रेसिपी (लघुकथा)

Submitted by रोहिणी निला on 15 July, 2018 - 13:59

पार्टी रंगात अली होती. अन्या, सुल्या, मक्या आणि मी किती दिवसांनी भेटत होतो आम्ही.जामच जमले होते ड्रिंक्स. त्यातून मी स्वतः बनवलेले masterchef च्या तोंडात मारतील असले एकेक स्टार्टर्स. मी एक फार भारी कुक आहे OK. कॉलेज मध्ये असल्यापासूनच कायकाय बनवतो. माझ्या होणाऱ्या बायकोची मजा आहे असं एकजात सगळ्यांचं मत होतं. माझ्या एक दोन मैत्रिणी तर मला कधीही propose करायला तयारच होत्या. एक चांगला नवरा व्हायला इतकं qualification पुरे होतं त्यांच्या मते.....

असो...कॉलेज संपल्यावर सगळ्यांची तोंडं वेगवेगळ्या दिशेला झाली होती. त्यातून लग्नं बिगनं झाल्यावर नाही म्हणलं तरी जरा अंतर वाढलंच होतं.

बरं, लग्नाची बायको असुदे नाहीतर गर्ल फ्रेंड असुदे, ह्यांच्यावरचा फोकस जरा म्हणून कमी झालेला खपत नाही ह्यांना. आधी नव्हाळीचे दिवस म्हणून आणि नंतर कधी क्वालिटी टाईम म्हणून, कधी शॉपिंग म्हणून आणि कधी पिरियड ब्लूज म्हणून सारखं आपलं ह्यांचं कौतुक करत पुढे मागे फिरा. कधीच तक्रार न करणाऱ्या नवऱ्याला ह्या गोष्टींचा त्रास होऊ शकतो ह्याची जाणीव पण नसते ह्यांना. आपल्या निरुपद्रवी आणि सहनशील नवऱ्याला पण त्याच्या मनासारखा एक उनाड दिवस मिळायला हवा असा विचारही ह्यांच्या मनाला शिवत नाही.

आजचा हा फंडू दिवस पण खरं तर मातीत जाणार होता. सुषमा ..... मी हिला प्रेमाने सुशी म्हणतो ... तर आज सकाळीच ह्या धासू प्लॅन चं सुशीमुळं वाटोळं होण्याची वेळ आली होती.

आता हिचा अमेरिकेहून आलेला आतेभाऊ म्हणजे काय अमेरिकेचा president आहे का की समस्त नातेवाईकांनी उठून त्याला तिकडे भेटायला जायचं. एरव्ही मी गेलोही असतो. पण ही आमची gang आजच धडकणार आहे हे सांगायला विसरलो... कसं ते खरंच माहिती नाही. पण ह्या सगळ्या खादाडी साठी सामान घेऊन आलो आणि ते प्रश्न चिन्ह बघूनच कळलं की लोचा झाला.

मग त्याच्यापुढं जे झालं ते वर्णन करणं अवघड आहे... तरी थोडक्यात सांगायचं तर आदळआपट, शाब्दिक चकमक, धुसफूस, रडारड ह्याची अवर्तनं झाली. पण मी थंड डोक्यानं विचार करायचा प्रयत्न करत राहिलो. खरं तर तिच्या भावाला भेटायला ती एकटी गेली असती तर काय इतकं आभाळ कोसळलं असतं? मी तसं सुचवून पण पहिलं. विनंती केली अक्षरश: पण हिचं मात्र एकच पालुपद "माझ्या लोकांना भेटायचं म्हटलं की त्यात १७६० विघ्नं आलीच. मला तर हे सगळं मुद्दाम केल्यासारखंच वाटतंय"

आता मात्र माझं डोकं सटकल. म्हटलं आता एकदा शेवटचं समजावून सांगीन. समजलं तर ठीक नाही तर I was totally helpless. काही तरी ठोस पाऊल उचलणं गरजेचं होतं. एरवी मी अजिबात असा माणूस नाहीये. Trust me.

"नित्या, साल्या बाहेर ये की kitchen मधून"

"आलो आलो"

"काय चव आहे यार तुझ्या हाताला. Continental dishes बाप बनवतोस. साल्या तेव्हा स्वप्नी आणि तेजी तुझ्या मागं लागल्या होत्या तेव्हाच तुला मागणी घालून लग्न करायला हवं होतं तुझ्याशी"

तिघं पण खदाखदा हसायला लागले

"अन्या, केलं नाहीस तेच बरं झालं... चला चला मेन कोर्स लावलाय आत टेबल वर"

टेबलवरची arrangement पाहून तिघेही हर्षोन्मदाने ओरडले " wow सुशी"

Group content visibility: 
Use group defaults

☺️

मला काही कळलीच नाही ...

बायकोला मारून डिश बनवलीय आणि ती सगळे खातात पण? माणसंच आहेत कि....... ? आणि त्यांना नाव कसं कळत "सुशी" म्हणून ?

मला काही कळलीच नाही ...

बायकोला मारून डिश बनवलीय आणि ती सगळे खातात पण? माणसंच आहेत कि....... ? आणि त्यांना नाव कसं कळत "सुशी" म्हणून ? >>> +११११११

शेवट जरा विस्काटुन सांगता का

@उपाशी बोका

छान छान म्हणायची तसदी नाही घेतली तरी चालेल

सुशी ही एक जापनीज डिश आहे.
त्याच्यात 'सुशी' घातलीये की नाही हे ज्याच्या त्याच्या कल्पनेवर अवलंबून आहे.

शेवटी समजूतदार पणे किंवा रागावूनच सुशी अतेभावाकडे जाते आणि नंतर परतही येऊ शकते.

दुसरा एक अर्थ असा होऊ शकतो की एका सुशीमुळे सगळ्या प्लॅन चं वाटोळं होता होता दुसऱ्या सुशीमुळे मजा आली.

नवऱ्याशी भांडल्यानंतर बायका जशा कणिक तिंबताना प्रतिकात्मक रित्या नवऱ्याला तिंबतात तसं त्यानं प्रतिकात्मक रित्या सुशी कापली

अरे देवा! मला वाटलं कथानायक उगीचच पुड्या सोडतोय. खरी अरेंजमेंट सुशीला (सुशी) ने केलीय हे त्याच्या मित्रांना कळलंय.