‘माथेरान’ व्हाया ‘पिसारनाथ’ आणि ‘वन ट्री हिल’

Submitted by योगेश आहिरराव on 4 July, 2018 - 03:35

‘माथेरान’ व्हाया ‘पिसारनाथ’ आणि ‘वन ट्री हिल’

नारायण अंकल गावी जाण्याच्या आधी मला त्यांच्यासोबत साधा सोपा निवांत ट्रेक करायचा होता मग सततच्या घाटवाटेच्या ट्रेकला स्वल्पविराम देत तितक्याच जवळच्या आणि आवडत्या माथेरान वर स्थिरावलो. नावाप्रमाणे माथ्यावर चांगलेच रान असलेले त्यात ऐन उन्हाळ्यात मनसोक्त भटकंती करण्यासाठी इतक्या जवळचे स्थळ शोधुनही सापडणार नाही. अंदाजे अडीच हजार फूट उंचीवर असलेले माथेरान नेहमीच आपलेसे वाटणारे. अलेक्झांडर आणि रामबाग या ट्रेक नंतर, पिसारनाथ, हाश्याची पट्टी, बीटराईस क्लिफ व माधवजी पॉइंट या वाटा आमच्या लिष्टीत होत्या. त्याच्या या विविध वाटा वेगवेगळ्या ऋतूत कायम खुणावत असतात. पिसारनाथ शिडीच्या वाटेने जाऊन हाश्याची पट्टी नाहीतर वन ट्री हिल ने उतरायचे ठरवले.
त्यात वन ट्री हिल ची वाट मी सुमारे बारा वर्षांपूर्वी केली होती तर नारायण अंकल यांनी मोरबे धरण होण्याआधी ही वाट चौक हून आंबेवाडी मार्गे चालत अनेक वेळा केलेली. मराठा सरदार प्रबळराव याच्या मदतीला शिवाजी महाराज याच वाटेने आले होते, असं कुठेतरी वाचलेलं आठवत. तसेच याच वाटेने ब्रिटिश अधिकारी मॅलेट माथेरानला पहिल्यांदा आले होते. रविवारी पहाटे कल्याणहून निघून बदलापुरात सुनील आम्हाला जॉइन झाला. पुढे नेरळ कर्जत पाईप लाईन रोड ने बोरगाव मार्गे मोरबे धरणाच्या पलीकडील आंबेवाडीत पोहचलो तेव्हा साडेआठ वाजून गेले होते.
आंबेवाडीचे लोकेशन भारीच एका बाजूला मोरबे जलाशयाचा फुगवटा तर दुसरीकडे खालच्या बाजूला नदी पलीकडे इर्शाळगड प्रबळगड आणि पाठिमागे माथेरानची वन ट्री हिल पासून निघालेली सोंड आंबेवाडीत सरळ रेषेत उतरलेली आहे. हिच ती वन ट्री हिलची वाट.
नीट निरखून पाहिले तर काही गावकरी याच वाटेने वर माथेरानला जाताना दिसत होते. तसं पाहिलं तर साधारण सह्याद्रीला थोडीफार समांतर अशी मलंगगड, तावली, नवरा नवरी, म्हैसमाळ, चंदेरी, नाखिंडा, पेब ते माथेरान अशी ही उत्तरदक्षिण डोंगर रांग. याच माथेरानचे दक्षिणेकडील वन ट्री हिल आणि चौक हे प्रसिद्ध पॉईंट.
