बकुळा

Submitted by माझी अबोली on 16 July, 2018 - 05:15

बकुळा

बकुळा..! काळीसावळी, हाडापेरानें भरलेली, मोठी उभी टिकली, पायात जाड पैंजण, हातात डझन भर बांगड्या, गळ्यात काळ्या मण्यांचं चारपदरी मंगळसूत्र आणि केसाच्या अंबाड्यात फुलं अडकवलेली. पहिल्याच भेटीत ती मला फारशी काही आवडली नाहीं. जरा नखरेल आणि अगाव वाटली. पण घरकामाचा नाईलाज आणि माझी नोकरीची गरज. दुसऱ्या दिवशी ती ठरलेल्या वेळेत आली. कामही पटापट आणि स्वच्छ केलं. मला जरा बरं वाटलं. पुढे दोन चार दिवस असेंच गेलें मग ती तिचे रागरंग दाखवायला सुरु केले. कधी उशिरा ये तर कधी लवकरचं. माझा कधी स्वयंपाक झालेला नसे तर कधी नोकरीला जायला उशीर. तिच्यामुळें माझी फार तारांबळ होऊ लागली. मग मी तिच्यावर चिडायला सुरुवात केली. ती शांतपणे माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करे. तिला जे हवंय तेच ती करें आणि जेंव्हा यायचं असें तेंव्हाच येई. कधी कधी तर खूप राग येई मला तिचा. पण काम चांगलं आणि विश्वासू म्हणून मग मला मूग गिळून शांत बसावे लागे.

एकदा तिला असाच यायला उशिर झाला अन मग माझी टकळी सुरु झाली. तिने पटापट तिचे काम तर आटोपलेच पण उलटं माझा स्वयंपाक झालेला नाही बघून मला म्हणाली, "सरका बाजूला. आवरा तुमी. मी करते भाजी. खाऊन तर बघा". मला खरंच उशीर झाला होता अन अयत खाण्याचं सुखं कोणाला नको असतें. मी म्हणाले, "करशील का पण नीट? नाहीतर मला कामं ओढवून ठेवशील". अस बडबड करत मी तिथून काढता पाय घेतला. तोंड धुवून तयारच होतच होतें कि खमंग असा वास आला. मी मनात म्हणाले, "व्वा.. भाजी छान झालेली दिसतीये". तयार होऊन मी बाहेर आले तर बयाने सर्व किचन ओटा चकचकीत केलेला हि होता. मी तिला म्हणाले, " super fast काम करतेस कि गं ". ती म्हणाली ," तर मंग .. उगाच काय लोक मला सयपाकाला लावत्यात?". मी हसून म्हणालें, "चल आतां, मला उशीर होतोय". जाताजाता तिने माझ्या गॅलरीतून गुलाबाचे एक फुलं तोडलं अन तिच्या केसात अडकवले. अन मलाच म्हणाली, "फुल काय वाळायला ठिवलीत की काय, ताय ?" मी जरा वैतागूनच तिला म्हणाले, "जा बाई लवकर. मला दार बंद करायचं आहे".

पुढे तिची मला सवय झाली. ती आली कि मला माझ्या आजूबाजूची आणि शेजाऱ्यापाजाऱ्यांची इतंभूत माहिती मिळत असे. घरामध्ये एक वेगळंच चैतन्य येतं असे. तिचं ते ठसक्यात बोलणं अन बिनधास्त वागणं याचं मला नवल वाटे. एकदा सुट्टीच निवांत असताना मी तिला विचारलं, "का गं; इतक्या नवनवीन साड्या घेतेस, नट्टापट्टा करतेस. दररोज वेळ तरी कसा मिळतो अन तुझा नवरा काही बोलत नाही का गं तूला?" ती फटकन म्हणाली, "त्याच्या काय बापाचं जातंय? म्या कमाईते, म्या खरचितें. त्याच्याकडून येकसुधीक पैसा घ्यात नाही म्यां. अन त्याच पैसे खर्चायला तो कुढं रहातोय माजा संग ?" मला काहींचं कळलं नाहीं म्हणून मी तिला विचारले, "परगावी असतो काय तो मग?" ती ठसक्यातचं म्हणाली ," कसचं ताय? इथंच पडीक हाय माज्या सवतींकडे. तिच्या पाईच तर टाकली त्यांना मला". मला जरा वाईट वाटलं. मी तिला "sorry " म्हणाले. अन विषय बदलावा म्हणून मी तिला विचारले "चहा घेणारं का?" ती म्हणली , "व्हयं".

