डी एन आर

Submitted by लिली जोशी on 28 June, 2018 - 09:40

डी एन आर

मोठ्या ठळक अक्षरात केस पेपरवर ‘डू नॉट रिससिटेट ‘ ही ऑर्डर लिहिली जाते तेव्हा त्याच्यामागे बरंच नाट्य घडत असतं.

“सिस्टर, रिलेटिव्हजना बोलवलं ?” आयसीयू रजिस्ट्रार डॉ. समीरनं दबक्या आवाजात विचारलं.
“बोलावलंय. पण त्यांच्याजवळ नसतंच कोणी. तो एक भाचा आहे, तोच धावपळ करतो सगळी. आत्ता त्याची आई आलीय, म्हणजे पेशंटची बहीण.” सिस्टरनी काहीशा फणकाऱ्यानं सांगितलं.
“बरं , मी राउंड घेतो. तोपर्यंत निरोप द्या.कोण कोण नातेवाईक आहेत,सर्वांनी या म्हणावं. मी परत परत त्यात वेळ नाही घालवणार आहे.” समीर म्हणाला.

सकाळी दहा साडे दहाची वेळ. आयसीयू मधे नेहमीची धामधूम चालू आहे. कन्सल्टन्ट लोकांच्या राउंड्स चालल्यात.नवीन दोन अड्मिशन्स आल्यात. कोपऱ्यात तो पडदा लावलाय, तो डेंगीचा पेशंट आत्ताच ऑफ़ झाला वाटतं.
समीरनं एका दृष्टिक्षेपात त्याच्या छोट्याशा राज्याकडे नजर टाकली. आज पहाटे तीनपासून सातपर्यन्त तो इथेच अडकला होता. जेमतेम अंघोळ , नाश्ता करण्यासाठी क्वार्टर्सवर गेला तेव्हढ्यात दाबकेकाका ‘बॅड’ झाल्याचा कॉल आलाच.

लिव्हर सिरोसिस सारखं दुखणं, तेसुद्धा दारूच्या थेंबालाही न शिवता. जेमतेम वर्ष-सहा महिन्यांची हिस्टरी. आणि एव्हढ्या झपाट्यानं वाढत गेलैला रोग. गेल्या दोन महिन्यात आयसीयूमधली ही तिसरी एडमिशन. यावेळी दाबकेकाका थेट कोम्यात गेलेले. श्वासातून अमोनियाचा दर्प. फ़टफ़टीत पांढरा चेहरा. सुजलेलं शरीर. हात उचलला की थरथर कापणारी बोटं. तळपायाला स्पर्श करताच सर्रकन उचल खाणारा अंगठा.
गेल्या दोन वेळांप्रमाणे आत्ताही रक्तातलं अल्ब्युमिनचं प्रमाण घसरलेलं.

समीरला पक्कं आठवतंय, गेल्या वेळी काकांना ओळीनं पाच अल्ब्युमिनच्या बाटल्या दिल्या होत्या. प्रत्येक बाटली साडेपाच हजार रुपयांची. प्रचंड महागड़ी एंटीबायोटिक्स, प्लाझ्माच्या बाटल्या तर अगणित. आणि ती नवी आलेली लिव्हरचं पोषण करणारी इंजेक्शन्स ! एकेक इंजेक्शन चार हजाराचं. समीरला अशा वेळी त्याच्या आजीचे शब्द आठवतात, “अरे, वठलेल्या झाडाला खतपाणी घालून होणाराय का उपयोग? फुटणारे का पालवी?”
त्यातून आत्ता तर काकांचे कोणतेच पॅरामीटर्स धड नव्हते. लिव्हरचा पत्ता काढून घेतल्यावर इमारतीतले उरलेले पत्तेही एकेक करून ढासळताना दिसत होते. लघवी बरोबर होत नव्हती. रक्तदाब घसरला होता. तो नॉर्मल ठेवण्यासाठी कृत्रिम उपाय योजना करायला लागत होती. पहाटेपासून श्वास सुद्धा अनियमित चालला होता.

समीरची राउंड उरकली. हात धुवून तो सेंट्रल मॉनिटरपाशी आला. “सिस्टर, दाबकेकाकांचे आले का रिलेटिव्ह्ज ?”
“समीर सर, आत्ता तर फ़क्त त्यांची बहीण, तो भाचा आणि त्याची बायको तिघेजण दिसताहेत. मी त्यांना तुमच्या काउंसेलिंग रूममधे बसवलंय. पण थांबा, एव्हढा चहा पिऊन जा.” सिस्टर तशी मायाळू आहे.
समीर या आयसीयूमध्ये गेली तीन वर्षं काम करतोय. आतापर्यंत त्यानं चिक्कार केसेस पाहिल्यात अशा , पूर्ण होपलेस. आणि अशी संभाषणं खूप पार पाडलियेत, तरीपण काहीच वाटून न घेण्याचा निर्ढावलेपणा त्याच्यात अजून आला नाही. काहीशा अनिच्छेनीच त्यानं काउंसेलिंग रूममध्ये पाऊल टाकलं. बसले होते तिघंही समोर. काकांची बहीण हवालदिल होऊन सुस्कारे टाकत होती. तिचा मुलगा दमून भागून क्लांत झालेला दिसत होता. त्याच्या तरुण बायकोचा चेहरा मात्र मख्ख होता. अधून मधून ती घड्याळाकडे पाहात होती.