आमची चढाई पिसारनाथ शिडीच्या वाटेने असल्याने आंबेवाडी पासून तासाभराच्या अंतरावर असलेल्या आरकसवाडी/ हुंबर्णे वस्तीपर्यंत पायपीट करणं भाग होतं. पाण्याच्या बाटल्या भरून, सुरक्षित ठिकाणी गाडी लावून हुंबर्णेच्या दिशेने मळलेल्या वाटेने निघालो. या भागाचं भौगोलिक वैशिष्ट्य म्हणजे माथेरानच्या साधारणपणे दक्षिण उत्तर पसरलेल्या डोंगराला पश्चिमेला प्रबळगड तर पूर्वेला गारबेट पासून सोंडंईपर्यंतची डोंगर रांगेची सोबत लाभली आहे. थोडक्यात प्रबळ आणि माथेरान यांच्यातली दरी तर पलीकडे माथेरान आणि सोडाई रांग यामधील दरी. साहजिकच डोंगरातून पावसाचे पाणी खाली दरीत झेपावत त्यामुळे दोन्हीकडे ओढ्याच्या अल्याड पल्याड छोठछोट्या वाडी वस्त्या वसलेले लहानसे खोरं म्हणता येईल. या दोन्ही बाजूने पावसाळ्यात अनेक मोठे प्रवाह एकत्रितपणे येऊन मोरबे जलाशयात मोठी भर घालतात.
वन ट्री हिल कडील माथेरानचा डोंगर उजव्या हाताला ठेवत पुढे निघालो.
विरळ झाडी त्यात आजूबाजूला झालेली वृक्षतोड त्यामुळे बहुतांश चाल ही माळरानातूनच. भरीस भर म्हणजे पावसाळी शेती केलेल्या बहुतेक ठिकाणी जाळून टाकलेले. धरणाच्या भिंतीपलीकडे दूरवर माणिकगड सहज ओळखू आला.
111.jpg
आमच्या डावीकडे इर्शाळ ते प्रबळ जोडणारी रांग खाली दरीत घावरी नदी, तर पूर्वेला माथेरानचा डोंगर. वाट डोंगर पायथ्याला चिकटून आडवी जात असली तरी एकमात्र बरे होते सकाळी सूर्य पलीकडे असल्यामुळे उन्हाचा त्रास नव्हता. अन्यथा पावसाळ्यात हवी हवीशी वाटणारी ही चाल उन्हाळ्यात थोडी कष्टदायक ठरते अर्थात दर्दी भटक्यांना तसाही काही फारसा फरक पडत नाही. थोड अंतर जात चार वाटांचा चौक लागला, डावीकडील वाट खाली विराच्यावाडीत तर उजवीकडची लगतच्या सोंडेवरून वर पदरात जात वन ट्री हिल च्या वाटेला, आम्ही अर्थातच सरळ वाटेला. अधून मधून दूर जंगलातून लाकूड तोडीचे आवाज, ठराविक पक्ष्यांची गुंजन आणि काही चराई करणारी गुरं असेच काहीसं चित्र. एव्हाना वन ट्री हिल चे टोक बरेच मागे पडले. वाटेतले दोन ओढे (कोरडे) ओलांडून, अगदी छोट्याश्या विरळ झाडीच्या टप्प्यातून बाहेर आलो तेव्हा समोर लुईझा पॉइंट आणि उजवीकडे पिसारनाथच्या दिशेने जाणारी सोंड नजरेस पडली. बरोब्बर पुढच्या दहा मिनिटात मोठा ओढा पार करुन आणखी एक चौक लागला. डावीकडे जाणारी वाट साधारणपणे शे दीडशे फूट उतरत वरोसा हुंबर्णेत जाते, उजवीकडील वाट वर पिसारनाथ तर सरळ जाणारी लुईझा कडून उतरलेल्या सोंडेला वळसा घालून जाते या वाटेला पुढे आणखी दोन वाटा फुटतात एक उजवीकडे वळून हाश्याच्या पट्टीतून माथेरान आणि दुसरी वाट म्हातारीच्या खिंडीतून चिंचवाडी पुढे धोदाणी गावात जाते. थोडक्यात आंबेवाडी ते धोदाणी या वाटेने माथेरानची पश्चिमेकडची फेरी पूर्ण होते तर !
