ये दिन क्या आये, लगे फूल हँसने...

Submitted by अतुल ठाकुर on 11 July, 2018 - 01:33

chhoti-si-baat.jpg

आनंदी स्वरातला मुकेश हा आपल्या फार ओळखीचा नाही. कारण मुकेश म्हणजे दर्द असं जणु समिकरण बनून गेलंय. राज कपूरने ते जास्त घट्ट केलं. पण मुकेशने सुखी माणसांची गाणीही बरीच गायिली आणि ती लोकप्रियसुद्धा झाली. "ये दिन क्या आये" हे बासु चटर्जींच्या "छोटीसी बात" मधील एक दुर्मिळ म्हणता येईल असं गाणं. रेडियोवर फारसं वाजलेलं ऐकलं नाही. कवी योगेश यांचे सिच्युएशनमध्ये चपखल बसणारे शब्द आणि त्याला दिलेली सलील चौधरींची अनोखी चाल. मूळात गाणे सुरु होते तेच अशा तर्‍हेने की ते संगीत ऐकून गाण्याचा मूड पटकन लक्षात यावा. सुकलेल्या, वर्षानुवर्ष पाणी न मिळालेल्या, तडे गेलेल्या जमिनीवर मुसळधार पाऊस पडावा आणि ती जमिन भिजून चिम्ब व्हावी तशी अवस्था सांगणारं हे गाणं आणि नेमकी तशीच अवस्था या चित्रपटाचा नायक अमोल पालेकर याची झालेली आहे.

लहानपणापासून आईवडिलांच्या सावलीत वाढलेल्या आणि आता एकट्या पडलेला आपला हा मध्यमवर्गिय नायक प्रेमात पडतो आणि त्याच्या "रास्ते का कांटा" असरानी त्याच्याहून अनेक बाबतीत सवाई आणि स्मार्ट असतो. त्याला शह देण्याचे ट्रेनिंग अशोक कुमार नायकाला देतो. अमोल पालेकर त्या सार्‍या ट्रिक्स वापरून यशस्वी होतो. आणि आपल्या प्रियेला बरोबर घेऊन, तिच्या समोरच असरानीच्या स्मार्टनेसवर कुरघोडी करत त्याच्याहीपेक्षा सरस ठरतो. आणि सुरु होतं "ये दिन क्या आये..."

मुकेशचा मॅनली आवाज, अमोल पालेकर आणि विद्या सिन्हाचे अगदी हवेहवेसे वाटणारे मध्यमवर्गीय लूक्स आणि मध्यमवर्गिय वागणे, बोलणे, चालणे, चायनीज खाताना असरानीची उडालेली तारांबळ, शेवटी त्यालाच भरावे लागलेले बील, असरानीला ताटकळत ठेऊन त्याचा राग वाढवणे, अमोल पालेकरचे टेबल टेनिस खेळतानाचे मनोरंजक सीन्स, असरानीची तारांबळ पाहताना अशोक कुमारचे मिस्किल हसणे अशी एकूणच सुरेख रंगसंगती या गाण्यात जमली आहे. मुकेशच्या आवाजात अमोल पालेकरच्या भावना आपल्यापर्यंत पोहोचतात. तृषार्त धरा नुसती शांतच झाली नाही तर तीवर आता हिरवेगार कोंबही फुटले आहेत ते जाणवतं.

सोने जैसी हो रही है हर सुबहा मेरी
लगे हर सांझ अब गुलाल से भरी
चलने लगी महकी हुई पवन मगन झुमके
आंचल तेरा चूमके...ये दिन क्या आये...

मनात प्रेम थुईथुई नाचु लागलं की आपोआपच आसमंतही देखणा वाटु लागतो. आतापर्यंत दबून राहिलेल्या नायकाला आपले प्रेम प्राप्त करण्याचा मार्ग मिळाला आहे. नव्हे ते त्याला प्राप्तच झाले आहे. बाकी या गाण्यासाठी मुकेशच्या आवाजाची निवड हा मला मास्टरस्ट्रोकच वाटतो. नेहेमी दर्दभरी गाणी गाणारा आवाज म्हणून हे आनंदी गाणे त्याला दिले असेल का? नेहेमी दबून राहिलेल्या नायकाला आता आनंद झाला आहे हे त्यातून सुचवायचं असेल का? मुकेशचे आणि दर्दचे नाते माहित असल्याने त्याला खेळकर आनंदाचे, स्वप्नपूर्तीचे गाणे देऊन सलीलदांनी नायकाच्या चित्रपटातील एकंदरीत सिच्युएशनलाच कवेत घेतले आहे. मला भावले ते या गाण्यातील जोडप्याचे मध्यमवर्गिय दिसणे. यातले काहीच अंगावर येत नाही. आणि आपल्या मनात झिरपत जातो तो मुकेशचा स्वर ज्या बरोबर आपणही गुणगुणु लागतो "देखो बसंती बसंती होने लगे, मेरे सपने..."

अतुल ठाकुर

हे गाणे येथे पाहता येईल
https://www.youtube.com/watch?v=k1WmYZzwi1A

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच ओ अतुलजी .
ही गानी कधीतरी फार ऐकलेली असतात , फार फार आवडलेली असतात .
तुम्ही अचानक आठवण करून देता . जुनी कॅसेट शोधून दिल्यावर परत परत तीच ऐकली जाते तसं होतयं बघा Happy

हो हे गाणं आणी पिक्चर खूप छान आहे.
सगळं आपल्या मनासारखं होत गेल्यावर प्रभा बरोबर असताना अरुण चं मनापासून निरागस हास्य.

मुकेश म्हणजे सच्चा सूर, सादगी. सलील चौधरी ने मुकेश चा आवाज बरेच वेळा मस्त वापरलाय. पटकन आठवणारं आणखीन काही उदाहरणं म्हणजे आनंद मधली ‘मैने तेरे लिये ही सात रंग के‘ आणी ‘कही दूर जब‘, मधुमती मधलं ‘सुहाना सफर और यह मौसम हसीं‘, रजनीगंधा मधलं, ‘कई बार यूं भी देखा है‘.

खुपच आवडणारे गाणे आणि पिक्चर. बर्‍याचवेळा बघितला जातो हा पिक्चर. सगळ्यांची कामं मस्त झालेली आहेत. सगळ्यांत मजा अशोक कुमार आणतात.

सर्वांचे मनःपूर्वक आभार.
रजनीगंधा मधलं, ‘कई बार यूं भी देखा है‘.
फेरफटका.. यावर लिहेन केव्हातरी Happy

छान लिहिलंय.
कई बार यूं भी देखा है>>> लवकर लिहा Happy

Wow..छान ,खूप सुंदर लिहिलंय.. हे गाणं हा सिनेमा ऑल टाईम फेवरेट आहेच.. कित्ती वेळा पारायणे केलीत पण कधीच कंटाळवाणा होत नाही. एवरग्रीन एवरफ्रेश.

हे माझंही अत्यंत आवडत गाणं आहे.

बाकी फेरफटक्याला अनुमोदन: माझ्या मते सलीलनेच मुकेशचा चांगला वापर केला. जागते रहो, छाया, हनीमून व पूनम की रात यात पण मुकेशची गाणी आहेत.