यांनी लग्नाबद्दल विचारले तेव्हा मला काहीच सुचत नव्हते. तेव्हाच तर आपण आपले वय पाहीले. चाळीशी गाठायला दोन महीने बाकी होते. गेली पंधरा वर्षे अनिकेत माझ्या पाठीशी होते. त्यांचा मला खुप आधार होता. अत्याचारा नंतरचे दिवस खूप कठीण होते. कोर्टात केस उभी राहीली होती. यात मला सहानुभूती सोबत बदनामी पण सोसावी लागली होती. अनिकेत यांच्या मदतीमुळेच त्या नराधमांना योग्य ती शिक्षा मिळाली होती.
तसही अनिकेत कधी आपल्या जीवनाबद्दल फारसे बोलत नसायचे. मी मात्र त्यांना काहीच उत्तर दिले नव्हते. डॉक्टर अनिकेत यांनी बायकोशी घटस्फोट घेतल्यानंतर लगेचच सहा महीन्यानी त्यांनी मला लग्नाचे विचारले होते. तिला काहीच कळत नव्हते.

समिधाच्या पर्समध्ये फोन वाजला. अनिकेत यांचाच कॉल होता. उचलावा कि उचलू नये यातच तो कट झाला. दोन मिनिटांनी परत कॉल आला.
"हॅलो, समिधा कुठे आहेस?" अनिकेतने विचारले.
" चालतेय, आता पोचेन घरी".
" संध्याकाळी जिमखान्याजवळच्या मंदीरात भेटशील?"
" आता आपण न भेटलेले बरे" असे बोलून तिने कॉल कट केला.