घड्याळात पाहिलं तर साडेदहा वाजत आले होते, नाश्ता करायची वेळ झाली होती. आंबेवाडीतून निघालो तेव्हा आमच्या तिघांकडे प्रत्येकी चार लिटर पेक्षाही अधिक पाणी होते पण तासाभराच्या या वाटेतच एक लिटर पेक्षाही जास्त पाणी वापरले गेले. अर्थातच उन्हाळी ट्रेकला पाणी हे शरीरात ठराविक अंतराने जायलाच हवे. चौकातच थांबून नाश्ता केला तर पुढे माथेरान गाठेपर्यंत पाणी मिळणार नाही हे माहीत होते. भर उन्हात उभी चढाई करताना प्रत्येकी पुरेसा पाणीसाठा हवाच, याच उद्देशाने खाली उतरून दहा मिनिटात हुंबर्णेत पोहचलो. तसेही इतक्या जवळ येऊन गावात भेट न देता जाणे शक्यच नव्हते. वीस पंचवीस उंबर्याचे स्वच्छ आणि टुमदार हुंबर्णे. प्रत्येक घरासमोर स्वच्छ सारवलेले अंगण, आजुबाजुला अंबा फणस सारखी मोठी झाडी. अंगणात विसावतो तोच एका मुलीने न मागता पाण्याचा लोटा आणून दिला. रिकाम्या झालेल्या पाण्याच्या बाटल्या आधी भरून घेतल्या.
हुंबर्णेत प्राथमिक जिल्हा परिषदेची शाळा पुढचं शिक्षण आंबेवाडी नाहीतर धोदाणी. उदार निर्वाह साठी थोडीफार पावसाळी शेती, माथेरान तसेच चौक कर्जत भागात जाऊन छोटी मोठी कामं करणे. माथेरानच्या आसपासच्या अशाच छोट्या मोठ्या वाडीत यांची सोयरीक जुळलेली.
इथेच सोबतचे ब्रेड बटर आणि नारायण अंकल यांनी घरातून आणलेल्या इडली चटणीचा नाश्ता उरकला. याच हुंबर्णेतून पलीकडे खाली नदी पार करून प्रबळगडाकडे जाता येते. स्वच्छ सुर्यप्रकाश, अधूनमधून वाऱ्याने होणारी झाडांच्या पानांची सळसळ, अशा रमणीय हुंबर्णेतला हा औट घटकेचा थांबा आम्हा तिघांनाही फारच आवडून गेला. खरंतर निघावेसे वाटत नव्हते, पुन्हा कधीतरी नक्की सवडीने येणार अशी मनाची समजूत घातली. पण एक मात्र खरं, आत्ता पर्यंत अशा अनेक जागा मनात घर करून आहेत. जिथे कधीही जाऊन काहीही न करता फक्त निवांत बसून राहायचं. रावळ्या जावळ्याची तिवारी वस्ती, मार्कंड्याचा आश्रम, पेठेची वाडी आणि कुमशेत या मधील मुळा नदी काठची पायलीची वाडी, डोनी दार घाटाच्या वेळी अवचित सापडलेले दरीच्या कडेला एकाकी असे निर्मळ मामांचे झाप, कोळेश्वरचं जानू खोटेकर यांच घर, धामणव्हळ ते दापसरे रूट मधील रेडे खिंडीपलीकडील ढेहबे मामांचा धनगरवाडा, पेज नदीकाठचा धनगर पाडा.. असो हा एक वेगळाच लिखाणाचा विषय होईल. ओढ्याला उजवीकडे ठेवत पुन्हा तो चढ चढून वाटेच्या चौकात आलो. वर पाहिले तर समोर होती ती पिसारनाथच्या वाटेवरची उघडी बोडकी सोंड.
