गझल - आतल्या आत भरकटत राहू

Submitted by जयदीप. on 3 July, 2018 - 12:40

आतल्या आत भरकटत राहू
रोज हरवून सापडत राहू

दोन खोल्यांमधे निजत राहू
एकमेकांकडे बघत राहू

मौन पाळू, दिवस असा ढकलू
गाढ झोपेत बडबडत राहू

जाग येताक्षणी विषय बदलू
आणि आंघोळ लांबवत राहू

नेहमी, सोमवार आला की
काल, रविवार आठवत राहू.

जयदीप

Group content visibility: 
Public - accessible to all site users