ही जनरेशन

Submitted by निशिकांत on 25 June, 2018 - 03:24

( बदल म्हणून एक इंग्रजी काफिये असलेली गझल. सहाजिकच गझलेत बरेच इंग्रजी शब्द येणे क्रमप्राप्त आहे )

कशी लिहावी शुध्द मराठी जाणत नाही ही जनरेशन
व्याकरणाचे फक्त पुस्तकी होते केंव्हा केंव्हा मेन्शन

शुभं करोती कुठे हरवले? हम्प्टी डम्प्टी रोज म्हणावे
भगवद् गीता, संध्या वाटे, बुरसटलेले जुने क्रिएशन

गल्लीमधला वाणी आता जुना वाटतो माल घ्यावया
वॉलमार्ट अन् बड्या मॉलशी जुळले आहे मस्त कनेक्शन

नाती बोटावर मोजावी इतकी ठाउक पाश्चात्यांना
बाकी सारे इनलॉ इनलॉ, ओलाव्याविन कसे रिलेशन?

राजा राणी कुटुंब छोटे मजेत राही परदेशी, पण
इनलॉ येता भेटायाला, डॉटर इनलॉ घेई टेन्शन

पोट भराया अन्न मिळेना चार घास खाण्यास परंतू
अमाप साठा, करावयाला कडधान्याचे फरमेंटेशन

नाक घासतो, मुजरा करतो, नकोच मर्जी खफा बॉसची
हवे प्रमोशन, हाव एवढी टेन्शनला ना मिळते पेन्शन

उजाड खेडी, बकाल शहरे, माणुसकीची जिथे वानवा
देश उद्याचा असेल कैसा, अवघड करणे इमॅजिनेशन

"निशिकांता" जर जगायचे; तर डोळेझाक करावी, अथवा
बाय करूनी जगास, स्वर्गी शोध तुझ्यासाठी लोकेशन

निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Group content visibility: 
Public - accessible to all site users