एव्हाना उन जाणवायला लागले होते. सुरुवातीला सरळ चढ मग तिरक्या रेषेत वळणं घेत पहिल्या टेकडीवर आलो. मागे हुंबर्णे बरेच खाली दिसत होते, त्यामागे नदी पलीकडे प्रबळगड. हवा स्वच्छ असल्यामुळे इर्शाळगड, दूरवर धरणापलीकडचा माणिकगड सांकशी डोंगर रांग तसेच कर्नाळा सहज ओळखू आले. आता टेकडीला उजवीकडे ठेवत डावीकडून छोटासा ट्रेव्हर्स मारुन, पिसारनाथ कडून आलेली सोंड आणि हि टेकडी या मधील खिंडीत आलो. पाण्याचे घोट अधे मधे घेत होतोच सोबत गुळाची चिक्की खात छोटा ब्रेक घेतला.
222.JPG
खिंडीतून समोरच लुईझा पॉइंट आणि त्या सोंडेलगत पलीकडे चढणारी हाश्याची पट्टीची वाट तसेच खालच्या टेपाडावरून वळसा घालून म्हातारीच्या खिंडीतून जाणारी वाट धोदाणीच्या दिशेने जाते. भर उन्हात बारा वाजेच्या सुमारास हि वैराण नाकाड्यावरची वाट दम काढणार, निदान पहिला टप्पा तरी झटपट पार करु जेणेकरून एखाददुसरा झाडोरा पाहून थांबता येईल या विचाराने निघालो. वाटेत दोघे तिघे भेटले राम राम शाम शाम झाल्यावर समजले ती वरोसा हुंबर्णेतली, काही सामान खरेदीसाठी माथेरानच्या बाजारात जाऊन परतत होती.
जसे वर चढू लागलो तशी वाट अरुंद, तीव्र चढाई जोडीला दोन्ही बाजूला दरी. वाटेत दोन मोठ्या धोंड्यांनमध्ये ठेवलेली शिडीसारखी लाकडाची मोळी. ते पार करून छोट्याश्या झाडीच्या टप्प्यात विसावलो. नारायण अंकल तेव्हाच म्हणाले, ‘योगेश आज हिट जादा है’. काय माहित वातावरण स्वच्छ असुनही भयंकर उष्मा जाणवत होता, आतापर्यंत भरपूर उन्हाळी भटकलो पण आज काहीतरी वेगळं वाटत होते. सॅक मध्ये असलेल्या पाण्याच्या बाटल्या सुद्धा तापलेल्या. तरी ऐन दुपारची वेळ, उघडी बोडकी धारेवरची चढाई, कोकणातला उष्मा या सर्व गोष्टींचा परिणाम असावा असे समजून चालत होतो. याचा उलगडा आम्हाला दुसऱ्या दिवशी सोमवारचा पेपर पाहिल्यावर झाला, त्या दिवशी मुंबईचे तापमान ४० डिग्री तर भिरा येथे ४५ डिग्री च्या आसपास. सावलीत पुरेशी विश्रांती घेऊन तशीच सरळ सोट चढाई करत डावीकडे ट्रेव्हर्स मारत एका वळणावर आलो तेंव्हा प्रबळगडाच्या उजवीकडे दुकानदारांच्या आवडीचा कलावंतीण दुर्ग आणि वायव्येला मलंगगड व तावली सहज ओळखू आले.