अनिकेतला तिचा राग अपेक्षित होता. त्याने परत फोन केला नाही.
ती घरी आली तेव्हा तिचा चेहरा पार उतरला होता. डोके ठणकत होते. कोणाच्या तरी कुशीत शिरून रडावेसे वाटत होते. तिला वाटले ती सगळ्यांनाच नकोशी झाली आहे. पाणावलेले डोळे पुसत ती कपडे बदलायला आत गेली. इतक्यात हॉलमध्ये फोन वाजला. अनिकेतचाच कॉल असणार म्हणून तिने लक्ष दिले नाही. लगेचच परत कॉल आला. तिने बाहेर येऊन मोबाईल पाहीला तर अपीचा कॉल होता.
"हॅलो, बोल अपी."
" ताई मला तुझ्याशी काही बोलायचे आहे, कधी भेटशील?" अपीचा आवाज थोडा जड झाला होता.
" काय झालं बेटा ?"
" मला फोनवर नाही सांगता येणार, मला आज भेट ना आपल्या नेहमीच्या ठिकाणी" अपीला नाही म्हणायला समिधाला जीवावर आले. तिचा मूड नसून पण ती भेटायला तयार झाली.
" हो ,भेटूया सोन्या" अपीला ती कधी कधी लाडाने सोन्या बोलायचे.
" थॅंक्यु तायडे" असे बोलून अपीने कॉल बंद केला.
समिधा विचारात पडली. अपी तिला सहसा कॉल करत नसे. पुन्हा तिने काही गोंधळ घातला तर नाही ना? समिधाला मागचा प्रसंग आठवला. अपीची आणि तिची ओळख ट्रेन मधली. अपी एक बिनधास्त मुलगी होती. निदान सुरूवातीला तरी तिच्या बोलण्या वागण्यातून ती बिनधास्त वाटत होती. तिचे खरे नाव समिधाला माहीत नव्हते. तिची मित्रमंडळी तिला अपी अशी हाक मारायचे म्हणून समिधाही तिला तेच म्हणू लागली . ती कायम ट्रेनच्या दरवाज्याजवळ उभी असायची. तिचा बॉयफ्रेंड तिला रोज भेटायला यायचा. ट्रेन सुटायच्या वेळेला त्यांचे प्रेम फार उतू जायचे. सुरूवातीला फ्लाईंग कीस वर ठेवलेले प्रेम नंतर नंतर मिठी पर्यंत पोहोचले. एक दिवस तिला आम्ही आत बोलविले. हे जे काही करतेस ते साफ चुकीचे आहे. असे चार चौघात वागणे बरे नव्हे.
"तुम्हाला काय करायचे आहे?" असे बोलून ती दरवाज्याजवळ निघून गेली. त्यांनंतर ते लव्ह बर्डस अतीच करू लागले. शेवटी शेवटी तर त्यांनी अगदी निर्लज्जपणाचा कळसच गाठला. समिधा आणि तिच्या सोबतच्या मैत्रिणीनी तिला समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण उपड्या घड्यावर पाणी.
काही दिवसानी अपी पंधरा दिवस गायब झाली. नंतर परत यायला लागली. पण नंतर एक गोष्ट आमच्या लक्षात आली तिचा तो बॉयफ्रेंड स्टेशनला यायचा बंद झाला. ही मात्र रोज वाट बघायची. सारखी फोन करायची . कदाचित त्याचा फोन लागत नसावा. आठ दिवसात तिचा चेहरा काळवंडला. मला तिची दशा पाहवेना तिला आम्ही आमच्या ग्रुपमध्ये घेऊन हसते करायचा प्रयत्न केला. तिही महीन्याभरानंतर नॉर्मल होत गेली. अधून मधून त्याला फोन करायची . फोन लागला नाही की, नाराज व्हायची. एक दिवस ट्रेनमध्ये आली तेव्हा खूपच काळजीत दिसली. समिधाने तिची चौकशी केली. पण काहीच सांगायला तयार नव्हती. तिचा चेहरा पार रडवेला झालेला. समिधा तिच्या पाठोपाठ स्टेशनला उतरली. तिला एका बाजूला घेवून समिधा तिची समजूत काढू लागली. त्याबरोबर तिचा हुंदका वाढला. ती शांत होईपर्यंत समिधा तिला तशीच थोपटत राहीली. हळू हळू तिला बोलते केले. स्फुंदत स्फुंदत तिने तिची सारी कहाणी सांगितली. ते ऐकून समिधाला ज्याची शंका होती तेच समोर आले. अपीची प्रेग्नंसी टेस्ट पॉझीटिव्ह आली होती. स्टेशनवर भेटणाऱ्या बॉयफ्रेंडने आपला स्वार्थ साधला होता आणि जबाबदारी घ्यायची वेळ आल्यावर तो गायब झाला होता आणि आता फोन पण उचलत नव्हता. शहरातील जत्रेत झालेली ओळख, मग मैत्री आणि त्यांनतरचे प्रेम खूपच तकलादू ठरले होते. तिने घरी या बद्दल काहीच सांगितले नव्हते. तिला समिधा परकी असली तरी जवळची वाटली होती. तिची मदत मिळेल या आशेने आणि विश्वासाने अपीने हे सारे समिधाला सांगितले होते. शेवटी समिधाच्या ट्रेनच्या ग्रुपमधलीच एक मैत्रीण तिच्या मदतीला धाऊन आली आणि अपीची या सा-या प्रकारातून सुटका झाली. ही मैत्रीण एक मोठ्या हाॅस्पीटलमध्ये समुपदेशक असल्यामुळे अपीच्या मानसिक आणि शारिरीक स्वास्थ्याची उत्तम काळजी घेतली गेली. त्यावेळी अपीच्या घरातल्यांना काहीच कळू दिले नाही. ही गोष्ट अपी आणि समिधा या दोघातच राहीली. थोड्याच दिवसात अपी पुन्हा पहिल्यासारखी नॉर्मल झाली. तिची आणि समिधाची भेट ट्रेनमध्ये होत राहायची. आणि आज खूप दिवसानी समिधाला तिचा फोन आला होता.

दरम्यान डॉक्टर अनिकेतचा एक मेसेज आला होता. तो उघडून न बघताच ती बेडवर आडवी झाली. तिला बराच मानसिक थकवा आला होता.