“मी तुम्हाला कशासाठी बोलावलंय याची कल्पना असेलच तुम्हाला. आपला पेशंट सुधारून पुन्हा पहिल्यासारखा होण्याची शक्यता जवळ जवळ नाही. सध्या चालू असलेल्या उपचारांना त्यांचा काहीच प्रतिसाद नाहीय. परिस्थिती फार बिकट आहे. कधीही त्यांना कृत्रिम श्वासाची गरज लागू शकते. एकदा व्हेंटिलेटरवर घेतलं की हे सगळं आणखी लांबत जाणार. रोजचा खर्च किती चाललाय ते तुम्ही बघता आहातच.. “ समीरनं सुरुवात केली. असे डायलॉग मारणं हा त्याच्या कामाचाच एक भाग होता.
दाबक्यांच्या बहिणीनं ‘क्यू ‘ मिळाल्यासारखा डोळ्याला रुमाल लावला. भाचा हतबलसा गप्प बसून राहिला.
“त्यांचा मुलगा कुठे ऑस्ट्रेलियात असतो ना? काय सांगितलंय त्यांनी?” समीरनं विचारलं.
“काय सांगणार? गेल्याच महिन्यात येऊन गेला ना तो. पुन्हा यायला जमणार नाही म्हणतोय. गेल्या वेळचे डिस्चार्ज पेपर्स सगळे त्यानं तिकडच्या डॉक्टर मित्राला दाखवले. त्याला मान्य आहे आम्ही काय करू ते. “भाच्यानं सांगितलं.
“बरं , मग काय ठरवताय तुम्ही?”
“डॉक्टर, तुम्ही सल्ला देताय का ट्रीटमेंट थांबवण्याचा.?”खडखडित कोरड्या आवाजात भाच्याची बायको बोलली.
“असं तर मी स्पष्ट सांगू शकत नाही. तुम्ही तशी इच्छा दाखवलीत तर त्यांचे प्राण जाईपर्यंत आम्ही प्रयत्न चालू ठेवणारच. तशी बांधिलकीच आहे आमची.” हा ‘बांधिलकी ‘शब्द बरा सुचला आपल्याला, समीरला चट्कन वाटून गेलं.
“म्हणजे, आमच्यावरच तुम्ही ओझं घालताय की या निर्णयाचं ?” बहीणबाई म्हणाली.

समीर जरासा त्रासला. परिस्थितीचं एव्हढंही भान असू नये या लोकांना? मी वरचेवर अपडेट देतोय तरी? पण मग त्याच्या लक्षात आलं , पोपट मेलाय असं म्हणायला कोणी तयार होत नाहीत. लोक म्हणतात, तो उडत नाही, खात नाही, चोच उघडत नाही.
“हे पहा, दाबके काकांच्या प्रकृतीची माहिती मी तुम्हाला दिली आहे. पुढे काय होणार याचा वैद्यकीय अंदाज कानावर घातला आहे. माझं काम मी केलंय. यानंतर निर्णय तुमचा.“ समीरनं उपोद्घात केला. उठलाच तो खुर्चीवरून. टेबलावरचा स्टेथोस्कोप गळ्यात अडकवून ‘मी चाललो माझ्या कामाला ‘अशी सूचनाच दिली त्यानं.
“थांबा डॉक्टर, आम्हाला त्यासाठी काय करायला लागेल ते सांगून जा तेव्हढं.”
“आत्ता मी जे बोललो तेच केस पेपरवर लिहिलं जाईल. मग तुम्ही तुमच्या हस्ताक्षरात लिहायचं की वरील सर्व माहिती आम्हाला मिळाली असून आम्ही असा निर्णय घेतला आहे की पेशंट श्री. दाबके यांना कोणतेही कृत्रिम उपाय जसं की कृत्रिम श्वसनयंत्र, डिफिब्रिलेटर, डायलिसिस मशीन किंवा महागडी औषधे यांचा वापर करू नये.” आणि त्याखाली तुमची सही करायची. सिस्टर मदत करतील तुम्हाला. “

समीर तड़क बाहेर पडला. अनुभवानं त्याला माहीत झालं होतं की ही चर्चा कितीही लांबू शकते. हो-ना करता करता दिवसचे दिवस जातात.
दाबक्यांच्या बाबतीत मात्र असं घडलं नाही. ऑस्ट्रेलियन मुलानं ताबडतोब ग्रीन सिग्नल दिला असणार. समीर ऑफ़ ड्यूटी जायच्या आतच दाबक्यांच्या केस पेपरवर अक्षरं उमटली, डी एनआर-डू नॉट रिससिटेट !