भिंतीला टेकत ती पुढे बोलू लागली, "ताय, आता वाईट नाय वाटतं बघा. लयं तरास दिलाय बघा सगळ्यांनी. लई मार खालला हाय, पोरापायी ..पर आत नाय ... आता मला माजा गण्या हाय. माजा गण्या जवापासून झालाय तवापासून म्यां कोणालाबी पुसीत नाय. नवसाचं पोरं हाय माज. लई हुशार हाय. मया बी लय करताया बघा. आता त्याच्यासाठीच जगायचं. लई शिकिविणारं हाय त्याला म्यां. असं त्याच्या बापगत नाय वागू दिनार .. ". मी तिला चहा देत विचारलं , "अगं! एवढा चांगला मुलगा आहे, तू पण चांगलं कमावतेस तर मग जरा नवऱ्याकडे लक्ष दे. वाटलं तर एखादं काम कमी कर पण घरांकडे बघ. मुली पण आहेंत ना तुला, लग्न करायची आहेंत तुला .. त्यावेळी वडील पाहिजेत ना ". तिने चहाचा घोट घेत रागानेच सांगितले," काय बी नग ताय, तो बी नग अन त्याच उपकार बी नग. लई लई छळाला हाय त्यानं .. तोंडसुदिक बघू वाटत नाय मला त्याच. आवं, लय लहान होती मी तवा, १२ -१३ वरसाची. तवाच माज ह्याच्याशी लगिन झालं बघा. माजी आय मी लहान होती तवाच मेली. बापानं दुसरं लगिन केलं. सावत्र आयला म्या नग होती म्हणून तिने या माणसाशी माज लगिन लावून दिलं बघा. ते बी फुकटातच .. हुंडाबिंडा, काय बी नग होतं त्याला. तवाच त्यो मयापकसा १५ -२० वरीस मोटा हुता. हा दणकट, अंगावर आला कि काटाच यायचा. घाबरून जायचा जीव माजा पर सांगायचं कुणाला? तशातच दिवस गेलं बघा मला. पहिल्यांदा बाळंतपण आयकडंच सांगून सासू गेली ती गेलीच गावाकडं. सावत्र आयमुळ बापानं तर कानाला खडाच लावला. मग देवालाच दया आली अन त्यानं माझ्या आजीला पाठईली. आजीनं कसबस बाळंतपण केल घरीच पर पोरगीच झाली. आजी बी गेली लगीच अन सासू तर त्वान्ड बघायला बी नाय आली नातीच. मग याच मारण चालू झालं तशातच दुसरी बी पोरगीचं झाली. मग ह्यो दारू पिऊन मारू लागला. नवरा काय पैसं दिना अन पोटाला तर तुकडा हवा. तवा पोरगी सबळायला म्यां माज्या बारक्या भावाला बोलईल. लय गयावया केली बापाकडं तवा धाडला भावाला. अन नसीब बी कसं घात करतया बघा ताय, मयीं पोरगी रस्ताकडे धावली म्हूणन पकडायला गेलं अन टरकन त्यालाच उडविला. मया डोळ्यादिखित भाव मेला माजा". ती कासावीस होऊन रडू लागली. मला फार बेचैन झालं. उगाच विषय काढला आपण तिच्या घरचा असा वाटू लागलं.

पण तिनेच नंतर डोळे पुसले अन कतार आवाजात सांगू लागली," भाव गेला अन माहेर बी गेलं. बापानं बोलणंच टाकलं. ऊरनुसता भरून यायचा, पर या हलकटला काय? त्याला नुसतीच भूक. तशातच तिसरी अन चॊथीबी पोरगीच झाली मया. मग तर ह्यो लईच पिसाळला. द्रूरुज दारू पिऊन मारायचा अन सवतील घरात घेऊन यायचा. त्यांचं ते रंगेल खेळ मया पोरींसमूर नग म्हणून मी त्याला अन तिला घराबाहीर काडल अन त्यो तवापासून तिच्याच दारात पडीक असतोया. पर देवाकडं न्याय असतोय बघा मला तवा दिवस गेलत हे कळलं. तवा मी आमच्या इथल्या गणपतीला नवस बोलली बघा.. इतकं उपासतापास केलं, देवीचं नवस, बोकडं कापली पर पोरग झालं नाय बघा अन ह्या बारी पोरगं झालं देवाच्या दयेने म्हणून म्या त्याच नावं गणेश ठिवलं. परं मया सासूला अन नवऱ्याला अजुनबी त्यो पोरगा त्यांचा हाय असं वाटीतच नाय.. दुसऱ्याचं पाप हाय म्हंत्याती .. पर आता म्या ध्यान देत नाय बघा तिकडं. मया गणेश, लय गुणाचं लेकरू हाय. लय मया लावत सगळ्यांना. माजा आधार हाय. बहिणीचं माहेर हाय. मया पोरीबी जीव ओवाळून टाकतात भावावर. अता कसलीबी काळजी नाय. लय काम करायईची अन लय मोट कराईचं गण्याला. त्याला लय आवडत म्या फुल घातलेली अन चांगलं राहिल्याली. हिरोईनसारखीच दिसती की मी मया गणूला ". भानावर येत ती उठली अन म्हणाली,"चला गं बाय, लय उशीर झालाय .. " आणि फराफरा चप्पलांचा आवाज करत गेलीसुद्धा. मी नुसतीच बघत राहिले तिला.

