झरोके

Submitted by जव्हेरगंज on 10 July, 2018 - 09:51

"मला एक गुलाम विकत घ्यायचा आहे." टेबलावर हजाराचे पुडके ठेवत मी म्हणालो. हॅट एका बाजूला कलवली. आणि चेहऱ्यावर स्मितहास्य.

"कसला पायजे? काळा, गोरा, रानटी? की आपला साधाच?" मुंडी वर न उचलता तो मनुष्य पैसे मोजण्यात गर्क होता. "पुरुष की बाई?" या वेळी मात्र त्याने वर पाहिले. भिवया थोड्या ताणलेल्या.
"तुमच्याकडचा अव्हेलेबल स्टॉक तरी दाखवा" बियरच्या बॉटलचं झाकण काढावं तसं मी विचारलं.
"तसं दाखवता येत नाही इथं. माल बाहेरून मागवावा लागतो. बरीच लफडी आहेत. तुम्ही रिक्वायरमेंट कळवा" एव्हाना त्यानं चौथं बंडल मोजून संपवलं होतं.

काय? तुम्ही त्यांच्याशी नडता. ज्यांना घ्यायची सवय आहे. अशाने हा बियरबार उध्वस्त होईल.

"ये पिंट्या, सायेबांना आत घेऊन जा"

अतिशय कळकट अंधार. चार पुरुष उभे होते आणि एक बाई.
"हा दगडं फोडतो.." एकजणाकडे बोट दाखवत पिंट्या म्हणाला.
"आणि हा रस्ते झाडतो"
"हू.."
"हिकडची दोघं काय कामाची नाहीत. डोक्यातनं गेलेत.."
"बरं.."
"आणि ही बाई. हीच काय माहीत नाही. कालंच आलीय. सैपाक पाणी तरी जमत आसंल म्हणा. ये, जमत का गं?"
"येस, आय कॅन डू दॅट" खिडकीजवळची ती बाई खुदकन हसत म्हणाली.
"ही इंग्लिश बोलते?"
"व्हय व्हय , कालपस्न कटकट लावलीय."

*****

"तुझं नाव काय?" घोडागाडीत बसल्यावर मी तिला विचारलं.
"लिली" एवढंच ती म्हणाली.
मग बाकीचा प्रवास आम्ही जुनाट पडक्या इमारती बघत सुरु केला. एक गाठोडं होतं तिच्यापाशी कसलंतरी. पण मी विचारलं नाही. तपकीरी कुरळे तिचे केस वाऱ्यावरती उडत होते. फारच मोहक.
"तू हे बिस्कीट खाणार का?" कोकोनट बिस्कीटाचा आख्खा पुडा फोडत मी म्हणालो.
तिच्या तोंडाला शब्दशः पाणी सुटले होते. मला राहावले नाही. संपूर्ण पुडा मी तिच्या स्वाधीन केला.

एका उध्वस्त इमारतीच्या तळमजल्यावर आम्ही उतरलो. रॉकेटहल्ल्यात तिची बरीच पडझड झाली होती. आणि तिचे दरवाजे चोरीला गेले होते. आत शब्दशः काहीच नव्हते.
"आज इथेच मुक्काम ठोकूया" घोडागाडीवाला निघून गेल्यावर मी म्हणालो.

*****

"तुला मी आख्खा बिस्किटाचा पुडा दिला आहे. तेव्हा तुला आज काही खायप्यायची गरज नसावी." जमीनीवर उपरणे अंधरत मी म्हणालो. अंधार गुडुप पडला होता. शब्दशः काळा.
"पण एक छोटासा पावाचा तुकडा मिळाल्यास फार उपकार होतील सरकार" कोपऱ्यात ती बहुदा अजून बसूनच असावी.
"तू अजून जिवंत आहेस याचं तुला आश्चर्य नाही वाटंत? मी अजून तुला साधा स्पर्शही नाही केला हे काय कमी नाही?"
त्या घनघोर अंधारात खरंतर मच्छरांचा भरपूर त्रास होता. अर्धवट पडलेल्या भिंतीच्या बाहेर बघत झोपेला शरण जाणे क्रमप्राप्त होते. या लिली नावाच्या बाईला पळून जाणे केव्हाही सहज शक्य होते. आणि असे झाले तर माझे दहा हजार रूपये पाण्यात जाणार होते. मी खिशातले पिस्तूल लोडेड करून ठेवले.

मध्यानरात्र ओलांडून पहाटेचा गार वारा चांगलाच झोंबू लागला. थंडीची हुडहुडी शरीरभर पसरली. आणि तीव्र विजेच्या झोताने अचानक आख्खी खोली व्यापून टाकली.

