सारा पसारा

Submitted by निशिकांत on 13 July, 2018 - 06:13

तरही--सानी मिसरा श्री भूषण कटककर यांचा )

आसवांच्या अडगळीने कोंडमारा
आवरू केंव्हा तरी सारा पसारा

अंधश्रध्दा ठेवणार्‍या माणसांना
जो जगी नसतोच तो वाटे सहारा

आप्त करतो दूर अन् गळफास जवळी
कर्ज नोंदीनेच भरला सात बारा

वाटही बघते तुझी का वाट सखये?
चाहुलीने सरसरे अंगी शहारा

परप्रकाशित चंद्र असुनी व्यर्थ भुललो
हे उमगले अन् निखळला एक तारा

वादळाने शांतता स्वीकारली अन्
अवकृपेचा तत्क्षणी सरला दरारा

जीवनाची नाव भरकटली तरी पण
मस्त आहे, का उगा शोधू किनारा?

याचकांना पावतो, शराणगातांना
देव करतो मानवाला का बिचारा?

जायचे "निशिकांत" तर तू जा सुखाने
जन्म पण, लिहिण्यास गझला, घे दुबारा

निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Group content visibility: 
Public - accessible to all site users