उजवीकडे वळून थोडं अंतर जात पहिल्या लहान लोखंडी शिडी पाशी आलो. मध्ये पाय ठेवायच्या ठिकाणी थोडी हालेडुले झालं पण तारेने बांधून ठेवल्याने सावकाश वर गेलो. डावीकडे कडा आणि उजवीकडे दरी अश्या अरुंद वाटेने काही अंतरावर त्या कड्याच्या पोटात असलेलं पिसारनाथचे मुळ स्थान. पिसारनाथाला नमन करून पुढच्या दोन मिनिटांत कातळाच्या घळीत पोहचलो. अंकल पहिल्या जिन्याजवळ थांबले. घळीच्या उजवीकडील आडव्या अरूंद वाटेने मी आणि सुनील थोडं अंतर पुढे जात हि वाट नक्की कुठपर्यंत जाते याचा अंदाज घेण्यासाठी निघालो. डावीकडे कडा आणि उजवीकडे दरी अशीच अरूंद वाट थोडा वळसा घेत जातो तोच डावीकडे वन ट्री हिल पॉईंट. त्या खालच्या कड्यात हि वाट न जाता खाली रानात उतरलेली. फारसा वेळ न दवडता माघारी फिरलो...याच घळीत दोन लोखंडी जिने बसवले आहेत. पुर्वी या जागी लाकडी शिडी होती त्यातली पहिली मोठी जुनी शिडी जिन्याच्या मागे अनेक वर्षे साथ देऊन आता कायमची निवृत्त झालेली. जिना चढताना त्या शिडी कडे पहात, पटकन बोलून पडलो. 'अरे आता काही मजा आणि थ्रील राहिलं नाही या वाटेला.' पण दुसऱ्या क्षणी जाणवलं, वाट.. शिडी.. थ्रील.. कसला विचार करतोय आपण ! कधीतरी एखाद दुसरा वेळी अश्या वाटेने येण्यात थ्रील पहातो. पण इथल्या स्थानिक ग्रामस्थांचे हे रोजचं येणं जाणं. अशावेळी त्यांच्या सोयी सुरक्षिततेसाठी जुनी शिडी काढून नवीन मजबूत टिकाऊ लोखंडी बसविली हे तर चांगलेच म्हणायला हवे.
333.JPG
घळीत शिडीचा पुढचा भाग अंदाजे दीड दोनशे फुटांचा अगदी हरिश्र्चंद्रगडाच्या राजनाळेसारखा. तापलेल्या घळीतला हा टप्पा पार करून जेव्हा माथ्यावरील दाट झाडीत शिरलो तेव्हा जरा हायसे वाटले. तसं पाहिलं तर हुंबर्णेतून निघालेल्या या वाटेवर अगदीच तुरळक झाडी वगळता काही नाही. उजवीकडील वाटेने उतरत शार्लोट तलावाजवळ आलो. जवळच मध्यभागी माथेरानचे ग्रामदैवत श्री पिसारनाथाचे मंदिर. रविवार असल्याने आजुबाजुला स्टॉल वर तसेच समोरच्या तलावाजवळ पर्यटकांची वर्दळ होती.
कधी नव्हे तर पहिल्यांदा ट्रेक ला थंड पाण्याची बाटली विकत घेतली. स्टॉलवाला भला माणूस त्याने आमचा अवतार पाहून हे डोंगर वेडे आहेत असे लगेच ओळखले. तसेच त्याच्या स्टॉल मधे आमचा घरातून सोबत आणलेला जेवणाचा डबा खाण्याची परवानगी सुध्दा.
सुनीलने मस्त पैकी चिकन आणले होते, अंकल शुद्ध शाकाहारी असल्यामुळे त्यांनी कारल्याची भाजी आणि चपाती. जेवताना माकड जवळ येऊ पहात होती पण स्टॉल वाल्याने त्याच्या बेच्कितून दगड मारत त्यांना रोखले. झाडावरून खाली उतरून जवळ येण्याच्या प्रयत्न करताच, दोन भू भू माकडांवर धावून गेले. त्यांच्यात एकदम टफ फाईट झाली. जेवण झाल्यावर लिंबू सरबत पिऊन स्टॉल वाल्याचा निरोप घेतला. लिंबू सरबत एवढे आवडले की अजुन एक एक ग्लास प्यावे पण पोटभर चिकन हादडल्यामुळे जागाच नव्हती. एवढं भरपेट जेवण झाल्यावर झोप येणारच, तलावाकाठी झोपू म्हणतो तर सावलीत बरीच मंडळी आणि काही प्रमाणात प्रेमी युगुल. वाटेत एका जुन्या बंगल्याच्या आवारात छानसा झाडाचा पार, बसायला सिमेंटचे बाकडे, कठडे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शांत परिसर अधून मधून एखाद्या पक्ष्याची शीळ काय तेवढीच. सुस्त शरीराला पडी मारायला ह्यापेक्षा चांगली जागा मिळाली नसती. अर्धा तासात निघायचं असं ठरवून चक्क तासाभरानंतर जाग आली घड्याळ पाहतो तर पावणेचार वाजून गेलेले. माथेरान मध्ये असे बरेच जुने ब्रिटीश काळातील तसेच पारशी लोकांचे भव्य बंगले असे रिकामे नजरेस पडतात.
