पाटील v/s पाटील - भाग ७

Submitted by अज्ञातवासी on 19 June, 2018 - 07:26

पाटील v/s पाटील - भाग ६

https://www.maayboli.com/node/66260

भाग ८

https://www.maayboli.com/node/66690

हुकुमराव पाटलांच्या बंगल्यावर (यापुढे याला हेडक्वार्टर म्हटले जाईल) जंगी पार्टी चालू होती.
"प्या, माझ्या मित्रानो मनसोक्त घ्या, लाजू नका, काजू घ्या. गम नको, रम घ्या. दारू पिऊन तुमचे वारू चौफेर उधळू द्या."
आणि व्यासांसहित सर्व कर्मचारीवृंद आपल्या धन्याकडे डोळे भरून पाहत होता.
एवढ्या सगळ्यांचा दारूदाता फक्त फळांचा रस घेतोय हे पाहून व्यासचे डोळे भरून आले.
"सर, घरात एन्ट्री झाली, आता पुढे काय?"
"व्यास काहीही विचारू नका, आज फक्त एन्जॉय. उद्यापासून ठरवू. एन्जॉय. "
आणि मोहन उठून बाहेर गेला.
सरांचं लक्षण काही ठीक दिसत नाहीये आज. कुणीतरी म्हणालं.
"राजा आहे हा माणूस राजा. तिकडे हा युक्रेन ला उठतो ना, १५ लोक वेगवेगळे चहाचे प्रकार घेऊन उभे असतात, कारण यालाच माहित नसतं, त्याला सकाळी उठल्यावर काय प्यावंसं वाटेल. सकाळी ब्रेकफास्ट ला स्पेशल कुक ठेवलाय यांनी, फक्त राधाबाई जे सांगतील तसं बनवायला. सकाळी याच्या मीटिंग रुममध्ये १०० लोक तरी नास्ता करतात. सगळं फ्रेश हवंय म्हणून खाण्याचे पदार्थ चार्टर प्लेनने येतात. याच्या गॅरेजमध्ये आज ५०० गाड्या आहेत, आणि २० ड्रायवर. स्वतःच्या मालकीचे ४ प्लेन, आणि जगातल्या सगळ्यात मोठ्या मोटार कंपनीत हा माणूस आज आपला माणूस सीइओ म्हणून बसवू शकतो. तो माणूस आज ड्रायवर म्हणून काम करणार असल्यावर कसं लक्षण ठीक दिसेल?" व्यास म्हणाले.
आणि सगळ्यांची नशा खाड्कन उतरली.
मोहन आपला ग्लास घेऊन बंगल्याच्या बाहेर असलेल्या मोठ्या ओट्यावर जाऊन बसला होता.
आजचा प्रसंग आठवून त्याला स्वतःशीच हसू येत होतं.
सोनी.... सोनाली.... काहीतरी होत तिच्यात.
ती आली, आणि आपण पाहतच राहिलो तिच्याकडे.
सोंदर्याच्या कुठल्याही मॉडर्न परिभाषेत ती बसत नाही. मस्त धष्टपुष्ट (जाडजूड) आहे, सावळी, गोल चेहरा, पाणीदार मोठे डोळे, नाकावर राग.
तरीही का जीव ओढतोय तिच्याकडे?
युक्रेनला कमी सोंदर्यवती नाहीत ना. निळ्या डोळ्याच्या, आरस्पानी सोंदर्याच्या.
मग का हिच्यावर जीव लागावा?

