माझा बिलकुल भरवसा नाही…

Submitted by Charudutt Ramti... on 14 July, 2018 - 13:23

पांघरून वेड जगतो, तरी बुद्ध्यांक विचारतात माझा,
अकलेवरच त्यांच्या, माझा बिलकुल भरवसा नाही…

सराफकट्यावर उर्मटांच्या, मोजला विनय ज्यांनी,
तराजूवरच त्यांच्या, माझा बिलकुल भरवसा नाही…

फेडतो कधी न संपणारे, कर्ज मी घेतले ज्यांचे,
चक्रवाढपद्धती वर त्यांच्या, माझा बिलकुल भरवसा नाही…

झाकला कोंबडा ज्यांनी, माझा सूर्य न उगवण्या साठी,
आरवण्यावरती त्यांच्या, माझा बिलकुल भरवसा नाही…

चुकवली बेरीज माझी, स्वत:चा हातचा राखण्या साठी,
पाढयांवरती त्यांच्या, माझा बिलकुल भरवसा नाही…

तोडल्या तारा ज्यांनी, गाणे भेसूर करण्या साठी,
‘रागां’वरती त्यांच्या, माझा बिलकुल भरवसा नाही…

टाकतात खडा आटवताना, केशरा ऐवजी जे मिठाचा,
‘कोजागिरी’ वर त्यांच्या, माझा बिलकुल भरवसा नाही…

चारूदत्त रामतीर्थकर
१४ जुलै २०१८, पुणे

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पांघरून वेड जगतो, तरी बुद्ध्यांक विचारतात माझा,
अकलेवरच त्यांच्या, माझा बिलकुल भरवसा नाही…

हा भारी आहे