खरंतर आमच्या मनांत हाश्याची पट्टीतून हुंबर्णेत उतरायचा विचार येत होता पण वळसा घेऊन सोंडेवरची ती वाट संपूर्ण बोडकी, त्यात सायंकाळच्या उन्हात पुन्हा हुंबर्णे ते आंबेवाडी तासाभराची चाल हे सारं त्रासदायक ठरले असते. त्यामानाने नियोजनानुसार वन ट्री हिलची वाट थोडाफार झाडोरा असलेली आणि थेट आंबेवाडीत उतरणारी. ओलंपिया ग्राउंड चा रस्ता डावीकडे सोडून अर्ध्या तासात वन ट्री हिलला आलो. समोरच पॉइंटला जोडून छोटी टेकडी त्यावर पूर्वी एक झाड होते त्यामुळेच याचे नाव ‘वन ट्री हिल’. टेकडीवरून सरळ रेषेत खाली आंबेवाडी, मोरबे जलाशयाचा फुगवटा त्या पलीकडे माणिकगड, सांकशी ते कर्नाळा पर्यंतची रांग. पश्चिमेला समोरच प्रबळगड, नैऋत्येला इर्शाळगड तर वायव्येला लुईझा पॉइंट त्यामागे दूरवर मलंगगड व तावली.
444.JPG
स्वच्छ हवा असल्याने आजुबाजुला व्यवस्थित न्याहाळता आले. पण एक गोष्ट मात्र खटकली ती म्हणजे खालच्या रानात बहुतेक ठिकाणी वणवे पेटलेले. दुर्दैवाने या दिवसात असे वणवे हमखास पाहायला मिळतात.
बरोबर साडेचार वाजता उतरायला सुरुवात केली. सुरुवातीला वळणावळणाची दगडी वाट थोड अंतर उतरताच डावीकडे एक वाट वळली ती न घेता उजव्या बाजूला दिशेप्रमाणे रुंद वाटेने झेड आकाराचे वळणे घेत टप्या टप्यात उतरत पदरात आलो. आता आमच्या डावीकडे वरच्या बाजूला चौक पॉईंट तर मागे आलो ती वाट. अधेमधे आंबेवाडी व आजुबाजूच्या वस्तीतील कामानिमित्त माथेरानला ये जा करणारे गावकरी भेटले. पोटापाण्यासाठी त्यांच्या हा तासाभराचा हा रोजचा प्रवास. पदरात बर्यापैकी जंगल, थोडं अंतर गेल्यावर मोठ्या दगडी धोंड्यांमध्ये भगवा झेंडा लावून खाली देव रचलेले. तशीच पुढे पंधरा वीस मिनिटांची पदरातली आडवी झाडी भरली मळलेली वाट. बहुतेक ठिकाणी लाकडाच्या मोळ्या रचून बांधून ठेवलेल्या. दिवसभर रानात सरपणासाठी हि सारी वणवण. झाडीतून वाट बाहेर येताच समोर विहीर दिसली. तिथल्याच जवळच्या वस्तीतले दोघे जण पाणी भरत होते. विहिरीत पाणी एकदम स्वच्छ, त्यांच्याकडून पोर्या घेत मनसोक्त गार पाणी पिऊन तोंडावर मारून फ्रेश झालो. विहीरीजवळून दोन वाटा निघतात, एक डावीकडची पठारावरील वस्ती त्यापुढे चिंचमाळ ला उतरते तर दुसरी आंबेवाडी.. थोडक्यात विहिरीकडे पाठ करून समोर पश्चिमेला इर्शाळच्या दिशेने सुटायचं. दोन्ही वाटा मळलेल्या आम्ही अर्थातच आंबेवाडीच्या वाटेला लागलो. सुरुवातीला मोकळ्या पठारावरील वाट सौम्य उताराच्या सोंडेवरून सरळ आंबेवाडीत उतरत गेलेली. मागे वळून पाहिले तर चौक पॉइंट ते वन ट्री हिलचा टप्पा. पश्चिमेला प्रबळगडाच्या मागे सुर्य परतीच्या वाटेवर तर पूर्वेला सोंडंईपर्यंतची डोंगर रांग त्या पलीकडे सह्याद्रीची मुख्य रांग त्याच कललेल्या उन्हात न्हाऊन निघालेली. सायंकाळच्या वेळी त्या सोंडेची उतराई फारच आवडून गेली.