मोबाईलचा अलार्म वाजला. ती उठली. अंग पार जड झाले होते. पण अपीला भेटायला जायचे असल्यामुळे तिने आळस झटकला आणि तयारीला लागली.
समिधा कावेरी गार्डन मध्ये पोचली तेव्हा तिथे अपी अगोदरच पोचलेली होती.
समिधाला ती थोडी काळजीत दिसली.
त्या दोघी एका शांत ठिकाणी बसल्या.
"हं, बोल बेटा, काय झाले?" गप्प बसलेल्या अपीला बोलते करायचा प्रयत्न करत समिधा म्हणाली.
"ताई माझा एक प्रश्न आहे गं, हवे तर जनरल समज. पण त्या प्रश्नांचे उत्तर मला हवे आहे."
" विचार?"
"मुलं लग्नाच्या वयाची झाली असताना त्यांच्या आई वडिलांनी जर त्यांचा पार्टनर नसेल तर पुन्हा लग्न करायला हवे का?
"अपी, काय झालय तुला, असे का प्रश्न विचारतेस?"
"तू सांग तर खरं"
"समोरच्या व्यक्तीची मान्यता असेल तर का करू नये?"
"अग ताई, मुलांना कसं वाटेल? बाबा किंवा आई लग्न करत असतील , खास करून मुलं मोठी असतील तर, मुलं छोटी असताना समजू शकते"
"अपी ,तुला सारं समजावते, माणसाला म्हातारपण चुकलेले नाही. आजकाल मुलं मोठी झाली की आई बाबांच्या घरट्यातून उडून आपले दुसरे घरटे बांधतात. अशा वेळी दोघापैकी कोणी एक नसेल ना तर मागे राहणाऱ्याला आयुष्यात खूप एकटेपणा येतो, संवाद साधायला, काळजी घ्यायला , मन मोकळं करायला, थोडक्यात आणि तुझ्या भाषेत सांगायचं म्हणजे शेअर करायला कुणी नसतं.
" पण तायडे, बाबासोबत मी कायम राहणार आहे. हे मी बाबाला सांगून सुद्धा तो ऐकत नाही" अपी पटकन बोलून गेली. इतक्यात समिधाला पण काहीतरी दुवा सापडला. काहीतरी आठवले. सकाळी ऐकलेल्या आवाजाशी साम्य जोडले गेले.
"अपी तुझं पूर्ण नाव काय गं?"
"अंजना अनिकेत ठाकूर. का?"
"ओह.. तर तू आहेस डॉक्टर अनिकेत यांची मुलगी?"
" हो, तू ओळखतेस बाबाला? "
"बोल काय म्हणत होतीस" समिधाने लगेच विषय बदलला.
"अगं तेच ना, बाबा तिसरे लग्न करायला निघालाय, एकदा तोंड पोळून सुद्धा परत तसेच करायला निघालाय, कोणी समिधा नावाची बाई आहे, तिच्या सोबत लग्न करायचं म्हणतोय" बाई बोलताना अपीने केलेल्या तोंडाकडे समिधा पाहतच बसली. अपीला समिधाचे नावच माहीत नव्हते आणि समिधाला अपीचे नाव आत्ताच कळले होते.
" तू अगोदर , बाबांना आदरार्थी बोल बघू " समिधा तिच्यावर चिडली.
" चिल तायडे, बाबाला मी "अरे बाबा" असच म्हणते
"पण मला नाही आवडत तू असे बोललेले."
"ते जाऊदे गं, माझा प्रॉब्लेम बाजूलाच राहीला, मी आज सकाळी या लग्नाच्या विषयावर बाबा आणि नानूशी भांडले"
" तू मोठी आहेस म्हणून तुझ्या बाबानी लग्न करू नये असे वाटते का तुला?" समिधाने विचारले
"हो , अजूनही एक कारण आहे, बाबाने आणि आम्ही खूप त्रास सहन केलायय, बाबाने आता जो घटस्फोट घेतलाय ती माझी जन्मदाती आई नाहीये. माझी आई माझ्या जन्मानंतर काही दिवसात मला आणि बाबाला सोडून गेली. नानू सांगतात माझी आई खूप चांगली होती. पण आम्हाला तिचा सहवास मिळाला नाही. त्यांनंतर बाबाने सर्वांच्या आग्रहाखातर दुसरे लग्न केले. पण दुसऱ्या आईने आम्हा सगळ्यानाच खूप त्रास दिला. बाबाचे आणि तिचे लग्न झाल्यापासून कधी ही कुठल्याही विषयावर एकमत झाले नाही. खूप वाईट होती ती. बाबा पुरता फसला होता. घटस्फोटही द्यायला तयार होत नव्हती. शेवटी १८ वर्षानी बाबाला घटस्फोट मिळवण्यात यश आले. त्यानंतर काही दिवसानीच नानूनी परत बाबाच्या लग्नाचा विषय काढला. बाबा अगोदर लग्नाला तयार होत नव्हता. पण नंतर कसा काय तयार झाला कोणास ठाऊक? समिधा म्हणून कोणीतरी बाई आहेत. आज सकाळी भेटायला येणार होत्या. पण आल्याच नाहीत. त्या स्वभावाने कशा आहेत ते पण मला माहीत नाहीये."
