लिहावी शायरी

Submitted by निशिकांत on 4 July, 2018 - 02:49

आसवांच्या गर्द शाईने लिहावी शायरी
व्यक्त व्हाया मार्ग नाही कोणताही यापरी

प्रेम विषयासक्त नव्हते राधिकेचे, पण तरी
आवडे "सा" बासरीचा, सोबतीला श्रीहरी

बांधले होते मनोरे, केवढे मी जीवनी !
फक्त नशिबी घाम होता, कुस्कराया भाकरी

"प्रेम करतो(ते) मी तुझ्यावर" एकमेकांना म्हणा
तत्क्षणी संपेल तुमच्या गैरसमजांची दरी

स्त्रीभ्रुणाला रास्त शंका, वाढता गर्भाशयी
माय मारायास उठली, काय व्हावे सासरी?

माय म्हणते लेकराला, तूच माझा दागिना!
जाहले तुझियामुळे दारिद्र्य माझे भरजरी

शेत हिरवे, राबणारे शेतमालक हरवले
गाव गेले, शहर आले, लोक करती चाकरी

मृगजळी विश्वात नक्की एवढी आहे खुबी!
फक्त भासाने जलाच्या, येत असते तरतरी

कोण अपुले? ना उमगले जीवनी "निशिकांत"ला
सांजवेळी वेदना आहे कळाले सोयरी

निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Group content visibility: 
Public - accessible to all site users