अचानक पुढे काही दिवसांनी ती आलीच नाही. एक दिवस, दोन दिवस, तीन दिवस.. आता मात्र मला तिचा राग आला. एखादा फोन नाही तर निरोप तरी द्यायचं ना. किती खोळंबा झाला होता माझा. आजारी असेल असं वाटलं कदाचित. पण मग शेवटी security कडे चौकशी केली. तो म्हणाला," बकुळेच्या इथे राहनाऱ्या कामवाल्या बाईने सांगितले कि ती आता येणार नाही.. तिचं पोरगं मेल बघा". मला तर अंगावरती वीज कोसल्यासारखेच झाले. मी त्याला म्हणाले," कसं काय? काय झाला त्याला?" तो सांगू लागला ," नवराबायकोची भांडणं चालली होती. तिचा नवर तिला दारूपिऊन काठीने मारीत होता अन हे पोरगं आईला मारू नका म्हणून मधी आलं अन काठी लागली डोक्यातचं त्याच्या. बकुळेच्या हातातच जीव गेला बघा त्याचा.. लय वंगाळ झालं बघा. " माझ्या सर्वं अंगाला मुंग्या आल्या अन बधिरपणा आला.सुन्न झालं सगळं. कोण काय बोलतंय तेच समजेना. डोळ्यासमोर अंधारी आली. कसं काय घडलं हे सगळं असं अचानक? किती खूष होती, बकुळा? किती कौतुक करत होती गणेशाचं ? का विषय काढला आपण? असें अनेक प्रश मला पडू लागले. खूप उदास वाटू लागले. सारखा बकुळेच हसरा चेहरा डोळ्यासमोर येऊ लागला. उगाच न पाहिलेला गणेश अन ती दिसू लागले. कसंतरीच होत होत मला. वाटत होत जाऊन भेटावं का तिला?

असेच अनेक दिवस गेलें अन अचानक एकदा दारावर बेल वाजली. सकाळी सकाळी कोण आले असेल म्हणून मी दार उघडला तर समोर बकुळा... ! काय बोलावें मला समजेना. माझे डोळे भरून आले. तिने विचारले," काम करू का तुमचं ?" मला काहींचं बोलवेना अन कळेना. मी मान हलवूनच होकार दिला. ती आत आली अन तिचं काम करू लागली पण आज कसलाही आवाज नव्हता. तिला आज असं शांत, निस्तेज चेहऱ्यांच, पाणावलेल्या डोळयांच बघून माझं मन हेलावून जात होत. जुनी साडी, विस्कटलेले केस असा तिचा अवतार बघून तर भडभडूनच येत होत. काय होती ती अन काय झाली होती ती. मी नुसतीच टक लावून तिच्याकडे बघत होते अन ती मात्र मान खाली घालून काम करत होती यंत्रासारखी .. भावनाशून्य .. ! काम आटपून ती जायला निघाली. जाताजाता गॅलरीतील फुलांकडे तिने पहिले अन तोंडावर हात धरून ती पटकन निघून गेली. मला एकदम हुंदका आला अन माझा बांध फुटाला. "का देव एखाद्याची इतकी परीक्षा बघतो? का इतक्या यातना देतो कि त्याच आयुष्याचं बदलून जात? का सुख देऊन तो हिरावून घेतो? तिला जर मुलगा झालाच नसता तर .. ". मी विचार करत बसले... ती अन तिच्या चार जिवांच्या पोटाचा ...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

का देव एखाद्याची इतकी परीक्षा बघतो? का इतक्या यातना देतो कि त्याच आयुष्याचं बदलून जात? का सुख देऊन तो हिरावून घेतो>>>> खरच..

का देव एखाद्याची इतकी परीक्षा बघतो? का इतक्या यातना देतो कि त्याच आयुष्याचं बदलून जात? का सुख देऊन तो हिरावून घेतो>>>> खरच.. +१

का देव एखाद्याची इतकी परीक्षा बघतो? का इतक्या यातना देतो कि त्याच आयुष्याचं बदलून जात? का सुख देऊन तो हिरावून घेतो>>>> Sad

बर्याचजणी असतात अशा. एकहाती घर चालवत असतात.

< "अगं! एवढा चांगला मुलगा आहे, तू पण चांगलं कमावतेस तर मग जरा नवऱ्याकडे लक्ष दे. वाटलं तर एखादं काम कमी कर पण घरांकडे बघ. मुली पण आहेंत ना तुला, लग्न करायची आहेंत तुला .. त्यावेळी वडील पाहिजेत ना ". >>> हे कैच्याकै आहे पण Angry

अ‍ॅमी Lol
मलाही वाचतानाच खटकलेलं ते.
पण दु:खांत वाचुन लिहिलं नाही.

का वाचले असे झाले ...सरसरून काटा आला बघा अंगावर. खूप खूप आतून मनात कुठे तरी लागले, शब्दात नाही सांगू शकत पण डोळ्यात आसवे आली माझ्या .. Sad