555.jpg
शेवटच्या टप्प्यात आलो तेंव्हा सूर्य इर्शाळच्या मागे अस्ताला जात होता खालच्या धावरी नदीच्या पाण्यात त्याचं प्रतिबिंब एकदम खुलून दिसत होते. आंबेवाडीत परतलो तेव्हा सहा वाजून गेले होते. गावातल्या दोन्ही विहीरींवर लहान लहान मुली, बायकांची पाणी भरण्याची गडबड. हाथ पाय तोंड धुवून फ्रेश झालो. विहीरीत डोकावून पाहिले तर अजब वाटले. कधीकाळी उन्हाळ्यात विहीर आटते तेव्हा विहिरीत टँकर ने पाणी टाकताना मी पाहिले आहे पण इथे दोन्ही विहिरीत खालच्या नदीतून पंपाद्वारे पाणी सोडले जात होते. विहिरीतून पाणी बाहेर काढण्याचा विरूद्ध प्रकार.
चौकशी केल्यावर समजले पावसाळ्यात जरी भरपूर पाणी असले तरी या दिवसात पाण्याची पातळी खूप खालावते. मग घावरी नदीतून पाणी पंपाने उपसून या विहीरीत सोडून आंबेवाडी, ताडवाडी आणि आजूबाजूच्या परिसरातील वाड्यावस्तीतील मंडळी हेच पाणी वापरतात. रोज सकाळ संध्याकाळ डोक्यावर तीन तीन हंडा कळशी घेऊन ये जा करणारा महिला वर्ग बहुतेक ठिकाणी हेच चित्र. असं पाहिल्यावर शहरात ठिकठिकाणी पाणी वाया घालवणारे महाभाग पाहिल्यावर चीड येते. खरंच जिथं मिळते तिथे किंमत नसते !
सूर्यास्त होत असताना आंबेवाडीतून निघालो. विषय तोच हाश्याची पट्टीला जोडून प्रबळगडाची वाट किंवा आणखी एखादी वेगळी वाट जोडता येईल का !

अधिक फोटो साठी हे पहा : https://ahireyogesh.blogspot.com/2018/04/matheran-pisarnath-one-tree-hil...

योगेश चंद्रकांत आहिरे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माथेरानची हीच एक वाट बाकी राहिली आहे. यावर्षी जाईन.
धरण होण्याअगोदर
* चौक नाका ( आता इथेच स्टेशन आहे ना?)
आंबेगाव - वनट्री,
आणि
* बोरगाव - पोखरवाडी -रामबाग गेलो आहे.
---
आता कुठून जाऊ? बोरगाव/चौक स्टेशन?

धन्यवाद SRD .

आता कुठून जाऊ? बोरगाव/चौक स्टेशन? >>> बोरगाव पोखरवाडी पुढे आंबेवाडी..

झक्कास !
अश्या भटकंतीच व्यसन इतरांनाही जडो !!