पापण्यात ओलावत असतो---( जुल्काफिया गझल )

Submitted by निशिकांत on 19 June, 2018 - 23:46

पापण्यात ओलावत असतो---( जुल्काफिया गझल )

जेंव्हा जेंव्हा सुखावणार्‍या आठवणी कुरवाळत निजतो
रात्र संपता संपत नाही, पापण्यात ओलावत असतो

भयाण एकाकीपण आता सवयीचे जाहले एवढे!
उभा राहुनी आरशापुढे, मीच स्वतःशी बोलत बसतो

तुला यायचे असेल तर ये, नसेल तर तू नकोस येऊ
तू नसशिल तर अजून कोणी, प्रवास केंव्हा थांबत नसतो

मनातले, माझा कॅमेरा, टिपतो हे कळता झालेली
धडधड, तारांबळ सभ्यानो! तुमची मी वाताहत बघतो

गतकालाची वैभव स्वप्ने खाक जाहली म्हणून आता
दिवाळखोरी वर्तमानही, आनंदे गोंजारत जगतो

मिठीत कोणी, मनात कोणी गुदमर माझा मलाच ठावे
आठवणींच्या धुक्यात तुझिया, रोज रोज रेंगाळत विरतो

पान पिवळसर आहे म्हणुनी नकात हिणवू लेखणीसही
सुरकुतलेला शायर सुध्दा ओला श्रावण शिंपत फिरतो

जरी रांगडी प्रतिमा माझी बाबा म्हणुनी जगास ठावे
मेणाहुनही मऊ आतुनी, अंधारी दुबळ्यागत रडतो

नकोस तू "निशिकांत" वाजवू व्यर्थ तुतारी चंगळवादी
धाव संपदेमागे तू अन्, मी अपुल्यांशी जुळवत रमतो

निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Group content visibility: 
Public - accessible to all site users