डॉ.लिली जोशी
भ्रमण ध्वनी ९७६५३९०२०७

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

गेलोय यातून मनावर खूप दगड ठेवून निर्णय घ्यावा लागतो ,घेतलेला निर्णय चुकला तर नाही ना म्हणून 2 महिने डिप्रेशन मध्ये होतो , सगळे सांगतात प्रॅक्टिकल निर्णय घ्या पण मन मानत नाही

खरोखर अवघड आहे निर्णय घ्यायला, पण प्रॅक्टिकलीही पाहणे योग्यच.

उत्तम लेख, वैद्यकीय क्षेत्रातले सारे बारकावे व्यवस्थित उलगडलेत.

आम्हीही गेलोय यातून. फार बेक्कार दिवस होते. मनावर दगड ठेवून निर्णय घ्यायला लागतात. फार चांगलं लिहीलंय. अगदीच वास्तव.

मागे एकदा एका प्रसिद्दह डोक्टरांचा लेख वाचला होता. त्यांच्या वडिलांचा वेन्टिलेटर कधी काढून घ्याय चा याचा निर्नय घेताना त्याना व त्यांच्या भावाना किती मानसिक त्रास झाला होता त्याबद्द्दल.

छान लिहिले आहे,

या बाबत माझ्या आजी ने (91) क्लीअर इन्स्ट्रुक्शन्स देऊन ठेवल्या आहेत, मला कुठेही नळ्या घालुन जगावायचे नाही,

उत्तम लिखाण! असा प्रसंग पेशंट्/डॉक्टर्/नातेवाईक सगळ्यांना जडच!

मी पण सांगणार आहे मुलांना - डी एनआर-डू नॉट रिससिटेट! आता सध्या नवर्‍याला सांगुन ठेवलयं नि त्याने मला!

चांगले लिहिलंय.
नळ्या घालून जगवू नका हे ठीकच आहे, पण कुठली शस्त्रक्रिया करायला लागली तर काय होऊ शकतं आणि शस्त्रक्रियेपश्चात्त कुठल्या क्रिया/ गोष्टी करण्यावर बंधन येऊ शकतं, आणि कुठल्या गोष्टींविना मी अधुरा आहे या द्वारे ठरवले तर नंतर निर्णय घेणाऱ्यांना सोपं/ ऑब्जेकटिव्ह पडू शकतं.
थोडक्यात काय होणार 'नसेल' तर जगवू नकाची लिस्ट. जसे बोलणे हा माझा प्राण आहे, चवीपरीने खाणे, आईस्क्रीम खाणे, फिरायला जाणे, पत्ते खेळणे, स्वतःच्या पायाने आंघोळीला जाणे काहीही असू शकतं. अनेकदा नळ्या लावायची वेळ येण्यापूर्वी काही तरी शस्त्रक्रिया करावी लागते आणि ते ट्रीट केलं तर शरीरक्रिया पूर्वपदावर येण्याची शक्यता फार कमी असेल, गुंतागुंत वाढण्याची शक्यता असेल आणि हे होणारा माणूस निर्णय घेण्याच्या स्थितीत नसेल तर गोंधळ उडू शकतो.

आणि शस्त्रक्रियेपश्चात्त कुठल्या क्रिया/ गोष्टी करण्यावर बंधन येऊ शकतं, आणि कुठल्या गोष्टींविना मी अधुरा आहे या द्वारे ठरवले तर नंतर निर्णय घेणाऱ्यांना सोपं/ >>>>>

अगदी हेच होताना तिने सांगितले, म्हणून तिच्या निर्धाराचे कौतुक वाटते,
ती घरीच पडली आणि खुब्याचे हाड फ्रक्चर झाले, तब्येत उत्तम म्हणण्याइतकि निरोगी होती म्हणून ऑपरेट करून इंप्लान्ट करायचे ठरले.
ऑपरेशन च्या आधी तिने स्पष्ट सांगितले होते, रिकव्हरी साठी कॅथेटर वगैरे ठीक आहे, वेळ आली तर पण नाकावाटे ट्यूब नि अन्न, व्हेंटिलेतर वगैरे करत बसू नका.

अमित +१

"Being mortal" हे ह्या विषयावरचं एक अतिशय उत्तम पुस्तक आहे. त्यात साधारण "you define your own quality of life, basically what you will call your good day and make decisions accordingly", हे आहे ते अतिशय पटलं.

अतिशय ओघवतं लिखाण.
हल्लीच वेटींग नावाचा पिक्चर बघितला. "बीइंग मॉर्टल" बहुदा त्यातल्या पात्रांनीं वाचलं नसावं.

Being mortal बद्द्ल सध्या बरेच ऐकतो आहे, माबोवर
कुठे चर्चा झाली आहे का या बद्दल?

छान लिहिल आहे.
प्रतिसाददेखील चांगले आहेत.
"मला या या केसमधे रिसरेक्ट करू नका' हे सांगण्यासाठी भारतात काय डॉक्युमेंटेशन करून ठेवावं लागतं?