" हे बघ अपी, तुला बाबांची काळजी वाटणे साहजिकच आहे. "पण सगळ्याच माणसांना एकाच मापात नको तोलूस. तू म्हणतेस कि तू कायम बाबांसोबत राहणार , प्रॅक्टीकली हे शक्य नाही . आज ना उद्या तुझं लग्न होणार, नानूंची साथही जास्त दिवस नाही. मग तुझ्या बाबांना परत लग्न करावसे वाटण्यात गैर काय आहे? जरी तू बिनलग्नाची राहून बाबांना सांभाळलस तरी बाबांच्या पश्चात तू ही एकटीच राहणार. म्हातारपण खूप वाईट असते गं याच वयात माणसाला कुणी आपलं, जवळचं ,बरोबर असण्याची खूप गरज असते. एकवेळ स्त्रीला पुरूष अगोदर सोडून गेला तर स्त्री जगू शकते पण पुरुष मात्र आपल्या पत्नीशिवाय नाही जगू शकत. "
"तायडे , मी असा विचारच केला नाही. मी चुकत होते. बाबाला एक नवीन इनिंग सुरू करायला काहीच हरकत नाहीये. " असे बोलून अपी समिधाच्या गळ्यात पडली.
इतक्यात समिधाने हातात पकडलेल्या मोबाईलवर डॉक्टर अनिकेत ठाकूर अशा नावाने कॉल आलेला पाहून अपीने समिधाला मारलेली मिठी सैल झाली. समिधा भानावर आली. तिने कॉल रिसीव केला आणि कॉल मुद्दाम स्पीकर मोडवर ठेवला
"हॅलो"
" समिधा आहेस कुठे, कधीपासून कॉल करतोय, तुझा फोनच लागत नव्हता. अगं सकाळसाठी सॉरी, अग अंजू ऐकतच नाहीये, तिला कसं समजावू तेच कळत नाहीये."
"मी सकाळी सारं ऐकलय"
दोघांचे संभाषण चालू असताना अपी उर्फ अंजनाचे तोंड मात्र उघडे पडले होते. समिधा तिच्या कडे पाहतच फोनवर बोलत होती. अपी आता थोडी लाजलीच होती. तिच्या कडून बराच गोंधळ झाला होता. मात्र मनोमनी समिधाला, तायडेला आपली आई मानायला तिचं मन तयार झालं होतं. तिच्या मनातील घालमेल ओळखून समिधाने मोबाईल वर हात ठेवून अपीच्या कानात काहीतरी सांगितले.
"अनिकेत, अंजना मला भेटायला आलीय, माझा पत्ता कसा मिळाला कोणास ठाऊक?"
"काय? अगं ती तर मला जाताना सांगून गेलीय की ती तिच्या मैत्रिणीला भेटायला गेलीय"
"ओके, तुम्हाला खोटं वाटतेय ना, थांबा हं" असे बोलून समिधाने अपीच्या हातात फोन दिला.
" बाबा, मी अपी बोलतेय, मला ह्या समिधा मॅडम अजिबात आवडलेल्या नाहीत"
" मला सुद्धा !! ही, तुमची,अपी अजिबात आवडलेली नाही, आल्यापासून भांडतेय माझ्याशी " समिधा दोघांचे संभाषण चालू असताना मोबाईलच्या माईक जवळ येऊन बोलली. त्याबरोबर त्या दोघीही आवाज न करता हसल्या . एकमेकांच्या गळ्यात गळे घालून कितीतरी वेळ डॉक्टर अनिकेत यांची फोनवर गम्मत करत राहील्या. पण त्याचवेळी
नानू एका झाडाआड लपून या दोघींचे संभाषण आणि अभिनय मोबाईल शुट करण्यात गुंतले होते. हा व्हीडीओ अनिकेतला लगेचच पाठवून अपी आणि समिधाच्या सरप्राईजचा फुगा ते फोडणार होते. त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरची खुशी मात्र काही और होती.