फ्लॅशबॅक.....
सोनी आत आली, मोहन तिच्याकडे बघतच राहिला.
हा कोण आगंतुक आपल्याकडे बघतोय, हे बघून ती फणकार्यात घरात निघून गेली.
"ओ महाराज, जरा धीर...जरा दम... नजरेनेच मारणार का पोरीला?"
मोहनने दचकून बघितले, जाधव आग्यावेताळासारख्या नजरेने बघत उभा होता...
"कोण आहे ही?"
"पाटील, सोनाली पाटील. अण्णांची धाकटी आणि लाडकी कन्या... हिच्या वाटेल जाऊ नकोस.... खानदानी राग आहे तिच्यात... मागच्या महिन्याचा किस्सा सांगतो."
"सांगा."
"सोनालीताई लावणीच्या क्लासला जातात. तिथे एक मजनू लावणी आवडते, आवडते, म्हणून पोरींच्या अंगचटी यायला लागला."
"मग?"
"मग एकदा सोनालीताई घुंगरू सोडत असताना, त्याने अचानक पायालाच हात लावला."
"अरे बापरे... एवढा मोठा अत्याचार?" मोहन नाटकीपणाने म्हटला.
"मग पाटलांनी त्याला मंजुळाबाईंबरोबर नाचवला."
"अरे वा. शेवटी कलागुणांना वाव मिळाला म्हणायचा."
"महाराज. नीट... मंजुळा म्हणजे आमच्या गोठ्यातली म्हैस. ढोलकी वाजली कि तिला लाथा झाडायची सवय आहे. बिचारा आता चालतो, तरी लोक नाचतोय असं म्हणतात."
"असं, एवढीच भीती वाटते तर नाचायचं कशाला? कला चार भिंतीत बांधून ठेवण्यासाठी नसते ना. कलागुणांना वाव मिळायला हवा. जागोजागी लोकनृत्याचे कार्यक्रम व्हायला हवेत. सरकारने बजेटमध्ये तशी तरतूद करायला हवी, यासाठी लोकांनी आंदोलन....?"
"खानदानी कला फक्त भिंतीतच दाखवायची असते."
मोहनने आवाजाकडे वळून बघितले. मीनलताई येत होत्या.
"जाधव हे ध्यान टिकणार नाही जास्त दिवस आपल्याकडे." त्यांनी जाधवकडे बघून म्हटले.
मीनलताई, आपल्या बहिणीच्या अगदी विरुद्ध. गोरा रंग, सडपातळ शरीर, उभट चेहरा...
"पहिला दिवस आहे बाईसाहेब, हळूहळू होईल सवय."
"हो जाधव या घराला हळूहळू होईल सवय माझी...."
मीनल हसू लागली.... तेवढ्यात...
घुंगराचा एक जोड सपकन मिनीच्या डोळ्याजवळ आला, मात्र डोळ्याला स्पर्श करण्याआधीच तो मोहनने झेलला.
"सोने, डोळा फोडते का माझा?"
सोनी तिकडून बाहेर आली... कुणाकडेही न बघता ती जाधवांकडे बघून म्हणाली...
"जाधव... पुन्हा माझ्या पैंजणांना कुणी हात लावला ना, बघा, मी तुमच्या पायात पैंजण घालेन."
मोहन तिच्याकडे बघतच होता. भान हरपून.
"पैंजण..."
काय...?
"पैंजण..."
तिने अक्षरशः मोहनच्या हातून पैंजण हिसकावून घेतले....
"सांगून ठेवते...." ती आली तशीच तरातरा आत निघून गेली.
"जाधव, कुणी हात लावला हिच्या पैंजणाला...?" मिनलने रागात विचारले.
"रुपालीताईने."
"का? काय गरज आहे? ती कशी आहे माहितीये ना तुम्हाला? अडवत जा यापुढे."
"जी मीनलताई."
मीनालताईही आत गेल्या. आणि जाधव मोहनकडे वळून म्हणाले.
"आजचा खेळ संपला. उद्या भेटू. सकाळी सहा वाजता. धन्यवाद"
जाधवही निघून गेले....
.... आणि मोहनने हळूच पैंजणातून नकळत काढलेला एक घुंगरू आपल्या डाव्या खिशात ठेवला....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद किल्ली, ममामी, मेघा, द्वादशांगुला, राव पाटील.

काही दिवस मायबोलीचा आक्सेस नव्हता. तो मिळाला. पुढचा भाग लवकरच पोस्ट करण्यात येईल.

ओ किल्ली मॅडम,
कशाला जुनी पापे उकरून काढतायेत! Wink