"उठा.... उठा..." बंदूकीची नळी ताणून धरत हवालदार जोरात ओरडत होता. आजूबाजूने अजून तिघे चौघे आत आले.
मी पडल्या पडल्याच हात वर केले.
"शो मी युवर येलो कार्ड. क्विक!"
मी वरच्या खिशात ठेवलेले येल्लो कार्ड त्याच्यासमोर नाचवले.
त्याने ते हातात घेऊन व्यवस्थित बघितले. मग सरळ ताठ उभा राहत म्हणाला,
"ओह आय एम सॉरी सर, फॉर ब्रेकींग युवर प्रायव्हसी."
"इट्स ओके" कार्ड परत घेत मी म्हणालो.
"बाय द वे, हू इज शी? मे आय हॅव हर येलो कार्ड प्लीज" तो लिलीकडे बघत म्हणाला. थँक गॉड ती पळून गेली नव्हती!

"माफ करा ऑफिसर, पण ती माझी धर्मपत्नी आहे. काल दुपारीच खरेदी केली. हे त्याचं बिल." मी कागद त्याच्यासमोर नाचवत म्हणालो.

"नो.." ऑफिसर हॅट काढत म्हणाला. "मला ते बघायचंसुद्धा नाही."
हातात एक छडी घेऊन तो लिलीकडे सरसावला. तिच्या चेहऱ्यावर टॉर्च मारून खाली झुकत पुन्हा म्हणाला.
"यू बेटर नो, धिस इज इल्लीगल इन आवर कंट्री."

मी अगदी शांत राहायचं ठरवलं.
"कुरळ्या केसांची बाई, आपली धर्मपत्नी का सर?" मिश्किलपणे हसत तो माझ्याकडे वळता झाला.
एव्हाना माझ्या कपाळावर घाम जमा झाला होता. खिशातून मी हजाराचे पुडके बाहेर काढले.
"चोवीस तास आहेत तुझ्याकडे. तिला परत सोडण्यासाठी." पुडके हातात घेत तो म्हणाला. "तुझा यलो कार्ड नंबर आहेच आमच्याकडे. गुडबाय.."

आणि ते त्यांचे बूट वाजवत तडक निघून गेले.

पुन्हा शब्दशः काळा अंधार पसरला. पण एक गोष्ट अशी होती की लिली कोपऱ्यातंच बसून होती. बहुदा रात्रभर ती तशीच बसली असावी. ती झोपली होती की नाही हे सांगणे बरेच अवघड आहे. पण ती आता अकरा हजाराची झाली होती एवढे मात्र निश्चित.
"तू घाबरलीस?"
"नाही" एवढंच ती बोलली.

मी उपरण्यावर पुन्हा अंग टाकले.
"अशा लोकांना घाबरून खरंच काही फायदा नाही" मी तिला म्हणालो. "तू आता झोप. उद्या आपल्याला बराच लांबचा पल्ला गाठायचा आहे."

क्रमशः

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा .. काही तरी इंटरेस्टिंग सुरूवात आहे. लवकर लवकर लिव्हा हो !!

काहीही कळलं नाही. वाट बघतोय.
आणि वेलकम बॅक!!!

घरातलं मोठं माणूस परत आल्यासारखं वाटतंय. दंडवत घ्या _/\_

मी ही कुठेतरी वाचलीये कथा.. अनुवादित.. आठवले तर सांगते.. सुरवात अशीच बायको खरेदीपासून होती.. पुढचे फारसे आठवत नाही अनेक वर्षे झालीत कारण वाचून..

@अनघा,
जमल्यास लिंक द्या. पाहायची इच्छा आहे.

< बऱ्याच दिवसांनी जव्हेरगंज मैदानात उतरलेत... आता मजा येणार >>> +१

पुभाप्र.

===
खरंतर "स्वैपाक करता येतो का?" हा स्टँडर्ड प्रश्न आणि पैसे देऊन बायको विकत आणणे यावरून थोडीशी हिंट मिळालीय; पण जव्हेरगंज लेखक असल्याने you never know Wink

जमल्यास लिंक द्या. पाहायची इच्छा आहे. >>> लिंक कशी देणार. पुस्तक (अनुवादित) अशी सुरवात असलेले वाचल्येय.. खूप वर्षे झाली त्याला. पुढचे आठवत नाही कथानक.. जाउदे.. तुमच्या कथा मी आव्डीने वाचत असते, ही ही वाचणार.