समाप्त...

© या कथेचे सर्व हक्क लेखकास्वाधीन आहेत. लेखकाच्या नावासहीत ही पोस्ट शेअर करायला हरकत नाही. तसे न झाल्यास कायदेशीर कारवाई अनिवार्य आहे.
------------------------------------------------------

लेखक - नितीन राणे.
सातरल - कणकवली
सध्या वास्तव्य - बदलापुर (ठाणे )
मोबाईल नं. ९००४६०२७६८

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

चांगली आहे, पण तुमच्या इतर कथा नैसर्गिक वाटतात, तशी ही वाटत नाहीये. घडवून आणलेले योगायोग वाटतात. समिधाची कथा जरा घाईघाईने सांगितल्यासारखी वाटते. शिवाय एका डॉक्टरच्या मुलीला अॅबॉर्शन करायला ट्रेनमधे ओळख झालेली, जिचं नावही माहीत नाही, अशा मुलीची मदत घ्यावी लागते, हेही जरा अविश्वसनीय वाटलं.
सॉरी, पण तुमचं बाकी लिखाण अाणि पात्रं अगदी अस्सल असतात, म्हणून एवढं लिहिलं. Happy

चांगली आहे, पण तुमच्या इतर कथा नैसर्गिक वाटतात, तशी ही वाटत नाहीये. घडवून आणलेले योगायोग वाटतात. समिधाची कथा जरा घाईघाईने सांगितल्यासारखी वाटते. शिवाय एका डॉक्टरच्या मुलीला अॅबॉर्शन करायला ट्रेनमधे ओळख झालेली, जिचं नावही माहीत नाही, अशा मुलीची मदत घ्यावी लागते, हेही जरा अविश्वसनीय वाटलं.
सॉरी, पण तुमचं बाकी लिखाण अाणि पात्रं अगदी अस्सल असतात, म्हणून एवढं लिहिलं. >>>>> सहमत

chan

मला तिची दशा पाहवेना तिला आम्ही आमच्या ग्रुपमध्ये घेऊन हसते करायचा प्रयत्न केला. तिही महीन्याभरानंतर नॉर्मल होत गेली. अधून मधून त्याला फोन करायची . फोन लागला नाही की, नाराज व्हायची. एक दिवस ट्रेनमध्ये आली तेव्हा खूपच काळजीत दिसली. समिधाने तिची चौकशी केली. पण काहीच सांगायला तयार नव्हती. तिचा चेहरा पार रडवेला झालेला. समिधा तिच्या पाठोपाठ स्टेशनला उतरली. तिला एका बाजूला घेवून समिधा तिची समजूत काढू लागली. त्याबरोबर तिचा हुंदका वाढला. ती शांत होईपर्यंत समिधा तिला तशीच थोपटत राहीली. हळू हळू तिला बोलते केले. स्फुंदत स्फुंदत तिने तिची सारी कहाणी सांगितली. ते ऐकून समिधाला ज्याची शंका होती तेच समोर आले. अपीची प्रेग्नंसी टेस्ट पॉझीटिव्ह आली होती. स्टेशनवर भेटणाऱ्या बॉयफ्रेंडने आपला स्वार्थ साधला होता आणि जबाबदारी घ्यायची वेळ आल्यावर तो गायब झाला होता आणि आता फोन पण उचलत नव्हता. शहरातील जत्रेत झालेली ओळख, मग मैत्री आणि त्यांनतरचे प्रेम खूपच तकलादू ठरले होते. तिने घरी या बद्दल काहीच सांगितले नव्हते. तिला समिधा परकी असली तरी जवळची वाटली होती. तिची मदत मिळेल या आशेने आणि विश्वासाने अपीने हे सारे समिधाला सांगितले होते>>>>>>>>> अपी, या लेडीज गृप मध्ये समिधाला जवळची मानत असेल कारण घरात आई वा आजी अशी कोणी मोठी स्त्री व्यक्ती नाही, की ज्यांच्याशी अपी तिच्या प्रॉब्लेम विषयी बोलु शकेल. मग त्यातुन समिधाने तिची प्रेमाने व काळजीने चौकशी केल्याने तिला समिधाच जवळची वाटु लागली असेल तर नवल नाही. शेवटी ही काल्पनीक गोष्ट आहे.

कथासूत्र आणि क्लायमॅक्स मागची कल्पना खूप चांगली. नाट्यमय आहे. पण मांडणी तितकीशी आवडली नाही. मध्ये कंटाळवाणी झाली आहे. तसेच, डॉक्टर आणि त्यांचे कुटुंबीय हि पात्रे आणि त्यांची एकंदर वर्तणूक वास्तवतेशी फारकत घेणारी म्हणून अजिबात पटली नाहीत.

तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार .. तुमचे अभिप्राय आवडले. निगेटिव्ह अभिप्राय मला पुढच्या कथा लिहिताना विचारात घेता येतील.
धन्यवाद ...
माझ्या सारख्या नवोदित लेखकाला सांभाळून घेताय यातच सारे आले ...